या काळरात्रीच्या पुढे सोनेरी पहाट आहे...

हिंमत ठेव.. हार मानू नकोस..


या काळरात्रीच्या पुढे सोनेरी पहाट आहे... 


"नाही म्हणलं न व म्या, एकदा सांगून बी समजत नाय काय?" कमला चिडत बोलत होती. ती भयंकर रागात होती. 



"कमे तू शांत बस बरं , मी बोलतो हाय ना चेत्या सोबत. "किसन. 



"अशी कशी शांत हो म्हणता, हीतं जीव वरखाल व्होयाला लागला हाय, आन् तुमि शांत हो म्हणता? हा दिवस पायण्यासाठी लेकराला येवढे मरेपरी कष्ट करून लहानाचा मोठा केलता काय म्या? परत तेच दिस पहास?" कमला खूप रागात बोलत होती. 



"माई, अगं एग्रिकल्चर खूप चांगला विषय आहे. मला सायंटिस्ट व्हायचे आहे. शेती करायची आहे. खूप शिकायचं आहे , वेगवेगळे प्रयोग करून माझ्या शेतकरी बांधवांची मदत करायची. माझं लहानपणापासूनचे स्वप्न आहे ते." चेतन बोलत होता की त्याच्या गालात एक जोरदार हात पडला.  


"खबरदार , पुन्हा कधी शेतकरी बनाचं नाव बी काढलास तर? माह्या सारखी वाईट कोण दुसरं नाय मग." कमला.  



        चेतन गालावर हात ठेवत पुढे उभ्या असलेल्या कमलाला बघत होता. तिचे डोळे जणूकाही आग ओकत होते. आज पहिल्यांदा आपल्या आईचे हे रूप बघत होता. त्याने त्याच्या आईला इतके रागात कधीच बघितले नव्हते. तो घाबरत कधी तिच्याकडे तर कधी आपल्या वडिलांकडे बघत होता. छोटी रेणूका, हे सगळं काय सुरू आहे? ते बघत उभी होती. 



"कमला, तरुण पोरावर कोण हात उचलते काय? आज एवढा चांगला दिस, आजच्या दिवशी त्यास मारलं? चल जा तिकडे , रेणुका आपल्या माईस दुसऱ्या खोलीत घेऊन जा." किसन.  



       कमलाने चेतन आणि किसनवर एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि दुसऱ्या खोलीमध्ये निघून आली. 



      चेतन , किसन आणि कमलाचा मोठा मुलगा. आज त्याचा बारावीचा बोर्डाचा निकाल लागला होता. तो ९७.३४ % घेऊन बोर्डमधून मेरिट आला होता. त्याने आईबापाच्या मेहनतीचे चीज केले होते. लहानपणापासूनच त्याने आईवडिलांना खूप कष्ट घेतांना बघितले होते. मुलं मोठी होऊन चांगली शिकावी , चांगल्या नोकरीला लागावी , मुलांचे आयुष्य सुखकारक व्हावे , एवढीच माफक इच्छा. मुलांना पण आईवडिलांच्या कष्टाची जाणीव होती . दोन्ही मुलं दिवसरात्र एक करत अभ्यास करत होती. मुलं खूप सालस, प्रामाणिक आणि कष्टाळू होती. लहान रेणुका नववीत होती, तर चेतनने बारावी पास केली होती. तो खूप चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झाला होता. न्यूजपेपर मधून त्याचे नाव, फोटो छापून आले होते. किसन आणि कमला तर खूप खुश होते. किसनने सगळ्या चाळीला मुलाच्या मेरिटमध्ये आल्याचे पेढे वाटले होते. सगळ्यांना ओरडुन ओरडुन सांगत होता " माझा चेत्या मेरिट आला, राज्यात पहिला आला , माझा चेत्या पास झाला." सगळी चाळ किसन, कमला, चेतनचे कौतुक करत होते. आई वडिलांना आनंदी बघून चेतन पण खूप खुश होता. 


       बारावी झाल्यावर आता पुढे काय शिकायचे, म्हणून घरात विषय निघाला, तेव्हा चेतनला शेतकरी व्हायचे , एग्रिकल्चर फील्ड घ्यायची असे सांगितले होते. त्यावरच त्याची आई कमला खूप भडकली होती. अक्षरशः तिने चेतनच्या गालात खूप जोराने मारली होती. एग्रिकल्चर एक खूप चांगली फिल्ड होती , नोकरी पण खूप चांगली मिळणार होती, सायंटिस्ट झाले तर उत्तमच होते, जीवनावश्यक असल्यामुळे त्यातले जॉब कधी बंद पडणार नव्हते, स्वतःची शेती केली तर उत्तमच होते. पैसे भरपूर, वरतून नवनवीन प्रयोग करत शेती अजून विकसित करता येणार होती. त्यातूनच देशाची, शेतकऱ्यांची मदत करण्याचे सौभाग्यही हातून घडणार होते. पण चेतनने एग्रिकल्चरचा विषय आईवडीलांपुढे मांडला होता तर आईवडीलांची नाराजी स्पष्ट दिसत होती, त्यात त्याची आई तर भयंकर संतापली होती. त्याने काय चूक केली त्याला कळत नव्हते. 



"चेत्या, मला म्हाईत हाय तुला खूप वाईट वाटले हाय . तुझ्या माईनं तुझ्यावर असा हात उगरयला व नव्हता पाहिजे . पण तुझ्या प्रेमापोटी, काळजीपोटी उचलला पाय तिनं हात . तिचा खूप जीव हाय पाय तुझ्यावर, म्हणजी आपल्या सगळ्यांवर. तू शेतकरी बनतो म्हणालास ना , तिला सहन नाय झालं , अन् तुझ्यावर तिचा हात उठला. तिला किती दुःख झाले असेल, तिचं काळीज किती दुखलं असेल मज म्हाईत हाय पोरा . नग तिचं बोलणं मनावर घेऊ. तुला दुसरीकडे कुठं , दुसऱ्या विषयात प्रवेश नाय मिळणार काय? टक्के तर चांगले हायेत तुझेवाले . " किसन चेतनला समजावणीच्या सुरात म्हणाला.  



"बापू , जिथं पाहिजे तिथं प्रवेश भेटते. फक्त मला एग्रिकल्चरमध्ये एडमिशन घ्यायची होती ." चेतन.



"हे पाय पोरा, ते शेतीचे वैगरे जे काय डोकस्यात हाय, ते काढून टाक. तुझ्या माईचे, माझे सपान होते , तुला डॉक्टर बनवायचे . तुझी माई नेहमीच म्हणत , म्या माह्या पोरास डॉक्टर बनविल . केवढे उपासतापास , देवाजवळ किती साकडं घातलं तिनं . अन् तिचे कष्ट तर तू पहिलेच आहे, घरोघरी भांडीधूनी केली. एवढ्या वर्षात कधी तिनं स्वतःसाठी साडीचोळी का फुटका मणी घेतला नाही. तिच्या मालकीण बाईनी दिल्या थ्याच घालते पाय. पोरा डॉक्टर व्हय , तुझ्या मागे तुझी भईन हाय, तू चांगला शिकला तर तिचं बी आयुष्य चांगलं व्होईल. "किसन.



"बापू, मला ते सगळंच समजते. तुम्ही सगळे म्हणत आहात तर मी डॉक्टरच होईल. मला पण माझ्या स्वप्नापेक्षा तुमच्या दोघांची स्वप्न पूर्ण करण्यात जास्त आनंद आहे. पण आज माई वेगळी वागत होती. मी कधीच तिला अशी रागावलेली, तिच्या रागात पण खूप दुःख होते. काही झाले होते काय बापू? म्हणजे असे काही जे मला माहिती असायला हवे?" चेतन.


"तसा आता तू मोठा झाला, तुला सांगायला काय हरकत नाय ." किसन त्याला झालेल्या गोष्टी एक एक करत सांगत होता. 


         कमला रागातच आपल्या रूममध्ये येत खाटेवर बसली. आज एवढ्या चांगल्या दिवशी पोरावर हात उगारला, त्याचे तिला खूप वाईट वाटत होते. पण जे तिच्यासोबत झाले होते, ते ती आपल्या पूर्ण आयुष्यात कधीच विसरू शकणार नव्हती. ' जीवघेणी अशी ती रात्र ' ती कधीच विसरू शकणार नव्हती. परत आज त्या काळरात्रीची चेतनने अनपेक्षितपणे आठवण करून दिली होती. ते आठवून तिच्या डोळ्यात पाणी जमायला लागले आणि ती भूतकाळात हरवली. 


"कमले कमले, पाय कसा हिरोवानी दिसते पोरगा. " सुषमा कमलाची लहान बहीण तिला एक फोटो दाखवत म्हणाली. 


"शेती करते, बापाची खूप शेती हाय म्हणते. राणीवानी नांदेल पाय माझी कमली . नशीब काढलं पाय पोरीनं." कमलाची आई.



"नाव काय म्हणाली त्यायीचं?" कमला लाजतच हळू आवाजात आपल्या लहान बहिणीला विचारत होती. 



