विश्व स्वप्नांचे भाग 3

Samiksha was stunned and surprised by his brother's behavior and decided not to speak with him....

विश्व स्वप्नांचे :- भाग 3

समीक्षा  रडत रडत कॉलेज मधून बाहेर पडली होती. कोणीही तिला थांबवले नाही की रडू नको असेही म्हणले नव्हते. 
घरी पोचल्यावर ती धाडकन दार ढकलून आत शिरली, तिथे बरेच लोक बसले होते पण कुठेही ढुंकून न पाहता रडत रडत ती स्वतःच्या रूम मध्ये शिरली. धाडकन आवाज करून तिने दरवाजा लावून घेतला. 
तिची आई बाहेरून म्हणाली" समीक्षा काय झालंय? दार उघड! बघ तुझा आवडता पास्ता केलाय मी बघ आज"
तरी दार उघडले नाही, बराच वेळ प्रयत्न केला पण आतून काहीच रिस्पॉन्स आला नाही. 
शेवटी घाबरून आईने तिच्या दादाला फोन केला....
तिचा दादा काही कामानिमित्त बाहेर होता, "घाबरू नकोस मी येतो घरी" असे तो म्हणाला.
जवळपास अर्ध्या तासांने तो घरी आला, त्याने पण " समू दार उघड बघू! काय झालं ते सांग तर! जे हवे ते मी तुला देईन पण आधी दार उघड." बरेच वेळ हे असं सुरू होते पण तिचा आवाज सुद्धा बाहेर आला नाही. 
शेवटी तो सुद्धा घाबरला, त्याने त्याच्या सहकाऱ्यांना वर बोलावले आणि दोघा तिघांनी मिळून दरवाजा तोडायचा प्रयत्न केला. 
दरवाजा दणकट असल्याने 10 मिनिटे प्रयत्न केल्यावर त्यांना तो तोडण्यात यश मिळाले. 
धावत तिचा दादा तिच्या रूम मध्ये शिरला आणि समोरच दृश्य बघून थक्क झाला. त्या प्रशस्त बेडवर समीक्षा उताणी निपचित पडून होती..... 
तो अत्यंत घाबरला आणि तिचे डोकं मांडीवर घेतलं, ती काहीच हालचाल करत नव्हती आणि रडून रडून डोळे, चेहरा पूर्ण सुजला होता....आणि हाताची नाडी एकदम हळू झाली होती...
 त्याच्या सहकाऱ्याने लगेच त्यांच्या नेहमीच्या डॉक्टर ला कॉल केला आणि अर्जन्सी सांगितली....
पुढच्या काही वेळातच डॉक्टर आले आणि त्यांनी समीक्षा ला नीट तपासले..... तिला इंजेक्शन दिले आणि म्हणाले " घाबरायचं काही कारण नाहीय, अति ताणामुळे ती बेशुद्ध झालीय, मी तिला इंजेक्शन दिलंय ती स्वस्थ झोपेल काही तास.....
काळजी करू नका मी काही मेडिसिन लिहून देतोय ती तिला ह्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे द्या."
"थँक्स डॉक्टर! अरे डॉक्टर साहेबांना कोणीतरी सोडून या" असे दादा म्हणत तो तिच्या उशाशी बसला. 
हलकेच तिच्या डोक्यावर कुरवाळत, तिला थोपटत तो बराच वेळ तिथेच बसून राहिला.
त्या दरम्यान त्याच्या आईने त्याचा चहा नाश्ता तिथेच आणला पण त्याने फक्त चहा घेतला. 
" काय झालं असेल ग आई हिला? 
का ही अशी वागतेय आणि कशाचा हिला इतका त्रास झाला?" तो आईशी बोलत होता.
आपल्या धाकट्या बहिणीत याचा किती जीव आहे हे आईला माहीत होते त्यामुळे ती काहीच बोलली नाही. फक्त त्याच्या खांद्यावर थोपटून निघून गेली.
जवळपास 4 तासानंतर तिन्हीसांजेला ती थोडी हलली तसा तो सतर्क झाला.....
तिने थोडे किलकिले डोळे केले आणि वर पाहिले तर तिचा दादा तिला दिसला, तसे तिने तोंड फिरवून पुन्हां रडायला लागली....
तिचे रडणे पाहून तो भांबावला...
" समीक्षा काय झालंय तुला बाळा? कशाचा त्रास झाला तुला इतका?"
"तू का बोलत आहेस माझ्याशी? तू जा! मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी!" मुसमुसत ती म्हणाली.
दादाने आईला आवाज दिला...
आई आल्यावर तो म्हणाला, "आई तूच बघ ही असे का बोलत आहे?"
" अग समू,  तू सांगितले नाहीस तर कसं कळेल की काय झालंय ते?" आईने तिला कुशीत घेत विचारले.
तशी ती पुन्हा ओक्षाबोक्शी रडू लागली, आता मात्र तिच्या दादाचा पेशन्स संपला तोही रूम मध्ये फेऱ्या मारू लागला.
आईने परत तिला विचारले, "बाळा सांगतेस का?"
" आई हा दादा काय समजतो स्वतःला? याला काय करायचं असते माझ्या प्रत्येक गोष्टीत? 
याचे हे गुंड मवाली सोबती माझ्या कॉलेजमध्ये गेले होते आणि माझा एक नवीन मित्र आहे आकाश त्याला याच्या माणसांनी सगळ्या लोकांदेखत मारले.....
 का तर म्हणे तो माझ्या सोबत असतो!
 माझ्या पासून दूर राहा अशी त्याला ताकीद दिली आणि त्याला  मारलं ग!
 तो स्वतः ब्लॅक बेल्ट होल्डर आहे पण त्यांने एकालाही चुकूनही उलट मारले नाही, का तर त्याला असल्या मवाली लोकांच्या नादी लागायचे नाही....
त्याचे ध्येय आहे की त्याला डिफेन्स ला जाऊन आपल्या देशासाठी काही चांगले करायचे आहे.... काय चूक त्याची ह्यामध्ये? 
जसे इतर चांगले मित्र मैत्रिणी असतात तसे तो होऊ शकत नाही का?" ती चिडून संतापून बोलत होती आणि हे ऐकत तिची आई अवाक होऊन आपल्या मुलाकडे बघत होती....

