Aug 09, 2022
General

बायकोचे आईवडील

Read Later
बायकोचे आईवडील

#बायकोचे_आईवडील

तात्या सेवानिवृत्त झाले. आता रोजसारखं सकाळी उठून ट्रेन पकडण्यासाठी धावायला नको म्हणून त्यांचा जीव सुखावला. लेकाचं लग्न झालं होतं. तो शहरात वास्तव्यास होता.

तात्यांनी जॉगिंग सुट,शूज असं सगळं सामान खरेदी केलं व पहाटे उठून जॉगिंगला जाऊ लागले. पहिल्याच दिवशी बाजूच्या बिल्डींगमधे बसलेल्या कुत्र्याने त्यांच्या पेहरावावरुन त्यांच्यावर डाउट घेतला व जोरजोरात भुंकत त्यांच्या पाठीच लागला. तात्या जाम घाबरले. तसे लहानपणापासून कुत्र्यांची थोडी भीतीच होती त्यांच्या मनात. सगळा जीव गोळा करुन ते वेगाने धावत सुटले. तरीही त्या कुत्र्याने त्यांना गाठलंच व जबड्यातले सगळे दात दाखवत त्यांच्यावर भुंकू लागला. तात्यांच्या पँटीच्या खिशातून लाल पिशवी लोंबत होती जी तात्यांची सहचारिणी इंदुमती हिने त्यांना जाताहेत तर बागेतल्या जास्वंदीच्या,अनंताच्या फांद्यांवरील चार फुलं आणण्यासाठी दिली होती. तात्यांचं नशीब बलवत्तर म्हणून त्या बिल्डींगचा वॉचमन,हिरालाल जो समोरच्या चहाच्या टपरीवर चहाचे घोट घेत घसा शेकवत बसला होता तो तात्यांची दयनीय स्थिती पाहून धावत आला . त्याने त्या कुत्र्याला हाकललं. तात्या घामाने डगडगले होते. पहिल्या दिवशीचं जॉगिंग त्यांच्या जीवावर बेतणार होतं.

"हिरालाल आज तुने बचाया मुझे नहीं तो ये कुत्ता मेरा पिछवाडा जरुर काट डालता।"

"अरे नहीं शाब,वो आपके थैली का रंग लाल है नं उसी के कारन वो बौखला गया नहीं तो सीधासाधा है बेचारा।"

हिरालालचे आभार मानत तात्यांनी ती पिशवी खिशात कोंबली व वडाच्या पारावर जाऊन बसले. कपाळावर आलेला घाम रुमालाने टिपला. इतक्यात काही ज्येष्ठ मंडळी तिथे बसायला आली. कुलकर्णी, राजे, ठाणेकर, भोसले, आगलावे असा पाच जणांचा चमू होता तो.

कुलकर्णी- नमस्कार पाचपांडे,आजपासून दीर्घ रजा तर तुमची. आमच्या ग्रुपमधे सहर्ष स्वागत तुमचं.

ठाणेकर- अहो तात्या, तुमच्यासारख्यांचा सहवास लाभणं हे भाग्यच आमचं.

भोसले- आता हात वर करा आणि आमच्यासारखे गडगडाटी हसा बघू.

तात्यांनी पाठीमागे,आजुबाजूस कुत्रं बसलय का याचा अदमास घेतला व इतर सोबत्यांबरोबर जोरजोरात हसू लागले. हाहाहाहा हाहाहाहा हाहाहाहा हाहाहाहा सगळ्या परिसरात हास्याचा ध्वनी पसरला. तात्यांना खरंच बरं वाटलं. हसूनहसून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

आगलावेंनी बाजूच्या पारिजातकाची फांदी जरा हलवली त्याबरोबर अक्षता पडाव्यात तशी पारिजातकाची फुलं आगलाव्यांच्या अंगाखांद्यावर बरसली. प्रत्येकाने थैलीत फुलं गोळा केली.

तात्यांनी पिशवी परत खिशात कोंबली. आज ठाणेकरांनी  थर्मास आणला होता सोबत. सगळ्यांनी चहा घेतला. प्रत्येकजण आळीपाळीने चहा करुन आणायचे. फिरती ढाल फिरावी तसा थर्मासही एकाकडून दुसऱ्याकडे चहाच्या पाळीनुसार फिरायचा. दुसऱ्या दिवशी येण्याचं प्रॉमिस देऊन तात्या घरी आले. अंघोळी करुन देवपूजा केली.  पारिजातकाची प्रसन्न फुलं देवाचरणी वाहिली. इंदुने त्यांच्या आवडीचा शिरा करुन ठेवला होता. देवाला प्रसाद दाखवून तात्या शिरा खायला बसले. लहान मुलं शाळेत चालली होती. त्यांच्या आयांच्या पाठींना ही भलीमोठी दप्तरं लोंबकळत होती.

तात्यांना आपल्या लेकाची आदिनाथची आठवण झाली. लहान असताना असाच तर जायचा शाळेत. शाळेचा कधी कंटाळा नाही केला पठ्ठ्याने. शाळा खूप आवडायची त्याला. आदिचा विचार डोक्यात असतानाच फोन वाजला.
"हेलो तात्या,आदि बोलतोय. बरे अहात ना. आज तुमचा सुट्टीचा पहिला दिवस. मला तुमच्या सेवानिव्रुत्तीच्या कार्यक्रमाला येता आलं नाही. एक मोठं प्रोजेक्ट सोपवलंय बॉसने माझ्यावर त्यामुळे सुट्टी घेता नाही आली."