" किसन! किसन नाव हाय पाय त्यायीचे ." सुषमा.



"तीन तीन पोरी देवानं पदरात टाकल्या , पण रूप गोजिर दिले तेवढे तरी देवाने बरं केले. मोठी त चांगल्या घरी पडली , आता हीचं बी नशीब उजळलं. लहानीचं असेच चांगलं होऊ दे म्हणजी मरासाठी मोकळं." आई देवघराकडे बघत हात जोडत म्हणाली.  


           तीन मुलीच झाल्या म्हणून कमलाच्या वडिलांनी कमलच्या आईला आणि मुलींना सोडले होते आणि दुसरे लग्न केले होते. कमलाच्या आईने कारखान्यात काम करून मुलींना मोठं केले होते. आता तिला फक्त मुलींच्या लग्नाची काळजी होती . ती पण देवाकृपेने हळूहळू मिटत होती. मुली चांगल्या घरी पडत होत्या. मुली दिसायला आणि स्वभावानं गाय होत्या. कमलाला तर मुलाकडूनच मागणी आली होती. घरात आनंदी आनंद होता. 


         कमला आणि किसनचे लग्न पार पडले. किसनला चार भाऊ आणि दोन बहिणी होत्या. किसन सगळ्यात लहान होता. बऱ्यापैकी शेती होती. दोन नंबरचा भाऊ कुठेतरी दुसऱ्या गावात नोकरी करत होता. बाकी तिघे शेती बघत होते. किसनच्या वडिलांनी मुलांना समान जमीन वाटून दिली होती. 


         लग्नानंतर सुरुवातीचा काळ ठीक गेला. नंतर घरात छोट्या मोठ्या कुरबुरी सुरू झाल्या. किसनच्या मोठ्या भावाची बायको गर्भवती होती. काही कारणाने तिचा गर्भपात झाला. त्यातच किसनच्या लग्नानंतर सहा महिन्याच्या आतमध्ये किसनच्या वडिलांचे निधन झाले. नातेवाईक कमलाला पांढऱ्या पायाची l, अपशकुनी म्हणून हिणवू लागले. तिच्या सासूच्याही मनात चुकीच्या गोष्टी भरवू लागले. त्यातच मग किसनच्या आई आणि मोठ्या जावेने मिळून कमलाला घराबाहेर काढले.


        किसनला माहिती होते या सगळ्यामध्ये कमलाचा काही दोष नाही आहे. सगळे नियतीचे खेळ आहे. त्याने कमलाची साथ सोडली नाही. दोघंही मिळून घराबाहेर पडले. वडिलांनी दिलेला थोडासा जमिनीचा तुकडा गाठीशी होता. शेती असलेल्या गावाजवळच त्यांनी दोन खोल्यांचे घर भाड्याने घेतले. दोघांनी मिळून आपला नवीन संसार सुरू केला. शेतात पीक चांगले येत होते . घरात भरभराट होत होती. दोन वर्ष खूप छान गेले. त्यांच्या संसारवेलीवर चेतन नावाचे फुल उमलले. चेतन झाला तेव्हा दोघंही खूप खुश होते. अगदी नजर लागावी तसा दोघांचा संसार सुरू होता. 


