सौ.प्राजक्ता पाटील
राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
विषय: कौटुंबिक
उपविषय: या फुलाला सुगंध मातीचा.
टीम सोलापूर..
भाग-7
सकाळ झाली तशी दिप्ती आपल्या कामावर रुजू होण्यासाठी आवरून निघाली होती. आबांनी आईला भाकरी बांधायला सांगितल्या. आज आबा त्या पाहुण्यांकडे भाकरी टेकायला जाणार होते.
दीप्ती उदास चेहऱ्याने गाडीत बसली. तिच्या मनाची होणारी घालमेल ड्रायव्हर काकांच्या लक्षात आली.
"मॅडम ते तुमचे कोण? ज्यांना भेटायचा तुम्ही कालपासून आग्रह धरत होतात. सॉरी ! बर का मॅडम, राहवलं नाही म्हणून विचारतोय बघा." ड्रायव्हर काका नम्रपणे म्हणाले.
अवघे काहीच दिवस झाले होते दीप्तीला कामावर रुजू होऊन त्यामुळे ड्रायव्हर काकाही अगदी नवीन होते.त्यांना दीप्तीची फारशी ओळख नव्हती.
"बालपणीचे मित्र आहोत काका आम्ही." दीप्ती हळू आवाजात म्हणाली.
"असं आहे का? माणसाला वाईट वाटतं, आपण ज्यांना जास्त ओळखतो ती व्यक्ती जर चुकीच्या मार्गावर जात असेल तर. त्यांना सुधारण्यासाठी तुम्ही खूप प्रामाणिक प्रयत्न करत होतात पण असो. तुम्ही नका टेन्शन घेऊ. त्यांना तुमचं ऐकायचं नाही असं त्यांच्या वागण्यावरून तरी वाटतं बघा. तुम्ही आता इथला विचार सोडून द्या." ड्रायव्हर काका दीप्तीला धीर देत होते.
"हो. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ड्रायव्हर काका." दीप्ती म्हणाली.
दीप्ती ऑफिसमध्ये पोहोचली. दिवसभर काम करून आलेला थकवा आणि काल घडलेला प्रकार यामुळे दीप्ती खूपच नाराज दिसत होती. मधल्या सुट्टीतही तिचे डब्याकडे मुळीच लक्ष नव्हते. थोडसं खाऊन झाल्यावर तिने डबा पॅक केला व दिप्ती डोळे मिटून शांत बसली. अचानक तिला कोणाचातरी मोठ्याने बोललेला आवाज ऐकू येऊ लागला होता. आवाजही ओळखीचा वाटत होता.पण उठून बाहेर पाहण्याचीही तिची बिल्कुल इच्छा नव्हती.
बाहेर सौरभ ड्रिंक करून शिपायांना मॅडमच्या केबिनमध्ये जायचंय म्हणून तंडत होता.
"मला आत जायचंय. तुम्ही कोण मला अडवणारे ? मी दहिटण्याच्या सरपंचाचा मुलगा आहे हे लक्षात ठेवा." सौरभ म्हणाला.
"मग तुमचा रुबाब गावात चालत असेल इथे नाही. इथे काम असेल तरच मॅडमना भेटता येते. तुमचे काम सांगा. मी त्यांची परमिशन घेऊन येतो." शिपाई म्हणाला.
"मला परमिशनची काही गरज नाही. मी आत जातोय." म्हणून सौरभने त्या व्यक्तीला हाताने बाजूला सरकवले. सुडोल बांधा, धारदार नाक आणि अगदी गोरापान असलेला सौरभ आपली भारदस्त पर्सनॅलिटी फक्त चुकीच्या कामासाठी वापरत होता.
सौरभने दीप्तीच्या केबिनच्या दरवाजा उघडला.
"आत येऊ का?" हा सौरभचा आवाज ऐकल्यावर दीप्तीने आश्चर्याने वर पाहिले आणि बाहेर मोठमोठ्याने बोलणारी व्यक्ती ही सौरभच होती हे तिच्या लक्षात आले.
"परमिशन घेता येते की तुम्हांला." दीप्ती म्हणाली.
"मला तुझ्याशी बोलायचं आहे." सौरभ म्हणाला.
"पण मी तुझ्याशी बोलू शकत नाही. तुझ्या मनात आलं म्हणून हाताला पकडून न्यायला हे काय आपलं गाव नाही. हे माझं ऑफिस आहे. जर तुला खरंच माझ्याशी बोलायचं असेल तर माझं ऑफिस संपेपर्यंत बाहेर थांबून वाट बघावी लागेल. तू आता जाऊ शकतोस." दीप्ती रागाने म्हणाली.
सौरभला दीप्तीचे शब्द खूप खटकले होते. रागाने अगदी लालबुंद होऊन सौरभ बाहेर गेला. दीप्तीला सौरभचा काल खूप राग आला होता आणि म्हणूनच तिला आज त्याच्याशी इच्छा नसतानाही कठोर वागावं लागलं होतं. दीप्तीला वाटले सौरभ आता निघून गेला असेल. ती दिवसभर कामाच्या घाईमध्ये सौरभ भेटायला आला होता हे पूर्णतः विसरली होती. दिवसभरची कामे आटपून झाल्यावर ती आपली बॅग घेऊन ऑफिसच्या बाहेर आली.
