सौ.प्राजक्ता पाटील
राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
विषय: कौटुंबिक
उपविषय: या फुलाला सुगंध मातीचा.
टीम सोलापूर..
भाग-10
"म्हणजे ते त्या दिवशी दाखवलेले आबांचे प्रेम, काळजी ते सगळे खोटे होते तर. तू तुझ्या मनाला वाटेल तसाच वागणार आहेस ना? तुला मैत्रीणीचीही काहीच गरज नाही. खरंच माझीच चूक झाली असंच मला वाटतंय. माफ कर मला. आता यापुढे मी तुझं नावही माझ्या आजूबाजूला सहन करणार नाही." दीप्ती नाराज होऊन म्हणाली.
सौरभ काहीही न बोलता निघून गेला.
दीप्ती म्हणाली खरी पण सौरभ निघून गेला तरीही तिचे मन त्याचाच विचार करत होते.
'काय झाले दीप्ती तुला? आता बिल्कुल सौरभचा विचार करायचा नाही. आई आबा किती काळजी करतात तुझी आणि तू मात्र ज्याला तुझी कदर नाही त्याचाच सतत विचार करतेय. आबा तर आत्ताच कुठे मरणाच्या दारातून परत आलेत. मग तू आता यापुढे आबांना बिलकुल दुखवायचं नाहीस.' दीप्ती मनात विचार करत होती.
दीप्तीने डोळ्यातील पाणी पुसून वर पाहिले तर समोर विजय उभा होता. विजय दीप्तीला म्हणाला, "झालं का ग दीप्ती तुझ्या मनासारखं? गेला ना तो रागानं. तुला नेमके काय हवेय हेच मला तर कळेना झालेय बघ?"
"हे बघ आता तू सुद्धा सौरभच्या नादाला लागू नको. अरे जरा शेतात लक्ष दे.काम कर आणि परिस्थिती सुधारायचं बघ. व्यसनाच्या आहारी जाऊन कोणाचाच चांगला होत नसतय अरे. पण हे तुमच्या कुठे लक्षात येतेय ? सौरभच्या नादाला लागून तुम्हीही शरीराचं, पैशाचं वाटोळं करताय." दीप्ती हताश होऊन बोलत होती.
"तुला कोणी सांगितलं मी व्यसन करतो म्हणून? आणि सौरभच्या नादानं कोण बिघडले ? सौरभ काय ग्लास घेऊन फिरतो का सगळ्यांच्या तोंडाला लावत? उलट त्याच्यामुळे गावात किती जणांचे भले झालेय हे तुला नाही माहीत. मला वाटलं होतं तू तरी त्याला ओळखले, पण तू ही त्याला ओळखले नाही." डोळ्यात पाणी आणून विजय बोलत होता.
"काय ओळखायचं त्याला? जो मैत्रिणीला दिलेला शब्दही पाळत नाही. पंधरा दिवस स्वतःला व्यसनापासून दूर ठेवलं आणि आज हे असं दारू पिऊन तिच्यासमोर यायला त्याला काहीच वाटलं नाही. हे ओळखायचं का त्याला?" दीप्तीचा पारा चांगला चढला होता.
"आज तुझ्यासाठीच त्याला हे सगळं करावं लागलं. तुझ्या भल्यासाठी. शिकलेला नवरा हवाय ना तुला ?" विजय रागाने म्हणाला.
"माझ्यासाठी. मी म्हटलं त्याला दारू पी म्हणून." दीप्ती म्हणाली.
"तसं नव्हं, तो गेलता ना आज त्या तुझ्या होणाऱ्या नवऱ्याकडे माफी मागायला. आजवर कोणाची डोळे वर करून बघायची हिंमत नव्हती सौरभकडं पण सौरभ तुझ्यासाठी तो म्हणेल तसं वागला. त्यानं नाही तसला अपमान केला माझ्या मित्राचा." विजय रागाने म्हणाला.
"म्हणून दारू प्यायची का? तिथे एखाद्या स्त्रीचा अपमान झाला असता तर राग शांत करण्यासाठी तिनेही असंच पाऊल उचलल असत का ? पुरुष म्हणून काहीही करायचं का?" दीप्ती म्हणाली.
"त्याने सौरभला तुझी शपथ घातली दारू पिण्यासाठी आणि म्हणून सौरभने दारू पिली. आज पहिल्यांदा मला माझा मित्र दारू पिताना घाबरलेला दिसला. ते म्हणजे तुला दिलेल्या शब्दामुळे." विजय वैतागून म्हणाला.
"काय ?"दीप्ती म्हणाली.
"हो. तुला खरं नाही वाटणार पण मी माझ्या डोळ्यांनं बघितलंय आणि कानानं ऐकलंय. मीच गेलो होतो त्याच्यासोबत." विजय म्हणाला.
"अरे पण मला सांगायचं ना त्याने ? आता मी त्याला विचारलं होतं." दीप्ती म्हणाली.
"असे कितीतरी बिन बुडाचे आरोप त्यांने सहन केलेत. तुझ्या प्रश्नाला उत्तर देऊन तो कशाला तुला नाराज करेल ? तुला गावातलं काहीही माहित नाही बघ. पाचवीच्यानंतर तू जी गेलीस ती आता आलीस. खूप अन्याय झालाय सौरभवर घरातूनही आणि बाहेरच्या कडूनही." विजय म्हणाला.
"असं कसं म्हणतोय तू ? ताई साहेबांसोबत सौरभ मला हॉस्टेलवर भेटायला यायचं ना. दहावीनंतरच काय ते मी त्याला भेटले नाही. कारण त्यानंतर ताईसाहेबच कायमचं हे जग सोडून गेल्या." दीप्ती डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली.
"अगं मग तेव्हाचा सौरभ असा होता का? तूच सांग? किती मदतीला धावून यायचा तो? तुला तरी त्याने कधी कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ दिला का ग? तुझी चप्पल तुटलेली होती म्हणून स्वतःचा सॅंडल देऊन सहलीत स्वतः अनवाणी चालला होता तो. तू विसरली असशील आम्ही नाही विसरलो." विजय म्हणाला.
"नाही रे, विसरले मी सुद्धा. म्हणूनच वाईट वाटतं बघ. त्याचंही चांगलं व्हावं अशीच माझी इच्छा आहे." दीप्ती म्हणाली.
"आहे ना तुझी इच्छा ? मग करशील तू सौरभशी लग्न?" विजय म्हणाला.
"काय?" दीप्ती विचारात पडली.
"हा मला माहित होतं नाही करणार. कमी शिकलेला आहे ना सौरभ आणि आज तू ज्याच्याशी लग्न करणार आहे तो जास्त शिकलेला. पण मनाने खूप वाईट माणूस आहे तो. तुला जर खरंच सौरभची काळजी असेल तर तू त्याच्याशी लग्न करून त्याची बायको बणून काळजी घेतलीस तरच तू त्याची खरी मैत्रीण नाहीतर अशी वरवर काळजी कोणालाही घेता येते, दाखवता येते. तुझी मर्जी नीट विचार कर. राज्याची लेक असूनही सावित्रीने सत्यानाशी लग्न केलं होतं. इतकच नाही तर सत्यवानाचे प्राणही यमांकडून परत आणले होते. तुला तर फक्त सौरभला योग्य मार्गावर आणायचे आहे." विजय म्हणाला.
विजय तिथून निघून गेला. दीप्ती अंगणातल्या खुर्चीवर आपल्याच विचारात रमली. दीप्तीचे मन सौरभसोबत लग्न करायला तयार होते. 'पण आई,आबा आणि सरपंचांना मी त्यांच्या घरची सून झालेली चालेल का?' हा विचार करून ती पुन्हा उदास झाली.
"दीप्ती अशी दारात का बसलीस?" शेतातून आलेली आई दीप्तीला म्हणाली.
"काही नाही आई, सहजच बसलेय.बघू दे इकडे ती पाटी." म्हणून आईच्या डोक्यावरची टोपली हातात घेऊन दीप्ती घरात आली.
"तुला माहितीये का ?उद्या आपल्या दीप्तीचा साखरपुडा आणि बैठक होणार आहे बरं. सरपंचांनी काढलेल्या त्याच पोराबरोबर." आबा शेतातून आलेल्या आपल्या बायकोला आनंदाने म्हणाले.
"पण मला काही ती माणस बरोबर वाटली नाहीत बघा." आई नाराज होऊन म्हणाली.
उद्या दीप्तीच्या साखरपुड्यात काही विघ्ने तर येणार नाहीत ना?
आईच्या म्हणण्याप्रमाणे ती माणसे अयोग्य असतील का?
पाहूया पुढील भागात क्रमशः
सौ. प्राजक्ता पाटील
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा