Mar 01, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

या फुलाला सुगंध मातीचा. (भाग-1)

Read Later
या फुलाला सुगंध मातीचा. (भाग-1)

सौ.प्राजक्ता पाटील 

# टीम सोलापूर 

कथामालिका: विषय:कौटुंबिक 

उपविषय: या फुलाला सुगंध मातीचा. (भाग-1)प्रसंग- "15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाचा. " अभिमानानं ऊर भरून यावा असाच काहीसा. स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हौतात्म्य पत्करणार्‍या त्या क्रांतिवीरांच्या स्मृतीस अभिवादन करण्याचा आणि स्वातंत्र्याचा आनंदही व्यक्त करण्याचा. हा दुहेरी क्षण प्रत्येक शाळा, कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होतो. शालेय स्तरावरही विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे त्यांचा गौरव केला जातो. त्यामुळे मुलांना स्वातंत्र्य दिन भारावून टाकतो.आज तो सोनेरी क्षण उगवला होता. दीप्तीच्या हातून तिच्या प्राथमिक शाळेतला झेंडा अगदी उत्साहाने फडकणार होता. शिक्षणाधिकारी झालेली दीप्ती आज खऱ्या अर्थाने गावाच्या तसेच आईबाबांच्या नावाला उज्ज्वल करणारी ज्योत ठरली होती.दीप्ती तिच्या गाडीतून खाली उतरली. दीप्तीच्या लहानपणी शाळेत नाव नोंदवल्यापासून परत कधीही शाळेकडे न फिरकलेले तिचे अडाणी आबा आणि आईही आज आपल्या लेकीच्या आग्रहाखातर तिच्याच गाडीतून ध्वजारोहणासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते.ध्वजारोहण करणाऱ्या आपल्या लेकीकडे अभिमानाने ते दोघे पाहत होते. आज बक्षीस घ्यायला येणाऱ्या प्रत्येक मुलासोबत कौतुक करायला त्यांचे पालक होते हे पाहिल्यावर आबांच्या डोळ्यात अश्रू तरळले. 


दिप्तीच्या आई सोपानरावांना म्हणाल्या, "आहो, काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय?"


" आपल्या लेकीनं आतापर्यंत खूप बक्षीस मिळवली पण आपल्याला ते पाहायला, तिचं कौतुक करायला कधी वेळच मिळाला नाही ही खंत वाटते बघ."


" आवं, असं कसं म्हणता ? आपल्याला तर काय येऊ वाटत नव्हत का? पण तवा संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत दूर करणं ही जबाबदारी लय मोठी होती बघा. आपली दीप्ती आता मोठी झालीय तिला सगळं समजत असल आता, तवा आपण जे वागत होतो त्यात आपली काय बी चूक नव्हती ते."


"व्हय गं ती घेतेच समजून." सोपानराव डोळे पुसत म्हणाले.


