Nov 30, 2021
प्रेम

ये तेरा घर ये मेरा घर

Read Later
ये तेरा घर ये मेरा घर

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

ये तेरा घर ये मेरा घर

   एक आटपाट नगर होतं. त्यात ही दोघं राहायची. ती आणि तो. सुखाचा संसार सुरू होता दोघांचा. संसारवेलीवर दोन फुलसुद्धा होती बरं का. आणि एक दिवस काय झालं माहितीये....
   तो  खूप दिवसांनी लवकर घरी आला. पाण्याचा ग्लास हातात देत ती म्हणाली,
"लवकर आलाच आहेस तर चल न कुठे तरी जाऊ. फिरायला किंवा शॉपिंग, एखादा मूव्ही बघायला. येताना डिनर बाहेरच घेऊ. मुलं येतीलच आत्ता शाळेतून. खूप खुश होतील बघ. खूप दिवसात गेलोच नाही कुठे आपण."

"झालं? एक दिवस लवकर घरी आलं तर लगेच झाली सुरू. पैसे खर्च करायचे म्हटलं की एका पायावर तयार. पैसा काय झाडाला नाही लागत. थोडं नं, कमवून बघ . अन् मग खर्च कर हवा तसा. सगळं कष्ट न करता मिळतं ना. काही किंमतच नाही. बाहेर जायचं म्हणे. घरात बसून काय जातं बोलायला." चिडून बॅग आपटून तो आत गेला.
 

ती पण त्याच्यामागे जात, "नाही जायचं तर सरळ नाही म्हणायचस ना. एवढं चिडून बोलायची गरज नव्हती."

"आता तू ठरवणार, मी कस बोलायचं ते. माझं घर आहे मी हवं तसं बोलेन, हवं तसं वागेन. It's none of your business."

"तुझं घर? आणि माझं काहीच नाही का?" ती पुटपुटली.
भांड्याला भांड लागलं, शब्दांनी शब्द वाढले, खूप कडाक्याचे भांडण झाले दोघांमध्ये.
"निघून जा इथून..... कुठेही जा..... मला तुझं तोंड पहायची मुळीच इच्छा नाहीये. तसही करतेस काय तू ,या घरासाठी, माझ्यासाठी?" त्याच्या तोंडून निघून गेलं.
तिनी पण तावातावाने बॅग भरली. मुलं शाळेतून आली तशी लगेच निघाली. त्यानंही तिला अडवायचे कष्ट घेतले नाही, साधं विचारलं सुध्दा नाही की कुठे जातेय.

ती-आईकडे

"अगं, म्हणून काय लगेच घर सोडून यायचं. जवाईबापू कोणत्यातरी टेंशनमध्ये असतील. ते चिडले तर तू नको का सावरून घ्यायला."

"आई, तुला नाही माहिती गं किती बोलला तो. म्हणे मी काहीच नाही करत घरासाठी, त्याच्यासाठी. वेळच तर मागितला होता मी."
" बरं मी काय म्हणतो, आलीये लेक कधी नाही तर माहेरपणाला, तर राहू दे की. नाही तर कधी ये म्हटलं तर हिच्यामागे लेकरांची शाळा, नवऱ्याचं ऑफिस. राहू देत आता थोडं सवडीने. दोन चार दिवसात निवळेल सगळं. नाही तर आपण आहोतच की, समजावून सांगू दोघांना."
"तुम्ही म्हणता तेही बरोबरच आहे. चला रे मुलांनो, उकडपेंडी खाता का?" मुलांची आजी मागे जात म्हणाली.