            दोन वर्ष शेती छान झाली होती. मात्र तिसऱ्या वर्षी दुष्काळाचे सावट पसरले. शेतीचे खूप नुकसान झाले. काहीच पीक हाती आले नाही. दोन वर्षापासून काही पैसे कमलाने गाठीशी साठवून ठेवले होते. तेच वापरून तिने घर चालवले होते. पण दुसऱ्या वर्षी शेती करायची तर कसे? घरकामातून उरलेले थोडे पैसे होते, पण ते पुरणार नव्हते. तिच्याजवळ लग्नात आईने दिलेले सोन्याचे कानातले होते, ते विकून आणि थोडे जवळचे पैसे टाकून शेतीची सोय केली होती. दोघांनी खूप मेहनत घेतली . पावसाने पण वेळेवर सुरुवात केली. सगळे शेतकरी बांधव खुश होते. मागच्या वर्षी झालेले नुकसान यावर्षी भरून निघेल, या विचारानेच सगळे खुश होते. पण झाले उलटेच. पावसाने जरी वेळेवर सुरुवात केली होती, तरी नंतर पाऊस पूर्णतः गायब झाला. यावर्षीही शेतीचे खूप नुकसान झाले. अगदी थोडेफार धान्य काय ते हाती लागले होते. किसन कमलाने कसेबसे काहीबाही विकून यावर्षी खाण्यापिण्याची सोय केली होती. आता पुढल्या वर्षी शेती करायची म्हणजे बी-बियाणे आणायचे कुठून? हाताशी काहीच शिल्लक नव्हते. थोडे जे काही सोन्याचे डोरले मनी होते ,ते सुद्धा विकून झाले होते. किसनने आशा सोडली होती. काय करावे, त्याला काही सुचेनासे झाले होते. कमला त्याला धीर बांधत होती. शेवटी सावकाराकडून कर्ज घेऊन शेती करायची ठरले होते. पण सावकार काहीतरी गहाण ठेवल्याशिवाय कर्ज देईना. म्हणून मग शेती गहाण ठेवून कर्ज घेतले. बी बियाणे, खत सगळं आणले. किसन आणि कमलाने खूप अंग मेहनत घेतली. छोट्या चेतनला शेतातच साडीचा पाळणा बांधून ,त्यात झोपवून कमला शेतीच्या कामात किसनला मदत करत होती. पेरणी वगैरे सगळं व्यवस्थित पार पडले होते. पाऊस पण अपेक्षेप्रमाणे झाला होता. डोळ्यांसमोर शेतीत सोन्यासारखे पीक वाढतांना बघून किसन आणि कमला खूप खुश होते. घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटत होते. घरात आनंदाचे वातावरण होते. अशातच कमलाला दुसऱ्यांदा दिवस राहिले. घरातील आनंद द्विगुणित झाला होता. 


"कमे, या वेळच्याला मुलगी झाली पाहिजे पाय. " किसन. 



"वाह रे चेत्याचे बापू , लोकास्नी पोरागा पाहिजे आस्ते अन् तुम्हासणी पोरगी पाहिजे व्हय?" कमला.



"व्हय, तुझ्यावानीच पाहिजेन पाय. पोरगी लक्ष्मीचं रूप असते, पोरीने घरला घरपण येते . जीव लावत्यात बापास. अख्ख्या घराची काळजी घेतात माय सारखी." बोलता बोलता त्याचे डोळे पाणावले. 


" आत्याबाईची आठवण येतय नव्हं. भेटून यावा. लय वर्ष झाले बगा, भेटला नाय तुम्ही. " कमला.



"नग, तुज घरात घील, तवा जाईल. तुझी कायबी चूक नव्हती तवा." किसन.



"जाऊ दे, नग तेवढा इचार, माय हाय न व तुमची, सगळं इसरून भेटून घ्यावा, त्यायीस बी तुमची आठवण येत असाल बगा." कमला.



"कमे, किती चांगले इचार हाय तुझे, म्हणून म्हणलो, तूयासारखी पोरगीच पाहिजे. बरं झोप आता." किसन. 



"व्हय जी" म्हणत कमला खाली सतरंजीवर किसनच्या शेजारी त्याच्या हातावर डोकं ठेऊन झोपली. 



"कमे, तिथं चेत्या शेजारी, वाकडवर झोप की. हितं खाली त्रास हुईल तुज." किसन, तिला आपल्या शेजारी बघून म्हणाला. 



"तुमच्याजवळ त्रास नसते होत बगा. तुमच्याजवळ हे सत्रंजीपण माखमलीच्या गादीवानी वाटते." कमला.



"येडीच हाय बाय माझी." तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तिला जवळ घेत तो झोपी गेला. 



        आता ऑक्टोबर महिना सुरू झाला होता. लकरच पीक कापणी सुरू होणार होती. आणि काळाने पुन्हा घात केला. जोराचा पाऊस सुरू झाला. लागोपाठ पाऊस सुरू होता. आजकाल असेच झाले होते. कोणत्या ऋतूचा काहीच भरवसा राहिला नव्हता. नद्या नाले तुडुंब भरून वाहत होते . काही काही ठिकाणी धरणे सुद्धा उघडले होते. शेवटी व्हायचे तेच झाले, खूप पावसामुळे पिकाची नासाडी झाली होती. हा अवकाळी पाऊस प्रत्येक शेतकर्यांचा डोळ्यात मरणाप्रत पाणी देऊन गेला होता. किसन सारख्या छोट्या शेतकऱ्यांच्या घरात शोकाकुल वातावरण झाले होते. 



"कमे, सारं संपलं. जीव घेतला या पावसानं. कधी नाय तो बरसत नाय, आज बरसायचा थांबला नाय." किसन हताशपणे शेताकडे बघत डोक्यावर हात ठेवून बसला होता. कमला पण भरल्या डोळ्यांनी शेतावरून नजर फिरवत होती. 