हे सगळं ऐकून त्याची नजर चोरासारखी खाली वळली होती. 
एक चकार शब्द तो बोलू शकत नव्हता, तरी प्रयत्न करत तो म्हणाला " तो कायम तुझ्या मागेपुढे करत असतो! त्याचे लक्षण मला काही नीट वाटलं नाही!"
" ते तू ठरवणारा कोण? तो माझ्या नाही मी त्याच्या सोबत असते! लक्षण त्याचे चांगलेच आहे तुझेच विचार खराब आहेत. 
आमचं शिक्षण सुरू आहे, आम्हाला शिकून पुढे जायचं आहे तुझ्या मवाली सोबत्यांसारखं हुंदडायच नाही." ती ओरडत बोलली तसं मात्र तो खूप शरमला...
आपल्या लाडक्या बहिणीला आपण असे दुखवू शकत नाही असे त्याचे मन त्याला बजावून सांगत होत. 
"समू, मला माफ कर!"
"माफी माझी नाही तर तुला आकाश ची मागावी लागेल तीसुद्धा सगळ्यांसमोर तरच मीही तुला माफ करेन नाहीतर यापुढे बोलायला येऊ नकोस माझ्याशी!"
हे असे अपमानकारक वागणे त्याला मान्यच नव्हते कारण तो एक राजकारणी होता....पण बहिणीच्या या अटीपुढे आपले काही चालणार नाही हे त्याला माहित होते.
" ठीक आहे,  पुढल्या आठवड्यात तुझा वाढदिवस आपण नेहमीप्रमाणे साजरा करू.... त्यावेळी तू त्याला बोलावं आणि मी तुझ्या सगळ्या फ्रेंड्स समोर त्याची माफी मागेलं!
मग तर ठीक?"
" प्रॉमिस?"
"पक्का प्रॉमिस"
तेव्हा कुठे ती थोडी नॉर्मल आली. आईने पुढे केलेला चहा ती प्यायली आणि पुन्हा डोळे मिटून पडून राहिली. 
मानसिक ताणामुळे तिला परत डोळा लागला.स्वप्नात मात्र ती हसत प्रवेश करत होती..….

दुसऱ्या दिवशी ती उठून आवरून कॉलेजमध्ये जायला निघाली पण अजूनही ती कोणाशी बोलत नव्हती....
शांतपणे आपली बॅकपॅक उचलून ड्राइवर ला कार काढ असे  म्हणाली आणि निघून गेली.....
आता मात्र त्याची आई बाहेर आली आणि झाल्या प्रकाराबद्दल तिने मुलाला खूप झाडले. पुन्हा अशी चूक होता कामा नये असे बजावून सांगितले... जणू त्याला ती ताकीदच  मिळाली होती....

समीक्षा कॉलेजमध्ये पोचली तर तीच सगळा ग्रुप पार्किंग मध्ये बसून होता, आकाश कोणाशी तरी फोनवर बोलण्यात बिझी होता. बराच वेळ झाला तरी त्याचे बोलणे संपत नव्हते आणि  बोलण्यावरून तरी काहीतरी सिरीयस आहे हे तिला जाणवत होते.....

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all