कामगार दिन विशेष अलक

Short Stories Telling What Happened During And After Strike In Labourers Life

कामगार दिन विशेष अलक



१) ती एक सुसंस्कृत घरातली , सुशिक्षित गृहकृत्यदक्ष, गृहिणी स्वतःच्या मुला - बाळात , कुटुंबात रमलेली. पण आजकाल तिला घरातले सगळे गृहीत धरायला लागले होते. सासूबाईंना औषध पाण्यासाठी, मुलांना अभ्यास आणि इतर छंद वर्गांसाठी, तर नवऱ्याला त्याच्या व्यवसायात मदतनीस म्हणून तीच हवी असे. शिवाय घरातला किराणा , वाण - सामान , भाजीपाला , पै - पाहुण्यांचे देणंघेणं सगळं तिलाच बघावं लागे. शेवटी एकदा न राहवून तिने घरातल्या सगळ्यांना एकत्र बोलावलं आणि स्वतःची व्यथा सांगितली. " घरातल्या कामवाल्या मावशी बाईंना, मुलांना आणि तुम्हाला (नवऱ्याला उद्देशून) सगळ्यांनाच आठवड्याची किमान एक तरी सुट्टी असते. मला मात्र महिन्यातला एकही दिवस हक्काचा मिळत नाही."



२) एस .टी.च्या संपकाळात तिच्या घरची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक झाली. आधीची महामारी आणि नंतर हा संप ती पुरती सैरभैर झाली. पण तिनं शांत डोक्याने निर्णय घेतला . स्वतःचं स्त्रीधन विकून तिनं घर तर चालवलंच पण नवऱ्याला ऑटोही घेऊन दिला . आणि ती स्वतः एका खाजगी शाळेत शिक्षिकेची नोकरी करू लागली.


३) तिचे वडील कामगार संघटनेचे महत्वाचे नेते आणि अध्यक्ष होते. संघटनेच्या महत्त्वाच्या बैठकीत ती हिरीरीने सहभाग घेत असे. संप चीघळल्याने कामगार मंत्र्यांनी पैशांचं आमिष दाखवलं पण ते ऐकत नाही असं पाहून मग वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तिच्या वडिलांना हृदयविकाराचा जोरदार धक्का लागला आणि ते गेले. ही बातमी तिने न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रात दिली त्यामुळेच मंत्र्यांचे मंत्रीपद तर गेलंच शिवाय त्या पक्षाचं सरकारही पडलं.


४) तो एक समाजशास्त्राचा विद्यार्थी होता. कामगारांच्या विषयावर पी.एच.डी करणारा. महामंडळाच्या संपाच्या काळात एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली .त्या दिवंगत कर्मचाऱ्याच्या मुलीची कहाणी ऐकून तो अगदी हादरून गेला होता , कारण त्या मुलीने स्वतःच्या दमेकरी आईला वाचवण्यासाठी आणि इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या आपल्या भावाची फी भरण्यासाठी स्वतःची अब्रु कामगार संघटनेच्या पुढाऱ्याला विकली होती.


५) अण्णासाहेब देशमुख एक मोठं राजकीय प्रस्थ. त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही राजकारणात होते. महामंडळाच्या कामगारांचा मोर्चा जेव्हा अण्णासाहेबांच्या घरावर चालून आला तेव्हा मुलान सुरक्षारक्षकांना मोर्चेकऱ्यांवर लाठीहल्ला करायला सांगितलं परंतु त्याच्या बहिणीने मात्र ते सारं थांबवून , त्या मोर्चेकरयांना शांत केलं. त्यांच्या मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या. त्यांना चहापाणी दिले आणि संपकाळात ला पगार आणि आत्महत्याग्रस्त कामगारांच्या वारसांना महामंडळात सामावून घ्यायचं आश्वासनही दिलं.






         वाचकहो आजचे अलक कसे वाटले नक्की अभिप्राय द्या.



फोटो   -      साभार गुगल




जय हिंद

🎭 Series Post

View all