आम्ही बाई वॉकिंगला जातो!

Story of a walking women group


गोष्ट छोटी डोंगराएवढी (२०)

विषय - विनोदी लेखन - हसा व हसवा

शीर्षक -आम्ही बाई वॉकिंग ला जातो!

©®लेखिका- स्वाती बालूरकर , सखी


संध्याकाळची वेळ होती.
नव्यानेच कॉलनीत राहायला आलेली अंजनी बाजूच्या फ्लॅट मधल्या पूनमसोबत फिरायला निघाली.
बाहेर पडली तर पाहते की एक एक जणी येत गेल्या आणि सार्वजनिक इवनिंग वॉक आहे की एखादा मोर्चा वगैरे निघाला असं वाटलं.


बरं आमचा छान वॉकिंग ग्रुप आहे असं तिला सांगण्यात आलं होतं. . .

बायकांचे सगळे ग्रुप असू शकतात उदाहरणार्थ योगा ग्रुप ,कॉलेज ग्रुप ,क्लासमेट ग्रुप , शॉपिंग ग्रुप ,जिम ग्रुप, किटी ग्रुप, खादाड ग्रुप(भुक्कड उर्फ हॉटेलिंग ) (अजूनही बरेच माहित आहेत पण नको, जरा जास्तच वाटेल)

पण वॉकिंगचा ग्रुप कसा असू शकतो ? याच कुतुहलापोटी अंजनी पूनमसोबत आज बाहेर पडली होती.

बरं एकानंतर एक जणी भेटत गेल्या आणि मग कुठपर्यंत व कितीवेळ वॉकिंग करायची याच्यावर अगदी थोडावेळ म्हणजे १५ एक मिनिट चर्चा झाली.

मग तो मोठा मोर्चा ग्रुप वॉकिंग ला सज्ज झाला तर आपोआप ३-४ महिलांचा असा एक याप्रमाणे एक ४-५ ग्रुप तयार झाले.

बरं घरातल्या अवतारात कुणीच नव्हतं , म्हणजे पंजाबी ड्रेस सारख्या साधारण फडतूस वेशात फक्त अंजनीच आली होती.
बाकीच्या सगळ्या जणी खरच हाय फाय होत्या. पोटावरच्या चरबीला किती मुश्किलीने टीशर्ट मधे बंदिस्त केलं होतं. काहीजणींनी घातलेल्या ट्रॅकपँटस किंवा स्लॅक्स जणु त्या शिलाईची परीक्षा पहात होत्या. काहीजणी अगदीच छान व मस्त जिम गेट अप मधे होत्या.
बरं शूज सॉक्स व ते पण ब्रॅण्ड चे यावर ही विशेष चर्चा होती शिवाय जे पण ज्यांच्याकडे नाहीय ते आणण्यासाठी  ही एक शॉपिंगचा प्लान बनत होता.
अंजनी नवीन असल्या कारणाने फक्त ऐकत होती व पहात होती. चुकुन कुणी विचारलं तर पूनम पटकन सांगून टाकायची "ये मेरी नयी पडोसन है!" मग अंजनीला ते पण बोलण्याची संधी मिळाली नाही.


वॉक सुरू झाला.


सोसायटी कडून मागच्या मोकळ्या ग्राउंड पर्यंत च्या पट्ट्यावर चालायचं.


अंजनीला यापूर्वी वाकिंगची सवय होती व एकटीच ब्रिस्क वॉक करायची. आज ती मिरवणुकीत चालल्याप्रमाणे  चालली तरीही ती सर्वांच्या पुढेच चालली होती कारण प्रत्येक ३-४ बायकांचा ग्रुप हा काही ना काहीतरी महत्वाच्या विषयांवर चर्चा करत होता. त्यामुळे जिभेच्या गतीपुढे पायांनी हार पत्करली होती. त्यातही आजूबाजूंच्या श्रोत्यांनी व प्रेक्षकांनी दाद दिल्या शिवाय टॉपिक कळणार कसा?
मागून पहिल्या ग्रुप च्या सोबत चालू लागली होती कारण पूनम तिथे होती. तर डिंपल सांगत होती," यार एकदा आपण विकेंडला सगळ्याजणी बसू आणि या नवरे मंडळींना दाखवूनच देवू की पार्टी आम्हाला पण करता येते.
"बसू म्हणजे?" अंजनीने न राहवून विचारलं.


पूनमने दबक्या आवाजात सांगितलं, " अगं एवढं सुद्धा कळालं नाही , म्हणजे तुझा नवरा घेत नाही की काय?"
"म्हणजे दारूऽ" अंजनीने तोंड वासलं त्यात ४ पाणीपुरी किंवा एक चीज बर्गर सहज मावला असता.
पूनमने दटावलं. " दारू काय यार ? डोण्ट बी ओल्डफॅशन अंजनी, ड्रिंक्स म्हणायचं."


