याचक (कथा)

Love will always stay even weren't not there.तिच्याकडे एक तिरकस कटाक्ष टाकून तो जरा रागातच घरातून बाहेर पडला. सरळ गाडीत जाऊन बसला अन गाडीचा दरवाजा जोरात आपटला. गाडी निघाली वाट फुटेल तिकडे.  "काय तर म्हणे "मी जगलेय हे आयुष्य या आधी देखील". देवाने तोंड दिलं म्हणून काहीही बोलत सुटायचं. पुढच्या माणसाच्या मनाचा विचार करणं सोडाच पण साधी काळजी देखील नसावी. जी साथ मिळावी म्हणून ५ वर्ष प्रयत्न केले ते प्रेम असं अर्धवट राहणार असेल तर त्याला काय अर्थ आहे. गाडीचा वाढणारा वेग अन मनातल्या विचारांचा गोंधळ. विचारांत गढलेला सौमित्र पुन्हा त्या जुन्या आठवणीत रमला.
    कसा विसरता येईल तो दिवस. रसायनशास्त्राचा तास बुडवला म्हणून सरांनी बोलावून घेतलं होतं. तशी कारणाची तयारी झाली होती. "बस एकदा उजळणी करतो" ह्या विचारात सौमित्र स्टाफ रूम च्या अलिकडच्या पायऱ्यांवरुन वळला आणि धाडकन् कोणावरतरी आदळला. "अरे केवढी ही घाई? जरा पुढे बघून तरी पळावं माणसाने." पण तिला ऐकायला कुठे वेळ होता. हो ती मुलगी होती एवढं दिसलं पण "अरे यार" असं म्हणाली अन पुन्हा पळत पळत निघून गेली. पण तिचं ओळखपत्र तिथेच त्याच्या समोर पडलं. "किती धांधरट आहे ही.. जाऊदे कार्यालयात जमा करतो आठवण येईल तेव्हा जाईल घ्यायला. हिच्या नादात मी तिथे सरांपुढे जाऊन माती खायला नको म्हणजे झालं." असं म्हणून सौमित्र निघाला. सरांना तासाला ग़ैरहजर असण्याचं कारण अगदी तुपमीठ लावून पटवून दिलं आणि जाताना ते ओळखपत्र  सरांकडे दिलं आणि इमारतीसमोर आला. पाहतो तर काय केवढी ही गर्दी. "अरे.. ही तर.. ती ती कौस्तुभ च्या वर्गातली मुलगी आहे." सौमित्र वरच्या दिशेने पाहत म्हणाला. एव्हाना ती आत्महत्येचा प्रयत्न करतेय हे सगळ्यांना समजलं होती. तिने उडी मारलीच होती इतक्यात कोणीतरी तिच्या हातांना घट्ट पकडून तिला वर खेचण्याचा प्रयत्न करत होतं. मैथिली होती ती, जी तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होती आणि आपण तिला धांधरट म्हणालो आणि ही तर किती धाडसी निघाली. त्याच क्षणी मैथिली सौमित्रच्या मनात भरली. "आवडली आपल्याला" नकळत सौमित्र बोलून गेला. पण आता हिच्याशी ओळख कशी होईल. "एक मार्ग होता ओळखपत्राचा जो मी स्वतःच बंद करून आलोय. आता काय.. काहीतरी कारण शोधावं लागणार." असं म्हणत सौमित्र समोरून येणाऱ्या मैथिली कडे पाहत होता पण तिच्यासमोर जाऊन बोलण्याची त्याची काही हिंमत झाली नाही.
       मैथिली देशपांडे. माधवराव देशपांडे यांची कनिष्ठ कन्या. घरातलं शेंडेफळ. अगदी लाडाखोडात वाढलेली पण तरीही धाडसी,स्वाभिमानी लवकरात लवकर शिक्षण पुर्ण करून स्वतःच्या पायावर उभं रहावं अशी मनोमन इच्छा बाळगणारी. हुशार अन लाघवी देखील. त्यादिवशी मैथिली एकटीच कैंटीनमध्ये बसली होती. तेवढ्यात एक मुलगा अचानक टेबलजवळ आला. "मी इथे बसू शकतो का? मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे." सौमित्र.
"हो, बसा ना." मैथिली.
"मला तुमची माफी मागायची होती." सौमित्र.
