याज्ञसेनी..

पांचालीचं स्वयंवर ही एक असाधारण घटना ...या स्वयंवरामुळे आर्यावर्ताचं वर्तमान आणि भविष्य संपूर्णतः बदललं .एका पराकोटीच्या विनाशाला सामोरं जावं लागलं ...संदर्भ बदलले सगळे ..


पांचालीचं स्वयंवर ही एक असाधारण घटना ...
या स्वयंवरामुळे आर्यावर्ताचं वर्तमान आणि भविष्य संपूर्णतः बदललं .एका पराकोटीच्या विनाशाला सामोरं जावं लागलं ...संदर्भ बदलले सगळे ..
या घटनांचे साक्षीदार त्यातल्या व्यक्तीरेखाही होत्या सारं ब्रम्हाडंही होतं ...पांचाली,याज्ञसेनीचा जन्म,तीचा विवाह ही या विनाशाची सुरूवात होती ....
जे घडणार होतं त्याची कल्पना तीला नसावी का ..?

असाधारण व्यक्तीमत्व, प्रगाढ विद्वत्ता, अफाट सामर्थ्यशाली अनुपम सौंदर्यवती अशी ही पांचाली ...तीच्या स्वयंवराच्या समयी उद्विग्न होती ...स्वतःचा साथिदार,जोडीदार निवडायचं स्वातंत्र्य तीला नव्हतं ,अशावेळी श्री कृष्ण तीचा प्रिय सखा त्याच्याशी संवाद साधणं तीला अपरीहार्य वाटलं असेल तर नवल नाही ....
तो संवाद काल्पनिक आहे ...का खरा माहीत नाही पण मी तो माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे ...ऐतिहासिक घटनांचा आधार घेऊन मी तो माझ्या परीने तुमच्या पर्यंत पोहोचवतीय .... संपूर्ण काल्पनिक आहे हा लेख याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी ..... ऐतिहासिक, पौराणिक काही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा..... कल्पनेचा विस्तार करतांना थोडं स्वातंत्र्य घ्यावं लागतं ते मी घेतलेलं आहे ...याचीही वाचकांनी नोंद घ्यावी ....

पांचाली......


"माझं अस्तित्व असून नसल्यासारखंच आहे कृष्णा."
तू असलास तरीही,नसलास तरीही
माझं जगणं आहे तसंच असेल."
भव्य प्रासादाच्या मधोमध असलेल्या शुभ्र कमलदलांवर जलबिंदूंना प्रवाहीत केलं याज्ञसेनीनं.. हेलकाव्यांनी क्षणभर कमलदल थरथरलं....याज्ञसेनीही शहारली वाऱ्याची मंद झुळूक शहारा पसरवून गेली आंगोपांगावर....
"तुला वाटत नाही ,तू ही असाच आहेस?निस्पृह,निर्मोही ,सगळ्यांत असतोस पण कुठेच नसतोस ."
मोरपंखी शेल्याचा घोळ सावरत गोविंद
याज्ञसेनी समीप आला ..तीच्या डोळ्यांतली आर्तता न्याहाळतांना एक पळभर कमालीची वेदना त्याच्याही नजरेत तरळली .
"होय, सखी मी आहे निर्मोही ,माझं असणं नसणं या चराचराला फरक पाडतं तू का एवढी विद्ध आहेस ...?"
" मी कुठे आहे कृष्णा ..? माझं समर्थ असणं मला कुठे घेऊन जाणार आहे...?
अलीकडे कासाविस होतोय जीव .अघटीत घडणार असल्याचे संकेत मिळताहेत .रात्री तल्या प्रहरातील भयाण शांतता मला घाबरवतेय .इतकी असहाय कधी होते मी .? अनाकलनिय गोष्टी घडताहेत ..खरंतर मी प्रसन्न असायला हवंय महाराजांनी स्वयंवराची घोषणा केलीय .नगारे,नौबती झडताहेत .नगरांत चैतन्य ओसंडून वहातंय पण ,पण मी रीती आहे .
मला हर्ष व्हावा ,प्रसन्न वाटावं असं आहे तर सगळंच पण मी ,माझीच नाहीये ...
" का..? एवढी द्विधा मनःस्थिती का व्हावी तुझी ..?" "कोणतं शल्य आहे मनांत तुझ्या ...?" "देशो देशीचे,सम्राट,राजे,युवराज
तुझं पाणिग्रहण करायला आलेत...महाराजांनी ,वैभवाचे अंबार खुले केलेत ,मंत्र मुग्ध झालेत सगळे ....तुला आणखी काय हवं आहे पांचाली ...?"
"बस्स एवढंच ..युवराज्ञी,पांचालाची युवराज्ञी,तीचं स्वयंवर ...? डोळे दिपतील नाहीतर काय होईल ...? सगळा साजशृंगार तर केलाय पण मी कुठे आहे यात....?"
कृष्णानं जवळ येऊन पांचालीच्या नजरेला नजर भिडवली ...संधी प्रकाशात गौरवर्ण नसला तरी मेघश्यामल वर्ण , जणू मावळत्या संधीप्रकाशाचा आभास व्हावा ,सरळ सुंदर नासिका ,मोहक बटांची दीलखेचक महीरप, सामर्थ्य आणि विद्वत्ता यांची ग्वाही देणारे पाणिदार नेत्र त्यांत रोखून पाहीलं.

"अनुपम सौंदर्यवती तू ....तुझ्या सौंदर्यावर न भाळणारा हा त्रिभुवनात नसेल...ज्याला वरशील तो तुझ्या अस्तित्वात विरून जाईल ..."
"तरी तू लुब्ध नाहीयेस माझ्यावर ...?माझ्या सौंदर्यावर ..?ईतका निर्लोभी आहेस तू ?" कृष्ण किंचिंत हसला ..त्याचा खट्याळपणाही मोहवून गेला ...त्याचं असं वागणं ही काळजाचं पाणी पाणी करतंय...
समजून न समजल्या सारखं करणं तसं वागणं किती जीवघेणा प्रकार हा ...
संधी प्रकाश हळूहळू प्रासादात तांबूस तपकीरी रंगांची उधळण करता झाला ...मनातल्या द्वंद्वांशी मिळत्या जुळत्या रंगांची आभा घेऊन येणारा...आशा निराशेतला मध्य गाठणारा ,उदासही तितकाच चैतन्यदायी ही . तितकाच..मावळतीचा साक्षीही आणि मंद शीतल चंद्राची शांतता घेऊन येणारा ही..
"मला एक सांग कृष्णा हे सगळं चाललंय माझं अस्तित्व काय आहे यात ...?"
"कोण कुठला युवराज,सम्राट ज्याला मी ओळखत ही नाही त्यांनं जिंकलं म्हणून मी त्याची व्हायचं ....? हा अन्याय आहे .त्यांतून स्वयंवरातल्या अटी ,कुणी नसेलच तसा तर धनुर्धर ...?"
ईतकं परावलंबी मी का असावं..?जन्म माझ्या हातात नव्हता ,शैशवही नव्हतं,आत्ता तरी माझ्या स्वयंवराचा निर्णय माझ्या स्वाधिन हवा होता ...मला असं वाटतंय मी एक साजशृंगार करुन ,नटवून आणलेल्या बळी सारखी आहे ...यांच्या साम्राज्या साठी,विस्तारा साठी राजकारणासाठी केलेली तडजोड .....या राजकारणात माझ्या भावनांचा ,माझ्या सामर्थ्याचा,माझ्या अस्तित्वाचाच बळी दिला जातोय ..".एका विषण्ण मन्ःस्थितीत पांचाली
होती ...तीच्या मुखकमलावर नैराश्यांचे गडद ढग जमु लागले ...अश्रूंचे बांध सुटले....
ईतका वेळ रोखून धरलेला आवेग तीला आवरता येईना....
