शब्दगंध!

Word Recognition.
शब्दबंध!

सर्वात सुंदर नातं असतं ते शब्दांचं... खरोखर एकमेकांना किती ओतप्रोत बिलगून असतात ते... शब्दांमुळेच भाषेला अन् लेखणीलाही दिशा मिळते. शब्दांच्या माध्यमातूनच सगळं काही व्यक्त करता येतं हे काहीअंशी खरं असलं तरी या शब्दांमागच्या भावनाही यात तितकीच भूमिका बजावतात. पण शब्द हे एक प्रकारचं अस्त्र आहे, म्हणूनच शब्दांना शस्त्राची उपमा दिली गेली आहे. आणि हे अगदी पूरक आहे. कारण शस्त्रांप्रमाणेच शब्दही एकदा सोडले तर ते माघारी घेता येत नाहीत.

तर या शब्दांचेही भिन्न प्रकार आहेत. औपचारिक आणि अनौपचारिक... औपचारिक म्हणजेच आपण जे मनात आहे ते स्पष्टपणे शब्दांच्या माध्यमातून बोलतो. आणि अनौपचारिक म्हणजे आपण तेच शब्द प्रत्यक्ष न बोलता देहबोली अथवा हावभावांवरून बोलतो. अनौपचारिक पद्धतीत शब्दांसोबत भावनाही बोलून जातात. तर याच शब्दांना मग ते औपचारिक असो अथवा अनौपचारिक, त्यांना भावनेची जोड आणि मनाची ओढही असावी... मनातल्या भावनांना अलवारपणे पेलून शब्द आकाराला येतात. अन् शब्द अव्यक्त राहिले तर भावना धुमसत राहतात.

म्हणूनच आपल्या संवाद कौशल्यात या दोन्ही शब्द प्रकारांचा संमिश्र वापर करून आपण यांची उत्तम सांगड घातली तर शब्दांसह आपल्या व्यक्तिमत्वालाही विशेष ओळख प्राप्त होते.

©️®️ अबोली डोंगरे.