बक्षीस वितरण करताना येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या पाठीवर शाबासकीची थाप देताना दीप्तीच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपल्यानंतर गावकऱ्यांनी प्रमुख पाहुण्यांना सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी खाली बसण्याची विनंती केली. संस्कृती कार्यक्रमही अगदी उत्साहात पार पडला. त्यानंतर सरपंचांनी दीप्तीच्या आईबाबांचाही सत्कार करण्यासाठी त्यांना स्टेजवर येण्याचा आग्रह केला.आबा सरपंचांना म्हणाले, "आमचा सत्कार करून काय उपयोग? सगळं काही स्वतःच्या जिद्दीवर पोरीनं केलं बघा.""तसं नाही आबा. तुम्ही मला दिवसभर शेतात ऊन्हात काम करून शहरात ठेवलंत. विश्वासाने पैसे पाठवलेत. हे काही कमी आहे का? सावलीत बसून मी फक्त अभ्यासच तर केलाय.तुम्ही माझ्यासाठी जे केलंत ते लाखमोलाचं आहे."असं म्हणून दिप्ती आई बाबांना स्टेजवर घेऊन गेली.आई आबांना तो सत्कार घेताना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. आज आईआबांच्या दिवस-रात्रीच्या मेहनतीचा सगळा शीण फिटला होता.दीप्ती कार्यक्रम संपल्यानंतर सरपंचांच्याच घरी जेवायला जाणार होती कारण सरपंचांनी खूपच आग्रह केला होता. काही दिवसापूर्वीच दीप्तीने कर्ज घेऊन बांधकामाचा पाया खोदण्यास सुरुवात केली होती पण आज सरपंचांनी आग्रह केल्यामुळे दीप्ती सरपंचांच्या घरी आई आबांसोबत जेवायला जाणार होती. सरपंचांचे घर शेतातच होते. खूप मोठा प्रशस्त बंगला होता त्यांचा. गाडी असूनही त्यांच्या मळ्यात जायला एक तास तरी लागायचा आणि रस्ताही खूप खराब होता. प्रवास करणे नकोशे वाटायचे.त्यामुळेच कदाचित दीप्तीच्या आई आबांना एकदाही शाळेत यायला वेळ मिळाला नसेल. रस्त्याने जाताना भूतकाळातील आठवणी दीप्तीच्या डोळ्यासमोरून सरसर पुढे जात होत्या. आयुष्यातील कित्येक बिकट क्षणावर सरपंचांच्या आणि त्यांच्या मुलाच्या म्हणजेच सौरभच्या मदतीनेच मात करता आली होती. दीप्तीचे बालपण जिथे गेले होते ते तिचे जुने घर. आता तिथेच तिने नवीन बांधकामाचा पाया खोदण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या नवीन घराच्या बांधकामापुढे गाडी येताच दीप्तीने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. सर्वजण खाली उतरले.आई आबा शेजारच्या मावशीबरोबर गप्पा मारत बसले होते. त्या मावशीच्या मुलाने दीप्तीला झाडाखाली खुर्ची आणून दिली. खुर्चीवर बसून दीप्ती तिच्या भूतकाळात आपल्याच विचारात रमली.
असाच आदर्श विद्यार्थिनीचा पुरस्कार दिप्तीलाही मिळत होता. अभ्यासात हुशार असण्याबरोबरच सर्व कलांमध्ये दिप्तीने पारितोषिके मिळवली होती. म्हणूनच शाळेतल्या शिक्षकांनी आवर्जून दीप्तीच्या आई-वडिलांना म्हणजेच गौराबाई आणि सोपान यांनाही बक्षीस घ्यायला आणि मुलीचे कौतुक करायला शाळेत बोलावले होते. पण नेहमीप्रमाणेच ते आले नव्हते. पण दीप्ती घरी आल्यावर आईआबांवर चांगलीच रागवली होती.वडिलांच्या डोळ्यात पाणी तरळले होते.त्यांनी आपल्या लाडक्या लेकीला जवळ घेत प्रेमाने समजावले होते, "दिप्ती आज कामाला गेलो नसतो तर संध्याकाळी काय खायचं होतं आपण ? म्हणून नाही आलो पोरी. तूच या गरीब आई-आबांना समजून नाही घेणार तर कोण घेणार?"कुठलीही सोयीसुविधा नसताना दिप्ती वर्गामध्ये पहिल्या नंबरने दरवर्षी पास होत होती. शिक्षकही सोपानरावाना भेटायला आल्यावर कौतुकास्पद सुमनपुष्पाचा दिप्तीवर वर्षाव करायचे तेंव्हा आई-वडिलांच्या आनंदाश्रूंचा बांध फुटायचा.
गावच्या सरपंचांच्या घरी सोपान चाकरी घालत होता. सरपंचांना खरोखरीच दिप्तीचे कौतुक वाटत होते. एके दिवशी अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे सोपानची झोपडी म्हणजे राहते घर कोलमडून पडले होते. उद्याला गणेश चतुर्थीला विघ्नहर्ता येणार होता.तर तीन दिवसांनी गौराई येणार होत्या. पण हे असं घडलं होतं. सोपान आणि गौराबाई काय करू? म्हणून रडत बसणाऱ्या जोडप्यांपैकी नव्हते. त्यांनी रात्र जरी शाळेच्या आवारात जागून काढली असली तरी दुसऱ्या दिवशी सकाळी नव्या उमेदीने झोपडी उभारण्यासाठी कंबर कसली होती. गावभर रात्री घडलेली ही वाईट घटना वाऱ्याच्या वेगाने पसरली. ही बातमी सरपंचाच्या कानावर आली. सरपंच त्यांच्या गाडीतून सोपानच्या घरी पोहोचले. 


"हे काय करतोय रे सोपान?" सरपंच म्हणाले. 


"कालच्या त्या पाऊसानं आन् वाऱ्यानं थैमान घातल्यामुळे आमचं गरिबाचं घर कोलमडून गेलं बघा. म्हणून आज पुन्हा उभारावं म्हणतोय." सोपान म्हणजे दीप्तीचे आबा सरपंचांना म्हणाले.


"आरं येडा आहेस की काय तू? इथं आपल्या गावचं तळं गच्च भरलय म्हणून धोक्याच्या सूचना यायलेत आणि तू हितं राहिलास तर तुला त्या तळ्याचा जास्तच धोका आहे बघ. रात्रीतून तळं कधी बी भरू शकतय त्याच्यापेक्षा तू असं कर सामान भर अन् आमच्या शेतातल्या त्या दोन खोल्यात जाऊन रहा." सरपंच अगदी प्रेमाने म्हणाले.
सरपंचानी देऊ केलेली मदत दिप्तीचे आबा स्विकारतील का? कसा उभारतील दीप्तीचे आईआबा हा कोलमडून पडलेला संसार?


पाहूया पुढील भागात क्रमश:सौ. प्राजक्ता पाटील 
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//