Mar 04, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

या फुलाला सुगंध मातीचा भाग-6

Read Later
या फुलाला सुगंध मातीचा भाग-6

सौ.प्राजक्ता पाटील 

राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा 

विषय: कौटुंबिक 

उपविषय: या फुलाला सुगंध मातीचा.

टीम सोलापूर..भाग-6


दीप्तीला पाहिल्यावर नाचगाणी पूर्णतः बंद झाली होती. सगळा आवाज थांबला होता. संपूर्ण केंद्रात शांतता पसरली होती. पण बाहेर कसला तरी आवाज ऐकू येत होता. आबाही मोठमोठ्याने बोलत होते म्हणून दीप्ती घाईने बाहेर आली.


"काय झालंय आबा?" दीप्ती घाबरून म्हणाली.


"अगं सकाळी इतक्या कौतुकानं तुझ्या हातून ध्वजारोहण झालं. तू गावाचं नाव मोठं केलं म्हणून तुझा आदर्श गावकऱ्यांनी घ्यावा म्हणून तुला गावात बोलावलं अन् तू इथे येऊन कशीही वागतेय व्हय? हाच आदर्श घ्यावा का तुझा गावातल्या पोरींनी?" गावातील प्रतिष्ठित असलेले एक गृहस्थ दीप्तीला म्हणाले.


दीप्ती सर्वांना उद्देशून म्हणाली, "आज जर या ठिकाणी तुमची स्वतःची मुलगी असती तर तुम्ही असेच बोलला असतात का ? जर तुमचा स्वतःचा मुलगा, भाऊ किंवा नातू असा चुकीच्या मार्गाला गेला असता तर त्याला अडवण्यासाठी तुमच्या घरातील एखादी स्त्री त्याचा पाठलाग करत आली असती तर तुम्ही असेच बोलला असतात का ? काय चुकलं यात माझं? माझ्यामुळे एखादा व्यक्ती सुधारू शकतो असं मला वाटलं आणि मी इथे आले तर मी काहीही चुकीचे केले नाही असे मला वाटते."


"पण बाई माणसांनी इथे यायचं असतं का? एवढं तरी कळायला हवं तुम्हाला." एक गृहस्थ म्हणाला.


"अरे वा! तुम्ही तर आता मला अहो जावो करायला लागलात. इतका वेळ मी एकटी आहे हे बघून माझ्या अंगावरती हात टाकत होतात. मी माझी ताकद दाखवल्यावर मागे सरकलात आणि आता फार काळजी दाखवतात. रंग बदलू गिरगीट आहात नुसते. अशा व्यक्तीमुळेच चांगले काय वाईट काय ? यातला फरक कळेनासा झालाय. चांगल्या माणसाच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन धूर्त माणसं आनंदात जगतायेत आणि चांगल्या माणसांना मात्र आयुष्यभर पश्चातापाची वेळ येतेय." सरपंचांकडे बघून दीप्ती म्हणाली. 


तितक्यात सौरभही बाहेर आला. सरपंच सौरभला उद्देशून म्हणाले, "अख्खा गाव तुझ्यासाठी दीप्तीला नाही नाही ते बोलतोय ती मैत्रीण म्हणून तुझी मदत करू पाहतेय आणि तुझं काय? तू फक्त तिची बदनामीच करणार आहेस का? कोणाला काहीही न बोलता सौरभने दीप्तीचा हात पकडला. भरभर पावले टाकत तो त्याच्या गाडीकडे गेला दीप्तीला गाडी बसायला सांगून तो तिला वाऱ्याच्या वेगाने दूर घेऊन गेला.


लोकं आबांना नाही नाही ते बोलत होती. 


"यासाठी तुम्ही मुलीला एवढं शिकवलं का? हे असं परपुरुषासोबत जायची काय गरज आहे तुमच्या पोरीला?" एकजण म्हणाले.


आबा मात्र धीराने घेत होते. "माझी लेक कशी आहे ते मला माहित आहे. तुम्ही मला सांगू नका तिने कुठे जायचं आणि कुठे नाही ते." 


तरीही गावातील प्रतिष्ठित लोक आबांना म्हणत होते, "आता मुलीचं लग्नाचं वय झालेय बघा. चांगलं स्थळ आलं की तिचं लग्न करून द्या. हवं तर तुमचं घर नंतर बांधा.म्हणजे त्या सरपंचांच्या पोराला सुधारायचे खूळ तिच्या डोक्यातून जाईल." आबांचे डोळे पाणावले होते.  


"तू काय काळजी करू नकोस सोपान. माझ्या सौरभमुळे मी तुझ्या पोरीची बदनामी होऊ देणार नाही.आमच्या नात्यातलाच एक मुलगा चांगला शिकलेला आहे उद्याच त्याच्या घरी भाकरी टेकून येऊ आपण." सरपंच दीप्तीच्या आबांना आधार देत होते.