पाहते तर काय? सौरभ ऑफिससमोर गाडीत बसलेला तिला दिसला.
'म्हणजे सौरभ अजून गेला नाही.' मनात विचार करून दीप्ती त्याच्याजवळ गेली. सौरभ जराही शुद्धीत नव्हता. "सॉरी दीप्ती." एवढेच तो बोलत होता. हे ऐकून दीप्तीच्या डोळ्यात पाणी आले.
दीप्तीने सौरभला आवाज दिला. पण तो ऐकण्याच्या स्थितीतही नव्हता. ड्रायव्हर काकांना दीप्ती आणि सौरभमध्ये काहीतरी बिनसलय हे लक्षात आल्यावर ते गाडीतून उतरून बाहेर आले आणि दीप्तीला म्हणाले, "काय झालं मॅडम ?"
दीप्ती म्हणाली, "काका सौरभ आज मला काहीतरी बोलायचं म्हणून ऑफिसमध्ये आला होता पण मी त्याला टाळलं. कारण मला त्याचा कालचा खूप राग आला होता. म्हणून मी त्याला मुद्दाम माझं ऑफिस संपल्यावर बोलू बाहेर थांब असं सांगितलं. मला वाटलं तो थांबणार नाही. पण बघा ना तो इथे थांबलाय आणि फक्त सॉरी सॉरी म्हणतोय."
" त्यांना या अवस्थेत पाहून तुम्हाला वाईट वाटतंय हे मी समजू शकतो. पण काल तेही चुकीचेच वागले होते.पण अशा अवस्थेत आता हे गावाकडेही जाऊ शकत नाहीत आणि आता मेन गेटही बंद होईल. तेव्हा यांना असे एकट्याला सोडून कसे जायचे?" काका म्हणाले.
"खरे आहे काका.पण मग आता काय करायचं ?" दीप्ती घाबरून म्हणाली.
काका म्हणाले, "आपण यांच्याच गाडीने जाऊया. मी ड्रायव्हिंग करतो. तुमची गाडी इथेच लावू. गाडीने आपण माझ्या घरी जाऊ. संकोच करू नका मॅडम मलाही तुमच्यासारख्या दोन मुली आहेत. थोड्यावेळाने हे शुद्धीवर आले की तुम्ही बोलू शकता त्यांच्याशी. म्हणजे तुम्हांलाही काळजी वाटणार नाही."
"बरं." म्हणून दीप्तीने होकारार्थी मान हलवली. ड्रायव्हर काकांनी सौरभला व्यवस्थित बसवलं. स्वतः ड्रायविंग सीटवर बसून त्यांनी दीप्तीला आणि सौरभला आपल्या घरी आणलं.
ड्रायव्हर काकाच्या बायकोने काही विचारायच्या आतच ड्रायव्हर काकांनी, " या दीप्ती मॅडम ज्यांच्या गाडीवर मी ड्रायव्हर म्हणून काम करतोय. त्या ह्या. आणि हे त्यांचे मित्र." हे सांगितलं.
दीप्तीने सौरभची सगळी कहाणी सांगितल्यावर ड्रायव्हर काकाच्या बायकोलाही खूप वाईट वाटत होते. त्यांनी चहा, नाष्टा तसेच संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली. दीप्तीच्या मदतीला ड्रायव्हर काका देवदूतासारखे धावून आले होते. त्यांचे हे उपकार दीप्तीसाठी खूप महत्त्वाचे होते. संध्याकाळच्या वेळी सौरभ शुद्धीवर आल्यावर लगेच गाडीकडे जात असताना दीप्ती त्याला म्हणाली," सौरभ तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना? ते बोलून तू कुठे जायचे तिथे जाऊ शकतोस."
सौरभ म्हणाला, "दीप्ती मला तुला दुखवायचं नाही किंवा मी काल जे वागलो ते तुला वाईट वाटावे म्हणून अजिबात नाही. तुला काहीच माहित नाही. बाबांचे चुकीचे पडलेले पाऊल माझ्या आईला माझ्यापासून कायमचे दूर घेऊन गेलेय. सांग ना काय चूक होती माझ्या आईची ? परत सावत्र आईनेही मला दिलेला त्रास यामुळे मी असा वागतोय. हेच ऐकायचं होतं ना तुला?"
दीप्ती म्हणाली, "ते तसे वागले म्हणून तू असं वागायचं का ? अरे यात तुझं नुकसान आहे. कोणाचं काहीही बिघडणार नाही. सौरभ तू तुझ्या शरीराचं तुझ्या मानसिक आरोग्याचं सगळ्यांचं नुकसान करतोय."
"हे सगळं खरं असलं तरीपण यातून बाहेर येणं आता मला शक्य वाटत नाही." सौरभ म्हणाला.
"का नाही येऊ शकत तू यातून बाहेर? येऊ शकतोस सौरभ. मनात आणलं तर व्यक्ती काहीही करू शकतो." दीप्ती अगदी प्रेमाने समजावत होती.
काय असेल दीप्तीचा सौरभला सुधारण्यासाठीचा प्रयत्न ? सौरभ दीप्तीला साथ देईल का? तो तिचे म्हणणे मान्य करेल का?
पाहूया पुढील भागात क्रमशः
सौ.प्राजक्ता पाटील
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा