Feb 24, 2024
प्रेम

विश्व स्वप्नांचे भाग 9

Read Later
विश्व स्वप्नांचे भाग 9

विश्व स्वप्नांचे :- भाग 9

आज आपल्या स्वातंत्र्याची जणू शेवटची रात्र आहे असेच सगळे वागत होते. आकाश आईशी बोलला का, इतकेच फक्त समीक्षा ने त्याला विचारले....

सगळ्यांना "सकाळी लवकर उठा" असे आकाश म्हणाला तसे काकू म्हणाल्या " अरे निघा उद्या पण जरा निवांत जा ना! अगदी 7 पर्यंत पोहचलात तरी हरकत नाही." 
तसं सगळे पुन्हा एकमताने " हुरेरे हुरेरे" म्हणत एकमेकांना टाळी द्यायला लागले...

मग काय तिथली रम्य सकाळ एन्जॉय करण्यासाठी सगळे उठले लवकरच आणि छानपैकी कोणी अंगणात वावर, कोणी फेरफटका मार, कोणी चुलीशी उद्योग कर असेच काहीसे सुरू होते.
आवरून नाश्ता,चहा करून....सगळे जण गावात परत एक चक्कर मारून आले...
आकाश ची शाळा..ग्राउंड...नदीकिनारा..असे करत दुपारी जेवायला घरी पोचले तर काकूंनी मस्त पैकी बाजरीची भाकरी...पाटवडी... करडई ची पातळ भाजी...कांद्याच्या पातीचे सॅलड... लसूण चटणी-दही आणि इंद्रायणी भात असे तयार केले होते..
आत्ता मात्र सगळ्यांनी हाताची बोटे चोखून चोखून जेवण केले...
राहुल आणि समीर ने काकूंना जाऊन साष्टांग दंडवत घातले आणि सांगितले... या जेवणाची लज्जतीसाठी कोटी कोटी धन्यवाद!

 शेवटी निघण्याची वेळ आली तसे सगळे एकेक करून काकूंना नमस्कार करत त्यांच्याकडे येण्याचा आग्रह करित गाडीकडे निघाले....
समीक्षा थांबली आणि तिने काकूंना नमस्कार करून मिठी मारली...
"काकू, खूप प्रेमळ आहात तुम्ही! मला घरापासून लांब असल्यासारखे वाटले नाही...हे दिवस मी कायम लक्षात ठेवेन...!"
"नीट राहा हां पोरी...फार गोड आहेस तू...सुखी राहा" असे म्हणत तिच्या डोक्यावर हात फिरवून आशीर्वाद देत त्या म्हणाल्या...

ती जशी गाडीकडे गेली तसे आकाश ने आईला विचारले...
" आई कधी येतेय तू मग?"
"आकाश मी येते म्हणाले ना! थोडा वेळ दे, पुढल्या आठवड्यात येईल मी" म्हणत त्यांनी आकाश ला जवळ घेतले..... 
"नक्की यायचंय आई..." असे म्हणत तो ही गाडीत शिरला...
गाडी निघाली तसे सगळे हात हलवून बाय करत होते आणि भरल्या डोळ्यांनी काकू त्यांना निरोप देत होत्या....

जातांना जसा उत्साह होता तो परतीला निवळला होता, त्यामुळे सगळे डुलक्या काढत प्रवास करत होते.
...दुपारी चहा साठी एक ठिकाणी थांबल्यावर ...थोड्या गप्पा करित ...कसे एन्जॉय केले 2 दिवस याचा पाढा वाचणे सुरू होते!

पुन्हा प्रवास सुरु झाला. बरोबर 7 वाजता त्यांची गाडी समीक्षा च्या गेट समोर हजर झाली.
थकलेले सगळे उतरले, पाणी पिऊन, थोडं जुजबी बोलून आपापल्या घरी निघाले...

" काय म्हणाली आई आकाश? कधी येतेय? " समीक्षा ची आईने त्याला विचारले.
"तशी ती पूर्ण यायला तयार नाही झालीय अजून! पण काही दिवसांसाठी पुढल्या शनिवारी येईल म्हणाली."
"बरं ठीक आहे, पण तू त्यांना घेऊन इथेच आमच्या गेस्ट हाऊस ला ये. मी बोलेन त्यांच्याशी, सोबत 4 दिवस राहिले की मन बदलेल, काळजी करू नकोस." त्या म्हणाल्या.
"हो काकू, ठीक आहे." असे म्हणून तोही रूमवर निघाला...