       त्यांच्याकडे ही शेवटची आशा उरली होती. दोन - तीन वर्षापासून पीक येत नव्हते. कसेतरी घर चालवत होते. आता तर कर्ज सुद्धा घेतले होते. जमीन पण गहाण होती. जमीन कशी सोडवणार, घर कसे चालणार? त्यात कमला तीन महिन्यांची गर्भवती, छोटा चेतन, असे सगळेच प्रश्न किसनपुढे येऊन ठाकले होते. दुसऱ्या शेतकऱ्याकडे कामाला जायचा विचार केला, पण कोणी काम देईना, असे झाले होते. सगळ्याच शेतकऱ्यांकडे सारखेच हाल होते. आजूबाजूच्या गावात सुद्धा त्याने काम शोधले , पण दहा वीस रुपये रोजी खेरीज काही जास्ती मिळत नव्हते. किसन आपल्या आईकडे पण जाऊन आला होता, कदाचित काही मदत मिळेल म्हणून, पण तिथेही सगळ्यांनी नकार दिला होता. दिवस चालवायचा म्हणून बऱ्याच ठिकाणी त्याची उधारी झाली होती. इकडे सावकार पण पैसे मागू लागला होता. त्याने किसनची हालत बघितली होती, जमीन हडपण्यासाठी या वेळ पेक्षा दुसरी कोणतीच चांगली वेळ असू शकत नाही, याचा फायदा घेत सावकाराने पण किसनच्या मागे पैशासाठी तगादा लावला होता.


           आता घरात दोन वेळचे जेवण होणे सुद्धा कठीण झाले होते. कितीतरी रात्री किसन आणि कमलाने पाणी पिऊन काढल्या होत्या. कमला त्याला सर्वतोपरी मदत करत होती. तिची कधीच कुठल्या गोष्टीसाठी तक्रार नव्हती. कमला पोटुशी, तिचे आठ महिने भरत आले होते. त्यात तिला दोन वेळेचे जेवण सुद्धा देऊ शकत नाही, सगळं बघून आता तो खचत चालला होता. परिस्थिती खूप खालावत चालली होती. मार्ग काही दिसत नव्हते.



"चेत्याचे बापू, आव चेत्याचे बापू, कंबर थोडशी दुखल्यागत लागतंय, थोडा बाम लावून, चोळून देता का?" कमला झोपेतच बाजूला हात मारत किसनला शोधत होती. बऱ्याच वेळ किसनचा काही आवाज नाही आला म्हणून जागीच उठत बसली. खोलीवर नजर फिरवली तर किसन कुठे दिसला नाही. 


"एवढ्या मध्यरात्रीचे कुठं गेलं असतील चेत्याचे बापू?" विचार करत कमला तिथेच थोडा वेळ बसत किसनची वाट बघत होती. बराच वेळ झाला, किसन आला नाही म्हणून ती त्याला बघायला म्हणून खोलीचं दार उघडत बाहेर अंगणात गेली. कंबर खूप दुखत होती , चालायला तिला त्रास होत होता. एका हाताने कंबर पकडत ती चालत आजूबाजूला बघत होती. तरी तो कुठे दिसला नाही. बाथरूमसाठी गेला असेल विचार करत ती घराच्या मागच्या बाजूला आली. 



"चेत्याचे बापू sssss ........." ती समोरचं दृश्य बघून खूप घाबरली . तोंडातून एकही अक्षर फुटत नव्हता, खूप धीर एकवटून ती जोराने ओरडली होती . 


         किसनने घराच्या मागच्या बाजूला एका मोठ्या झाडाच्या फांदीवर दोर टाकून गळफास घेतला होता. त्याने बहुतेक नुकताच गळफास घेतला होता, त्याचे पाय हलत होते. कमला पळतच त्याचा जवळ जात त्याचे पाय धरून पकडले. पण तिला भार सहन होईना, शेवटी तिने त्याचे पाय आपल्या खांद्यावर ठेवत धरून पकडले. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. एवढ्या रात्रीचं काय करू , तिला काहीच कळत नव्हते. 



" मंग्याचे बापू sssss .......

" सरले..........

" सोम्या........." कमलाला जो जो आठवत होता त्याचे ती जोरजोराने नाव घेत ओरडत होती. तिला त्या परिस्थितीत तसे उभे राहणे असह्य होत होते. तरी तिने हिम्मत नव्हती हारली. पूर्ण शक्ती एकवटून ती उभी आजूबाजूच्या लोकांना आवाज देत, मदत मागत होती. 



