Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

या फुलाला सुगंध मातीचा. भाग-8

Read Later
या फुलाला सुगंध मातीचा. भाग-8
सौ.प्राजक्ता पाटील 
राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा 
विषय: कौटुंबिक 
उपविषय: या फुलाला सुगंध मातीचा.
टीम सोलापूर..


भाग-8

"काय करणार आहेस तू?" सौरभ म्हणाला.

"म्हणजे मी घोड्याला पाण्यापर्यंत नेण्याच काम करणार आहे. त्याला जर गरज वाटत असेल तर त्याने पाणी प्यावे किंवा मग तसेच परत यावे हे त्याने स्वतः ठरवायचे आहे." दीप्ती म्हणाली.

"होय सर, दीप्ती मॅडम म्हणताय ते खरं आहे. आम्ही काल दीप्ती मॅडमना एका डॉक्टराविषयी सांगितलय. तुम्हाला त्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ असे म्हणालोय. ते आयुर्वेदिक डॉक्टर जे औषध देतात ज्यामुळे तुम्ही व्यसनाला दूर लोटू शकता पण हे सर्व तुमच्या स्वतःच्या संयमावर अवलंबून आहे. स्वतःची तीव्र इच्छा असावी लागते व्यसनातून बाहेर पडण्यासाठी. असे कितीतरी लोक त्यांच्याकडे येतात आणि  व्यसनमुक्तही होतात पण काही लोक कितीही प्रयत्न केले तरी व्यसनमुक्त होत नाहीत. हे सर्वस्वी स्वतःच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे." ड्रायव्हर काका प्रेमाने म्हणाले. 

"म्हणजे मी घोडा ? तुम्ही मला डॉक्टरांकडे घेऊन जाताय आणि तुमचं कर्तव्य बजावताय ? असच ना दीप्ती." सौरभ म्हणाला.

"हो म्हणजे नाही." दीप्ती घाबरून म्हणाली. तिला वाटत होते सौरभला नक्कीच राग आला आहे. पण सौरभ हसून म्हणाला, "ठीक आहे. जाऊया आपण त्या डॉक्टरांकडे." 

दीप्तीला खूप आनंद झाला होता. आज आपण ताईसाहेबांसाठी काहीतरी करू शकलो याचे तिला समाधान वाटत होते. दुसऱ्या दिवशी व्यसनमुक्ती केंद्रावर जायचं ठरलं होतं. त्यासाठी दीप्तीने रजाही घेतली होती. पण अचानकच आबांचा गावावरून फोन आला. त्यांनी दीप्तीला ताबडतोब गावी बोलावले होते.

आज सरपंचांच्या नात्यातील तो मुलगा दीप्तीला पाहायला येणार होता. ड्रायव्हर काकांना दीप्तीने सांगितल्यावर ड्रायव्हर काका गाडी घेऊन यायला ऑफिसकडे निघाले होते. तेवढ्यात सौरभ म्हणाला," मी जातो मग गावाकडे. डॉक्टरांकडे उद्याही जाता येईल. येशील का माझ्यासोबत ? सोडू ना मी तुला तुझ्या घरी ? उगाच ड्रायव्हर काकांना कशाला त्रास द्यायचा?" 

"ठीक आहे." दीप्ती म्हणाली. 

दीप्ती आवरून गाडीत बसली. सौरभ आज कधी नव्हे ते पूर्ण शुद्धीत होता. प्रवासात त्याने गाणे सुरू केले. जुन्या गाण्यांची दीप्तीलाही फार आवड होती. सौरभ सोबत प्रवास करताना तिला तिचं लहानपण आठवत होतं. लहानपणीची दोघांनीही गाडीत बसून गायलेली गाणी सूरताल नसतानाही ड्रायव्हर काकांना छान वाटत होती. हे दीप्तीला आठवल्यावर तिला हसू आलं. 

"काय झाले तुला हसायला?" सौरभ रागाने म्हणाला. 

"काही नाही रे." आपण ड्रायव्हर काकांसोबत शाळेतून घरी येताना कसल्या बेसूर आवाजात गात होतो, तरीही ड्रायव्हर काका छान आहे आवाज म्हणायचे. त्याच हसू आलं." सौरभचे हात थरथरू लागले होते. 

"दीप्ती मी व्यसनाशिवाय राहू शकत नाही असंच मला वाटतंय. बघितलंस माझी अवस्था कशी होते ते." सौरभ निराश होऊन म्हणाला.

"अरे आपण जाणार आहोत ना त्या डॉक्टरांकडे. करतील अरे ते या सगळ्यांवर काहीतरी उपाय. तू नको घाबरूस. तू फक्त तुझ्या मतावर ठाम राहा." दीप्ती म्हणाली. 

गाडी दीप्तीच्या घरासमोर येऊन थांबली. दीप्ती गाडीतून खाली उतरली. पाहुणे मंडळी दारातच बसली होती. आज दीप्तीची बैठक होणार होती. आबांनी हे दीप्तीला सांगितल नव्हत. तरीही मोठ्या माणसांनी ठरवले आहे म्हणजे सगळे ठीक असेल. हा विचार करून दीप्ती तयार झाली.

