Mar 04, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

#या फुलाला सुगंध मातीचा भाग-2

Read Later
#या फुलाला सुगंध मातीचा भाग-2

सौ. प्राजक्ता पाटील 

राज्यस्तरीय करंडक कथामालिका 

विषय- कौटुंबिक 

या फुलाला सुगंध मातीचा भाग -2


एवढे बोलून सरपंच आपल्या गाडीत बसून निघून गेले.  पण सोपानराव मात्र विचार करत बसले. तसे सरपंच चांगले होते पण त्यांना आपला त्रास देणे सोपानरावांना नको वाटत होते.


"अहो, कसला विचार करताय ? सरपंच जे बोलले ते बरोबर आहे. जाऊ आपण त्यांच्या मळ्यावर राहिला. नाही तरी आपण रोज कामाला जातोच की त्यांच्या मळ्यावर. थोडे दिवस राहू तिथंच आणि परत बघू आपल्याकडे पैसे आलं की बांधता येईल एखादं पत्र्याचं शेड." दीप्तीच्या आई सोपानरावांना म्हणाल्या."तू म्हणतेस ते बी खरं आहे बघ. पण तू एक विचार केलास का ? दीप्तीला शाळा किती लांब पडंल? आपल्या दीप्तीला तिथून शाळेत यायला किती वेळ लागलं? शिवाय सोबत बी कुणीतरी पाहिजेच की, आपण तर चोवीस तास कामात गुंतलेलं असतोय म्हणून नको वाटतेय बाकी काही नाही बघ. ""तुम्ही नका काळजी करू होईल सगळं ठीक. आपण मळा लांब होता म्हणून सायकलवर जायचोत आता मळयातच राहायचंय म्हणल्यावर आपल्याला सायकलची काय गरज आहे? मग ती सायकल देऊ की दीप्तीला. जाशील नव्हं दीप्ती सायकलवर?" आई दीप्तीला म्हणाली."हो आबा, आई म्हणते ते बरोबरच आहे. आता जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. अन् ती जना पण तिकडंच राहते मी जाईन तिच्याबरोबर शाळेत." दीप्ती आपल्या वडिलांना म्हणाली.त्यांना दीप्तीच्या आईचं आणि दीप्तीचं बोलणं पटलं. मग सोपानरावांनी विचार करून सामान पोत्यात भरायला सुरुवात केली. जुन्या पेट्या, थोडीशी भांडी आणि कपडे भरून त्यांनी गावातील एका खाजगी वाहनात ते सामान टाकले आणि त्यांचे ते बिऱ्हाड पाठीवर घेऊन सोपानराव सरपंचांच्या मळ्यात पोहोचलेले. सामान खोलीत नेऊन ठेवू लागले.हे सर्व बंगल्यासमोरील झोपाळ्यावर झोके घेत असलेला सौरभ पाहत होता. त्याने गाडीतून दीप्तीला खाली उतरताना पाहिले आणि पळत तो दीप्तीजवळ गेला.


"दीप्ती तुम्ही इथे राहायला आला आहात का?" सौरभ म्हणाला.


"हो. ते तळ भरणार आहे ना आपल्या गावातलं आणि आमचं घरही मोडून गेलं वाऱ्यानं म्हणून तुझ्या बाबांनी आम्हाला इथे राहायला सांगितलंय. " दीप्तीच्या डोळ्यात पाणी आले.सौरभलाही वाईट वाटले होते हे त्याच्या चेहर्‍यावरून स्पष्ट दिसत होते.


"बरं रहा तुम्ही इथे. पण मला एक चांगली मैत्रीण मिळाली तू इथे आल्यामुळे. फ्रेंड्स." म्हणून सौरभने दीप्तीसमोर हात पुढे केला.


"हो, फ्रेंड्स." म्हणत दीप्तीनेही सौरभच्या हातात हात दिला.


दीप्तीचे बाबा एकटेच पेटी उचलत होते हे पाहून सौरभ त्यांना म्हणाला, "थांबा मी पकडू लागतो तुम्हांला. " म्हणून त्याने पेटीला हात लावला.


"अहो मालक, तुम्ही नका उचलू . व्हा बरं बाजूला." सोपानराव म्हणाले. 