" आई, काय मज्जा केली आम्ही 2 दिवस! काय मस्त जेवण बनवते आकाश ची आई!  काय सांगू आणि काय नाही असं होतंय बघ." समीक्षा उत्साहात बोलत होती.
आई तीच फक्त निरीक्षण करत होती... आपल्या लेकीला गाव, तिथलं जीवन कसे असते तेच तर तिला दाखवायचे होते....

पुढचा तास दोन तासभर तरी समीक्षा फक्त बोलत होती आणि आई ऐकत होती....  सांगतानाचा तिचा उत्साह तिला जाणवत होता...
आईने तिची प्रत्येक गोष्ट बारकाईने ऐकली आणि योग्य ती नोंद मनात करून ठेवली!

दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये पोचून कोणी पण  लेक्चर ला बसलेच नाही...सगळे जण कॅन्टीनमध्ये ट्रिप चा  विषय बोलत होते.... प्रत्येकाने मनापासून या नवीन अनुभवाबद्दल आकाश ला थँक्स म्हणले, तसे आकाशने सांगितले की  ही आयडिया समीक्षा च्या आईची होती....!

बघता बघता पुढचा शुक्रवार आला..दुसऱ्या दिवशी पहाटेच्या बस ने आकाश ची आई यायला निघणार होती त्याप्रमाणे आकाश त्यांना घ्यायला बस स्टॉप ला गेला होता....
आई जशी आली तशी समीर आणि त्याने सरळ समीक्षा च्या घरी गेस्ट हाऊस ला त्यांना नेले....
 त्या येण्यापूर्वीच समीक्षा च्या आईने छान व्यवस्था लावून घेतली होती. समीक्षा च्या बोलण्यातून त्यांना जे जाणवले होते त्यानुसारच त्यांनी त्यांची सोया केली होती..

त्या आल्याबरोबर त्यांनी आकाश च्या आईच छान स्वागत केलं आणि समीक्षा सोबतच होती.
गेस्ट हाऊस छान आणि साजेसं होत,त्यातील व्यवस्था त्यांनी अगदी आकाश च्या गावाकडील घराप्रमाणे करवून घेतली होती त्यामुळे त्याची आई एकदम ऍडजस्ट हाऊ शकली....

समीक्षा ची आई जातीने लक्ष देत होती त्यामुळे त्यांची आणि आकाश च्या आईची छान गट्टी जमली. 
आकाश ची आईसुद्धा आपले गाव, लोक, त्यांचे मिस्टर यांच्याबद्दल भरभरून बोलत होत्या. त्या दरम्यान आकाश पण तिथेच आईजवळ राहत होता...
समीक्षाच्या आईने सुद्धा त्यांच्या घराबद्दल त्यांच्या स्वतःबद्दल थोड्या जुजबी गोष्टी सांगितल्या...
त्यामुळे 2 दिवस कसे गेले हे त्यांना कळलेच नाही...
 असेच बोलत असताना समीक्षा च्या आईने विषय काढला,
"पुढल्या महिन्यात आकाश वर्षभरासाठी आता पुण्याला जाईल मग तुम्ही एकट्या गावात काय कराल?"
"अहो आमचं शेत आहे, गडी माणूस आहे ते असतील की सोबत!" आकाश ची आई म्हणाली.
"अहो ते ठीक आहे, पण पुढे आकाश जेव्हा 2 वर्षात परीक्षा पास होऊन बोर्डर वर जाईल मग तुम्ही काय कराल? त्या पेक्षा तुम्ही इथे आमच्या सोबत या!  ही बाकीची मुलं आहेत तुम्हाला एकटे नाही वाटणार आणि हो अधूनमधून तुम्ही गावाला एक फेरी मारून येत जा...तुम्ही इथे राहिलात तर आकाश पण निश्चिन्त होईल...."

कुठेतरी त्यांना हे पटत होते कारण ही लोक त्यांना आवडली होती.... आणखी दोन दिवस त्यांना  विचार करायला वेळ देऊन समीक्षा आणि तिची आई त्यांच्याबरोबर वेळ घालवत होत्या....

 अखेर त्या तयार झाल्या... त्यापूर्वी एकदा गावात जाऊन सगळी व्यवस्था लावून येते असे म्हणाल्या तेव्हा कुठे आकाश चा जीव भांड्यात पडला....

