महालीची लेखणी_ समाजप्रबोधनासाठी कमावलेले अस्त्र

प्रस्तुत कथेतून मी महालीचा एक गावातील अडाणी मुलगी ते समाजप्रबोधन करणारी लेखिका असा प्रवास दर्शविला आहे.

"महाली , अय महाली!"


" आले ग माय! काय हाय? कशापाई बोंब मारतीया माह्या नावानं?"



" आग पोरी, यवढा राग बरा न्हाई. काय सारखं त्ये बुकं घेऊन बसती? तुला म्हाहीत हाय नव तुझ्या बापाला ह्ये आवडत न्हाय मनून!"

" आये, म्हाझे ईचार लई येगळे हायेत बग.मला ना मोठी मॅडम व्हायचय.लई शिकायचंय!"

" पोरी,आपल्या नशिबात हे समद न्हाय! चूल अन् मूल हीच आपली जिंदगी.उगाच काही बाही सपान दिवसाढवळ्या बघून तुझी मती भ्रष्ट झालीया.चल आटीप लवकर ही भाकर भाज .दे ते बुक ठेऊन."

" ये आए, तू तरी मला समजून घे ना बाय."

" न्हाई म्हंजी न्हाई. चल उठ मुकाट्यानं! "

महाली नाराज झाली.दुसऱ्या दिवशी मनोमन काहीतरी ठरवत ती सगळ्यांची नजर चुकवून गावातल्या शाळेत आली.थोड्या वेळातच ती घरी आली.

" कुट गेली व्हतीस?"

" कुट नाय बा;म्हंजे त्या गावातल्या माह्या मैत्रिणीकड!"

महालीच्या बा ने एक जळजळीत कटाक्ष तिच्याकडे टाकला,अन ती घरात पळाली.
थोड्या वेळातच शाळेतील मास्तरीनबाई घरी आल्या.

" येऊ का आत? ?"

" कोण हाय? अगं बया मास्तरीनबाई तुमी? "

" नमस्कार! महाली चे बाबा पण आहेत का घरात? त्यांच्याशी आणि तुमच्याशी मला जरा बोलायचं होतं."
महालीच्या बाने मनोमन म्हंटले, " हीच महाली ची गावातली मैत्रीण व्हती व्हय! बर बघतोच आता काय म्हणतीया!"

" हे बघा.तुमची महाली खूप हुशार आहे.तुम्ही तिला शाळेत का येऊ देत नाही? अहो तुमची मुलगी खूप छान लिहिते.तिच्या कल्पक लिखाणाला पाहून ती भविष्यात खूप छान लेखिका म्हणून नावारूपास येऊ शकते. "

" अव मॅडम, म्या तिचा बा हाय.ती माजी पोरगी हाय. तिचं लगीन करायचं हाय मला.चूल अन् मूल हीच तिची जिंदगी हाय.शिकून बिकुन लय डोक्यावर मिरे वाटणार न्हाई ती ! चल जाय ग मदी!"

" हे बघा .ती उद्या तुमच्या घराण्याचे नाव उज्ज्वल करेल.तिच्यात जिद्द आहे धमक आहे .ती शिकल्यावर तिला समाजात मान राहील.समाजातील भ्याड लोक तिच्यावर नजर सुद्धा टाकणार नाहीत.कारण शिक्षण ,लेखणी सारखे अस्त्र तिची तेव्हा दैवी ताकद असेल.

माझ्याही वडिलांनी हाच विचार तेव्हा केला असता तर महालीसारखी मीही आज चूल अन् मूल यातच अडकले असते.पण अचानक एकदा गावातील सरपंचाच्या मुलाने माझी छेड काढली.मी मात्र त्याला चांगला पलटवार केला आणि तो सरळ झाला.कारण शिक्षणाने मला एक वेगळीच ताकद दिली होती.तेव्हा महालीला अशा विकृत नजरेपासून वाचण्यासाठी सक्षम बनू द्या .लेखणीचे अस्त्र तिच्या हाती देवून तिला माझ्यासारखे होऊन समाजप्रबोधन करू द्या,जेणेकरून तिच्यासारख्या गावातील अनेक मुली आत्मनिर्भर होऊन ,सुशिक्षित बनतील, व आपले कुटुंब साक्षर करून अशी काही समाजातील विकृती नाहीशी करतील."

" मॅडम,खरच तूमी आमचे डोळे उघडले.आमच्या महालीला आमी लई शिकवू.तिला तिच्या पायावर उभं करू,जेणेकरून ती ह्या भ्याड लोकांना पळवून लावेल आणि बिनधास्त आयुष्य जगू शकेन. ठरलं तर आता,माझी महाली आजपासूनच शाळेत येणार! "

" व्हय धनी. बरोबर बोलताय तुमी.आपली महाली लेखणीच्या अस्त्रावरच मान वर करून जगू शकन."

अशा रीतीने महालीचे शाळेत जाणे पुन्हा एकदा सुरू झाले.एक दिवस ती एक प्रख्यात लेखिका बनली.


तिच्या आयुष्याचा कायापालट करणारा हा अनुभव तिला एक समाजप्रबोधन करणारी लेखिका म्हणून नावारूपास आणण्यास महत्वाचा ठरला.शेवटी शिक्षण आणि लेखणीचे अस्त्र तिने कठीण परिस्थीतीतही स्वतःकडे खेचून आणले आणि आज ती गावोगावी जाऊन मुलींच्या शिक्षणासाठी एनजीओ देखील चालवते.

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
# गोष्ट छोटी डोंगराएवढी

# फोटो_ साभार गुगल