"मी कुणीच नाहीये कृष्णा ,माझा विचार कोणीच करत नाहीये ..."
तीच्या अशा हतबलतेने कृष्ण ही मलूल झाला ...तीच्या जवळ येऊन तीचा अश्रूंनी भरलेला चेहेरा दोन्ही हातात धरुन ,शांतपणे तीच्या डोळ्यांत पहात तो म्हणाला" हे असंच होणार आहे ,तू एकटी नाहीस ,राजघराण्यातल्या प्रत्येक स्त्रिला हे करावं लागलंय .तुझा अपवाद कसा असेल ..?काही गोष्टी या स्वतः साठी करायच्याच नसतात ..तुझं स्वयंवर हे पांचालाला सुरक्षित करायचं प्रयोजन आहे ...जो कोणी वरेल तुला त्याच्या सामर्थ्यशाली प्रभावामुळे आर्यावर्ताला नवे आयाम मिळतील ..."
"आणि त्याची किंमत मला मोजावी लागणार आहे ,असंच ना....?"
"माझा बळी देऊन ...!"
एक दिर्घ श्वास घेऊन येणारे अश्रू पुसले तीने ..
होणारी चलबिचल रोखायचा अटोकाट प्रयत्न केला तीने...होणारं टाळता येणार नाहीये हे माहीत असूनही काहीतरी गवसल्याच्या ....
एका अनामिक विचारानं पांचालीचे डोळे लकाकू लागले...म्लान झालेला चेहेरा खुलला ..एका अनावर उर्मी नं स्वतःचा भरजरी शेला सांवरत ती कृष्णा ला म्हणाली "हे तू बदलू शकतोस कृष्णा." "तुला काहीच अशक्य नाही.." ती काय म्हणणार आहे याचा रोख लक्षात येऊन "तुला काळजीचं कारण नाही ,सखी,ईथे येणारा प्रत्येक सम्राट हा सामर्थ्यशाली ,बलाढ्यच असणार आहे .तुझं आणि तुझ्या मातृभूमीचं रक्षण करणारा असेल .तू निश्चिंत
रहा ."
"पण तो मला जाणणारा नसणार आहे...मी ज्याला मनापासून वरेन असा नसणार आहे ..माझ्या अंतरंगात डोकावणारा नसणार आहे ...असेलही तो शूर योद्धा पण मी ज्याच्यावर लुब्ध व्हावं असा नसणार आहे ,मला प्राप्त करणं सोपं नाही ईतकं हे तू जाणतोस...
"आणि ,आणि असा कुणी मला हवा असणारा माझं सत्व,माझं मी पण जपणारा एकच असू शकतो तो तू आहेस माधवा...तूच का नाहीस माझं पाणिग्रहण करत....?तुझ्या पराक्रमाचं कौतुक मी करु का माधवा ..?तो तू का नाहीस ...?तूच का थांबवत नाहीयेस हे...? एकतर माझं पाणिग्रहण कर .... नाहीतर.... पळवून का नेत नाहीस मला .माझे सगळेच प्रश्न सुटतील ..."
तीच्या या अचानक विचारलेल्या प्रश्नावर कृष्ण अवाक् झाला ...इतकं स्पष्ट ती विचारेल ही कल्पनाच नसल्यामुळे किंचित भांबावला..
तीच्या पासून दूर जात "हे ,अशक्य आहे पांचाली ..मी हा विचार करु शकत नाही ...."
पांचाली धीर करून त्याच्या समीप आली .त्याचा हात हातात घेतला "पहा माझ्या डोळ्यांत ,माझ्यावर प्रेम करत नाहीस का तू ?
मला अव्हेरावं असं का वाटतंंय तुला ...?
तुझ्या सारखा प्राणसखा मला का बरं मिळू नये .?ज्याच्यावर मी आरक्त आहे ..माझं सर्वस्व जो होऊ शकतोय त्याला वरायचा मला अधिकार
का नसावा ...?"
