Oct 25, 2020
स्पर्धा

या जगण्यावर शतदा प्रेम करावे

Read Later
या जगण्यावर शतदा प्रेम करावे

Copyright..©..✍️ जगदीश लक्ष्मण वानखडे.

                 "या जगण्यावर शतदा प्रेम करावे"

                     सुर्यदेवता मावळतीला आले होते. दिवे लावण्याची वेळ झाली होती. सावित्रीने नेहमीप्रमाणे देवाजवळ दिवा लावला. स्वतःशीच हळू आवाजात काहीतरी पुटपुटली. तिला आता हृदयाचा जास्त त्रास जाणवत असल्याने सारखे थकल्या सारखे वाटत होते. मात्र परिस्थिती जेमतेम असल्यामुळे डॉक्टरांनी सांगीतलेले ऑपरेशन पुढे ढकलावे लागत होते. आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने ती सतीशकडे तब्येतीची कोणतीच तक्रार करत नव्हती. पती अकाली गेल्यामुळे सतीश एकटाच तिचा सहारा होता. त्याला वाढवण्यात व शिकवण्यात तीच अखं आयुष्य खर्ची झालं होतं. सतीशला चांगली नोकरी लागल्यानंतर त्याच लग्न लावू व नंतर नातवंडासोबत खेळत पुढील आयुष्य आनंदानं जगू असं तिनं मनाशी ठरवलं होतं. पण सतीशचे शिक्षण पूर्ण होऊन एक वर्ष उलटलं. एक कुरियरची नोकरी सोडली तर त्याला योग्य ते यश, चांगली नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे सावित्री नेहमी काळजीत राहत होती. पण सतीशची सध्याची मानसिक स्थिती पाहुन ती त्याला त्यातलं काहीच कळू देत नव्हती.

                      आज नेहमीपेक्षा खूप उशीर झाला. सतीश अजून घरी आला नव्हता. म्हणून सावित्रीला हुरहूर वाटत होती. सतीश आल्यानंतर त्याच्या आवडीचं वांग्याचं भरीत करू! असं मनाशी ठरवून ती त्याची वाट पाहत होती. रात्र चढत होती. मात्र सतीशचा अजूनही काही पत्ता नव्हता. अशा स्थितीत वाईट विचार तिच्या मनात घोळू लागले.  'सततच अपयश येत असल्याने सतीशने काही वेडं-वाकडं तर केलं नसेल ना.?' या विचाराने ती थक्क झाली. आता तिला घड्याळाच्या कट्ट्याचे टकटक आवाज ऐकू येऊ लागले. तेवढयातच तिला सतीशच्या सायकल ठेवण्याचा आवाज ऐकू आला. सतीशला पाहून तिचा दिवसभराचा थकवा एका क्षणात दूर झाला.

                  सतीश फ्रेश होईपर्यंत तिने सतीशच्या आवडीचे भरीत केले. जेवताना विषय नको म्हणून ती काही न बोलता सतीशला वाढत होती. पण आज मात्र आईची काळजी व तगमग सतीशच्या नजरेतून सुटली नव्हती.
"आई तू पण जेऊन घे ना माझ्या सोबत."
त्याने आईला बोलतं करण्याचा प्रयत्न केला.
"नको बाळा, तू करून घे जेवण. मी करेल नंतर." बोलता-बोलता आईने त्याला भाकर वाढती घेतली. 
"आई आता बस झालं जेवण! पोट भरलं ग बाई माझं." असं बोलून सतीशने जेवण संपविले.

