Mar 04, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

परतून याल का?

Read Later
परतून याल का?

स्पर्धा-  गोष्ट छोटी डोंगराएवढी

विषय-  अविस्मरणीय  अनुभव 

कथा शीर्षक -  परतून याल का?


परतून याल का?

आज काल मी कधी कधी एकदम स्थितप्रज्ञ अवस्थेला पोहोचते आणि स्वतःबद्दल विचार करायला लागते तेव्हा मी मला नव्याने कळायला लागते. जेव्हा मी तटस्थ किंवा त्रयस्थासारखं माझ्याच गत आयुष्यकडे वळून बघते तेव्हा ते एखाद्या वाहत्या नदीप्रमाणे किंवा उंचावरून कोसळणार्‍या धबधब्याप्रमाणे जाणवतं. . . म्हणजे तो जितका वरून पडतो किंवा जेवढा जास्ट ठेचकाळतो तेवढा जास्त सुंदर दिसतो.

असंच काहिसं संघर्षमय आयुष्य वाट्याला आलेलं, तक्रार तशी नाहीच जीवनाकडून कारण नियती माझं काय करू पाहतेय हे तिलाच माहित हा विचार करण्याइतकी मी तटस्थ झालेय.

अविस्मरणीय घटना व प्रसंगांची मोठी यादी आहे जी लिहिली तर शेकडो कथा होतील पण त्यातही आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग या गोष्टीचा विचार केला तर दोन अनुभव मनात चमकतायत त्यातला पहिला तो जो ३२ वर्षे मनात रूतून बसलेला होता . तो अनुभव म्हणजे माझ्या पप्पांचं अकाली जाणं .

मी खरंच अभ्यासात हुशार होते हे मला आता जाणवतं, १९८८ मधे वयाच्या साडेचौदा वर्षाला मी दहावी ८३% मिळवून उत्तीर्ण झाले, तालुक्यात पहिली , जिल्ह्यात तिसरी! घरात अभ्यासाचं वातावरणं किंवा शिक्षणाची विशेष प्रेरणा नसताना मिळालेलं यश अद्भुत होतं.
पप्पांना कळालं , पोरगी हुशार आहे, मेडिकल ला जाऊ इच्छिते मग हिला खूप शिकवायचं.
कारण मोठ्या बहिणीचं नववी पास झाली की पंधराव्या वर्षीच लग्न करून दिलं होतं

तालुक्यात सायन्सचं कॉलेज नव्हतं . जिल्ह्याच्या ठिकाणी अॅडमिशन दिलं , खोली करून स्वतः राहायला आले सोबत. . . पण अकरावीची परीक्षा झाली आणि टायफाईड सारख्या क्षुल्लक आजाराने वयाच्या ४५ व्या वर्षी पप्पा गेले.

सलाईन चढवण्यासाठी गेलेल्या पप्पांची डेड बॉडी घरी आलेली पाहणं. . . यासारखं दुर्दैव नसावं . क्षणात स्वप्न भंगली. सगळं आयुष्यच थांबलं जणु! जास्त लिहू इच्छित नाही, कारण या एका घटनेने माझ्या आयुष्याची दशा व दिशाच बदलली. आई ३५ वर्षाची व भाऊ १४ वर्षांचा मी सोळा .

पुढे बारावी काढली, बी एस्सी केलं पण सांस्कृतिक कार्यक्रमात कॉलेज गाजवलं. कारण पप्पांच्या जाण्याने आयुष्याची अशाश्वती मनात बिंबली होती. जणु आजचा दिवस शेवटचा असं समजून भरभरून जगत राहिले,सगळ्यात भाग घेत राहिले, लिखाणात ३ वर्षे खूप नाव झालं. एम ए. इंग्लिश केलं व करतानाच लग्न ठरलं .
वयाच्या साडे २० व्या वर्षी तर लग्न झालं. आवडलेल्या व्यक्तिशी लग्न झालं या मनस्वी आनंदात होते.

१९९४, लग्नानंतर थोडं लिहायचा प्रयत्न केला पण हैदराबादेत राहून त्यावेळी इथे औरंगाबाद, जालना ,मुंबई , पुणे संपर्क अवघड वाटायला लागला. आपोआप लिखाण बंद!

एका पप्पांच्या जाण्याने डॉक्टर न झालेली मी सासर्‍यांच्या आग्रहाखातर व इच्छेखातर शिक्षिका झाले , मग हिन्दी शिक्षिका!