"हे होणं नाही पांचाली ....नियतीला हे मान्य नाही ...एका गवळ्याचा पोराला पांचालाच्या नरेशाची युवराज्ञी वरते...हसं होईल सगळी कडे ...."
"हे एवढंच कारण आहे ...?."मला पर्वा नाही त्याची ..." "तुला अशक्य काही नाही माधवा.विचार का करतो आहेस एवढा ..?"
"इथे तुझा माझा प्रश्नच नाहीये ,.सखी तेवढंच असतं तर मी ते ही केलं असतं ..पण आर्यावर्ताचा इतिहास बदलायची संधी देतीय नियती तुला .माझ्याशी विवाह करुन एक स्थिर ,ऐश्वर्संपन्न आयुष्य घालवू शकशील ,तुझं असणं नसणं कुणाला काही फरक पाडणार नाही .पण नियतीनं योजलेल्या घटना ज्या घडणार आहेत तू इतिहासात अजरामर होशिल .."
"मला व्हायचंच नाहीये अजरामर ."
माझी गरज नाहीये ती.. मला साधंसुधं आयुष्य हवंय जे तू देऊ शकतोस तू मनांत आणलंस तर ..."
" ईतकी स्वार्थी केंव्हा पासून झालीस पांचाली ...?"
" का असू नये .?मी इतरांचा का विचार करावा ...? तू असलास तर ते ही होईलच कि ..."
"नाही पांचाली ज्या साठी आपला जन्म झालाय ती कर्तव्य तुला ही पार पाडायचीत मला ही ... तुझा जन्म हीच या सगळ्याची सुरुवात आहे हे तू ही नाकारु शकत नाहीस मी ही , तू च महत्वाची भूमिका निभावणार आहेस हे मी सांगायला हवंय तुला...?" " "पण मी च का..?"
" कारण तुझ्या व्यतिरिक्त हे पेलणार कोणी नाहीये स्पष्टच सांगतो .तेवढी समर्थता कुणात नाहीये .तुझी निवड त्यासाठी केली गेलेली आहे ,.एका स्वयंवरानं तुझ्या , काळाचा आलेख बदलेल घडणाऱ्या घटनांनी इतिहास ,भूत,वर्तमान,भविष्यही ढवळून निघेल ...आणि तू कारणीभूत असशील या सर्वांना ...एक स्थिरतेतलं ,सर्वसामान्य आयुष्य जगण्या पेक्षा इतिहासाची साक्षी हो ...आयुष्याचं सोनं करुन घे ...तुझ्या आत्मसमर्पणाची नोंद इतिहास ठेवेल..." " शेवटी निर्णय तू घ्यायचा आहेस ..निर्णय बदलायची क्षमता तुझ्यात आहे..फक्त एक लक्षात ठेव ही वेळ पुन्हा येणार नाही .काळ तुझ्यासाठी थांबणार नाही ...मी थांबवू शकणार नाही ...तुझं अस्तित्व ,तुझं सर्वस्व ही किंमत
इहलोकाच्या उद्धारापुढे यत्कींचितही नाहीये ...हे मी जवळचा सखा,तुझा हीतेशी ,तुझा गुरु
या नात्यानं फक्त सांगतोय ...तुझा निर्णय हा सर्वस्वी तुझाच असणार आहे ...."
" माधवा तुला ही असंच वाटतंय ...तुला घडणाऱ्या घटना ज्ञात आहेत ...तू त्या सांगणार नाहीस मला हे ही माहीत आहे....
"शेवटी तयार व्हायला लागेलच मला
या त्यागासाठी .."
आश्रिता सारखी धगधगत्या विवाह वेदीवर आत्मसमर्पणातली समिधा होईन मी .. तू म्हणतोस म्हणून .तू माझ्या बरोबर असशील ही ग्वाही दे ... फक्त....
होईन मी अखंड तेवत रहाणारी एक पेटती धुनी...या आर्यावर्ताचा उद्धार करणारी...एक याज्ञसेनी......
©लीना राजीव.