तो आहे.... नक्कीच आहे!!!

My Personal Experience

"ह्या देवाने माझं काही चांगलं केलं नाही... मला देव मान्य नाही... इथे ह्या मुर्त्या का आणल्यास तू? मला चीड येईल असं तू काही करतेसच का गं!" चिरंजीवांचा हा हल्ला खरं तर तिला अपेक्षितच होता.


निमित्त होतं ती नोकरी करणाऱ्या लेकाकडे काही दिवसासाठी राहायला गेल्याचं. त्याचा तीन खोल्यांचा ब्लॉक आणि त्यात एकटा जीव सदाशिव!

पण त्याच्या खाण्यापिण्याची आबाळ, नवीन नोकरीचं प्रेशर आणि विदर्भातला असह्य उकाडा!! त्यामुळे तिनं ठरवलं आणि ऑफिसमधून चांगली एक महिन्याची सुट्टी घेतली... लेकाजवळ राहण्यासाठी...

मग थोडी स्वैपाकाची तयारी केली... कुकर, कढई, दोन तीन भांडी, पातेली... शिधा -डाळ, तांदूळ, कणिक, बेसन, पोहे, रवा... मसाले -तिखट, हळद, हिंग, मीठ, गरम मसाला.... गरजेपुरतं...

आणि हो, सोबत छानश्या श्री लक्ष्मी आणि श्री बालाजीच्या सुबक आणि रेखीव पितळी मुर्त्या! थोडं पूजेचं सामान... हळद कुंकू,तेलवाती,फुलवाती,देव मांडायला एक छोटासा चौरंग,तुळशीजवळ लावायला छोटी पणती!!

तर तिथे गेल्यावर दुसरे दिवशी शुचिर्भूत होऊन तिनं डब्यातल्या लक्ष्मी-बालाजीच्या मुर्त्या काढल्या...चौरंगावर स्थानापन्न केल्या...

एव्हढ्यात तिचा लेक अंघोळ करून आला आणि त्याचा मनस्ताप सुरु झाला.

"अरे, देव कुणाचं वाईट नाही करत... आपल्या नशिबाचे भोग असतात... भोगावे लागतात." तिनं समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

" हूं!... म्हणे भोग... मी काय त्रास दिलाय का कोणाला आजपर्यंत... कधी तुमच्याकडे हट्ट केलाय का मला हेच पाहिजे अन् तेच पाहिजे म्हणून! की कधी बापाचे पैसे उधळतो मी... मग माझ्या बाबतीत का असं!

माझा चांगुलपणा, प्रामाणिकपणा तुझ्या देवाला दिसत नाही का? मला नाही आवडत देव... इथे नको ठेऊस माझ्या घरात! तिथे अमरावतीला करतेस ना तू पूजा-बीजा.. तेव्हढं पुरे आहे!"

"ह्यात माझं घर अन् तुझं घर कुठे आलं? अमरावतीचं घर पण तुझंच किनई!मग तिथे चालतं तर इथे चालवून घे ना... वाटल्यास तू ऑफिसला गेल्यावर करत जाईन मी पूजा! देव नको समजू ह्यांना हवं तर...धातूचे ठोकळे समज. पण काढून नको घ्यायला लावूस"... ती अगदी काकूळतीला आली.

"ठीक आहे... पण जाताना हे तुझ्यासोबत घेऊन जा!" त्यानं अगदी निर्वाणीचं सांगितलं.अन् ऑफिसला निघून गेला.

ती विचारात पडली... तिच्या लेकाचा त्रागा काही चुकीचा नव्हताच. अत्यंत हुशार मुलगा... दहावीत 94 अन् बारावीत 80 टक्के मिळवून इंजिनिअर झालेला..! पण मनासारखी नोकरी नाहीच मिळाली. शेवटी तडजोड म्हणून एका खाजगी बँकेत नोकरी जॉईन केली ... मनाविरुद्ध! आणि हा सगळा राग, फ्रस्ट्रेशन काढायला हक्काची जागा.. त्याची आई आणि "तो" तिचा देव!!

तो ऑफिसला निघून गेला खरं पण आईचा जीव टांगणीला लावूनच! आता घरात मांडलेले देव उचलून ठेवावे तरी पंचाईत आणि नाही तर देव मांडलेले पाहून लेकराला होणारा असह्य मनस्ताप!!!

तिनं थरथरत्या हातानं देव उचलून डब्यात ठेवण्याचं धाडस केलं खरं पण न राहावून पुन्हा ते जागेवर मांडले. हताश होऊन देवाला हात जोडले.

"असा कसा रे देव तू... माझ्या मुलाच्या घरात जागा मिळवू शकत नाहीस, हा कालचा पोर तो तुला घरातून काढू पाहतो आणि तरीही तू काहीच करू शकत नाहीस. मला तर आता तुझ्या अस्तित्वावर शंका यायला लागलीये. खरंच तू आहेस की नाहीस... तुझं अस्तित्व आहे की नाही.... का उगाच मी विश्वास ठेवून तुझी पूजा-प्रार्थना करतेय!!!माझी श्रद्धा व्यर्थ आहे असंच वाटतंय आता!"
तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले.

दिवसभर ती अस्वस्थ होती. येता जाता देवाच्या मूर्तीकडे पाहून हात जोडत होती. लेकराच्या अपराधाबद्दल क्षमा मागत होती .

संध्याकाळी मुलगा घरी आला. तो सकाळचा वाद विसरला होता. तिला तेव्हढंच बरं वाटलं. आपला मुलगा अस्वस्थ असेल, अशांत असेल तर कोणत्या आईला आवडेल?

रात्री जेवणं आटोपली. झोपेसाठी बिछाना घातला. दिवसभराच्या विचारांमुळे तिला लगेच झोप लागली. मुलगा मात्र सवयीप्रमाणे आडवा पडून मोबाईलशी चाळा करत होता.

अचानक तो ताडकन उठून बसला. मोबाईलवर काहीतरी खटपट करू लागला. त्याच्या हालचालीमुळे तिची झोप चाळवली.

"काय झालं रे बाळा! किती वाजले?" तिनं डोळे किलकिले करत विचारलं.

" पावणे बारा झालेत....मी मागे दोन वर्षांपूर्वी एक परीक्षा दिली होती बघ... नागपूरला... ती क्लिअर केलीये मी. आता मुख्य परीक्षेचा call आहे. Mail आलीये..तीच check करतोय."

"अरे व्वा! कधी आहे रे मेन्स?" तिनं उत्सुकतेनं विचारलं. ह्यावेळी तरी लेकराला यश दे रे बाबा! होऊ दे त्याच्या मनासारखं... मिळू देत त्याला मनासारखी नोकरी!" तिनं मनातल्या मनात गाऱ्हाणं मांडलं.

"परीक्षा 13 जून ला आहे आणि ह्यावेळेस परीक्षेचं सेंटर आंध्रप्रदेशात आहे गं आई... तिरुपतीला!"

तिला वाटलं नक्कीच हे स्वप्न! दिवसभर बालाजी महाराजांना हात जोडले म्हणून तिरुपती तिरुपती ऐकू येतंय... तिनं स्वतः झोपेत नसून पूर्ण जाग असल्याची खात्री करून घेतली.

"हो ss बघू बघू... ती उत्सुकतेनं त्याच्या मोबाईलमध्ये डोकावली तसा त्याने तो mail तिला फॉरवर्ड केला. तिनं तो mail पुन्हा पुन्हा वाचत खात्री करून घेतली अन् तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.

"भगवंता! तुलाच रे बाबा काळजी आमची! माझ्या लेकरावर राग नाही धरलास तू" ती धावतच देवघरात गेली.

श्री बालाजींची मूर्ती तेजाने झळकत होती.. जणू म्हणत होती "त्याला मी नकोय ना इथे त्याच्या घरी... तर बघ त्यालाच बोलावलंय तिरुपतीला... मला भेटायला!" तिच्या शरीरावर रोमांच उभे राहिले.


सकाळी मात्र मुलगा म्हणाला -"इतक्या दूर पाठवाल का मला फक्त परीक्षेसाठी!"

"का नाही?" आपण तिघंही (आई-बाबा-मुलगा) जाऊया. बालाजी महाराजांचं दर्शन होईल. त्यांनी बोलावलंय तर जायलाच लागेल." तिचा उत्साह ओसंडून वाहत होता.

"आजची 1 तारीख आहे. आपल्याला 11 तारखेला निघावं लागेल...12 ला तिथे पोहचणार आणि 13 ला सकाळी परीक्षा! रेल्वेचं रिझर्वेशन मिळेल का? शिवाय तुझा पन्नासावा वाढदिवस आहे 12 तारखेला. माझ्या परीक्षेमुळे बर्थडे सेलिब्रेशन राहून जाईल. काय करायचं?"

आता चकित होण्याची पाळी तिची होती. ह्या सगळ्या गडबडीत तिचा पन्नासावा वाढदिवस 12 जूनला आहे हे
ती विसरलीच... पण बालाजी महाराज नव्हते विसरले. त्यांनी दर्शन देण्यासाठी आवर्जून तिच्या वाढदिवसाचा दिवस निवडला होता.. आणि त्यादिवशी द्वादशी होती!!!

वाढदिवसाच्या दिवशी... ते ही पन्नासाव्या वाढदिवसाच्या दिवशी द्वादशी सारख्या शुभ तिथीला अनपेक्षितपणे तिरुपतीची यात्रा घडणार ह्यापरते सौभाग्य ते काय!!!

हे सगळं मुलाला सांगितल्यावर त्यानं विचारलं..."म्हणजे तू आणलेली देवाची मूर्ती बालाजींची आहे?"

तिनं घश्यात आलेला आवंढा गिळत रुद्ध कंठाने होकार दिला. आता त्याचाही विश्वास बसला की "देव आहे आणि त्याचं माझ्याकडे लक्ष आहे,त्याला माझी काळजी आहे ."

"आणि देवाचं लक्ष ज्यांच्याकडे असतं त्यांचं सगळं चांगलंच होणार" तिनं लेकराला जवळ घेतलं.

श्री बालाजींचा वरदहस्त असल्यावर रेल्वेच्या आरक्षणापासून ते बालाजींच्या दर्शनापर्यंतची सगळी व्यवस्था अर्थातच अगदी चोख होणारच होती!

तिरुपतीला झालेल्या तिच्या मुलाच्या परीक्षेचा निकाल अजून लागायचा आहे. पण श्री बालाजी महाराजांच्या छत्रछायेत "जे होईल ते चांगलंच होईल" असा तिला ठाम विश्वास आहे!!!