या वळणावर

This story is about three women whose lives take twist and turns where they have to take tough decisions.

या_वळणावर (भाग 1)

कधीकधी संध्याकाळी अगदीच उदास वाटतं.. का कूणास ठाऊक पण आजची संध्याकाळ अगदी तशीच वाटत होती. खिडकीतून डोकावून बघितलं तर खूप आभाळ भरून आलं होतं. जणू काही माझ्याच सारखं त्याच्याही मनावर मळभ साचलय. मी परत माझ्या खुर्चीवर येऊन बसले. जेव्हा पासून तो फ़ोन आला होता तेव्हापासून कामातही लक्ष लागत नव्हतं. घड्याळात कधी एकदाचे सात वाजतायत आणि मी घरी जायला निघतेय असं झालं होतं मला. पण नेमकं अशाच वेळी घड्याळाचा काटा पुढे सरकतच नाही. मी माझी एक नजर आजूबाजूला फिरवली. माझ्या बाजूला बसलेले शर्मा सर, जोगळेकर मॅडम, धारकर साहेब, सोफिया, नैना सगळेच आपाअपल्या कामात व्यग्र होते. मी परत आपल्या खुर्चीवर येऊन बसले. मंद आवाजात माझ्या मोबाइलवर ‘भय इथले संपत नाही..’ हे गाणं लावलं. जेव्हा मला असं उदास वाटतं ना तेव्हा मी हेच गाणं ऐकते. ग्रेसांचे शब्द आणि लता दिदिंचा आवाज आहा..  मन कसं शांत शांत होत जातं. मी परत खाली मान घातली आणि उगाच माझ्या टेबलवर पसरलेली कागदं, फाईली उगाचच चालत राहिले. 

काय स्वप्न बघितले होते मी.. Journalism म्हणजे passion होतं माझं. पण इथे आल्यावर कळतंय की आपल्या स्वप्नातलं journalism आणि प्रत्यक्ष आपण करतोय त्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. मला आलेल्या फ़ोनची सरांना कल्पना दिली. चांगली लिड होती माझ्याकडे त्या प्रधानांच्या धंद्यांबद्दल पण मोरे सर ऐकायलाच तयार नाही. काय तर हे बिट तूझं नाही म्हणे. या नंतर असा कॉल आला तर सरळ दुर्लक्ष कर म्हणे. बरोबर आहे एकूण धंद्यातला जवळपास तिस टक्के धंदा त्यांच्याकडूनच मिळतोय ना यांना. चूक बरोबर वाखाणण्याची माझी बुद्धी आटत जाईल की काय असं वाटायला लागतं मला. कधी कधी वाटतं सोडून द्यावी ही नोकरी आणि छान स्वच्छंदी आयुष्य जगावं पण सद्ध्यातरी हे शक्य नाही. आणखी किती पैसा लागणार आहे ट्रिटमेंटला कूणास ठाऊक. किती प्रेम आहे त्याचं माझ्यावर!! आणि मी मात्र त्याच्यासाठी एवढंही शकत नाही. अर्थात तो याचा दोष मला कधीच देत नाही पण मला मात्र वाटत राहातं... 

“काय हो अदिती मॅडम..! कामात काही लक्ष वगैरे आहे की नाही तुमचं?” मी आपल्याच विचारात मग्न असताना अभयनी मला आवाज दिला. “काय रे ए.. केवढ्याने ओरडतोय कानाजवळ?” मी एक हलकीच चापट मारत त्याला म्हंटलं. “अगं तंद्री लागली होती तूझी. अग साडे सात व्हायला आले.. घरी जायचं नाहीया का?” बापरे विचारांच्या गर्दीत सात कधी वाजून गेले कळलंच नाही. मी त्याच्याशी बोलत बोलतच माझा टेबल आवरला, मोबाईलवरच गाणं बंद केलं... “तुझं कसं काय?” मी अभयला विचारलं. त्याची शिफ्ट रात्री अकरा पर्यंत होती. त्यामुळे मी एकटीच चालू लागले. अभय म्हणजे माझा खास मित्र. मास कॉमला सोबत होतो आम्ही. लग्नानंतर त्याचं आणि निखिलचंही छानच जमलं. कधी कधी तर तो माझा मित्रा आहे की निखिलचा असाच प्रश्न पडतो मला. 

नेमकी माझी घरी जायची वेळ आणि बाहेर धो धो पाउस पाउस पडत होता. आभाळानी तर त्याचं मन मोकळं केलं होतं पण माझ्या मनातले ढग मात्र अजूनही तसेच होते. मी बॅग मधून आपली छत्री काढली आणि बस स्टँडच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. लोकं सुद्धा असेल नसेल तिथे आडोसा शोधण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे बस स्टँडवरही चांगलीच गर्दी होती. आणि मी त्या गर्दीचाच एक भाग बनून अंग चोरून बसची वाट बघत उभी होते. एक बस आली पण त्यात इतकी ढकला ढकल की खूप प्रयत्न करूनही मला जागा काही मिळाली नाही. मग काय.. दुसरया बसची वाट बघत तिथेच उभी राहण्याशिवाय काही पर्याय नव्हता. निखिलला कळवावं म्हणून मी फोन बाहेर काढणार तेवढ्यातच तिथे आलेल्या आलिशान गाडीने माझं लक्ष वेधून घेतलं. गाड्यांचं तसं मला लहानपणा पासूनच कौतूक होतं. त्या गाडीच्ं निरिक्षण करण्यात मी गुंग असतांनाच गाडीचं दार उघडलं आणि एक साधारण माझ्याच वयाची मुलगी खाली उतरली. लगेच तिचा ड्रायवर छत्री घेऊन आला. त्या मुलीने सिगरेट पेटवली आणि बाजुच्या टपरीवाल्याला भज्यांची ऑर्डर दिली.

