Login

विन्डो सीट

लोकल म्हणजे मुंबईचा जीव की प्राण..! आणि खिडकीचा जागा म्हणजे प्रत्येक मुंबईकराच्या जिव्हाळ्याच?

#विन्डो सीट#
  
लाडके...

  खरंच तू माझी लाडकी आहेस म्हणून बोलले, लाडके...! जवळपास एक वर्षानंतर आपली पुनःभेट होणार म्हणून सकाळपासून मी खूप उत्साहात घरभर वावरत होते. आणि शेवटी तुझी आणि माझी भेट झालीच....
   
    कानावर ओझरते "गाडीचे पायदान आणि फलाटावरील अंतरावर लक्ष असू द्या" हे वाक्य कोणे एके काळचे कंटाळवाणे वाक्य ऐकून आज खूप आनंद झाला. किंचितही वेळ न दवडता मी पळत तुझ्याचपाशी आले.... तू माझी लाडकी... माझी विन्डो सीट... ह्या कोरोना महामारीने तुला आणि मला जवळपास वर्षभर दूर ठेवले. तू माझी आठवण काढली की नाही ठाऊक नाही, पण दररोज किमान चार तास ट्रेनने प्रवास करणारी मी आता जवळपास वर्षभर माझ्या ट्रेनला आणि लाडक्या विन्डो सीटला आठवून मनातल्या मनात हळहळत होते. प्रवासाचे नियम जरी शिथिल झाले तरी बाहेर जायला घरून बंदीच होती. पण आज परवानगी मिळालीच शेवटी! सारं काही अलबेलं वाटत होतं. ना गर्दी, ना तो नेहमीसारखा चिवचिवाट...! माणसे असुनी नसल्यासारखी. एक स्माईल देऊन समोरच्या माणसाला अनोळखी असूनही आपलंसं करणारी कला मुंबई लोकल ट्रेनमध्ये हमखास दिसून येते. पण कोरोना रूपी राक्षसामुळे प्रत्येक चेहरा मास्कमुळे झाकला गेला आणि हा आपलेपणा विरतोय की काय ह्याची धास्ती वाटत होती. इतक्यात बाजूच्या सीटवर बसलेल्या (सुरक्षित अंतर ठेवून) डोळ्यांकडे पाहिले. चेहरा कळला नाही पण डोळ्यांनी हसून माझ्या धास्तावलेल्या मनाला दिलासा दिला. तेव्हा मनात आलं कितीही संकट आले, किती सवयी बदलल्या तरी ही मुंबई लोकल ट्रेन काही तिचा स्वभाव बदलणार नाही.
   आणि तू पण मला नाही विसरलीस. तू, बाहेरची पळणारी झाडं आणि सळसळणारा वारा मला आनंद देत होतात नेहमीप्रमाणे..  कुणाला कळण्याच्या आतच ह्या मुंबईच्या लाईफ लाईनने मला माझ्या तात्पुरत्या डेस्टीनेशनला पोचवले... नेहमीप्रमाणे....!
~ऋचा निलिमा