समीक्षा आणि तिच्या आईला पण आता बरे वाटत होतं, समीक्षा च्या आईने त्यांना काळजी करू नका सगळं छान होईल म्हणून आधार दिला....

बघता बघता एक आठवड्यावर आकाशचे जाणे आले तसं समीक्षा च्या आईने त्याला घरी बोलावून घेतलं त्या म्हणाल्या, "आकाश तुझी तिथली व्यवस्था  नीट झाली का?"

"हो काकू! होस्टेल आहे त्यांचे आणि मेस सुद्धा त्यामुळे राहणे आणि खाणे याची काळजी नाही आणि शिवाय त्यांची लायब्ररी आहे त्यामुळे अभ्यास होईल तिथे ."

" छान! आणि हो इथली काळजी करू नकोस आई इथे आमच्या सोबत नीट असेल तू फक्त अभ्यासाकडे बघ....
तू केवळ ज्या उद्देशाने चालला आहेस तो तुला पूर्ण करायचा आहे!"

समीक्षा मात्र थोडी खट्टू झाली होती.... आता हा जाणार त्यामुळे ती थोडी अबोल झाली.

एकदा कॉलेज मधून घरी येताना आकाश तिला म्हणाला.
"समीक्षा हे बघ तू आणि तुझी आई माझ्यासाठी खूप काही करत आहात. तुझ्या भावना मला कळतात पण सध्या आपलं लक्ष हे आपलं शिक्षण याकडे राहीले तर उद्या कोणी नाव ठेवणार नाही....तू काळजी करू नकोस आणि नीट राहा...." 

आज पहिल्यांदा तो काहीतरी वेगळं बोलला हे तिला खूप सुखावले आणि तिने पण मनाची तयारी करत त्याला सांगितले " हो मला कळतंय तुझं बोलणं आणि पटते सुद्धा आहे....
तू तुझं स्वप्न पूर्ण करायला काही कमी पडू देऊ नकोस इथे मी आहे आईची काळजी घ्यायला....मी इथे काही कमी पडून नाही देणार..." 
यावर त्याने तिचा हात प्रेमाने हातात घेऊन घट्ट पकडला....तिने सुद्धा तट हातावर त्याला प्रेमाने थोपटले...
आज थोडक्यात बरेच काही बोलणं झालं होतं त्यामुळे दोघंही समाधानी होते....

सगळे मित्र कंपनी सुद्धा थोडे खट्टू होते कारण त्यांचा लाडका  आकाश आता वर्षभर दूर जाणार होता पण त्याच्या इथल्या सगळ्या गोष्टी बघण्याची जवाबदारी त्यांनी घेतली होती....

तो निघण्याच्या एक दिवस आधी त्याची आई सगळी व्यवस्था लावून गावावरून परत आली....
आपला मुलगा केवळ  त्याच्याच नाही तर त्याच्या वडिलांच्या शुद्ध स्वप्नाच्या दिशेने पुढे जातोय बघून, अभिमानाने त्यांचा ऊर भरून आला...
रात्रभर आई आणि मुलाच्या  गोष्टी सुरू होत्या...
थोडावेळ समीक्षा आणि तिची आई पण येऊन गेले...आता आईसंदर्भात आकाश पूर्ण निश्चिन्त झाला होता....

सकाळीच त्याची सगळी मंडळी त्या गेस्ट हाऊस ला जमली...
 कोणी त्याला हा खाऊ दे, कोणी पेन तर कोणी बॅग दे असे काही करत प्रत्येकाने घरून काही ना काही आपल्या लाडक्या आकाश साठी आणले होते ते दिले...
 ते बघून त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आले आणि मन सुखावले...

त्याने आईला आणि समीक्षा च्या आईला दोघींना नमस्कार केला, तिच्या दादाचा पण निरोप घेतला...
बाकी मंडळी तर त्याला बाय करायला स्टॉप वर त्याच्या सोबत निघाली.
आज त्याला बाय करताना समीक्षा खूप रिलॅक्स होती आणि तो पण तिच्यावर आपली मुख्य जवाबदारी सोपवून निश्चिन्त झाला होता....

आता त्याला स्वतःला सिद्ध करायचे होते आणि ते आव्हान लीलया  पेलण्यासाठी तो पुण्याला निघाला होता....
एका शाश्वत आधाराने आणि खंबीर मनाने!

क्रमशः

©®अमित मेढेकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Amitt Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!

//