                 आई झोपली होती. मात्र सतीशला त्या रात्री झोपच लागत नव्हती. तो सारखा आईकडे पाहत होता व स्वतःला दोष देत होता. तो ही आता हतबल झाला होता. रोज सकाळी नव्या उमेद्दींन उठून कुरियरची नोकरी करायची व चांगल्या नोकरीच्या शोधात राहायचे पण सरते शेवटी नेहमीप्रमाणे निराश, रिकाम्या हाती घरी येणं हे त्याला सारखं रुतत होत. अजूनही आपण आईच्या शिवणकामाच्या कमाईवरचं जीवन जगत आहोत हा विचार त्याला सहन होत नव्हता. त्यातच आईची दिवसंदिवस खालावत चाललेली तब्येत त्याला पाहवत नव्हती. घरची अशी परिस्थिती व आपल्या पदरी पडणारे सारखे अपयश यामुळे तो सारखा खचून जात होता. अशा बिकट परिस्थितीत आपण जास्त काळ तग धरू शकणार नाही याची जाणीव त्याला होत होती. 'आत्महत्या करावी' हा विचार त्याच्या मनात घर करू लागला. पण आईकडे पाहून त्याला आत्महत्या देखील करता येत नव्हती. 'आत्महत्या करावी वाटून देखील आत्महत्या न करता येणं.' माणसाने एवढं ही हतबल होऊ नये. खरंच 'भावनिक दृष्ट्या आत्महत्येचं ही स्वातंत्र्य असतं तर कीती बरं झालं असतं.' असं त्याला सारखं वाटत होतं.  

                  सतीश पूर्ण हताश झाला होता. याच मानसिक स्थितीत तो कुरियर सेंटरला गेला. पण काम करत असतांना देखील त्याच्या मनातून आत्महत्येचे विचार काही करून जात नव्हते. आज मनोज न आल्याने कुरियर पोहवण्याची जबाबदारी सतीशकडे आली होती. सर्व कुरियर शॉर्टइंग करून सतीशने कुरियर वाटण्यास सुरुवात केली. दिवसभर कुरियर वाटून झाल्यावर थकलेला सतीश हताश मनानं चहाच्या टपरीवर चहा घेण्यासाठी बसला होता. तेवढ्यात त्याच्या पायाला काही तरी टोचत आहे याची जाणीव त्याला झाली.  "बाबा एक कप चहा पाजा ना.?" या आवाजाने तो थोडा शुद्धीवर आला. पाहतो तर काय एक मळलेले कापड घातलेला उतारवयातील आंधळा माणूस, हातात काठी घेऊन सतीशकडे चहासाठी विनवणी करत होता. त्याची अशी स्थिती पाहून सतीशला त्याची दया आली. त्याला चहा देऊन सतीश घराकडे निघालाच होता. तर त्याला जाणवले की आणखी एक कुरियर देण्याचे बाकी आहे. 'समाधान गणपत सोळुंके, पत्ता जुनी झोपडपट्टी' शेवटचे कुरियर देऊन सरळ घरी जाऊ असं म्हणत त्याने सायकल काढली. मात्र आत्महत्येचे विचार काही करून त्याच्या मनातून जात नव्हते. या विचारातच तो कुरियरच्या पत्त्यावर पोहचला.