लोक निघून गेले. दीप्तीच्या आबांना मात्र लोकांचे शब्द एखाद्या शस्त्राप्रमाणे बोचले होते. आबांच्या मनात 'कसं होईल माझ्या लेकीचं?' हा एकच विचार घोळत होता.


________इकडे सौरभ गावाच्या बाहेर गाडी थांबवून दीप्तीला म्हणाला, " बोल एकदाच, तुला काय बोलायचं आहे ते? मुलगी आहेस याचं भान असू दे. उठ सुठ कुठेही जात जाऊ नकोस. बदनामी होते अशाने." 


"आणि आता तू माझ्या हाताला धरून घेऊन आलास त्याने माझी बदनामी होणार नाही असं वाटतं का तुला?" दीप्ती धाडसाने सौरभसमोर उभी राहून म्हणाली.


"बोलायचं तुला आहे म्हणून घेऊन आलो.काय बोलायचं आहे ते पटकन बोल?" सौरभ म्हणाला.


"सौरभ मी लहान असल्यापासून तुला ओळखते. तू असा का वागतोय एवढच मला सांग ? अरे वाईट म्हणून घ्यायला एक दिवसही पुरेसा असतो. पण चांगलं म्हणून घेण्यासाठी अख्खे आयुष्य घालवावे लागते. तू ताईसाहेबांच्या संस्कारांना कसा विसरू शकतोस?" दीप्ती काळजीपोटी म्हणाली.


"तुला काय माहित आहे ग ? काय चांगलं झालं माझ्या आईचं? एवढं सगळ्यांच चांगलं केलं तिने आणि सांग ना तिच्या नशिबी काय आलं? म्हणूनच मी ठरवलंय कोणाशीही चांगलं वागायचं नाही." सौरभ डोळ्यातले अश्रू लपवत म्हणाला.


"माझ्याशीही? अरे बोल ना." दीप्ती म्हणाली.


"हो.तुझ्याशीही मी चांगला नाही वागू शकत.समजलं तूला? तुझ्या प्रयत्नांना कधीही यश येणार नाही. तेव्हा तू हे असे निरर्थक प्रयत्न करणे सोडून दे आणि परत माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करू नकोस. आता गाडीत बस." सौरभ स्पष्टपणे म्हणाला.


"ठीक आहे. यापुढे तुझ्या आयुष्यात मी परत कधीही येणार नाही. पण एक लक्षात ठेव तू माझ्यासाठी आतापर्यंत जे काही केलं ते तुझ्या एका वाक्याने निरर्थक झालं. किती अपेक्षा घेऊन मी तुला भेटायला आले होते पण असो तुला जर माझी काहीच किंमत नसेल तर ठीक आहे. सोड आता मला घरी." असे म्हणून दीप्ती गाडीत बसली.संपूर्ण प्रवासात दीप्ती अश्रू ढाळत होती.  


सौरभलाही तिला असं उदास पाहून वाईट वाटत होतं पण इतक्या वर्षात त्याच्या मनामध्ये कितीतरी गोष्टींचा संघर्ष चालू होता तो एका दिवसात थोडीच संपणार होता. सर्व काही समजत असूनही तो दुर्लक्ष करत होता. गाडी बाबांच्या घराजवळ येऊन थांबली. दीप्ती गाडीतून खाली उतरली. वाऱ्याच्या वेगाने सौरभ निघून गेला. दीप्ती आत गेली. 


तसे आबा दीप्तीला म्हणाले," दीप्ती तुझ्यापुढे मी हात पसरतो. आता पुन्हा सौरभचे नावही काढू नकोस. आपण गरीब माणसं आहोत. सौरभला त्याच्या प्रॉपर्टीला बघून चांगली मुलगी मिळेलही. त्याच सगळं चांगलं होईलही पण आपल्या गरिबाचं काय ? आणि आता तू फक्त एका आडाणी बापाची लेक किंवा सरपंचांच्या घरी काम करणाऱ्या गड्याची मुलगी नसून शिक्षणाधिकारी आहेस. तू तुझ्या पदाचा तरी मान राख पोरी. आम्ही तुझ्या लग्नाचे बघतोय. तू नाही म्हणणार नाहीस. अशी मला पूर्ण खात्री आहे. सरपंचांच्या नात्यातल्याच मुलाशी आपण तुझं लग्न लावून देऊ. चांगला शिकलेला पोरगा आहे. सरपंच म्हणत होते. उगाच गावात नाही नाही ते तुझ्याबद्दल बोललं जाईल त्यापेक्षा तुझं लग्न झालं की, तुला इथलं काहीच आठवणार नाही. तुझ्या घरी तू सुखी रहा." आबा म्हणाले.


दीप्तीला सौरभने ऐकलं नाही याचं जास्त वाईट वाटत होतं आबा जे बोलत होते ते दीप्तीच्या कानापर्यंतही पोहोचले नव्हते.


कसं असेल दीप्तीसाठी आलेलं हे स्थळ?

दीप्ती सौरभसाठी काहीच करू शकणार नाही का?

पाहूया पुढील भागात क्रमशः

सौ.प्राजक्ता पाटील ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//