इकडे-तो

गेली लगे निघून. जाईना का कुठे मला काय त्याचं. मी कुठे चुकीचा बोललो. आता कसं शांत वाटतंय घर. नाही तर सारखं मागे तुणतुणे सुरूच. विचारांच्या तंद्रीत कधी झोप लागून गेली त्यालाही नाही कळलं. उठला तेव्हा बेडरूममध्ये अंधार वाटत होता. खिडकीचे पडदे बाजूला केले तर कळत नव्हतं सकाळ आहे की संध्याकाळ. मोबाईलमध्ये 6.55 PM दिसलं. उठून बाहेर आला. कॉफी बनवायला दूध गॅसवर ठेवलं अन न्युज पाहत बसला. अर्ध्या तासाने आठवलं दूध गॅसवर ठेवलं होतं म्हणून. तो पर्यंत बरच दूध उतू जाऊन उरलेल्या दुधाची आटून बासुंदी झाली होती. भूक लागली होती, पोळी डब्ब्यात दोन-तीन पोळ्या होत्या अन फ्रीजमध्ये भाजी. वाढून घेतलं तर खायची इच्छाच नव्हती. खरंतर घर त्याला खायला उठलं होतं.
   दुसऱ्या दिवशी उठायला उशीर झाला. अलार्म लावून झोपणे ही गोष्ट तो इतक्या वर्षात विसरला होता. घाईघाईने ऑफिसची तयारी करून निघून गेला. संध्याकाळी घरी आल्यावर सवयीप्रमाणे बेल वाजवली. पण दरवाजा कोण उघडणार? कुलूप उघडून आत येताना बाहेर ठेवलेल्या दुधाच्या पिशव्या दिसल्या. घरात येऊन दुध तापवायला ठेवलं तर नासलं. कालच्या खरकट्या भांड्यांचा वास सुटला होता. मोठ्या कष्टाने त्यानं कसंबसं आवरलं सगळं. जेवण बाहेरून ऑर्डर करू असं ठरवून mails चेक करत बसला. अकरा कधी वाजले कळलंच नाही. हॉटेल्सची होम डिलिव्हरी बंद झाली होती. स्वयंपाक घरात शोधाशोध केली तर एका डब्यातले चिवडा लाडू कामी आले.

   कसेबसे दिवस पुढे ढकलणे सुरू होते. दोन-चार दिवस असेच गेले. पण प्रेमावर अहंकाराचा विजय होत होता. चूक कळत होती पण अहंकार ती मान्य करू देत नव्हता.
  

   इकडे ती- "झाले नं आता तीन-चार दिवस. पण हा काही सॉरी म्हणायचा नाही. मी पण नाही म्हणणार. प्रत्येक वेळी मीच नमतं घेते. पण यावेळेस नाही. मी निघाले तर साधं जाऊ नकोस असं सुध्दा म्हटला नाही. कुठे आहे मी, लेकरं कशी आहेत, साधी लेकरांची चौकशीसुद्धा नाही. माझं घर म्हणे. बस आता सांभाळत एकटा." आईने आवाज दिला तशी ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली.

 

   एक दिवस पहाटेच बेल वाजली म्हणून तो उठला.
"कोण पाहिजे?"

"मी दूधवाला, पैसे पाहिजे होते. ते दहा तारीख आली आज. अन् काम होतं पैशाचं. तसं वहिणीसाहेब उशीर नाही करत पैशाला."

"किती झाले?"
"ते वहिनीसाहेबांना माहिती. दूध पाहिजे तसं कमी जास्त घेत राहतात त्या."
"त्या गावाला गेल्यात. पंधरा-वीस दिवस तरी नाही यायच्या अजून. तू एक काम कर, घरी जा आठवून हिशोब कर अन उद्या ये पैसे न्यायला?"
"बर, उद्या येतो मी."
तो आवरून ऑफिसमध्ये निघाला, आता बाहेरच्या खाण्याचा कंटाळा आला होता. पण तिच्यावाचून काही अडत नाही हे सिद्ध करायच होत नं त्याला.

   दुसऱ्या दिवशी परत बेल वाजली म्हणून तो उठला. परत दूधवालाच.
"साहेब मी काल केला होता फोन वाहिनीसाहेबांना. स्वयंपाकघरात कॅलेंडरच्या मागच्या महिन्याच्या पानावर लिहिलेला आहे म्हणे हिशोब. तेवढा पाहून पैसे द्या. पोरीची फीस भरायची आज, शेवटचा दिवस आहे."

"बरं".  'काय कटकट आहे, अस कॅलेंडवर लिहितं कोणी हिशोब! शुद्ध मूर्खपणा आहे सगळा.' असं मनातल्या मनात म्हणत तो आत गेला.

