या फुलाला सुगंध मातीचा. भाग- 5

True Friends

सौ.प्राजक्ता पाटील 

राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा 

विषय: कौटुंबिक 

उपविषय: या फुलाला सुगंध मातीचा.

टीम सोलापूर..


भाग-5

सर्वजण सरपंचासमोर येऊन उभे राहिले.

"अरे असं का उभारलात शिक्षा केल्यासारखे ? या इथं." पोर्चमधल्या खुर्चीवर सर्वांना बसायला सांगून सरपंचांनी रखमाला आवाज दिला. 

"आले ,आले." म्हणत रखमा बाहेर आली.

"ये,बस पोरी या पाटावर.पहिल्यांदा आली आहेस इतक्या वर्षांनी." सरपंच म्हणाले.

" याची काही गरज नव्हती मला इतका मानपान देण्याची.लहान आहे मी तुमच्यापेक्षा.आणि मी पुन्हा येणार आहे." दीप्ती म्हणाली.

"लय उपकार होतील तू जर पुन्हा आलीस तर. चांगल्या माणसाच्या संगतीत राहिल्यावर लोखंडाचही सोनं होतंय हे ऐकलंय. तसा काही चमत्कार माझ्या सौरभच्या बाबतीत झाला तर धन्य होईल मी. बाकी कशा कशाचं टेन्शन घेत नाही मी पण माझ्या सौरभचं तेवढं चांगल व्हावं एवढच वाटतय. पण बघ तू ही साडीचोळी घ्यायला नको म्हणालीस तर मात्र माझ्या मनाला लय वाईट वाटंल बघ. काय करायचंय ते तुझी तू ठरव. " सरपंच दीप्तीजवळ आपलं मन हलकं करत होते.

दीप्ती सरपंचांच्या भावना समजू शकत होती. सरपंच पुढे म्हणाले, "जेवढ्या कौतुकाने तुला जेवायला बोलावलं तेवढ्या कौतुकाने तुझं औक्षण नाही करू शकलो बघ.पण ही खास तुझ्यासाठी गावात जाऊन साडीचोळी घेऊन आलोय. ती तेवढी घे पोरी. नाही म्हणू नकोस." सरपंचांनी रखमाला दीप्तीची साडीचोळी देऊन ओटी भरायला सांगितली. 


दीप्ती कसलाही विचार न करता पटकन पाटावर बसली.रखमाने तिची ओटी भरली. दीप्तीला मानाने साडीचोळी देऊन तिचा पाहुणचार करून सरपंचांनी त्यांच्यामध्ये अजूनही देव माणूस जिवंत आहे याचीच प्रचिती दिली होती. 


दीप्ती सरपंचांच्या पाया पडण्यासाठी वाकली होती. 


"नको पोरी, माझ्या पाया पडून मी काय आशीर्वाद देणार ? ज्याने स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलाय तो व्यक्ती दुसऱ्यासाठी कसा आदर्श असेल ?" सरपंच म्हणाले.


"तुम्ही काही काळजी करू नका सरपंच, होईल सर्व ठीक. मला पूर्ण विश्वास आहे." दीप्ती लहान असूनही सरपंचांना धीर देत होती.


सरपंचांचा निरोप घेऊन दीप्ती आणि तिच्या घरचे गावाकडे निघाले.


घराजवळ गाडी थांबली होती. आई गाडीतून खाली उतरली पण पुन्हा मागे वळून म्हणाली," तू सौरभला कुठंतरी दुसरीकडं भेट. कसलीही लोक असतील गं तिथं. नको पोरी जाऊ तू . लोकं नावं ठेवतील गं तुला." 


"आबा तुमचा विश्वास आहे ना तुमच्या पोरीवर. मग जगानी कितीही शिंतोडे उडवले किंवा नावे ठेवले तरी मी घाबरत नाही. प्लीज ,तुम्ही मला घेऊन जा सौरभजवळ." दीप्ती हट्टाला पेटली होती.


"ठीक आहे. तुझी इच्छा आहे ना.तर जाऊया आपण सौरभला भेटायला." आबा म्हणाले.


आणि दीप्तीच्या आईलाही आबा म्हणाले, "मी आहे ना तिच्यासोबत. तू कशाला काळजी करतेस ?"


'थँक्यू आबा. आज तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलेय.  


इतका खंबीर असणारा सौरभ असा कसा वागू शकेल? हे मला त्याला विचारावं लागेल. मी तुला असं चुकीचं वागू देणार नाही. सौरभ तुला योग्य मार्गावर आणल्याशिवाय माझ्या मनाला चैन पडणार नाही.' गाडीत बसल्यावरही दीप्तीच्या डोळ्यासमोरून सौरभचा चेहरा जराही दूर होत नव्हता. 