               एक झोपडी ती ही पडत्या स्वरूपात होती. केव्हा पडेल याचा काही अंदाज नव्हता. जेमतेम एक खोली एवढी जागा. तेवढ्यात रेडिओवर गुलझार ने रचलेलं किशोर कुमारचं  "आणेवाला पल जाणे वाला है."  हे गाणे सुरू होते. त्या मागे आजोबाही तेच गाणे आनंदाने गुणगुणत होते. सतीशने आवाज दिला.
"समाधान गणपत सोळुंके आपणच का ?"
"हो मीच 'समाधान'....बोला काय काम काढलं आजोबा कडे ?" आजोबाने पहाडी आवाजात विचारले.
"काही नाही तुमचं कुरियर आहे."
"अरे वा! आलं का कुरियर?"
"कौशल्या आलं ग! बाई कुरियर." असं म्हणत-म्हणत आजोबा आत गेले व बाहेर येताच आनंदाने सतीशला विचारलं.
"बहाद्दर चहा घेतोस का ? पण दूध नाही, काळा चहा मिळेल. घेतोस का ?"
नकळत सतीशच्या तोंडून "हो आजोबा." हे शब्द बाहेर पडले.
"थांब मी ठेवतो, तुझी आजी खूप दिवसापासून आजारी आहे." असं म्हणत आजोबा चहा ठेवतच बोलत होते.
"हा चहा मला आनंद झाला म्हणून तुला देत आहे पोरा. खूप दिवसानी मनीषची मानिऑर्डर आली 500 रु. पाठविले मुलाने, तो शहरात नोकरीवर आहे. सूनबाई नातवंड तिथेच राहतात. आमची अडचण होत होती त्याला, म्हणून आम्ही इथे निघून आलो." असं म्हणत आजोबाने सतिशच्या हातात चहाचा कप दिला. चहाचा घोट घेत सतीशने विचारले.
"आजी कधी पासून अंथरुणाला पडली आहे आजोबा ?"
"खूप दिवस झालेत आता जास्त दिवस तिची सोबत राहणार नाही." असं म्हणतचं आजोबाने चहाचा कप खाली ठेवला. आजोबाकडे पाहत सतीश म्हणाला..
" आजोबा, या अशा परिस्थितीत देखील तुम्ही एवढे आनंदी कसे काय राहता ?"
आजोबा बोलता बोलता.. बोलत गेले... म्हणाले,
"सुख भोगा की दुःख भोगा ते भोगण्यासाठी तुम्ही जिवंत आहात हेच खूप आहे. आयुष्य म्हंटल की पडता काळ येतो आणि जातो ही.. सदा सर्वकाळ सर्व दिवस सारखे राहत नाहीत. मनुष्य म्हटलं की तो जन्मला येणार आणि मरणार देखील." असं म्हणून आजोबा आत निघून गेले.

              सतीश बराच वेळ तिथंच सुन्न बसून राहिला. आज त्याने दोन प्रसंग पाहिले होते, एक आंधळ्या माणसाचा प्रसंग व दुसरा आजोबा व अंथरुणाला खिळलेली त्यांची पत्नी हा प्रसंग. दोन्ही प्रसंग त्याच्या समोर डोकावू लागले. मानवी स्वभावाची वृत्तीच मुळात तुलना करण्याची असते. मानवी प्रकृतीच्या या नियमाला सतीशही अपवाद नव्हता. त्याचं ही मन नकळत त्याच्या परिस्थितीची तुलना त्या दोन प्रसंगाशी करू लागले. एवढ्या कठीण परिस्तिथीवर मात करून एक आंधळा माणूस व स्वतःचा मुलगा असून देखील तो जवळ नाही, पत्नी आहे पण काही दिवसाची सोबती, ती ही अंथरुणाला खिळलेली. डोंगराएव्हढे दुःख पचवून दोन्ही व्यक्ती समाधानी जीवन जगत आहेत व आपण खचून जात आहोत, आपण तर आई जवळ आहोत आणि परिस्थितीही एवढी वाईट नाही. तर या सर्व वाईट परिस्थितीवर आपण मात करू शकतो. आईचे ऑपरेशन करु शकतो व आयुष्यात प्रगतीचा मार्गावर वाटचाल ही करू शकतो. हे सकारात्मक विचार आता आत्महत्येच्या गढूळ विचाराला बाजूला सारून पुढे येऊ लागले. आशेची व आत्मविश्वासाची किरणे मनात साचलेल्या नैराश्येच्या अंधारावर पडत होती. एक नवीन उमेद व ऊर्जा सतीशच्या मनात निर्माण होत होती. एवढ्यातच  रेडिओवरून अरुण दातेचे बोल त्याच्या कानावर पडले, 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.' हेच बोल गुणगुणत सतीश घराकडे निघाला.

समाप्त..

✍️..Copyright © जगदीश लक्ष्मण वानखडे.
All Rights Reserved.
संपर्क :- jalawa28@gmail.com

Circle Image

Jagdish Wankhade

Employee

काय लिहू माझ्या बाबत.? अद्याप मलाच माझी ओळख झाली नाही..