विश्व स्वप्नांचे भाग 7

Akash and his all friends decide to visit his native place ...The reason for visiting was known only to Akash...

विश्व स्वप्नांचे :- भाग 7

हे सगळं बोलणं झाल्यानंतर समीक्षा ला खूप हलकं वाटत होते.. आपली नाळ त्याच्याशी वेगळ्या अर्थाने जोडली जातेय असे फिलिंग तिला येत होते आणि हे फीलिंग तिला खूप सुखावत सुद्धा होते.....  
आपल्या आईने उचललेल्या या पावलाने ती खूप छान फील करत होती. तिच्या आईला पण आकाश आवडला होता आणि त्याचे भले व्हावे नाही तर होईलच असा ठाम विश्वास कुठेतरी वाटत होता.....
 खरच उद्या हा मुलगा आपल्या घराशी जोडला गेला तरी काही हरकत नाही असे तिला वाटत होते.

लगेच रात्रीच तिने आपल्या ग्रुप ला विकेंड ला आपण आकाश च्या गावाला जातोय याची कल्पना दिली. 
सगळ्याना आश्चर्य पण वाटले आणि आनंद पण, कारण गावाकडील राहणीमान ,परिसर ,लोक याबद्दल त्यांनी फक्त ऐकले होते. अनुभव ते पहिल्यांदा घेणार होते आणि तेही रॉयल स्टाइल मध्ये जाऊन.....
कारण जाण्यासाठी ची गाडी (टुरिस्ट सीटर) ची व्यवस्था समीक्षा ची आई करणार होती...
स्मिता आणि सीमा च्या घरी तिच्या आईने स्वतः बोलून त्यांची जाण्यासाठी परमिशन मिळवून दिली त्यामुळे त्या तर खूपच खुश होत्या....
 कधी एकदाचा आठवडा संपतोय असे सगळ्यांना झालेले...
 आणि इकडे समीक्षा स्वप्नवत वावरत होती कारण आईचा असलेला कौलं तिला कळलेला होता....

आकाश ने पण घरी आईला कळवलं की शनिवारी सकाळीच मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना घेऊन येणार आहे आणि 2 दिवस ते सगळे तिथेच राहणार.
आई  हे ऐकून थोडी गडबडली कारण सगळी व्यवस्था तिला एकटीला लावायची होती पण तरीही ती आनंदाने हो म्हणाली....

लगबगीने तिने किरणासामान, भाजीपाला आणि इतर लागणाऱ्या गोष्टींची यादी वगैरे करून सगळ्यांच्या आवडीनिवडी आकाश कडून जाणून घेतल्या. एकंदर काय तर सगळे उत्साहात होते इथे हे सगळे आणि तिथे आई सुद्धा....

आकाश आपल्या आईला जाणून होता, तिचा स्वाभिमान तिने आयुष्यभर जपला होता. तिच्याशी बोलताना खूप जपून तिच्या कलाने बोलावे लागणार हे त्याला माहित होते, त्याची परीक्षा आहे हे तो जाणून होता..... 
ती कुठेही दुखावणार नाही याचीच काळजी घेणे हे त्याला आपले कर्तव्य वाटत होते,  त्यामुळे त्याची आपली वेगळी तयारी सुरू होती....

 आकाश चे गाव ते त्यांचं शहर यातल अंतर  5 तासांचे होते आणि पूर्ण दोन दिवस एन्जॉय करता यावे म्हणून त्यांनी शुक्रवारीच दुपारी निघायचं ठरवले ज्यामुळे जास्ती रात्र होण्याच्या आत ते गावात पोहचतील. ....
ठरल्याप्रमाणे उत्साही सगळी मंडळी  शुक्रवारी कॉलेज मधून परस्परच समीक्षा च्या घरी 3.30 ला पोहचले. 
गाडी येऊन तयार होती... सगळे जण आपल्या बॅग घेऊन आलेच होते. कॉलेज च्या बॅग्ज समीक्षा च्या घरीच ठेऊन सामानाच्या तेवढ्या बॅग घेऊन सगळे पटापट गाडीत जाऊन बसले. 
समीक्षा च्या आईने सगळ्यांना प्रवासासाठी खाऊ दिला होता...पॅटिस, चिवडा, चिप्स, सॉफ्ट ड्रिंक, पेस्ट्री सगळेच दिमतीला होते त्यामुळे सगळे जामच खुश होते....
बरोबर 4 ला त्यांचा प्रवास सुरू झाला. हसत खेळत गाणी म्हणत ऐकत ...तो ताल पकडून त्या तालावर नाचत त्यांचा प्रवास सुरु होता.... 
तिथे सगळ्यांमध्ये असली तरी वेगळ्या आनंदात समीक्षा च मन हेलकावे खात होते, एक कसलीशी हुरहूर तिला  सतत जाणवत होती.
आकाश ला पण थोडीफार कल्पना येत होती समीक्षा च्या आईच्या वागण्यातून पण स्पष्ट असे काही नाही त्यामुळे सध्या आपण आपले ध्येय नि आईची व्यवस्था हाच विचार त्याने मनाशी ठरवला होता....