आबांनी ड्रायव्हरला गाडी लोककला केंद्राकडे घ्यायला सांगितली.


'दिवस-रात्र नशेत असलेला सौरभ कसा वागेल माझ्या लेकीशी? तिथल्या लोकांच्या वाईट नजरांनी माझ्या दीप्तीला त्रास व्हायला नको. ' हा मनात विचार करून आबा देवाकडे प्रार्थना करत होते.  


दीप्ती मात्र निशब्द झाली होती. गाडी लोककला केंद्रावर येऊन थांबली. आबा सौरभला बोलवायला आत गेले होते. दीप्ती गाडीत बसूनच सौरभची आणि आबांची वाट बघत होती. अर्धा तास झाला तरी आबा परत आले नाहीत हे पाहून दीप्तीला खूपच भीती वाटत होती. ना ना तऱ्हेचे प्रश्न तिच्या मनात काहूर माजवत होते.न राहून तिनेच आत जायचा निर्णय घेतला. गाण्यांचा आवाज, घुंगरांचा आवाज सभोवतालच्या वातावरणात घुमत होता. दीप्तीला मनातून अवघडल्यासारखे वाटत होते. पण तिने सौरभला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मनाची खूणगाठ बांधली होती. ती सर्व बळ एकवटून आत जायला निघाली.


तेवढ्यात कोणीतरी मुद्दाम तिच्या मागे येतेय याची तिला जाणीव झाली. ती जाब विचारण्यासाठी थांबली. तर त्या व्यक्तीने दिप्तीच्या खांद्यावर हात ठेवला. 


दीप्तीने तो हात रागाने झिडकारला.


"कोण आहात तुम्ही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? काय करताय तुम्ही हे?" दीप्ती रागाने म्हणाली.


"मी कुणी का असेना ? पण तुम्ही इथे येऊन इतक्या साजूक बनताय म्हटल्यावर तुमचंच डोकं ठिकाणावर दिसत नाही?" तो माणूस विचित्र नजरेने दीप्तीकडे पाहत म्हणाला.


तो माणूस दिप्तीच्या जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. दीप्तीही कराटे चॅम्पियन होती.तिच्या हिमतीवर तिने त्याला रोखलं पण आता तिचे मन आत जाण्यास तयार नव्हते.


आबा बाहेर आले होते. आबा दीप्तीला म्हणाले,"दीप्ती सौरभ ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. माझा त्याच्यापर्यंत आवाजही पोहोचला नाही. त्याचे सगळे सोबती मित्र मला त्याच्याजवळ जाऊ देत नव्हते. त्यांना वाटतेय मला सरपंचांनी पाठवले आहे. खूप वेळ थांबलो पण काही उपयोग झाला नाही. चल जाऊया आपण परत."


"आबा तुम्ही इथेच थांबा. मी आलेच. म्हणून दीप्ती तडक आत गेली. दीप्तीला पाहिल्यावर सगळ्यांनी मागे वळून शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली.किती विचित्र नजरा झेलत दीप्ती सौरभपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होती. सगळेजण मागे काय पाहत आहेत? म्हणून सौरभने आपली मान वळवली. पाहतो तो काय? स्वर्गातील अप्सरेप्रमाणे उजळ कांती, निळसर डोळे,  लांबसडक केस नाजूक बांधा आणि ती सौरभवर रोखून धरलेली नजर. सौरभ घायाळ झाला होता. स्वतःला सावरत 'मी कुठे आणि दीप्ती कुठे?' हा विचार करून स्मितहास्य करत म्हणाला , "रस्ता चुकला की असा त्रास सहन करावा लागतो. म्हणून आल्या पावली जा परत आणि परत चुकूनही या रस्त्याकडे वळू नकोस. जा तू." 


"रस्ता चुकला तरी हरकत नाही.त्रासही सहन करण्याची माझी तयारी आहे पण त्याच रस्त्यावरून चालून माझी इच्छा पूर्ण होणार असेल तर चालेन मी त्या रस्त्यावरून." दीप्ती म्हणाली. 


"काय गरज आहे तुला इथे यायची? तू तुझा योग्य मार्ग निवडला आहेस. विनाकारण माझ्यासाठी वाट वाकडी नको करूस." सौरभ म्हणाला.


" मी तुला माझ्यासोबत न्यायला आले आहे." दीप्ती म्हणाली.


"मी कुठेही येणार नाही." सौरभ म्हणाला.


"चालेल मी ही इथेच थांबेन मग. या सगळ्यांच्या घाणेरड्या नजरांना सहन करत. चालेल ना?" दीप्ती पुन्हा म्हणाली.


काय असेल सौरभचे उत्तर ?

सौरभ दीप्तीसोबत यायला तयार होईल का?

पाहूया पुढील भागात क्रमशः 

सौ.प्राजक्ता पाटील






🎭 Series Post

View all