जागतिक निद्रा दिन

जागतिक निद्रा दिनाच्या निमित्ताने सहज विचार आला काहीतरी लिहावे. World Sleep Society या संस्थेच्या अंतर्ग??

       जागतिक निद्रा दिनाच्या निमित्ताने सहज विचार आला काहीतरी लिहावे. World Sleep Society या संस्थेच्या अंतर्गत २००७ पासून दरवर्षी मार्च महिन्यात जागतिक निद्रा दिन साजरा केला जातो. निद्रा दिनाची तारीख दरवर्षी बदलत राहते, पण बहुतेककरून शुक्रवारचा दिवस निवडण्यात येतो.

        आता तुम्ही म्हणाल की निद्रा दिन म्हणजे काय? या दिवशी पूर्ण दिवस झोपा काढायच्या का? तसं नाही. झोपेचं महत्त्व आणि त्याच्याशी निगडीत आजारांबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. २००७ सालच्या पहिल्या निद्रा दिनाचं कारणच जगभरातील आरोग्य तज्ञांना एकत्र आणून झोप या विषयावर चर्चा करण्याचं आणि त्याचं महत्त्व जगभर पोहोचवणं हे होतं. त्यानंतर पुढे हा प्रघात पडला. यंदाच्या जागतिक निद्रा दिनाची थीम ‘नियमित झोप, स्वस्थ भविष्य’ अशी आहे. झोप पूर्ण झाली तर माणसाची कार्यक्षमता वाढते. आरोग्य सुधारते. त्यामुळे 'आठ तासाची झोप घ्यावीच' असा सल्ला या निमित्ताने दिला आहे.

         कित्येक लोक असे बोलताना दिसतात, "मला ना झोपच येत नाही." "झोपेचं आणि माझं काय वाकडं आहे कुणास ठाऊक." यात जास्त म्हाताऱ्या मंडळींचे प्रमाण असते. वयोमानाप्रमाणे झोप कमी होत जाते असे म्हणतात. म्हणजे लहान बाळ कसे सारखे झोपत असते, त्या उलट म्हातारी मंडळी बघावी तेव्हा आपली टक्क जागी असतात. पण आजकाल तरुण वर्गाला सुद्धा झोप न येणे हा त्रास होऊ लागला आहे. दिनचर्येतील बदल आणि मोबाईलचा अति वापर ही त्यामागची मुख्य कारणे सांगितली जातात. आणि मागच्या एक वर्षांपासून कोरोनाने दिलेले वर्क फ्रॉम होम हे देखील एक प्रमुख कारण आहे. घरी असल्यामुळे कामाच्या वेळा वाढत जातात आणि मग झोप न येण्यासाठी वारंवार चहा आणि कॉफीचा मारा केला जातो. झोप ताणून धरल्याने वाढत जातो तो चिडचिडेपणा.

          हे झालं लोकांच्या झोपेचं. आता तुम्ही म्हणाल हीचं काहीतरी वेगळंच आपलं. हो खरंय अगदी. मला ना कुठेही झोप येऊ शकते. म्हणजे लाईट गेलेली असताना सुद्धा अगदी चादर अंगावर घेऊन शांत झोपणारी आहे मी. हाईटच आहे ना. आणि मीटिंग, ट्रेनिंग असताना येणाऱ्या झोपेचं तर विचारूच नका. अगदी हक्काची झोप असल्यासारखं पेंगुळलेल्या अवस्थेत कोणी आपल्याकडे बघत तर नाही ना, इकडे लक्ष ठेवत डोळे किती उघडे राहतील याचा आटापिटा करणं म्हणजे महादिव्यच! आणि हो एक राहिलंच की. लोक लॉन्ग राइड वर जातात ना मस्त एकदम. एन्जॉय करायला. तर ह्या लॉन्ग राइड म्हणजे हमखास झोपेची वेळ साधणाऱ्या असतात माझ्यासाठी. मग ती कार असो कि बाईक. काही फरक पडत नाही आपल्याला. दुपारी जेवल्यानंतरची वेळ म्हणजे तर अगदी ३ ते ४ मध्ये काही नको असं हतबल होऊन सांगायची इच्छा होते. ऑफिस चा डेस्क, घरातला सोफा, बस, ट्रेन, कुठेही आपला डोळा लागू शकतो. कुणी जर झोपेत वेट लॉस होतो अशी काही एक्सरसाईझ दिली तर किती बरं होईल ना? कारण सकाळी उठून काही करायचं म्हणजे आपली झोप कुठे पुरी होते? कितीही ठरवा, अलार्म लावा, काही करा, हि झोप सकाळच्या उठण्याचं अगदी वाटोळं करून टाकते. काय करावं? बरं रात्री जागरण असतं असंही काही नाही ना!अशी हि झोप. हवी तेव्हा येत नाही, पण नको तेव्हा जागं राहू देत नाही. माझ्यावर निद्रादेवी अगदी प्रसन्न आहे. काहीही म्हणा झोप आपल्याला अगदी प्रिय आहे. झोपेच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. 

          सर्व विकत घेता येतं, पण झोप विकत मिळत नाही; म्हणतात ना ते अगदी खरं आहे. दुनियेची सर्व सुखं एखाद्याच्या पायाशी लोळत असतील, पण ती सुखाची झोप ज्या गरिबाला त्याच्या झोपडीत राहून मिळते, त्याची तुलना होऊच शकत नाही. आज आपल्याकडे एसी बेडरूम, मऊ गादी, सगळे ऐशोआराम आहेत, पण पूर्वी ज्या गोधडीवर शांत झोप लागत असे, ती या गादीवर लागते का, हा प्रश्न स्वतःला नक्की विचारला पाहिजे. अपुऱ्या झोपेमुळे कितीतरी दुष्पिणामांना सामोरे जावे लागते आहे. शरीरावर किती विपरीत परिणाम होतात. अपुरी झोप ही आरोग्यासाठी घातक आहे. आपल्याला कळत नाही, पण नकळतपणे ही अपुरी झोप आपल्या शरीराला पोखरते आहे. या गोष्टीची जाणीव वेळीच व्हावी, म्हणूनच वर्ल्ड स्लिप सोसायटी ने 'वर्ल्ड स्लिप डे' साजरा करण्यास सुरुवात केली आहे. 

            चला तर मग मस्त निद्रादेवीची आराधना करून झोपेच्या अधीन जाऊया. थोडक्यात काय चला झोपा काढुया!!!