मध्ये एक ठिकाणी ते चहा साठी थांबले तेव्हा स्मिता म्हणाली " आकाश, मी गावात पहिल्यांदा जात आहे! 
गाव कसं ते मी फक्त ऐकून आहे पण आज तुझ्या मुळे आणि समू च्या आईमुळे तो अनुभवायला मिळणार आहे. 
खूप एक्ससायटेड वाटत आहे!
 कशी आहेत रे तिकडची लोकं?
 तुझी आई कशी आहे रे? तुझ्या गावात पण सिनेमात असते तशी नदी आहे का? छान हिरवीगार शेत वगैरे? काहितरी तर बोल ना !"

"अग तू त्याला बोलायला चान्स देशील तर तो बोलेल न!" राहुल म्हणाला तसे सगळे हसायला लागले.

"असू द्या रे, नका चिडवू तिला" म्हणत आकाश ने स्मिताकडे बघून सांगायला सुरुवात केली.. " हे बघ माझं गाव हे गाव असलं तरी सधन गाव आहे. 
सगळी व्यवस्था तिथे चांगली आहे आणि लोक सुद्धा...भरपूर झाडे आहेत..तुला वाटते तशी नदी आहे...छान पैकी एक मोठा डोंगर आहे ज्यावर शंकराचे देऊळ आहे...
बाकी काय आहे ते थोडं बघायला ठेव.... सगळंच आता सांगितलं तर क्यूरिओसिटी संपेल ना!" 
तसं ती पण हसली आणि " येस बॉस!" म्हणाली....

साधारण रात्री 9.30 च्या सुमारास गाडी आकाश च्या घरासमोर थांबली तशी त्याची आई लगबगीने स्वागताला बाहेर आली.
मुलं गाडीतून उतरली....प्रशस्त अंगण आजूबाजूला झाडं आणि त्याचे छोटेसे पण टुमदार घर बघून खूप आनंदली....
 समोर काकू होत्याच त्या म्हणाल्या " या मुलांनो! प्रवास कसा झाला? काही त्रास नाही न झाला?"
सगळे आपापली ओळख करून देत होते आणि म्हणत होते..
 " नाही काकू,उलट आम्ही खूप एन्जॉय केलं" 
समीक्षा ने पण आपली ओळख करून दिली तसं त्या म्हणाल्या 
"तुझ्या आईने पुढाकार घेतला म्हणून तुम्ही आलात....
खरंच मला खूप छान वाटत आहे..... माझा मुलगा तिथे एकटा नाही तुमच्या सारखी जिवाभावाची मित्र-मंडळी आहेत त्यामुळे मला काळजी नाही."

त्यांना सगळ्यांना हात पाय धुवायला बाहेरच वरांड्यातच गरम पाण्याची सोय केली होती, हात पाय धूवून सगळे बैठकीत गेले.

 आकाशच्या आईने एक रूम मुलांना आणि त्यांच्या बाजूची रूम मुलींना अशी तयारच ठेवली होती त्यामुळे सगळ्यांनी लगेच आपले सामान तिथे नेऊन ठेवले.....

त्या म्हणाल्या " हे बघा मुलांनो आता आज जेवायला उशीर झालाय त्यामुळे मी हलकसे जेवण ठेवलं आहे! 
मसाले भात, कढी, पापड, लोणचे आणि कोशिंबीर असा बेत आहे! आवडेल ना तुम्हाला?"

"अरे आवडेल काय धावेल!" राहुल एकदम जोरात म्हणाला तसा हशा पिकला तिथे....

लगेच स्मिता, समीक्षा आणि सीमा त्यांच्या मदतीला माजघरात गेल्या आणि पटापट पाने वाढली आणि बाकीच्यांना बोलावले....

 तिथला साधासा पण मनाला भावणारा थाट बघून सगळे खूप प्रेमाने काकूंकडे बघत होती ...
जेवण वाढल्यावर काकू म्हणाल्या..." अरे बघताय काय? चला ताव मारा.."

