Login

यात्रा भाग 11

Marathi Story Yatra - Fortuitous Circumstance
यात्रा भाग 11

मागच्या भागात आपण वाचले, आबासाहेबांनी कुस्तीसाठी हिरवा झेंडा दाखवला होता. आता पुढे


विजय चे आव्हान स्वीकारून आबासाहेब आणि परिवार घरी आला. यात्रेनिमित्त बरेच पाहुणे येणार असल्याने घरातील बायका स्वयंपाकात गुंतल्या. साक्षीही मदतीला गेली.
इकडे विलास आणि रमेश कामाला लागले. संध्याकाळपर्यंत चांगला कुस्तीपटू शोधण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.गावातील बरीच मंडळी बातमी एकूण आबासाहेबांना भेटायला येत होते आणि चर्चा ही रंगत होत्या.

" आबासाहेब हे तुम्ही लई चांगल केलं, एकदा का त्या इजयला त्याची जागा दाखिवली ना मग जरा तो गप पडल."........एक व्यक्ती

"हा, पर आबासाहेब आपल्याकडून कुस्तीपटू भारी पाहिजे बर का. तो महिपत लई भारी हाय म्हणत्यात."....दुसरा

"अरे कितीबी भारी असू द्या. आपणच जिकनार ही काळ्या दगडावरची रेघ हाय.".......विनायकराव

प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपले मत मांडत होता.या सगळ्यात अजिंक्य मात्र एका कोपऱ्यात शांत बसलेला होता.त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. आबासाहेब सगळ्यांशी बोलत असले तरी अजिंक्यची नाराजी त्यांच्या लक्षात आली होती. ते अजिंक्यच्या शेजारी येऊन बसले.

" अजिंक्यराव, माहीत हाय आम्हाला तुम्हासनी हे सगळ आवडत नाय."

" आबासाहेब , हे सगळं कशासाठी? हे राजकारण बस झालं. तुम्ही यात पडू नये असं मला वाटतं."

" आमी स्वताहून नाय पडलो यात. आव लोकांचा ईस्वास हाय आमच्यावर त्यांच्यासाठी करावं लागतं."
"आबासाहेब, राजकारणात न पडताही लोकांची मदत करता येते."

"नाय अजिंक्यराव, चुकताय तुमी. आम्हाला सत्तेची हाव नाय.पर ही सत्ता कोणा चुकीच्या माणसाच्या हातात आमी बी जाऊ देणार नाय.पुढचा जर चांगला असता तर आमी स्वतःहून बाजूला झालो असतो पर ईजय सरदेसाई चांगला माणूस नाय.त्याच्याकडं सत्ता जाणं म्हंजी गावाचं काय खरं नाय. अन् तुमासनी एक सांगतो ज्याचाकड सत्ता ना त्याचच पारड भारी असतय.
तुमी काय बी काळजी करू नगा.आमी चुकीचं काय बी करणार नाय. या येळेला त्या इज्याच नाक कापलं ना मग पुन्यांदा तो आपल्या वाटला जाणार नाय. नंतर आमी बी सत्ता तरुण, चांगल्या ईश्र्वासू लोकांकडे सोपवून यातून मोकळे होऊ."

"ठिक आहे, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा."

" तुमी यात लक्ष घालू नगा. दोन दिस आनंदात रहा. सूनबाईसनी घेऊन फिरा.उद्या त्यांना यात्रा दाखवा अन् मजा करा.हिकडच आमी बघतो. हां पर असं नाराज व्हहून बसू नगा."

अजिंक्यने आबासाबांकडे बघून मान हलवली.तेवढ्यात विलास तिथे आला.

"काम झालं आबासाहेब. उद्याच्या आपल्या विजयावर शिककामोर्तब."

विलास चे बोलणे एकूण सगळेच त्याच्या दिशेने धावले.

" मिळाला का चांगला गडी."....पहिला

"कोण हाय?".....दुसरा

"त्याला लगिच इकडं बोलिवल का ?"......तिसरा

"अरे दमा की जरा. त्याला बोलुद्या" ......सुरेश

"आबासाहेब , एकदम भारी कुस्तीपटू सापडलाय
उदयराज महाडिक नाव हाय त्याचं.आज संध्याकाळ पर्यंत वाड्यावर येतो म्हणाला."
" लई भारी काम इलास" ....विनायकराव

विलास च्या या बातमीने आबासाहेबांच्या तंबूत आनंदाचे वातावरण झाले.

अजिंक्य ला शांत बसलेलं बघून विलासणे त्याच्या खांद्यावर हात ठेवला
" मी आहे ना, काळजी करू नको सगळ व्यवस्थित होईल."

अजिंक्यने मोठा सुस्कारा सोडला.

क्रमशः

कुस्त्या शांततेत पडतील का पार.वाचू पुढील भागात

0

🎭 Series Post

View all