" किसन्या sss...." कमलाच्या आवाजाने जागा झालेला सोमनाथ त्याच्या घरातून बाहेर आला. समोरचे दृश्य बघून तोही घाबरला. 


" गोप्या, राज्याssss , आरं लवकर या , हे पाय किस्न्याने गळफास लावला. आरं लवकर या." ओरडतच सोमनाथ धावतच कमला जवळ आला होता. त्याच्या पाठोपाठ त्याची बायको, आणि बरीच आजूबाजूची लोकं धाऊन आली होती. 


"सरले, वैनीस सांभाळ." सोमनाथ.


          सगळ्यांनी मिळून किसनला झाडावरून खाली उतरवले. सगळ्यांनी मिळून त्याचा जीव वाचवला होता. 


         कमलाला चांगलाच दम लागला होता. सगळं डोळ्यासमोर येत होते. ते सगळे आठवून तिला भोवळ आली , ती खाली बसणार तेवढयात सरला आणि बाकी बायकांनी तिला सावरले. 


         कमलाने दोन दिवस शांत राहण्याचे ठरवले. किसनचे मित्र, शेजारी सगळे त्याला खूप बोलत होते, समजावत होते. किसनला तर कमलासोबत नजर मिळवणे सुद्धा जमत नव्हते. किसनची आणि कमलाची हालत ओळखून कोणीच त्यांना एकटे सोडले नव्हते. दिवस तर ठीक जात होता, पण रात्रीची कमलाला अजिबात झोप येत नव्हती. सगळे लक्ष तिचे किसनकडे राहत होते. शेवटी दोन दिवसाने तिचा बांध फुटलाच.  


"असे कशापयी केले तुम्ही? माया, पोराईचा थोडा तर इचार करायचा व्होता. आमी कोणाकडे पाहून जगलो असतो? अन् हे वटितले बाळ, बाप पहिला बी नाही. मज यायला दोन सकंद उशीर झाला असता तर कायच्या काय हून बसलं असते." कमला रडत बोलत होती. 


"कमे काय करू, तू पोटाशी, पोटभर तर जाऊदे दोन येळचे जेवण बी नाही देऊ शकत . कोणत्याच कामाचा नाय मी. जगून तरी काय करू? मरून तरी फायदा होईल, शेतकरी आत्महत्या करत्यात तर पैसे तरी मिळेल." किसन. 



"किती दीस पुरल थे पैसे? आयुष्य सरल का त्येच्यात?" कमला आता चिडली होती.


तिच्या प्रश्नाने तो चूप झाला होता. 


"पैका कित्तिक ही असला तरी कधीच पुरायचा नाय. अन् तुमच्या मरणाचा पैका घशाखाली तरी उतरला असता काय आमच्या? एकटी दोन पोरायसनी कशी संभाळील, इचार नाय आला? विधवा बाईकडं लोकं कश्या कश्या नजरेनं बघत्यात, म्हाईत हाय न व तुम्हास. वाईट येळ, कोण आमचं रक्षण करल? तुमच्या मायेस का उत्तर दिलं असत? माया पोरास बी खाल्ल चांडळणीने ,म्हणल्या अस्त्या. सारे लोकं नावं ठिऊ ठिऊ जगू नस्त्ये देले." कमला.


"तुमच्या मानसायचे बरे असते, सहनशक्ती संपली का, ना मागचा ना पुढचा इचार करत , हार मानून मरण छातीशी कवटाळता. आमा बायकांना मरतो म्हणलं तरी दहा येळ विचार करा लागते. पोरं, नवरा, घर डोळ्यासमोर येत्ये. मरासाठी बी येळ नस्त्ये आमा बायांना. आम्ही आमची जिम्मेदारी इसरत नाय. तुमचं बरे असते एका झटक्यात त्रासातून मुक्त, ना आगचा ना मागचा इचार तुम्हास." कमला.


"हे पोरगं अजून भाईर बी नाय आलं, का सांगितले अस्त्ये पोराईस, बाप त्यांचा भेकाड निगाला? जन्म दियुन आपली जिम्मेदारी इसरला? का आदर्श घेतील पोरं? परिस्थिती सगट लढता नसल यीत तर घ्या गळफास? बापच शिकौन गेला नाय काय भेकडपणा?" कमला.


       आता मात्र तिचे एक एक शब्द त्याच्या हृदयावर घाव करत होते. 