   कॅलेंडरवरचं मागच्या महिन्याचं पान उघडलं. वरच्याच बाजूला दुधाचा हिशोब लिहिलेला होता. अजून बरच काही होत लिहिलेलं. काय लिहून ठेवलंय ते पाहू तरी म्हणत त्याने एक एक वाचायला सुरुवात केली. रोज दुधाचे किती पॅकेट्स घेतले, भांड्यावाल्या बाईचा हिशोब, कपडे इस्त्रीसाठी कधी आणि किती नेले, इस्त्रीवाल्याचा हिशोब, गॅस लावल्याची नोंद, मुलांचे प्रोजेक्ट्स, युनिट टेस्ट, पॅरेंट्स मीटिंग, वाण-सामानाची यादी, गाडीत कधी आणि किती रुपयांचं पेट्रोल टाकलं, नातेवाईक, मित्र मैत्रिणी यांचे वाढदिवस, भिशी, मुलांच्या स्कूल बसचे पैसे, शाळेची फीस, लाईट बिल, पाणी बिल अशा कितीतरी गोष्टी होत्या.आणि सगळ्यात शेवटी, तो जी दर महिन्याला एक रक्कम घर खर्चासाठी द्यायचा त्यातून किती खर्च झाले अन् किती बाकी याचा हिशोब.

   एक परफेक्ट मॅनेजमेंट दिसून येत होती या सगळ्यातून. आता त्याला त्याच्याच बोलण्याचं वाईट वाटू लागलं.मुलं थोडी मोठी झाली तसं त्यानं घरातून जसं काही अंगच काढून घेतल होतं. घरखर्चाला पैसे दिले अन् घराचे, कारचे हफ्ते भरले की झालं एवढंच गणित होत त्याचं. बाकी घरात काही आणायचंय का, काही हवं नको, मुलांचे दुखणे-खुपणे ते त्यानी कधीच नाही पाहिलं. आता मात्र त्याला मनापासून तिची माफी मागायची होती. दुधवाल्याचा हिशोब केला अन् ऑफिसमध्ये सिक लिव्ह चा मेल करून तो तिला घायला निघाला.

 

    मुलं अंगणातच खेळत होती. इतक्या दिवसांनी बाबाला बघून त्याला बिलगलीच एकदम. त्याच्याही डोळ्यात पाणी आलं .
त्यानी हात जोडून तिची माफी मागितली.
"तू नाहीस तर घराला घरपण नाही. प्लीज आता चल घरी."

त्याचे हात हातात पकडून तिनी एक गोड स्माईल दिली.

"पण कॅलेंडरवरची एक गोष्ट नाही कळली. उपमा, वांगी, सँडविच असे तीन तीन पदार्थ एका दिवशी लिहिलेले." तो.

"नाश्ता, डब्बा आणि मुलं शाळेतून आल्यावर काय द्यायचं ते असतं. रात्रीचा बेत आम्ही तिघं मिळून ठरवतो रोज. आठवड्याचा भाजीपाला एकदम आणते ना मग प्रश्न पडत नाही कधी काय करू ते आणि भिजू घालणे, आंबवणे, मोड आणणे या गोष्टी वेळेवर होत नाहीत." ती.

"मग मोबाईल वापरायचा ना. या सगळ्या गोष्टींसाठी ऍप्स आहेत कितीतरी."

" हो. पण मोबाईल अनलॉक करून सगळं बघत बसावं लागत, कॅलेंडर कसं डोळ्यासमोर राहतं."
 

त्यानी तिच्यासमोर हात जोडले, "धन्य मॅनेजमेंट गुरू, चला आता घरी. नाहीतर बाहेरच जाऊ. कुठे जायचं तुम्ही सांगा. मस्त फिरू दिवसभर."
  "नको बाहेर. घरीच जाऊ. तसही सगळं घर आवरावे लागेल परत."
    आई बाबांचा आशीर्वाद घेऊन सगळे निघाले घरी वापस. कारमध्ये गाणं सुरू होतं
             ये तेरा घर ये मेरा घर
             किसी को देखना हो गर
             तो पहले आ के माँग ले,
             मेरी नज़र तेरी नज़र
             ये तेरा घर ये मेरा घर
             ये घर बहुत हसीन है ...
 
                         © डॉ किमया मुळावकर

फोटो- गुगलवरून साभार
( कथा कशी वाटली? तुमचा अभिप्राय नक्की कळवा. तुमचा अभिप्राय लेखनाची एक मोठी ऊर्जा आहे. Share करायची असल्यास लेखिकेच्या नावसहित share करू शकता.) 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न