"ओह ओके. म्हणजे तुम्ही सगळ्या ड्रिंक्स पण घेता. . . ?"
"अगं आम्ही काहीजणींनी टेस्ट केलीय पण ही डिंपल मात्र घेते बरं नवर्‍यासोबत. . . आणि इथल्या काहीजणींना घ्यायला आवडत नाही पण त्याच्याबद्दल बोलायला आवडतं."


आता मात्र अंजनीच्या हळू चालण्याचं पेशंस संपला व तिने गति वाढवली.


पुढच्या ग्रुपमधे प्रत्येकाची ननंद हा गरमा गरम टॉपिक होता. नणंद हा किती त्रासदायक प्राणी आहे, सासू कसा दुजाभाव करते, व तिची मुलं कशी सतावतात वगैरे.
अंजनीला वाटलं की या कुणालाच भाऊ नसावा बहुतेक! कारण यांना भाऊ असला तर नक्कीच यांच्या भावजया व वहिन्यापण असंच काहीतरी बोलत असाव्यात.


गप्पातला रस पाहता वॉकिंग होतीय असं वाटेचना.


मग थोडी गति वाढवली तर पुढचा ग्रुप चालायचा मग थांबायचा मग चालायचा. विषय गरम झाला की गति कमी व्हायची व विषय थंड झाला की गति वाढायची. इथला विषय होता "माझी सासू"
किती व्यथा किती कथा! या विषयावर जगातलं सर्वात जास्त व मनोरंजक साहित्य लिहिलं जावू शकतं. तुझी तर काहीच नाही माझी तर ना. . . ! अशा कॅप्शन ने विषय सुरू व्हायचा अन मग त्याला अंतच नाही.

अंजनीने  आता गति वाढवली व सगळ्यात पुढच्या ग्रुप सोबत चालायला लागली.


इथला विषय होता आमचे हे किंवा माझा नवरा!
" काल काय झालं माहित आहे का ? आमच्या यांनी नाही का . . "
बस्स आता अंजनीला काहीच रस वाटेना. तिने आपल्या प्रतीने जमेल तशी वॉकिंग केली . मधेच दोघी दोघी बोलताना दिसायच्या , त्यांचा एक साईड टॉपिक होता की कुणाचं कुठं अफेअर चालू आहे किंवा कुणाची काय भानगड होती वगैरे!


साधारण दोन -अडिच किलोमीटर चालून झालं असेल तेव्हा अंजनी परत निघाली.


शेवटचा ग्रुप जिथे तिची शेजारिण पूनम होती तिथे आली व म्हणाली की" मी निघते."
पूनम म्हणाली, " अगं इतक्या लवकर ? आम्ही तर बाई अगदी दोन तास वॉकिंग केल्याशिवाय
थांबत नाही , आणि मग वॉकिंग झाल्यावर बसून एक अर्धातास तरी गप्पा मारतो बाई, त्याशिवाय रिलॅक्स वाटत नाही. ठीक आहे आज पहिलाच दिवस ना ! ओके. ठीक आहे.!"


अंजनी परत निघाली व विचारात पडली की \"मी तरी दोन -अडिच किलोमीटर चालले पण या बायका तर एक - दीड किलोमीटर पण चालल्या नसतील. या गतीने चालल्या तर ती पोटाची लटकलेली चरबी कशी कमी होणार होती?

२० मिनिट म्हणजे शून्य वॉकिंग असते हे मान्य करून ती ४०-५० मिनिटं चालायची. पण या बायका जर दोन तासात एक - दीड किलोमीटर चालत असतील तर ? हा वॉकिंग ग्रुप आहे की टॉकिंग ग्रुप आहे ?"


यापेक्षा बिल्डिंग च्या गच्चीवर एकटीने केलेली वॉकिंग बरी. कारण डिंपल म्हणाली होती की प्रॉपर जॉगिंग सूट आणून घे उद्या. त्याला खर्च कोण करणार?
आईसारखी प्रेमळ सासू , मैत्रिणीसारखी असलेली लाडकी नणंद व मेहनती समजूतदार नवरा असताना तिच्या सारख्या आनंदी गृहिणी ली मुळी अशा वॉकिंग ग्रुप ची गरज आहे का ? हा विचार मनात डोकावला.

काय म्हणता ? तुम्हाला काय वाटतं? अंजनीने कंटिन्यू करावी का ही वॉकिंग ?

©® लेखिका- स्वाती बालूरकर , सखी
दिनांक २०. ११ .२२


फोटो - गूगलवरून साभार!