Login

हो मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय

Are We Following the Values which are Passed to us by Savitri Bai Phule
ओळखलंत का मला?
हो मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय,
एरवी मी बोलले नसते , माझ्या विचारांचे घोटून घोटून क्रीम बनवले आहे , मला फोटो फ्रेम मध्ये बसवून देव बनवले आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी माझे सोयीनुसार कौतुक करता , मला देवासारखे गृहित धरता,हे सारं सहन होत नाही,म्हणून आता मन मोकळं करते ,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.

आम्ही पहिली शाळा उघडली,म्हणून उपकार नाही केले ,पण आज जे काही चालले आहे ते पाहून मन पिळवटते,तुमच्याच भाषेत सांगायचं तर रात्रंदिवस झटलो होतो , शिवीगाळ,शेणाचा मारा यासाठी सहन केला नव्हता , त्यावेळी पुढं काय होईल हा विचार कधीच केला नव्हता ,आता शाळा उघडल्या जातात , तुम्हाला काही करण्याची गरज नाही, शिक्षण तुम्हाला फुकटात मिळत आहे ,त्याची आजच्या पिढीला जाण नाही ,म्हणून तर ते स्त्री स्वातंत्र्याला स्वैराचार समजत आहे ,माझ्या लेकी व्यसनाधीन होत आहे ,हे सगळं सावरलं पाहिजे ,म्हणून मला तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटते, माझ्या एका बाहुलीने शाळेत शिकण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, तिने शाळेत येऊ नये म्हणून त्या नराधमांनी तिच्या लाडूत काचेचा चुरा टाकला,माझ्या त्या बाहुलीची आतडी न आतडी फाटली ,पण आम्ही काहीच करू शकलो नाही,पण अजूनही वेळ गेलेली नाही ,सावरा स्वतःला , आपण समाजाचं देणं लागतो,हे ओळखा.शाळा कॉलेजात nss च्या अंतर्गत ज्या माझ्या लेकी समाजासाठी काम करतात ,आपण समाजाचं देणं लागतो याची जाणीव त्यांना आहे ,ह्या आहे माझ्या लेकी , सावित्रीच्या लेकी.

माझं लग्न नवव्या वर्षी झालं, त्यावेळी बालविवाह होत होते,अगदी पोटात असतानाही काळा टिका लावून लग्न व्हायची, मला कधी कधी हेवा वाटतो तुमचा, तुम्ही तुमचं करीअर मनाप्रमाणे करता ,हव्या असलेल्या मुलाशी लग्न करता आणि ते ही वयाच्या 30 व्या वर्षी, यावेळी मातृत्वासाठी तरसता, डिप्रेशन मध्ये जातात, आई न होण्याचं दुःख काय असते,हे माझ्या पेक्षा जास्त कुणीच समजू शकत नाही, पण त्या काळात आम्ही यशवंताला दत्तक घेतले,रडत नाही बसलो ,तुम्ही तर एवढ्या मोकळ्या वातावरणात वाढलेल्या, शिकलेल्या, सत्य स्वीकारा , घ्या एका अनाथाला दत्तक आणि करा त्याला सनाथ,मग मी अभिमानाने म्हणू शकेन ह्या आहे माझ्या लेकी , सावित्रीच्या लेकी.

सनातन्यांनी आमच्यावर बहिष्कार टाकला,पण तरी आम्ही सती जाणे,केशवपन यांचा विरोध केला,विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, कारण आमची लढाई ही विचारांशी होती ,ना की कुण्या एका व्यक्ती बरोबर. मला हे सांगताना खूप खेद वाटतो की, आजही एखादया विधवेने पुनर्विवाह केला तर आपणच आहोत ,जे तिच्या बद्दल वाईट बोलतो,आजही त्यांना पवित्र कामात सहभागी करून घेतले जात नाही ,हळदी कुंकु समारंभाला बोलवत नाही, ज्या माझ्या लेकी या गोष्टीचा प्रखरपणे विरोध करतात,त्या आहे सावित्रीच्या लेकी.

आज जातीच राजकारण बघून मन सुन्न होतं, निवडून येण्यासाठी केलेलं थोतांड आहे, आपणच आपल्या लोकांशी भांडत आहोत ,आम्ही ह्या विचाराने नव्हती केली सत्यशोधक समाजाची चळवळ उभी, आम्ही जात धर्म कधी बघितला नाही , दलितांसाठी हौद खुला केला,सर्व धर्माच्या मुलींना शिक्षण दिले , विधवांना, अनाथांना आसरा दिला, आम्ही घरातून बाहेर पडल्यावर आम्हाला साथ देणारे उस्मान शेख आणि फातिमा बेगमच होते , त्यावेळी लोकं शिकलेली नव्हती,आता तर तुम्ही साऱ्या सज्ञान आहात, पुढच्या पिढीला धर्म निरपेक्ष पणे राहायला शिकवा, जातीच राजकारण करण्यापेक्षा, विकासाचं समाजकारण करा, आपल्या मतांवर ठामपणे उभ्या रहा ,त्या आहे माझ्या लेकी, सावित्रीच्या लेकी.

आज जर वृद्धाश्रमातील परिस्थिती पाहिली ,तर मन खूप व्यथित होते , यासाठी नव्हता केला आम्ही एवढा अट्टाहास, आजच्या मुलींना माझं एवढंच सांगणं आहे, नवीन विचारधारेच्या इतक्या आहारी जाऊ नका की आपल्याला ज्यांनी जन्म दिला त्यांनाच विसराल, हे ही लक्षात ठेवा तुम्ही ही कधी तरी म्हातारे होणारच आहात , हे त्रिवार सत्य आहे ,जे तुम्ही झिडकारू शकत नाही. ज्या लेकी जपतील आईबापाला,सासू सासऱ्यांना, जपतील आपल्या संस्कृतीला त्याच माझ्या खऱ्या लेकी, सावित्रीच्या लेकी.

माझे आणि शेठजींचे विचार कधीच वेगळे नव्हते ,ते एकमेकांस नेहमी पूरक होते, माझ्याशिवाय त्यांचं आणि त्यांच्या शिवाय माझं आयुष्य निरर्थक होतं,नवरा बायको दोघांनी एकमेकांचा आदर करा, एकमेकांच्या विचारांचे समर्थन करा ,मग कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही ही क्रांती सूर्य आणि क्रांती ज्योती सारखे तळपत रहाल.

जय ज्योती जय क्रांती.