तिचं वागणं, तिचे हावभाव अगदीच लक्षवेधक होतं म्हणून मी अजूनच कुतूहलाने तिच्या कडे बघायला लागले. अरे ही तर सुमी होती. हो तीच ती शाळेतली सुमी. मी जवळ जवळ ओरडलीच, “सुमीsss....! त्या मुलीनेही वळून पाहीले तशी माझी खात्री पटली. आणि सगळं तसच सोडून धावत जाऊन मी तिला मिठीच मारली. “बापरे सुमी ही तूच आहेस ना नक्की? केवढी बदलली आहेस? पण सुट होतोय हा थाट तुला..!” यावर सुमी हलकीच हसली.

कशी होती सुमी शाळेत? तो ढगळा पंजाबी ड्रेस, तेल लावून घट्ट गोवलेल्या त्या दोन वेण्या. आत्मविश्वास म्हणाल तर मुळीच नाही. पण आता तर रंगरूपच पालटून गेलं हीचं. ती शाळेतली सुमी हिच आहे यावर कोणाचाही विश्वास बसला नसता. सुमंतिनी पाठक. पण सगळे तिला सुमीच म्हणायचे. परिस्थिती अगदीच जेमतेम असावी. पण आता पहा ना... इतक्या आलिशान गाडीतून फिरतेय.. अतिव सुंदर रूप, आखीव रेखीव नाक, विलक्षण बोलके डोळे, कमनीय बांधा, खांद्यावरून समोर वक्षांवर ओघळणारे ते केस. तिनी घातलेलं स्लिव्हलेस ब्लाउज दिसेल इतपत पारदर्शक फिकट अबोली रंगाची तलम अशी शिफॉनची साडी. जणू कुणालाही हिची भुरळ पडावी. आणि त्याच्या जोडीला ही श्रीमंती. पण गर्वाचा लवलेशही तिच्या वागण्यात जाणवत नव्हता. अर्थात जास्त मीच बोलत होते म्हणा. हा कुठे आहे, ती कुठे असते, कोण भेटल्ं होतं, कुणाशी बोलण  झालं असे एक ना अनेक विषयांवर मी खूप उत्साहाने तिच्याशी गप्पा मारू लागले. असं जुनं कोणी भेटलं की किती आपुलकी वाटते ना आपल्याला. तसेच तिला बघितल्यावर लहानपणीच्या अनेक आठवणी उफाळून आल्या. मला आता हलकं वाटायला लागलं होतं. मघाशी मनावर साचलेलं मळभ दूर झाल्यासारखं वाटत होतं.

तुझे मिस्टर काय करतात? मी तिला विचारलं. पण इतक्यात लक्षात आलं की निखिलला कळवायला हवं. गप्पांमधे कसा वेळ गेला कळलंच नाही. साडे आठ व्हायला आले होते. आता पाऊसही थांबला होता आणि आजूबाजूची गर्दीही बरीच ओसरली होती. मी निखिलला फ़ोन करायला फ़ोन काढणार इतक्यात त्याचाच फ़ोन वाजला. मी फ़ोन उचलला, म्हंटलं वाह...क्या टेलिपथी है!! तुलाच फ़ोन करणार होते आत्ता. पण त्याचा आवाज घाबरलेला वाटत होता. म्हणाला असशील तशी घरी ये.. कुणीतरी दगड मारून आपल्या घराची काच फोडली आहे आणि त्या सोबतच तुझ्या नावाची चिट्ठी पण आहे. मी गोंधळून गेले. निखिल तू ठिक आहेस ना?आणि मनी? आणखी काही झालं नाहीया ना? ‘आम्ही दोघंही ठिक आहोत पण तू आधी घरी ये’ म्हणून त्याने फ़ोन ठेवला.

काय प्रकार होता हा? मी त्याचा आवाज ऐकून पुरती गोंधळून गेले होते. मला काय करावं सुचत नव्हतं. म्हणावं का हिला मला घरी सोड म्हणून.. पण इतक्या वर्षांनी भेटलो आपण आणि लगेच कसं म्हणायचं. इतक्यात समोरून ऑटोरिक्षा येताना दिसला आणि मला  हायसं वाटलं. मी तीच निरोप घेऊन लगेच ऑटोत बसले. 

कोणी केला असेल असला प्रकार? काय लिहिलं असेल त्या चिठ्ठीत. प्रधानांची लोकं असतील का ती? पण त्यांना कसं कळलं असेल की माझ्या हाती काय लागलेय ते? पण प्रधान आहेत ते. त्यांच्यासाठी काहीही शक्य आहे. पण म्हणून धमकी असेल का ही आपल्यासाठी? काय खरं, काय खोटं काहीच कळत नव्हतं. मन उगाचच घटनांचे धागे दोरे जुळवू पाहात होतं. 

घरासमोर उतरले तर सगळी कडे अंधार होता. जर निखिल घरी आहे तर मग घरातले दिवे का बंद आहेत? माझ्या हृदयाचे ठोके आता अजूनच जलद व्हायला लागले होते. मी बाहेरूनच निखिलला एक दोन दा आवाज दिल. पण आतून मात्र काहीच प्रतिसाद आला नाही. मग हळूच पर्समधून चावी काढून दरवाजा उघडला. त्या दाराचा चर्र आवाज सुद्धा नकोसा वाटत होता. घरातही पुर्ण अंधाराच होता. मी आत पाऊल ठेवून निखिलला आवाज देणार इतक्यातच कुणीतरी मागून आलं आणि माझ्या तोंडून मोठी किंकाळी बाहेर पडली. 

क्रमश: 

शलाका गोगटे बिनिवाले

🎭 Series Post

View all