मी खूप चांगली हिन्दी बोलते व दाक्षिणात्य राज्यात त्याला मान आहे हे हेरून बाबांनी मला हिन्दी विद्वान, हिन्दी पंडित हे कोर्स बाहेरून करायला लावले. ३ वर्षाचा मुलगा असताना पंडित ट्रेनिंग (हिन्दी भाषा शिक्षणात बीएड) रेग्युलर कॉलेज केलं एक वर्ष!

यात कितीतरी अविस्मरणीय प्रसंग येत गेले, सामना करत ,संघर्ष करत मोठ्या शहरात जगत राहिलो. पण जगण्याचा आनंद कमी होवू दिला नाही. १९९६ - २०२१ पर्यंत शिक्षण क्षेत्रात २५ वर्षे पूर्ण झाली. व लग्नाला २७ वर्षे पूर्ण झाली. दोन सुंदर व हुशार मुलं , प्रेमळ सासू सासरे या सर्वात डॉक्टर न झाल्याची सल थोडी बोथट झाली होती. आर्थिक संकट आल्यावर वाटायचं कधी काही क्षणी पण शिक्षिका आहे व विद्यार्थीप्रिय शिक्षिका आहे याचाही आनंद मनात बाळगून होते.

दरम्यान २०१८ मधे प्रतिलिपि नावाचं अॅप सापडलं होतं व स्वप्रकाशित साहित्याला छान दाद मिळत होती. २४ वर्षांनंतर मी पुन्हा लिहायला लागले होते , आहे त्यात खूप आनंदाने जगत होते पण. . . .

. . . पण सरळ संथ राहिल तो धबधबा नसतोच. . . . त्याला तर पडायचं असतं , कोसळायचं असतं उंचावरून ! तसंच अायुष्य.

२०२१ मधे २७ वा लग्नाचा वाढदिवस साजरा झाला आणि १० दिवसांनंतर घरातले सर्वच सहा जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले.

काहीतरी अघटित घडत होतं, सुट्ट्यांसाठी औरंगाबाद हून हैदराबादला आमच्या घरात राहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेलो आम्ही नियतीच्या फेर्‍यात आलो आणि तो जो प्रवास आहे मृत्यूच्या तांडवाचा . . तो याक्षणी शब्दबद्ध करणं अशक्य आहे कारण ते शब्दमर्यादेत बसणारं नाही. . . त्याचा एक ग्रंथ होईल.

३५ दिवस , पाच आठवड्यात कुटुंबातली तीन माणसं गमावणं यासारकजा शाप नाही. ते देखील इतक्या हतबल अवस्थेत जेव्हा कुणीच मदतीला येवू शकत नव्हतं .( १८ मे ते २२ जून )

१४ मे ला सगळेजण पॉझिटीव्ह , १५ में ला रात्री बाबांना अॅडमिट करवलं आणि १८ में दुपारी बाबा( सासरे ) गेले. माझं पितृछत्र पुन्हा हरवलं.
२४ मे ला सासूबाईंना अॅडमिट केलं , २६ मे ला संतोषना(माझे पती)!

आई व संतोष वेगळ्या दवाखान्यात , दोन्ही पोरं पॉझिटिव्ह ,छोटा घरी व मी पॉझिटीव्ह व मोठा मुलगा फिरतोय. . दवाखाने- दवाखाने!

जे जे शक्य होतं ते सर्व केलं , आपली मानबसं जगावी अन घरी परतावी म्हणून पण अपयशच हाती लागलं. २६ तारखेपासून पुढचे २२ दिवस जे काढले व संघर्ष केला त्याला \"नरकयातना \" एवढा एकच शब्द सुचतोय सध्या.

ते बावीस दिवस, बावीस अध्यायांचं पुस्तक होईल.

१ जून २०२१ . . आयुष्यातला काळा दिवस! संतोषनी कायमचा निरोप घेतला! कसली कुर्‍हाड माझ्यावर पडली होती शब्दात व्यक्त होणं अशक्य आहे.

तो दिवस सिनेमासारखा डोक्यात फिक्स झालाय.

२६ मे पासून मी रोज गांधी मेडिकल कॉलेज व सिविल हॉस्पिटल ला जायचे तिथल्या एमरजन्सी कोविड वार्डमधे , संतोष सोबत थांबण्यासाठी खी त्यांना मला पाहून तरी जगण्याची उमेद मिळावी कारण स्कॅनिंगचा स्कोर २३ आला होता.

