या फुलाला सुगंध मातीचा. भाग-4

मित्र मैत्रीणी अनेक भेटतात, पण संकटातून बाहेर पडायला जे मदत करतात तेच खरे मैत्री निभावतात..

सौ.प्राजक्ता पाटील 


राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा 


विषय: कौटुंबिक 


उपविषय: या फुलाला सुगंध मातीचा.


टीम सोलापूर..


भाग-4



"तू वाईट वाटून घेऊ नकोस पोरी. पण मी नाही सांगू शकत सौरभ कुठाय ते ? म्हणजे मला नाही माहित. तो एका ठिकाणी थोडीच असतो ? तो तर मला, याच काय ? जन्माआधीपासून आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या चुकांची शिक्षा देतोय." सरपंचांचे डोळे भरून आले होते.


डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत सरपंच पुढे म्हणाले,


"किती वेळा सांगू तुला ? तुझा लहानपणीचा मित्र सौरभ हरवलाय कुठेतरी. नको शोधत बसू त्याला. नाहीतर उगाच तुझा वेळ वाया जाईल तुझा. निराशेशिवाय तुझ्या पदरी दुसरे काही पडणार नाही." असे म्हणून सरपंच दूर निघून गेले.


आई आणि आबाही खूप नाराज झाले होते. 


"अगं दीप्ती, कशाला तोच तोच विषय काढते? सरपंचांना आधी काय घरचं टेन्शन कमी आहे का? त्या नव्या सरपंचीनबाई खूप त्रास देतात सरपंचांना आणि तू पण असा सारखा सारखा सौरभचा विषय काढून नको त्यांना टेन्शन देऊ. " आबा उदास होऊन म्हणाले.


"अगं पोरी, सौरभ लय वाया गेलाय बघ आता. तो तुझा लहानपणीचा मित्र नाही राहिला आता. त्याला तू भेटायला जायला. आबा म्हणतेत ती खरंय, कशाला उगी नसत्या भानगडीत पडायचं? आपली नोकरी आणि आपण बास झालं. उगा त्या सौरभचा विषय नको काढूस. किती ओळखतेस अशी तू त्याला ? चार-पाच वर्ष तेही लहानपणीचे. तवाचा माणूस आणि आताचा खूप बदलेला असतो पोरी." आई दीप्तीला समजावून सांगत होती.तिला वाटले आपण समजून सांगितल्यावर दीप्तीला नक्की पटेल.


पण दीप्ती जास्तच भावूक झाली. ती आईला म्हणाली, "मला वाटतं आई, बालपणीचा काळ हाच खरा माणसं ओळखण्याचा असतो म्हणूनच म्हणत असतील कदाचित- मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तेच माणसाचं खरं रूप असतं. माणूस बालपणी जे वागतो ना आई, ते त्याच्या निर्मळ मनाचं प्रतिबिंब असतं. त्यानंतर माणूस जे वागतो तो एकतर परिस्थितीमुळे किंवा आयुष्यात भेटलेल्या चांगल्या वाईट संगतीमुळे. लोकांच्या संपर्कातून दुखावल्यामुळे किंवा जगात जगताना खोटे मुखवटे पांघरलेल्या लोकांमुळे तो मोठेपणी तसा वागतो. मला पूर्ण खात्रीय की, मी सौरभला या सगळ्यातून बाहेर काढेन."


"पोरी, तू म्हणतेस ते मला सगळं पटतंय गं. पण तो काळ वेगळा होता आणि आता वेगळाय. तू जर सौरभला बोलायला गेलीस तर लोकं तुझ्याच चारित्र्यावर शिंतोडे उडवल्याशिवाय राहणार नाहीत. आता तुम्ही दोघेही लहान नाही आहात." आबा दीप्तीची समजूत काढत म्हणाले.