"माफी..? कश्याबद्दल..?"मैथिली
"ते तुम्ही त्यादिवशी त्या मुलीला वाचवायला धावत घाईघाईत निघाला होतात अन आपली चुकून टक्कर झाली. तेव्हा मी तुम्हाला खूप नाही नाही ते बोललो त्याबद्दल."सौमित्र
"अरे.. माझ्या लक्षात देखील नव्हतं हे. आणि ठीके ओ सॉरी वगैरे काय असं अचानक कोणी आपल्यावर येऊन आदळलं तर चिडचिड होणं सहाजिक आहे त्यामुळे तुम्ही काही वाईट वगैरे वाटून घेऊ नका. मी अशीच आहे धडपडी." मैथिली.
बऱ्याच गप्पा झाल्या. बऱ्याच नव्या गोष्टी समजल्या. बऱ्याच दिवसांनी सौमित्र मनमोकळेपणाने कोणाशीतरी बोलला. त्यादिवशी त्यांनी आपले फोन नंबर शेयर केले आणि हा दुरावा बऱ्यापैकी कमी केला.
   चार वर्षाचं शिक्षण कसं रंगीबेरंगी झालरीने सजलं. मैथिलीच्या साथीने आयुष्य अगदी स्वप्नवत वाटू लागलं. चार वर्ष झाली तरीही सौमित्रने आपल्या भावनांचा पसारा कधीच मैथिलीसमोर मांडला नाही. "ती मैत्री तोडणार नाही पण व्यक्त केल्यावर मला मैत्री सांभाळता येईल?" ह्या विचाराने सौमित्र काहीच बोलू शकला नाही. शैक्षणिक वर्षाचा शेवटचा पेपर. सकाळी सौमित्र मैथिलीला भेटलाच नाही. यापुढे ती आपल्याला दिसणार नाही हा विचारच त्याला सहन झाला नाही. पेपर झाला आणि तो घराच्या दिशेने निघाला. लवकरात लवकर मैथिलीच्या नकळत निघून जाण्याचा त्याचा विचार मैथिलीने चांगलाच वाटेला लावला.
"काय साहेब, आज तोंड ही पहायचं नाही वाटतं आमचं?" मैथिली.
"काहीही काय गं मैथिली..! मी आपलं जरा विचारात होतो म्हणून लक्षात नाही राहिलं." सौमित्र
तसं मैथिलीचं देखील सौमित्र वर खूप खूप खूप प्रेम होतं. पण हा आज ना उद्या नक्की बोलेल ह्या आशेवर मैथिली शांत होती.  कारण आपल्या भावना आपण कोणावर लादायच्या नाहीत ह्या विचाराची ती होती परंतु आता शांत राहण्याची वेळ संपली होती. आता बोललो नाही तर सौमित्र कायमचा दूर जाईल त्यामुळे आज काय ते स्पष्ट विचारु हे मैथिलीने मनाशी पक्क केलं होतं. त्यादिवशी त्या बोलण्यातून त्यांच्या एकमेकांविषयीच्या सगळ्या भावना स्पष्ट झाल्या आणि सुरु झाला एक नवा प्रवास.
        सौमित्रने गाडी थांबवली. तो एका तळ्याजवळ आला होता. ते तेच तळं जिथे सौमित्र मैथिली तासनतास गप्पा मारत बसायचे. एकमेकांसोबत, एकमेकांसाठी. आज सौमित्र एकटाच त्या ठिकाणी बसला. बराच वेळ विचार करत. शेवटी रागाने त्याने तिथलाच एक दगड जोरात पाण्यात भिरकावला. त्याला काहीतरी आठवलं. "मैथिलीचं हे वागणं त्या दिवसापासून सुरु झालंय. उगाचच तिला त्या वाड्यात घेऊन गेलो यार मी.."