आग्रहाने त्यांनी काकूंना पण सोबतच बसवले, कोणाला काय हवे नको ते आपसात छान मॅनेज करणे सुरू होते.....
 राहुल एकदम म्हणाला " काकू बेत तर एकदम झकास झालाय बघा. आज जेवण तर नेहमीपेक्षा जास्तच जातंय आणि हो आमच्या या मैत्रिणी अशा कामाच्या आहेत हे आजच कळलंय!" 
तसे सगळे परत हसायला लागले आणि त्या तिघी लटकेच रागाने त्याच्याकडे बघत हसल्या....
"आम्ही घरात पण कामे करतो म्हणले..." स्मिता ने तेवढ्याच ठाम पणे सांगितले...
त्यावर खोटी खोटी चिडवा चिडवी झाली आणि जेवणे मजेत पार पडली...

रात्री थोड्या फार गप्पा झाल्या पण आकाश ने सगळ्यांना लवकर उठून तयार राहा काही सरप्राईज आहे म्हणत जबरदस्तीने झोपायला जायला सांगितले....
 तसंही प्रवासाने सगळे दमले असल्याने कोणी आढेवेढे घेतलें नाही आणि झोपायला गेले.

सकाळी 5 लाच समीक्षा ला जाग आली...ती सहजच रूम च्या बाहेर येऊन बघते तर आकाश आणि काकू काही बोलत होत्या....

"नीट झोप झाली का बेटा " तिला पाहून तिच्या  जवळ जात काकू  म्हणाल्या.

" हो काकू, इतकी शांत आणि गाढ झोप क्वचितच लागते आणि खूप प्रसन्न वाटत आहे उठल्यावर" ती म्हणाली.

" अगं, गावच वातावरण असेच असते बघ." 
 "बरं तू त्या दोघींना पण उठव मी या बाकीच्यांना उठवतो म्हणजे आपण लवकर निघू आणि हो अंघोळी वगैरे नका करू पण थोडे कपडे सोबत ठेवा."आकाश म्हणाला.

तशी ती गेली आणि थोड्या वेळात सगळे डोळे चोळत बाहेर आले.
" चला पटकन आवरा, आणि हो कपडे सोबत ठेवा जिथे आपण जात आहोत त्यासाठी.....
 
"अरे पण आपण चाललो आहे कुठे..?"

" नो प्रश्न... ओन्ली सरप्राईज.... आवरा तुम्ही , आई तोवर सगळ्यांना चहा देईलच." आकाश ने सांगितले.

सगळे पटापट ब्रश, पेस्ट घेऊन आले. तिथे बेसिन वगैरे नव्हतं त्यामुळे आकाश च्या पाठोपाठ मागील अंगणात सगळे जण आले.
पण तेथील दृश्य बघून हरखून गेले....

दिवस उजेडतानाचा तो धूसर मंद प्रकाश, त्यात वातावरणातील ती शुद्ध हवा,   मागील अंगणातील केळीची झाडं आणि तिथेच छोटा पाण्याचा  हौद  त्याजवळ चूल पेटलेली आणि तांब्याचा पाण्याचं गंगाळ गरम पाण्याने भरलेले आणि त्यात स्वच्छ तांब्या त्यांना पाणी घ्यायला..... 

सगळ्यांनाच ते खूप मोहून गेलं, तो खूप नवीन अनुभव होता पण आवडीने त्यांनी तो एन्जॉय करत पटकन आवरून घेतले. 
आत आले तसे काकूंनी लगेच त्यांना चहा दिला... तो चहा त्याची ती चव पण त्यांना फार छान आणि वेगळी वाटली. 

" नीट जा आणि छान एंजॉय करा,आणि हो खूप उशीर करू नका हां यायला" काकू म्हणाल्या.

ते सगळे आपली छोटी बॅग घेऊन ते पटापट गाडीत बसले तेव्हा बरोबर 6 वाजले होते...

 आकाश ने सूचना दिल्या त्याप्रमाणे ड्राइवर गाडी चालवत होता. साधारण 6.30 ला ते ऐका ठिकाणी थांबले, तसं आकाश म्हणाला " चला उतरा सगळे थोडे 10 मिनिटे चालत जायचे आहे...
 माझ्या मागोमाग या सगळे."  तो सरळ चालायला लागलो तसे सगळे त्याला फॉलो करत मागे निघाले....

एका छोट्या पायवाटेने ते पुढे गेले आणि काही मिनिटाने समोरचे  दृष्य बघून स्तंभित झाले....!

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all