या वळणावर (भाग 5)

This story revolves around the three women whose lives take twist and turns where they have to take tough decisions.

#या_वळणावर (भाग 5)

मी सोनगाव सोडलं तेव्हा पावसाला सुरूवात झाली होती. जणूकाही आइचेच आनंदाश्रू होते ते. मला सुरेश भटांची कवीता आठवली.

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते-
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते !

पण हिची तर मरणानंतरही सुटका झाली नाही. लोकं सतत दूषण देत राहिली तिला. आणि जिच्यासाठी तिने हा निर्णय घेतला त्या पोटच्या पोरीनेही तीचा तिरस्कारच केला. आता कदाचीत शांत वाटत असेल तिला. आणि म्हणूनच मोकळी होत असेल ती.  
जाता जाता आत्याला भेटून जायचं ठरवलं. खूप भांडावसं वाटत होतं तिच्याशी, जाब विचारायचा होता तिला. पण तिला बघीतलं आणि तिडीक गेली डोक्यात. एकही शब्द बोलायची इच्छा झाली नाही. मनातून उतरली होती ती. एक स्त्री असूनही स्त्रिला नाही समजू शकली. आपण तरी कुठे समजू शकलो? ते तर सुमी म्हणाली म्हणून आपण शोध तरी घेतला नाहीतर.. सुमिची आठवण आली आणि चेहरयावर थोडंस हसू फुललं. 

आत्याशी जुजबीच बोलले. आणि जुने अलबम काढून फोटो शोधू लागले. माझ्या जवळ आईचा एकही फोटो नव्हता. आणि तो असावा असं आत्ता पर्यंत वाटलही नाही कधी. मला फक्त तिचा हलकासा चेहरा आठवत होता. शेवटी अथक प्रयासाने एक फोटो दिसला. ब्लॅक अँड व्हाईट. मध्यम बांधा,थोडी अस्ताव्यस्त अशी गोवलेली वेणी, साधीशीच साडी. पुर्ण दिसतही नव्हती ती त्या फोटोत . पण आता माझ्यासाठी तिचं असणं महत्वाचं होतं. मी पटकन तो फोटो पर्समधे टाकला. 

अचानक न सांगता, न कळवता कशी आली. काय झालं? आत्या प्रश्न विचारत राहिली आणि मी थोडक्यात उत्तरं देत गेली. तशी वाईट नव्हती ती. कितिही झालं तरी जवाबदारी न झटकता सांभाळलं होतं तिने. तिचेच तीन पोरं आणि त्यात मी चौथी. कमवाणारे हात दोन आणि खाणारी तोंड मात्र सहा. त्यामुळे चिडचिड व्हायची तिची. पण निभाऊन घेतलं तिनेही. आताही प्रेमाने जेवायला वाढलं. पहीला घास खाल्ला आणि लक्षात आलं, सकाळपासून काहीच गेलं नव्हतं पोटात. निखील तर नेहमीच म्हणती की एकदा हिने एखादी गोष्ट मनावर घेतली ना की तहान भूक सगळं विसरून त्याच्याच पाठी लागते ही.

उशीर झाला होता. सातारयाला जायची शेवटची बस साडेआठची होती. मला निघायला हवं होतं. पुण्याला जायला मध्यरात्रच होणार होती. आत्या म्हणालीही खूप उशीर झालाय, आता कुठे जाते रात्रीची? पण मला त्या गावात थांबायचं नव्हतं. मी निघाले पण घराकडे एक चक्कर टाकायचा मोह काही मला आवरला नाही. मी मुद्दाम वाट वाकडी करून गेले. एक कौलारू, मोडकळीस आलेलं घर. भयाणता सोडली तर काहीच नव्हतं तिथे. जाता जाता त्या पडक्या विहिरीकडे लक्ष गेलं माझं. त्यात डोकावून पाहिलं तर जणू काही आई माझ्याकडे बघून समाधानाने हसते आहे असा भास झाला आणि शहारा आला अंगावर. मी क्षणभर रेंगाळले आणि मग मात्र परतीच्या प्रवासाला लागले.

