" ये ग ये ग गाई बाळाला दुधू देई, बाळ माझं झोपी जाई, तान्हूलं ग माझं छकुलं!!"
रेवा आपल्या तान्ह्या बाळाला झोका देत होती. तिचा तान्हूला आता तीन महिन्याचा होत आला होता. खरंतर बाळाच्या जन्माच्या वेळी थोडे कॉम्प्लिकेशन्स झाले होते म्हणून बाळ व बाळंतीनीला वातावरणाचा त्रास होऊ नये म्हणून सव्वा महिन्यातच तिच्या नवऱ्याने तिला सासरी येण्यासाठी हट्ट धरला. रेवाचे माहेर इगतपुरी होते. पहिल बाळंतपण हे नेहमी माहेरी होते अशी रीत असल्याने तिला तिच्या सासूबाईंनी सातव्या महिन्यातच माहेरी धाडले होते.
रेवाचा दिनक्रम बाळासोबत अगदी छान चालू होता. पण आता बाळ तीन महिन्याचे होत आले होते तरीही रेवा घर कामात चाल ढकल करते, सारखे बाळाला कुरवाळत असते, त्यामुळे पूर्वीसारखी तिची चपळाई राहिलेली नाही अशी गाऱ्हाणे तिच्या सासूबाईंनी सर्वांकडे सांगण्यास सुरुवात केली. किंबहुना रेवालाही अगदी प्रकर्षाने, टोचून बोलल्यागत सासुबाई सतत हिनवू लागल्या.
खरंतर नवीन बाळंतीणीला सुरुवातीची काही दिवस आरामाची सक्त गरज असते. पण सव्वा महिन्यातच सासरी आल्यामुळे रेवाची बाळ आणि घरातील कामे यांच्यामध्ये खूप कसरत होत असे. कधी कधी तर ती एकदम हतबल होत असे. कारण सासूबाई बऱ्याचदा हिच्याकडून आता काम होत नाहीत घरातली बरीच कामे मलाच करावी लागतात, असे आल्या गेल्यांना म्हणू लागल्या.त्यामुळे नातेवाईक सुद्धा तू अताजरा चपळ हो बाई असे तिला तोंडावर म्हणू लागले. रेवाला मनोमन प्रश्न पडायचा की खरंच मी घरात काहीच काम करत नाही?
छोट्या नातवाला तिच्या सासूने कधी अंगा- खांद्यावर खेळवले नाही की कधी त्याला न्हाऊ घातले नाही.पण रेवा मात्र तिच्या इव ल्याश्या पिलामध्ये रमून जायची आणि मग तिच्या मनातील राग द्वेष क्षणात नाहीसा होत असे. नवरा सुद्धा तिला मदत करण्यास नकार द्यायचा.आता ही जबाबदारी केवळ तुझीच आहे असे बोलून तो मोकळे व्हायचा.ती मनोमन खूप दुःखी व्हायची .पण पुन्हा आपल्या बाळासाठी सावरायची.
दिवाळीचा दिवस होता.रेवा नेहमीपेक्षा जरा लवकर उठली.तिने उठून,छान स्नान करून अंगण स्वच्छ केले,आणि रांगोळी काढायला घेतली. बाळ रात्री जरा किरकिर करत होते म्हणून ते उशिरा झोपले आणि लगोलग उठले सुद्धा.त्याचा रडण्याचा आवाज ऐकून रेवा तशीच उठली आणि त्याला जवळ घेत शांत करू लागली.
तोच सासूबाई बरसल्या, " काय बाई आज तर दिवाळीचा दिवस! तरीही रेवा मॅडम बाळाला जरा सुद्धा सोडायला तयार नाहीत.याला म्हणतात,कामातून पळवाट काढणे,कामचुकार कुठली!"
रेवाचा राग आता विकोपाला गेला.
" हो आहे मी कामचुकार! मला इतर कामांपेक्षा माझे बाळ प्रिय आहे,असे तुम्हाला म्हणायचे आहे ना? तर हो मला माझे बाळच जास्त महत्वाचे आहे.काय हो तुम्ही बघताच ना माझी किती धावपळ होते ते. मग बाळ झोपल्यावर मी माझ्या वाट्याची कामे करेन की! तुम्ही जर सर्वच कामांची विभागणी केली तर छान होईल ना सगळं. कोण्या एकीवर लोड येणार नाही आणि मग तुम्हाला सगळीकडे मलाच जास्त काम करावे लागते,असे सांगावे लागणार नाही. असे केल्यावर वेळच्या वेळी कामे पूर्ण होतील.जरा तुम्ही मला साथ दिलीत तर बिघडले कुठे? उगाच माझ्याबद्दल इतरत्र काहीही बोलण्यापेक्षा एकमेकींना आपण विश्वासात घेतले तर घरात रोज होणाऱ्या या कटकटी थांबतील .म्हणून स्पष्टच बोलते माझ्याकडून आता बाळ झोपल्यावर च कामे होतील कारण त्याला मीच पूर्ण दिवस सांभाळते.मग भलेही मला तुम्ही किंवा कोणीही कामचुकार म्हंटले तरीही मला काहीही फरक पडणार नाही."
रेवाच्या सासूबाई जरा दचकल्याच.त्यांनी रेवाचे हे रौद्र रूप पहिल्यांदाच पाहिले होते.क्षणात सासूबाईंना आपली चूक उमगली.त्यांनी त्वरित कामांची विभागणी केली आणि आपल्या नातवालाही आजीची माया देऊ लागल्या.
खरच आईपण अनुभवताना बऱ्याच जणींना या प्रसंगातून जावे लागते.म्हणून वेळीच मर्यादा राखत आपली घुसमट व्यक्त केली तर नक्कीच कुटुंबात प्रेम आणि जिव्हाळा टिकून राहू शकतो.म्हणून आपल्या वाटेचे प्रेम ,आदर मिळत नसेल तर तो स्पष्ट बोलून मिळवण्यात काहीही वावगे नसते,असे मला वाटते.
तुम्हाला सुद्धा हेच वाटत ना?
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
फोटो : साभार गूगल
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा