विश्व स्वप्नांचे भाग 1

It is a story of a young boy who came to the city with newer hopes and new dreams in his mind

विश्व स्वप्नांचे:- भाग 1

आकाश चा कॉलेज चा आज पहिला दिवस होता. 
जिल्ह्याच्या शाळेच्या ठिकाणी आजवर त्याचे संपुर्ण 12वी पर्यंत चे शिक्षण झाले होते...
त्यात विशेष प्राविण्य मिळवून मेरिट बेसिस वर त्याने शहरातील एका मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवली होती. 
ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावी म्हणून लोक पैसे ओतायला तयार असायचे तिथे त्याला ते अगदी सहज मिळाले. 
खूप आनंदात तो या नवीन शहरात एका आठवड्यापूर्वी आला तर खरा...पण तिथले लोक त्यांचे राहणीमान आणि वागणे बोलणे पाहून जरा बुजला होता. 
आपल्याला कोणी हसेल का? आपल्याला त्यांच्यासारखं इंग्रजी बोलता येईल का? आपल्याला जमेल का सगळे इथे असे ना ना प्रश्न त्याला भेडसावत होते.
धडधडत्या मनाने त्याने कॉलेज च्या गेट मध्ये प्रवेश केला आणि भिरभिरत सगळीकडे बघत होता, तेवढ्यात दोन गाड्या सुसाट वेगाने त्याला अगदी खेटून आत शिरल्या आणि त्यावरील मुले अगदी मस्तीत खिदळत पुढे गेली.
 तो आणखी बावचळला आणि दबकत दबकत आपला वर्ग शोधत आत शिरला.
भली मोठी कॉलेज ची इमारत त्यात सायन्स, आर्टस्,आणि कॉमर्स अशी तिन्ही शाखा शिवाय पोस्ट ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट असे सगळेच वर्ग त्यामुळे स्टुडंट्स ची गर्दी तर विचारायलाच नको.....

कोणाला विचारावे की नको या विचारात असतानाच एक मुलांचे टोळकं तिथे आलं आणि " कोण रे तू?  काय नाव तुझं? " त्याला दरडावून विचारत होते.
" आकाश काळे नाव माझं! मी इथे ऍडमिशन घेतली आहे आणि आज माझा कॉलेज चा पहिला दिवस आहे." थोडं चाचरत पण स्पष्ट बोलला तो....
त्या मुलांनी त्याची खोडी काढायचा प्रयत्न केला पण तेवढ्यात एक दुसरा ग्रुप तिथून जात होता, त्यातील एका मुलीने " अरे तू इथे काय करतो आहेस कधीची शोधतेय मी तुला" अस म्हणत त्याला बोलुही न देता त्याच्या हाताला धरून स्वतःसोबत ये असं खुणावत चालू लागली. काय होतंय हे कळत नव्हतं पण तो यांच्या पाठोपाठ चालू लागला....
काहीसे पुढे गेल्यावत तो ग्रुप थांबला तशी ती मुलगी वळली आणि हसत म्हणाली " तुला विचित्र वाटले असेल ना माझं वागणे?"
"हो म्हणजे खरंतर पण नाही....!" जरा अडखळत तो म्हणाला.
"हाय मी समीक्षा! समीक्षा डोंगरे !
FY BSC ला आहे, आणि तू?"
"मी आकाश काळे, माझा आज या कॉलेज मधला पहिला दिवस आहे आणि नुकताच मी या शहरात आलोय. मला सगळं नवीन आहे."
" अरे ते तर मला कळलंच की तू नवीन आहेत या कॉलेजमध्ये. नाहीतर त्या टवाळ ग्रुप शी उत्तर देत थांबला नसतास. 
ती मुलं स्वतः अभ्यास करत नाही आणि कोणाला करू देत नाहीत. ओळखते ना मी त्यांना! मी याच कॉलेज मधून 11 वी आणि 12वी केलंय त्यामुळे मला माहित आहे आणि तू जसा भांबावला ते तुझ्या चेहऱ्यावरून कळत होते म्हणून मला तुला मदत करावीशी वाटली" हसत ती बोलली. 
तीचे हसणं लघवी वाटले आणि बोलणे एकदम छाप पडेल असे.
"थँक्स समीक्षा!" आकाश म्हणाला. 
" वेल कम, फ्रेंड्स?" तिने हात पुढे करत विचारले.
"येस फ्रेंड्स!" त्यानेही हसत उत्तर दिले...तसे इतर ही त्या ग्रुप मधील पुढे आले आणि त्याला हात मिळवत आपापली नावे सांगत होती......
 आता तो थोडा रिलॅक्स झाला सगळे सोबत वर्गात गेले. आज पहिला दिवस असल्याने फारसं काही झालं नाही थोड्या वेळाने सगळे बाहेर पडले तसा हा पण निघाला ते कुठे जात आहेत हे त्याला कळत नव्हते पण अंदाजे ते कॅन्टीन मध्ये जातील असे मानून तो सोबत निघाला.
" मग आकाश किती मार्क होते तुला 12वी मध्ये?" राहुल ने विचारले.
"98.80% " तो उत्तरला तसे सगळे अवाक होऊन त्याच्याकडे बघत होते.
"असं का बघताय?" न राहवून त्याने विचारलं.
"अरे मग तू इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हायचं सोडून BSC का करत आहेस?" स्मिता ने विचारले.
"मला ना फक्त चांगल्या मार्कने ग्रॅज्युएट व्हायचं आहे पण सोबत मला एक परीक्षेची तयारी करायची आहे त्यामुळे मी इथे आलोय." सहजपणे तो बोलला.
पण त्याच्या बोलण्याने सगळ्यांच्या त्याला जाणून घ्यायच्या ईच्छा बळावली. समीक्षा म्हणाली " म्हणजे नेमकी काय परीक्षा?"
" हे बघ मला ना सामान्य जीवन नाही जगायचे. 
मला आपल्या देशासाठी काही करायचे आहे ! 
त्यासाठी ची CDS ची तयारी मला करायची आहे, मग एक इंजिनिअर किंवा डॉक्टर होऊन मी काय करू? 
त्यापेक्षा ज्यांना व्हायचे त्यांनी ते करावे मला जे हवे ते मी करावे" हसत चहाचा घोट घेत तो म्हणाला तसे सगळे एकदम इंम्प्रेस झाले. याच स्वप्नं काहीतरी वेगळं पण हा ध्येयवेडा नक्कीच आहे हे समीक्षा ने पक्के जोखले.
त्या दिवशीपासून त्यांची खूप छान गट्टी जमली, पूर्ण ग्रुप ने त्याला आपल्यात सामावून घेतल्याने शहर, मोठं कॉलेज असा सगळं परकेपणा गेला आणि तो कॉन्फिडेंट होऊन वावरू लागला. 
कॉलेजमध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये तो भाग घेत असे आणि काहीतरी विशेष करून दाखवीत असे...... 

त्याच हे असं असणे समीक्षा ला खूप आवडू लागले होते, ती सतत त्याच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करीत असे. जिथे जायचं तिथे आकाश हवाच असं तीचे गणित झालं होतं पण हे कुठेतरी खटकत होते....समीक्षाच्या घरचे बॅकग्राऊंड फार वेगळं होत. 
तिचा भाऊ हा राजकारणात होता, त्यामुळे नाही म्हणले तरी
तिची कोणाजवळची ही अशी ओढ, किंवा सतत त्या सोबत वावरणे हे कुठेतरी लक्षात घेतले जात होते पण याची तिला कल्पना नव्हती.
आकाश ला पण समीक्षा आवडायला लागली होती पण त्याला त्याच ध्येय हे सगळ्यात महत्त्वाचं होत. 
अचानक एक दिवस तिच्या भावाची माणसे आकाश ला शोधत कॉलेजमध्ये आली " आकाश काळे  कोण आहे?" धमकावत त्यांनी विचारलं.
" मी आकाश!" म्हणत तो पुढें आला तस फाडकन त्याच्या मुस्काटात एकाने मारली.....
 काय झालं हे कळायच्या आत पुन्हा त्याला मार बसला आणि
 "समीक्षा ताई पासून लांब रहा नाहीतर महागात पडेल!" म्हणत ती लोक निघून पण गेली.
ग्रुप ची मुलं मुली पण अवाक होऊन बघत होती. काय झाले ? कोण होती ती लोक असे नां ना प्रश्न त्यालाच विचारली जात होती, पण त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं आणि आज समीक्षा पण नेमकी सुटीवर होती.
गाल चोळत, आपले कपडे झटकत आकाश उभा राहिला तसे स्मिता ने त्याला पाणी दिलं. 
ते थोडं पिऊन तो शांतपणे कट्ट्यावर बसला आणि कसलासा विचार करत होता.
अचानक कोण आलं, अस मला मारलं त्यात समीक्षाचे नाव घेतलं! नक्की काय आहे हे? 
समीक्षा कुठे आहे आज? फोन पण नाही केला आणि काही मेसेज पण नाही! कुठे असेल ती आणि तिचा काय संबंध या गुंड वाटणाऱ्या लोकांशी?
ना ना विचार त्याला भेडसावत होते आणि तो फक्त शांत बसून होता......

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all