"दोघं मिळून काढली अस्त्यी वाट. काम केले असते, भिक मागितली अस्त्यी, पण केले अस्त्ये ना काई जोडीनं? एकमेकास आधार दियुन रायलो अस्त्यो न? हे दिस काय आयुष्यभर असेच थोडी रायतील? परीक्षेचा काळ हाये, निघल हे दीस बी. अन् पुढल्या येळ असं काय करायचं असल ना, तर आधी आम्हास मारा , मग तुम्हास जे करायचं ते करा." कमला. 


          कमलाचे बोलणे ऐकून किसनचे डोळे वाहू लागले. त्याला त्याची चूक कळली होती. 


"चुकलं माह्या, आता नाय करणार असं काय. या हालतीत तूला खूप तरास दिला. माफी मागतो, आता असं नाय वागणार." किसन.



"तुमच्या अन् पोराई शिवाय, काय नग मला. तुम्ही सोबत हाय तर कायबी करू शकते. स्वतःला ईकील, पण तुम्हा कोणास काय बी होऊ देणार नाय." कमला.


"कमला, असं काय बी नग बोलू. आता कायच नाय करणार. तुझी परमिसन नसल तर यमाला बी वापस पाटविल, जसं त्या दिस तू त्यास वापस पाटवलिस." किसन.


किसनचं बोलणं ऐकून कमलाच्या चेहऱ्यावर हसू उमलले. 


*******


वर्तमान ....


" बापरे बापू, खूप भयानक होते हे सगळं." चेतनच्या डोळ्यात पाणी साचत आले होते.


" तुझ्या माईने भरल्या डोळ्यांनी मरण अनुभवले हाय. म्हणून तूयावर चिडली. नायतर खूप प्रेम करते ती तुझ्यावर." किसन. 


"बापू, नकळत मी माईला खूप दुखावले. आज तिला परत ते सगळं आठवले असेल." चेतन. 


"हो."किसन.


"बापू ,आपण मग इकडे मुंबईमध्ये कसे आलो?" चेतन.


"त्या दिवस नंतर पंधरा वीस दिवसांनी रेणुका झाली. अन् म्हणल्याप्रमाने लक्ष्मीच्या पावलानं घरात आली. सावकार गहाण ठीवलेली जमीन इकत घेतो म्हणला. त्यानं कर्ज घेतलेले पैसे कापून उरलेले पैस दिलं. त्याच दिवशी हीतं मुंबईमध्ये तो माधव राहत होता, तुझा माधव काका, देवासारखा धाऊन आला. तो गावचाच होता, तो हीतं कारखान्यात नोकरी करत होता, त्याचा फोन आलता. त्याला माया गळफास बद्दल कोणीतरी सांगितले म्हणे. तो म्हणला हितं खूप नोकऱ्या हायीत, येऊन जा म्हणून. मग शेतीचे होते थोडे पैसे गाठीशी, तुम्हा सर्वास घियुन आलो इथं. त्यानं खूप मदत केली पाय. तू चार पाच वर्षाचा, रेणुका एका महिन्याची व्होती. त्यानं दोन महिनं त्याच्याच खोलीत राहायला दिलं, कारखान्यात नोकरी लावून दिली. मग तिथेच एक खोली किरायानी घेतली. नवीन संसार सुरू केला. तुझ्या माईने तेव्हाच मनाशी ठाणल व्हतं , पोरांस्नी खूप शिकौन मोठं करायचं, नौकरी करायची. पैसे कमी नग पडाया, माह्या एकट्यावर पैशाचा ताण नग म्हणून, तुझ्या माईन ओळखीतून धूनी भांडीची कामं सुरू केली. त्यातून तिची चांगल्या शिकल्या घरात ओळखी झाली. चांगल्या गोष्टी शिकली. तुला , रेणुकेला चांगले संस्कार दिले. तिच्या हिमतीपायीच हे सारं सगळं चांगले झाले पाय. आज तू पास झाला, तुझी अन् तिचीच मेहनत हाय." किसन. 



        तिकडे कमला भूतकाळाच्या विचारातून बाहेर आली. तिला समजले की तिने आज मुलावर हात उचलून खूप चूक केली. तिने आपले डोळे पुसले आणि बाहेर आली. 



"पोरा, आपल्या माईला माफ कर. एवढा चांगला दिस, म्या तुला मारायला नग व्हतं. आमी आमची सपान तूयावर लादली, चुकलोच पाय. तुला जे वाटते ते शिक. आम्ही तुया पाठीशी आहो." कमला चेतनच्या डोक्यावरून हात फिरवत त्याचा गालगुच्चे घेत म्हणाली. 



"माई, तू कशाला माफी मागते, तुझा हक्क आहे मारायचा. जो प्रेम करतो तो रागावू शकतो, मारू पण शकतो. आणि हो तुमचं स्वप्न तेच माझं स्वप्न, मी डॉक्टरच होणार. " चेतन आपल्या आईला जवळ घेत बोलला. 