निखीलला कळवलं. तो घ्यायला येणार होता मला बस स्टँडवर. त्याला कधी एकदा जाऊन सगळं सांगतेय असं झालं होतं. आणि सुमी.. तिलाही जाऊन घट्ट मिठी मारायची होती. तिच्यामुळेच माझी आई आज मला सापडली होती. सुमीच्ं ते देखण रूप, आखीव रेखीव नाक, विलक्षण बोलके डोळे,  चालण्याची, बोलण्याची पद्धत, तिचं ते सारखं पदराशी खेळणं, तिचा तो श्रीमंती थाट सगळच डोळयासमोर येवून गेलं. खर तर तीचं वेगळेपण तिच्या सभोवताल पसरलेल्या गुढतेत होतं. समजतच नाहीया.. कोण आहे कोण ती? 

पुण्याला पोहोचले तेव्हा साडे बारा झाले होते. निखील आला होता घ्यायला. मी घरात आल्या आल्या त्याला सगळं सांगायला सुरुवात केली. तोही मन लावून ऐकत होता. म्हणाला, “आपण किती लवकर माणसाला चुक-बरोबरचा ठपका लाऊन मोकळं होतो ना अदिती! खरं तर चुक बरोबर हा आपला दृष्टीकोन असतो.” मला पटलं त्याचं म्हणणं. जर अशा परिस्थितीत तीनी स्वत:च्या सुखाचा विचार केलाही असता तरी काय चुक होतं त्यात? आत्ता पर्यंत तिला माफ नाही करू शकणार म्हणणारी मी आता तिच्याच बाजूने विचार करत होती. माणुस किती मतलबी असतो ना स्वत:च्या सोईनुसार चूक बरोबरची गणितं लावत बसतो. मला स्वतःवरच हसायला आलं. मी निखीलचा हात हातात घेऊन त्याला म्हणाले, “करूयात आपण IVF साठी प्रयत्न. आई व्हायचय मला.” त्यानेही मानेने होकार दिला. त्या रात्री कमालीची शांत झोप लागली. 

दुसरया दिवशी ऑफिसला लवकरच गेले.प्रधानांच्या मुलाखतीसाठी तयारी करायची होती. मी इंटरनेटवर सर्च केलं. शेखर प्रधान. लगेच माहितीचा खजीना माझ्या समोर हजर झाला. मी त्यांचा फोटो निरखून बघत होते. गोरा रंग, पांढरी झाक असलेले केस, घारे डोळे, ओठांच्या खाली असलेला तो लक्ष वेधून घेणारा तीळ. पांढरा शर्ट, त्यावर रॉयल ब्लू ब्लेझर आणि थोडासा ऑड वाटणार फ्लुरोसंट पिंक टाय, उत्तम राहाणीमान असलं तरी चेहरयावर पडलेल्या सुरकुत्या वयाची आठवण करून देत होत्या. जन्म 1967. म्हणजे चौपन्न वर्षांचं वय असेल. वडीलांचा पिढीजात हॉटेल व्यवसाय होताच. पण यांनी मात्र तो एका वेगळया उंचीवर नेऊन ठेवला. पुण्यात सुरू केलेल्या दोन हॉटेल्सचे रूपांतर आता चेन ऑफ़ हॉटेल्समध्ये झाले होते. देशा विदेशात त्यांनी आपले पाय पसरले होते. मी माहिती वाचत गेले आणि प्रश्न काढू लागले. माझं लक्ष मात्र त्यांच्या ‘सुमित्रा चॅरिटेबल ट्रस्ट’ कडे होतं. मी त्या बद्दल माहिती वाचायला सुरुवात केली. 1980 मधली स्थापन होती संस्थेची. सुरुवातीला छोटी छोटी शिबिर, अवेअरनेस प्रोग्राम असंच स्वरूप होतं संस्थेचं.1988 मध्ये त्यांनी पहिली शाळा स्थापन केली. गरीब मुला मुलींसाठी मोफत शिक्षण होतं त्या शाळेत. मग 2001 मधे वसतिगृहाची स्थापना झाली. खेड्यापाड्यातील मुलींसाठी पुण्यासारख्या शहरात मोफत शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. आणि मग 2004 मध्ये सुरू झाला स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या मुला मुलींनाही परदेशातील संधी उपलब्ध व्हाव्यात हाच त्यामागचा उद्देश. माझा अभ्यास सुरू होता तेवढ्यात संपादकांनी बोलावलं काही कारणांमुळे मुलाखत पुढे ढकलण्यात आली होती. माझा जरासा हिरमोडच झाला. कितिही नाही म्हंटलं तरी त्या फ़ोनचं प्रकरण डोक्यात घोळतच होतं. 

माझी ईतर कामं आटोपून घरी जायला निघाले. सुमीला भेटायची ओढ होतीच. मी तिची वाट बघत बसले. खरं तर आठ सव्वा आठ पर्यंत यायची ती नेहमी. पण आज साडे आठ होवून गेले तरी अजून कशी आली नव्हती ती. मी अजून दहा मिनिटे वाट बघून निघायचं ठरवलं. ते काही नाही, आता तिचा नंबर घ्यायलाच हवा. म्हणजे फ़ोन तरी करता येईल अशा वेळी. बरं वगरे नसेल का? की काल मी आली नाही म्हणून आली नसेल? नाही पण असं नाही करणार ती. दुसरया दिवशी, तिसरया दिवशी, चौथ्या दिवशीही... मी रोज वाट बघत होते. पण ती नाही आली. माझी अस्वस्थता वाढत राहिली. आधीच घ्यायला हवा होता नंबर. असं कसं लक्षात आलं नाही माझ्या? पण तशी वेळही आली नाही. रोजच तर भेटत होतो आपण. शाळेतले जे जे  मुलं मुली संपर्कात होते त्यांना सगळ्यांना विचारून पाहिलं पण कोणाच्याच संपर्कात नव्हती ती. तिच्या आई वडीलांनीही कधीच गाव सोडलं होतं पण कुणालाच माहिती नव्हतं त्यांच्या बद्दल. एवढयासाठीच आली होती का ती आपल्या आयुष्यात्? आपला कार्यभाग उरकला आणि निघून गेली. कदाचीत अशीच अवचीत भेटेल पुन्हा कधीतरी. 

माझी IVF ट्रीटमेंट सुरू झाली होती. कामही बरं सुरू होतं. त्या दिवशी रद्द झालेली मुलाखत घेण्याचा योग शेवटी आज आलाच. मी चांगली तयारी केली होती. अर्थात संपदकांनी अनेक सुचना देऊनच पाठवलं होतं. त्यांना ओकवर्ड होईल असे प्रश्न टाळण्याच्या सुचना होत्या. मी तयारीनिशी गेले. मुलाखत त्यांच्या घरीच होती. सुरक्षेचे त्यांचे सगळे नियम पाळत पोहोचले मी शेवटी त्यांच्या बंगल्यात. आमचं अख्ख घर असेल त्याहून कितीतरी मोठा हॉल होता. पूर्ण जमिनीवर गालीचा पसरला होता. मला एका सुरक्षा रक्षकांनी सोफ्यावर बसायला सांगीतलं. मी तिथे बसून त्या बंगल्याचे निरिक्षण करू लागले. एखाद्या पंचतारांकित हॉटेल सारखा तो बंगला. कोपरयात ठेवलेली एका स्त्रीची मोहक मूर्ती, ते मोठालं झुंबर सगळच अगदी आकर्षक. निरिक्षण करता करता माझं लक्ष एका फोटोकडे गेलं. आणि मला धक्काच बसला. त्या फोटोत मिस्टर प्रधान एका स्त्रीच्या खांद्यावर हात ठेवून उभे होते. मी तिथल्याच एका सुरक्षारक्षकाला विचारलं, “या कोण?” त्याच्या कडून लगेच उत्तर आलं, “मिसेस प्रधान.” ती स्त्री दुसरी तिसरी कुणी नसून माझ्याच वयाची सुमी होती. 

क्रमश:

शलाका गोगटे बिनिवाले

भाग 6 ????
https://www.facebook.com/111944793793963/posts/317333189921788/

कथेचा पुढील भाग वाचायला फॉलो करायला विसरू नका हितगुज - Blogs by Shalaka Biniwale

🎭 Series Post

View all