"पण आई-आबा त्या बालपणीच्या काळात मी ताईसाहेब आणि सौरभच्या संपर्कात आले म्हणूनच मी माझ्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटू शकले. त्यांनी दिलेली वागणूक आणि केलेली मदत तुम्ही दोघे कसे विसरू शकताय? आई आबा माझा नवोदयला नंबर लागल्यावर तुमच्याइतकाच किंबहुना जास्त आनंद त्या माऊलीला झाला होता. सौरभचा नंबर नवोदयला लागला नाही याचं वाईट वाटून न घेता त्यांनी मला ड्रेस घेण्यापासून ते दर महिन्याला खाऊ पाठवण्यापर्यंत सर्व केलं होतं. आणि आज त्याच माऊलीच्या लेकराला आपली गरज असताना आपण असं दुर्लक्ष कसं करायच ?" दीप्ती जुन्या गोष्टींना उजाळा देत आईआबांची परवानगी मिळवण्यासाठी धडपडत होती. 


"ठीक आहे. तुझी इतकीच इच्छा असेल सौरभला भेटायची तर आपण उद्याच जाऊया त्याला भेटायला. पण तो तुला भेटेल की नाही ? यात शंका म्हणण्यापेक्षा खात्रीने सांगतोय तो तुला नाही भेटणार आणि त्याच्या वागण्याचा तुला त्रास होणार जो आम्हांला नाही पाहावणार." आबा लेकीच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले.


"मगाशी रस्त्यात आडवी असलेली गाडी देवाचा देव आला तरी बाजूला सरकणार नाही अशीही तुम्हाला खात्रीच होती ना आबा पण सौरभने गाडी बाजूला केली. हो ना. प्लीज आबा विश्वास ठेवा माझ्यावर. कोणीही माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले तरी तुम्ही तुमचा विश्वास ढळू देऊ नका. लोकांकडे लक्ष देत बसलो ना तर मला माझी मैत्री निभावता आली नाही याची खंत आणि ताईसाहेबांच्या आत्म्याला शांती लाभू शकेल असे काहीच करू शकले नाही याचा पश्चाताप आयुष्यभर राहील.आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या. " डोळ्यातून ओघळणारी आसवे टिपत दीप्ती म्हणाली.


"घेऊन जाईन मी तुला सौरभकडे पण तू आत यायचं नाहीस एवढं लक्षात ठेव." आबा हताश होऊन म्हणाले.


"पण का आबा?" दीप्ती घाबरून म्हणाली.


"कारण सौरभ आत्ता नाचगाण्याचा कार्यक्रम पाहायला गेला असेल. तो रात्रंदिवस तिथेच असतो गावाबाहेरच्या लोककलाकेंद्रावर." आबा म्हणाले.


दीप्ती थोड्यावेळ विचारात पडली. दिप्ती नाहीच म्हणणार याची आबांना खात्री होती. 


पण पूर्ण विचार करून दीप्ती म्हणाली,"चला घरी जाऊया." आबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. 


"बरं केलस पोरी सौरभला भेटण्याचा नाद सोडून दिलास ते. " आबा पुन्हा म्हणाले. 


"आबा मी फक्त एकदाच सौरभला भेटणार आहे. पुन्हा मी त्याचं नावही नाही घेणार. आईला घरी सोडून जाऊया आपण." दीप्ती म्हणाली.


"का ऐकत नाहीयेस तू दीप्ती? पोरी आम्ही तुझ्या भल्याचाच विचार करतोय म्हणूनच तुला इतके दिवस ताईसाहेबांचही आणि सौरभचही काही कळूच दिलं नव्हतं. नाहीतर तुझं मनही अभ्यासात लागलं नसतं." दीप्तीच्या आई दीप्तीला म्हणाल्या. 


"आई , जे झाल ते वाईट झालं. लहान असल्यामुळे मीही तेव्हा काही करू शकले नसते पण आता सौरभसाठी मला काहीतरी करता येईल याची मला खात्रीय आणि तुम्ही मला साथ द्या." दीप्ती नम्रपणे म्हणाली.


आईनेही "बरं." म्हणून होकारार्थी मान हलवली.


इतक्यात सरपंचाच्या घरी काम करणाऱ्या मावशी तिथे आल्या आणि त्यांनी सोपानरावांना आणि त्यांच्या घरच्यांना सगळ्यांना सरपंचानी आत बोलावले म्हणून सांगितले.


कशासाठी बोलावले असेल सरपंचांनी?


दीप्तीला सौरभला भेटता येईल ना?


पाहूया पुढील भागात क्रमशः 


सौ. प्राजक्ता पाटील









🎭 Series Post

View all