दुपारी सासूबाईंकडे रेल्वे दवाखान्यात २-३ तास बसून यायचे. त्यांना कल्पनाही दिली नव्हती की संतोषला ऍडमिट केलंय अशी.
मी स्वतः पॉझिटिव्ह असताना ,उभी राहण्याची शक्ती नसताना १३ किमी व १७ किमी दवाखाने फिरणं हे अशक्यप्राय होतं पण करत होते,शिवाय लॉकडाऊन होतं. दोघांकडे केअर टेकर ठेवले होते मोठी रक्कम देवून पण जावं लागायचंच!

संतोष फक्त हातात हात घेवून पडून रहायचे. बोलणं शक्यच नव्हतं , चेहर्‍यांकडे पाहत रहायचे.

१ जून ला सकाळी मला खूपच थकवा होता,  जेवणाची बोंब  होती, त्राणच नव्हतं . . . केअर टेकरला सकाळी ७ लाच विचारलं तर त्याने सांगितलं की सॅच्युरेशन वाढलंय,चिंता करू नका. कारण गेली चार दिवस ऑक्सिजन ड्रॉप होत होतं.

मी थोडा उशीराने येते असं सांगितलं. साडे नऊला मी निघेपर्यंत केअर टेकरचा फोन ,"मॅडम साब आपको बहुत याद कर रे जल्दी आऔ!"

"भाई उनको इडली खिलादो मैं आती हूँ।"

पुन्हा त्याचा फोन, " साब आपको जल्दी आओ बोल रे, आप के हाथ से ही खाते बोल रे!"
जिवात जीव नाही. असणं अवसान आणून ओला ऑटो बुक केला, दोन मास्क दोन ग्लोव्हज व रस्त्त्याने नारळपाणी बाटलीत भरून घेतलं , व जातेय. ते ४० मिनिट काहिो कटत नव्हते.

दर १० मिनिटाला त्याचा फोन " मॅडम आप किदर है, साबका तबीयत सिरीयस हो गया , जल्दी आऔ!"
अॉटोत थकव्याने अंधारी येत होती त्यात असं म्हटल्यावर तर. . . . पायाखालची जमीनच सरकली.
तिथे पोहोचले, त्यांना सांगितलं की मी आलेय स्वाती. . . स्वाती! ६० लिटर ऑक्सिजन चालू असतानाही मला पाहून चेहर्‍यांवरचा ग्लो व आनंद!

इडली नको म्हणाले म्हणून त्याना बाळासारखं एका हातावर घेवून थोडंसं नारळाचं पाणी पाजलं.
श्वास खूप मोठ्याने चालू होते. फक्त माझ्याकडे पहात होते.
दुसरा घोट तोंडात घातला आणि ठसका लागला. छाती चोळेपर्यंत ते माझ्याच हातात निपचित झाले.

मी जिवाच्या आकांताने ओरडले "डॉक्टर ऽ"
सॅच्युरेशन ९७ दाखवत होतं पण हात पाय काळे निळे पडले होते. अवयवांना ऑक्सिजन पुरवठा होत नव्हता म्हणून वेंटीलेटर लावायचं ठरवलं. मला सही मागितली. पुढची व्यथा मी याक्षणी लिहू शकत नाही. रात्री ११.३० ला ते कायमचे गेले.
मी व २ मुले घरात. . . शेकडो नातेवाईक ,पाहुणे व मित्रमैत्रिणी पण त्या क्षणी त्या रात्री रडण्यासाठी एक खांदा नसावा हे कसलं दुर्दैव !

२ जून ते २२ जून सासूबाईंना रोज भेटूनही त्यांचा मुलगा गेलाय हे न सांगण्याचं दिव्य!

सहा जण गेलो व ३ महिन्यांनी तिघे परतलो हे दुर्दैव !

पप्पाचं जाणं ३२ वर्ष सल देत राहिलं ,आता माझ्या लेकरांचे पप्पा गेलेत ही सल मरेपर्यंत !

वाटतं विचारावं, परतून याल का ?

सगळं जग एकीकडे व सहचर,साथीदार एकीकडे पण मी जगतेच आहे.

नियतीच्या फटक्यातूनही स्वतःला फुलवण्याचा प्रयत्न करते आहे, काय करणार?

जगते आहे कारण मी जिवंत आहे!


©® स्वाती बालूरकर देशपांडे, सखी

दिनांक - २५ सप्टेंबर \"२०२२

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Swati Balurkar, Sakhi

Hindi teacher in CBSE school

I swati Balurkar, working as Hindi teacher in CBSE school in Aurangabad at present. Having 25 years of experience in teaching. worked 23 years in Hyderabad . 1990-1994 I wrote many stories n poems and got published. After break started writing in July 2018 again. I am published writer on PRATILIPI MARATHI and STORYMORROR.

//