" ये रेणुके, हिकड ये, तिथं का रडत उभी हाय ?" किसनचे लक्ष तिच्याकडे गेले , ती एका कोपऱ्यात उभी रडत होती. रेणुका धावतच आपल्या बाबाच्या कुशीत शिरली .



******


15 वर्ष नंतर .....



" And the ' diversified agriculture ' award goes to Dr. Chetan Kisan Patil." स्टेजवरून मोठ्या आवाजात नाव घेतल्या जात होते. 



       एका आलिशान हॉटेलमध्ये एग्रिकल्चर डिपार्टमेंटशी संबंधित अवॉर्ड सुरू होते. त्यात बेस्ट एग्रिकल्चर अवॉर्ड चेतनला मिळाला होता. चेतनचे माई बापू, रेणुका आणि त्याची बायको डॉक्टर रचना, सगळे हॉलमध्ये बसले आनंदाने टाळ्या वाजवत होते. किसन आणि कमलाचे डोळे आनंदाश्रुन्नी वाहत होते. 


       बारावी नंतर चेतनला शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला होता. पूर्ण मन लावून अभ्यास करत तो डॉक्टर झाला होता. रेणुका भावच्याच पावलावर पाय ठेवत बारावी मध्ये मेरिट आली होती. तिने इंजिनिअरिंगची फील्ड निवडली होती. ती एका मल्टीनेशनल कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरी करत होती. रचना चेतनची ज्युनिअर होती. दोघांचा प्रेमविवाह झाला होता . एमबीबीएस नंतर त्याने MS सुद्धा केले होते. एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये तो आणि रचना नोकरी करत होते. 


          चेतनचे आधीपासूनच शेतकरी व्हायचे स्वप्न होते. चेतनने पैसे साठवून शेती विकत घेतली होती. त्याचे बाबा , तो आणि एग्रिकल्चरचे काही लोकं मिळून ते शेती बघत होते. आधुनिक पद्धती, वेगवेगळे प्रयोग करत शेती एका वेगळ्या लेव्हलवर नेऊन ठेवली होती. त्यातून होणारी कमाई तो इतर गरजू शेतकऱ्यांसाठी वापरत होता. एग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये त्याने चांगले नाव कमावले होते. त्याचाच आज त्याला अवॉर्ड मिळाला होता. 



"म्हणलं व्हतं न व , येळ सारखी नाय राहत. तेव्हा गळफास घेऊन गेला असता तर आजचं हे सुख पायता आलं अस्त का? थोड्या काळच्या वेदनेने, पाय अख्ख्या आयुष्याची राखरांगोळी करत व्हता. आत्महत्या करणे म्हणजे परत्येक त्रासाचा, दुःखाचा उपाय नस्त्यो , चेत्याचे बापू. थोड धिरानं जर वागला, आपला जर तोल सांभाळला तर सोन्यासारखे दिवस अस्त्यात समोर आयुष्यात , फकस्त थोडी हिंमत ठेवा लागते, अन् खुप मेहनत घ्या लागते. " कमला.


" हो बरोबर हाय तुझं, चुकलोच म्या तवा. तू होती म्हणून आयुष्य वापस आले, आजचा हा सोन्यासारखा दीस पहायास भेटला. प्रत्येक शेतकऱ्यास माझी एकच विनंती हाय, जे चूक मी करास गेलो होतो, ते तुम्ही करू नका. मला वाचवायला माझी कमला आली. पण परत्येक येळ कमला यील, असं नव्ह . आयुष्य खूप सुंदर हाय , दिस एकसारखे राहत नाय, पालटत्यात, हिम्मत ठेवा लागते, खचून जाऊ नका. नायतर तुमच्या सोन्यासारख्या संसराची, परिवाराची राखरांगोळी व्हते. बायकोला एकटे सोडून जाऊ नका. तिच्या सोबतीने , हिमतीने जगा. संसार नक्की फुलेल.".किसन. 


       चेतन अवॉर्ड घ्यायला स्टेजवर गेला. सगळीकडे टाळ्यांचा गडगडाट होत होता. 


" मी जन्माने शेतकरी होतो, आणि मरेलही तर शेतकरी म्हणूनच. अभिमान आहे मला माझ्या या काळी मातीचा, अभिमान आहे मला माझा शेतकरी होण्याचा. " चेतनच्या वाक्यावर त्याच्यावर पुष्पांचा वर्षाव होऊ लागला. 


*****


समाप्त