दीप्तीला सरपंचच्या मुलासोबत गाडीत आलेले पाहून शेवंता मावशी म्हणाल्या, " हा स्वतःही सुधारायचा नाही आणि दुसऱ्यालाही सुधरू द्यायचा नाही. आमच्या मुलालाही याच्यामुळेच व्यसन लागले आहे. आता काय तर दीप्तीच्याच मागे लागलाय ? सतत तिला त्याच्या मर्जीनुसार वागायला सांगतो. काल तिलाच भेटायला गेला होता शहरात. तो आत्ताच आलाय वाटतेय."

हे जेव्हा पाहुण्यांच्या कानावर गेलं तेव्हा त्यांना दीप्तीवर वेगळाच संशय आला. दीप्ती आवरून पाहुण्यांसमोर येऊन बसली होती. नक्षत्रासारखी देखणी पोर पण पाहुण्यांनी तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. जेव्हा सरपंच म्हणाले, "हुंड्याचं काय ?" तेव्हा ते पाहुणे उठून जायला निघाले.  

आबांनी त्यांना कारण विचारल्यावर ते म्हणाले, "तुमची मुलगी परपुरुषासोबत गाडीत बसून येते. सरपंचाचा मुलगाही रात्रभर तिच्यासोबत असतो हे ऐकल्यावर आम्ही तुमच्या मुलीला सून म्हणून स्वीकारावा का ? याआधीच आम्हाला समजलं होतं पण आज प्रत्यक्ष पाहिलं."  

सरपंचांनी पाहुण्यांसमोर हात जोडले. 

"माझा मुलगा दोषी असेल पण त्यात दीप्तीचा काहीही दोष नाही.  मी तुमच्यापुढे हात जोडतो. दीप्ती खूप गुणी आणि चांगली मुलगी आहे." सरपंच म्हणाले.

पण पाहुण्यांनी काहीच ऐकले नाही. आल्या पावली ते निघून गेले. 

आबांना हा धक्का सहन झाला नाही. त्यांना दरदरून घाम आला. ताबडतोब आबांना दवाखान्यात नेण्यात आले. आबांना सौम्य अटॅक आला असं डॉक्टरांनी सांगितलं. आबांची सर्जरी करायची ठरली. सरपंचांनी आणि सौरभने पैसे जमवले. आबांचे ऑपरेशन सक्सेसफुल झाले. चार दिवस झाले आबा हॉस्पिटलमध्येच होते. दीप्तीने सौरभशी अबोला धरला होता. पण सौरभला आता त्याची चूक कळाली होती. 

'माझ्यामुळे दीप्तीची बदनामी झालेली मी कधीही सहन करणार नाही. मला सुधारण्याची तिची इच्छा नक्की पूर्ण होणार.' हा मनात निश्चय करून, स्वतःहून ड्रायव्हर काकांसोबत डॉक्टरांकडे जाऊन सौरभने व्यसन सोडण्यासाठी ट्रीटमेंट सुरू केली. अगदी तो डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचना फॉलो करत होता. आज पंधरा दिवस झाले त्याने कोणत्याही व्यसनाला हातही लावला नव्हता. आज आबांना डिस्चार्ज मिळणार होता. सौरभ त्याची गाडी घेऊन दवाखान्यात पोहोचला. सर्वांना आश्चर्य वाटत होते. सौरभ पूर्ण शुद्धीत होता. आबांसाठी धावपळ करत होता. सरपंच मनातून देवाचे आभार मानत होते. सरपंचांना दीप्ती आणि सौरभ यांचे नाते मनापासून आवडले होते, पण आबांकडे लेकीचा हात मागण्याची हिंमत त्यांच्याकडे नव्हती. 

"कसे आहात सोपान काका?" सौरभ म्हणाला. 

"मी जिवंत असून काय उपयोग ? माझ्या लेकीचं जमणारं लग्न मोडलं आणि मी काहीच करू शकलो नाही." आबा हताश होऊन म्हणाले.

"आबा तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. यापुढे माझ्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही." दीप्ती डोळ्यांमध्ये पाणी आणून म्हणाली.

"यात तुमचा किंवा दीप्तीचाही काहीच दोष नाही. सगळी चूक माझीच आहे. मी उद्याच जाऊन माफी मागेन त्या पाहुण्यांची. त्या मुलाला दीप्तीशी लग्न करायला भाग पडेल मी. हे सर्व माझ्यामुळे झाले आहे तर त्याला ठीकही मीच करेन. हा माझा शब्द असेल." सौरभ म्हणाला.

सगळं ठीक झालं होतं. पण दीप्तीला मनातून आनंद वाटत नव्हता.हे सरपंचांना समजत होतं.

दीप्तीचे लग्न जुळवण्यात सौरभला यश येईल का?

लग्न जमल्यावर दीप्ती खुश होईल का? 

पाहूया पुढील भागात क्रमश:

सौ. प्राजक्ता पाटील ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//