रविवारचा दिवस होता तो. सुट्टी मिळाली की सौमित्र मैथिली भटकंतीसाठी निघायचे. मग कुठेही. ह्या आठवड्यात एका टोकाला पुढच्या आठवड्यात दुसऱ्या असा नेम ठरलेला असायचा. ह्या रविवारी ते एका टेकडीवर निघाले होते. दिवस पावसाळ्याचे त्यामुळे गाडीत आवश्यक सगळं सामान होतं. जाताना रस्ता अगदी प्रसन्न, हिरवी शाल पांघरलेला, अगदी निर्मळ. टेकडीवर एक छोटसं देवीचं मंदीर होतं. दोघेही पाया पडले. जरावेळ तिथल्या आवारात फिरले. फिरताना मैथिलीला एक वाडा दिसला. तसं टेकडीवर जाण्याचा विषय काढल्यापासून किंबहुना इंटरनेटवर ही जागा पाहिल्यापासून एक वेगळीच ओढ मैथिलीच्या मनाला लागली होती. वाड्याकडे लक्ष गेलं तसं तो वाडा तिला खूप दिवसांपासून बोलावतोय असं तिला जाणवत होतं. जे ठिकाण आपण आयुष्यात पहिल्यांदा पाहतोय त्याविषयी इतकी ओढ का असावी अशी शंकेची पालही चुकचुकली. पण एकदा निघालो की "अरे..! हे पहायचंच राहिलं की असं अजिबात म्हणायचं नाही हे सौमित्रचे विचार होते त्यामुळे बघू वाटेल ते सगळं बघायचं, जगायचं असं ठरवून ते बाहेर पडले होते. त्या वाड्यात पाय ठेवला अन मैथिलीने एका वेगळ्या जगात प्रवेश केला. तिच्या डोळ्यांसमोरून काही चित्रं वाऱ्याच्या वेगाने निघून गेली. "त्यात मी आणि सौमित्र होतो पण मी साडी वगैरे कधी घातली आणि आणि ते लग्न.. आमचं लग्न कधी झालं.. आणि अचानक सौमित्रची चिता..?" हे सगळं काय होतं? असं म्हणत मैथिली जमिनीवर कोसळली ती एका दवाखान्यातच जागी झाली. डोळे उघडले तशी सौमित्र.. सौमित्र म्हणून हाका मारू लागली. त्यादिवसानंतर मैथिली बदलली. सौमित्रसोबत लग्न केलं तर त्याला आपण कायमचं गमावू ह्या भीतीने मैथिली पुरती घाबरली होती. एकीकडे सौमित्र होता ज्याला तिच्या ह्या वागण्याचा मनोमन राग येत होता. "मुळात कारणच द्यायचं आहे तर पटेल असं द्यावं" असं म्हणून तो घरातून बाहेर पडला होता. सौमित्रला आता मैथिलीच्या वागण्याचा अर्थ समजत होता. त्या वाड्यातच काहीतरी असं आहे जे ह्या प्रकरणाचा छडा लावेल ह्या विचाराने सौमित्र त्या वाडयाच्या दिशेने निघाला. वाड्यात पोहोचल्यावर काही भेटतंय का ह्या शोधात सौमित्र होता. भिंतीवर एक फोटो होता. "असं कसं होऊ शकतं..? मी .. आणि मैथिली ..! आमचा फोटो इथे कसा. सौमित्रने फोटो हातात घेतला त्यावर नाव लिहिलेलं होतं. सौ. आनंदी व श्री. दिनेश केशव सरपोतदार. दिनांक- ०५/०९/१७६२. "म्हणजे.. मी आणि मैथिली म्हणजेच आनंदी आणि दिनेश आहोत." सौमित्रला आता मैथिलीची काळजी वाटू लागली होती. मैथिलीला गृहीत धरून रागारागाने आपण घरातून बाहेर पडलो. मैथिली बरी असावी म्हणजे झालं. आपण उगाच चिडचिड केली. श्या..!.सौमित्र घरी पोहोचला पण त्याला बराच उशीर झाला होता. मैथिलीने आपल्या हाताची नस कापून ती जमिनीवर निपचित पडली होती. शेजारी एक चिट्ठी होती ज्यात लिहिलं होतं. "मला तुम्हाला पुन्हा गमवायचं नाहीये दिनेश.. त्यामुळे यावेळी मी निघालेय. जमलं तर माफ करा."
ही चिठ्ठी वाचून सौमित्र जागीच स्तब्ध झाला. मैथिली गाढ झोपली होती. कायमची. अन सौमित्र तिच्या निपचित पडलेल्या देहाकडे एकटक पाहत होता. आता ती उठेल आणि मला म्हणेल चल सौमित्र कुठेतरी दूर निघून जाऊ जिथे फक्त आपण दोघेच असू. सौमित्र एकटक पाहत होता त्या देहाकडे याचकासारखा. पुन्हा त्याची धडपड बघायला. पुन्हा एकदा त्याच्यासोबत जगायला.

            ©श्वेता कुलकर्णी♥️