"असू दे सोपानदादा. किती वेळा सांगितलं तुला त्याला मालक नको म्हणत जाऊस म्हणून. लहान आहे तो तुझ्यापेक्षा. दुसऱ्यांना मदत करणे ही चांगली सवय असते. पकडू दे बरं त्याला त्या पेटीला." सौरभच्या आई म्हणाल्या."बरं ताईसाहेब." म्हणत दीप्तीच्या बाबांनी सौरभला पेटीला पकडू दिले. दोघेजण मिळून पेटी खोलीत ठेवून आले.  दीप्तीच्या मनात सौरभच्या आईविषयी आणि सौरभविषयी एक वेगळे स्थान निर्माण झाले. तिच्या मनात त्यांच्याविषयी आपोआप आदर निर्माण झाला. तीही सौरभच्या आईला कामात मदत करू लागली. तिला सौरभविषयी आणि त्याच्या आईविषयी आपुलकी वाटत होती.  त्यांनी तिला कधीही कमी लेखले नव्हते.  दररोज त्या सौरभच्या टिफिनमध्ये नवनवीन पदार्थ बनवून द्यायच्या त्यासोबत त्या आवर्जून दीप्तीसाठीही डबा पॅक करायच्या. दीप्ती हुशार होती त्यामुळे सौरभसोबत अभ्यास केला की सौरभही हुशार होईल असे त्यांना वाटायचे म्हणून त्या सतत दीप्तीला सौरभसोबत अभ्यास करायला बसवायच्या. इतकच नाही तर दीप्ती दररोज त्यांच्याच गाडीतून सौरभसोबत तिच्या शाळेत जायची आणि यायची अनंत उपकार होते त्या माऊलीचे दिप्तीवर. पण आज… सरपंचाच्या घरचं सगळं चित्रच पालटलं होतं. जेव्हा सौरभची आई त्याला सोडून देवाघरी गेली होती त्यावेळी दिप्ती नवोदयला नंबर लागल्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी राहत होती. तिला लहान असल्यामुळे सौरभच्या आईला काय झाले होते? हे नेमके ठावुक नव्हते. पण सरपंचांनी दुसरं लग्न करून ज्या सरपंचीन बाई घरात आणल्या होत्या त्या फार गर्विष्ठ आणि निष्ठूर होत्या हे दीप्तीच्या कानावर आले होते.लहानपणी ज्या बंगल्यातील माणसांनी तिला आपलंसं केलं होतं त्याच बंगल्यात आज तिला जेवायला जायचं होतं. पण का कुणास ठाऊक तिला तो बंगला परका वाटत होता. दीप्तीचे डोळे सौरभच्या आईच्या आठवणीने पाणावले होते. " हे काय ग दीप्ती ? तुझ्या डोळ्यात पाणी ?" आई दीप्तीला म्हणाली.


काही नाही आई , डोळ्यात काहीतरी गेलं वाटतं." दीप्ती म्हणाली. "आबा झालं का तुमचं बोलून ? निघायचं का आता?" दीप्ती म्हणाली. 


"आता मन नाही करत ग पोरी, मळ्यातल्या बंगल्यावर जायचं. ताईसाहेब होत्या तेव्हा त्या बंगल्यात आपलेपणा वाटायचा. पण आता केवळ सरपंचांचा आग्रह आहे म्हणून जाऊन दोन घास खाऊन यायचे." हळवे होऊन सोपानराव म्हणाले. "हे अगदी खरं आहे बघा. त्या माऊलीनं आपल्या दीप्तीला, आपल्याला कधीही परकं समजल नाही. पण ह्या नव्या सरपंचीनबाईनं ताईसाहेबांचा संसार तर उध्वस्त केलाच पण त्यांचा जीवही घेतला." दीप्तीच्या आई म्हणाल्या.


"हळू बोल जरा. आपल्याला काहीही हक्क नाही त्या मोठ्या लोकांची बदनामी करायचा. जे घडतं ते विधीलिखित असतं. आता चर्चा नको व्हायला त्या गोष्टीची." म्हणून आबा पुढे निघून गेले.


"आई काय झालं होतं गं ताईसाहेबांना?" दीप्ती उदास होऊन म्हणाली."दीप्ती, इतके दिवस मी तुला सांगितलं नाही पण ताईसाहेब आजारी वगैरे नव्हत्या. तेव्हा सरपंचांचा जीव ह्या नव्या सरपंचीन बाईमध्ये अडकला होता हे ताईसाहेबाना समजलं होतं.कितीही सांगितलं तरी सरपंचांनी त्या बाईकडे जाणं सोडलं नाही म्हणूनच ताई साहेबांनी विहिरीत उडी मारून जीव दिला. आणि कायमचं सरपंच ना सर्व बंधनातून मुक्त केलं." दिप्तीच्या आई डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत म्हणाल्या"काय? किती विचित्र वागले ना सरपंच? किती चांगले होते ते ? त्यांना असे कसे वागावे वाटले असेल आपल्या एवढ्या समजूतदार बायको सोबत?" हताश होऊन दीप्ती म्हणाली." काय माहीत ? त्या बाईंनी काय जादू केली ते ? आता सरपंचांनाही त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होत असेल आपलेच दात आणि आपलेच ओठ कोणाला ते बोलणार? म्हणून गप्प बसत असतील. कारण सौरभ प्रत्येक ठिकाणी त्यांचं नाव घालवतोय. कर्माची फळ भोगतायेत सरपंच. एका लक्ष्मीला दुखावल्याची." आई म्हणाली."म्हणजे काय झाले सौरभला ?" दीप्ती घाबरून म्हणाली.


"तुला आता बंगल्यावर गेल्यावर कळेलच की सगळं." आई दीप्तीला म्हणाली.


आईच्या या वाक्याने दीप्तीचा जीव पिळवटून निघाला होता. कोणीतरी आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीबद्दल इतकं कटू बोलतयं हे तिला सहनच होत नव्हतं. आता तिला कधी एकदा मळ्यात जाऊन सौरभला पाहते असं झालं होतं.


ताईसाहेबांच्या संस्कारात वाढलेला, परक्यानाही आपलंस करणारा सौरभ आता कसा असेल ? 

कोणता मार्ग अवलंबला असेल त्याने?


पाहूया पुढील भागात क्रमश:


सौ. प्राजक्ता पाटील 


सोलापूर जिल्हा


कथामालिका : कौटुंबिक ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//