"हो रे,कळतं मला तू तुझ्या व्यापात आहेस ते. मी व तुझी आई ठणठणीत आहोत अगदी. आमची काळजी करु नकोस. वेळ मिळाला की ये भेटायला."

"तात्या, तुम्ही दोघं या ना इकडे. जरा हवापालटही होईल तुमची."

"थांब हा. ही आली,हिच्याशी बोल."

"हं आदि,बराएस ना रे बाळा. आर्या कशी आहे?"

"आम्ही दोघंही अगदी मजेत आहोत आई. तुम्ही दोघं या आमच्याकडे रहायला आता."

"बरं बाळा, बघतो."

इंदुने फोन ठेवून दिला नि तात्यांचा होकार ग्रुहित धरून लेकासाठी,सुनेसाठी काय काय घेऊन जायचं याचा विचार करु लागली. तात्या चारेक दिवसानंतरची तिकीट काढून आले. पुढचे चारी दिवस मात्र मित्रांसोबत प्रभातफेरीला जात होते,हसत होते. ठाणेकराला एकच मुलगी. तिचं लग्न व्हायचं होतं. तो वरसंशोधनात मग्न होता. दळव्याला दोन मुलगे. दोघांनीही वाटणी करा असा धोशा लावला होता. या वाटणीत दळव्याला स्वतःकडे ठेवण्यास एकही लेक तयार नव्हता. बायको लवकर गेल्याने दळवी खरोखरच अगतिक जीवन जगत होते. कुलकर्ण्यांना एक मुलगा व एक मुलगी होती. कुलकर्णी मुलाच्याच घरात रहात होते. मुलीकडे चारेक दिवस जाऊन यायचे पण मुलाच्या घरात त्यांना लाचार वाटत होतं. तसं कोण वाईट बोलत नव्हती पण तोंड भरुन गप्पाही कधी मारत नव्हती. कुलकर्णी व त्यांच्या बायकोचं अस्तित्व हे भाडोत्र्यासारखं झालं होतं. आगलाव्यांना मुलंच नव्हतं. ते स्वतःला सुखी समजत होते. एकेकाची कहाणी ऐकून तात्यांच्या काळजात धस्स झालं. भविष्यकाळात आपल्याही वाट्याला हे असं लाचार म्हातारपण येणार कि काय अशी शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकू लागली.

इकडे इंदू मात्र लेकासाठी त्याच्या आवडीचे मुगाचे लाडू,सुनेसाठी कराची हलवा बनवण्यात व्यस्त होती.

"अगं कशाला हे नको ते व्याप करत बसतेस! आणलं असतं ना बाहेरुन. आजकाल सगळं विकत मिळतं."

"विकत मिळतं हो पण त्याला आपल्या हाताची,मायेची चव नसते आणि आपल्या मुलांसाठी काही बनवण्यात कसला आलाय शीण!"

एकदाचे तात्या व इंदू मुलाच्या ब्लॉकवर पोहोचले. तसे ते एकदोनदा गेले होते तिथे पण एखाद दिवसासाठी. असं रहायला वगैरे पहिल्यांदाच गेले होते. सुनेने सासूसासऱ्यांचं स्वागत केलं. त्यांच्या बेगा न्हेऊन बेडरुममधे ठेवल्या.

आर्या व आदिनाथचा प्रेमविवाह होता. खरंतर तात्यांना किती उत्साह होता सून शोधण्याचा. सेवानिव्रुत्तीनंतर आदिच्या लग्नाचा विचार करणार होते ते पण आदिने स्वत:च मुलगी पटवली व जरा लवकरच लग्नबेडीत अडकला. तात्यांचा सुनेशी तसा फारसा संबंध आलाच नव्हता पण ते आल्यापासून बघत होते. आर्याच्या देहबोलीत कुठेही सासूसासरे आल्याचा ताण,वैताग नव्हता. ती अगदी सहज वावरत होती. इंदुलाही तिने थोडीशी कामं दिली होती. कामं करताकरता दोघींच्या गप्पा चालल्या होत्या. जेवताना तात्यांना जाणवलं की सुनेच्या हातालाही तिच्या सासूच्या हातासारखी विशेष चव आहे. दुसऱ्या दिवशी आर्या त्यांना तिच्या माहेरी घेऊन गेली. अप्पा काणेंशी,तिच्या वडिलांशी बोलून बरं वाटलं तात्यांना. गप्पांना कांदाभजी व चहाची सोबत होती. तिथेच जेवण उरकून ती घरी आली. तसा आठवडा होत आला त्यांना आदिकडे येऊन. इंदुच्या व तात्यांच्याही लक्षात आलं,आदि व आर्या एकमेकांशी मोजकंच बोलतात,तेही अगदी ओढूनताणून,अगदीच आवश्यक असेल तरच.

तात्या चिंतीत झाले. तात्या विचार करु लागले, काय बरं असेल या दोघांच्या मनात? यांना बंगला हवाय का माझा. तो मागण्यासाठी हट्ट करत असेल का आर्या आदिकडे? बिचारा आदि. इकडे आड तिकडे विहीर. दळव्यांसारखी दोन मुलं नाहीत म्हणजे वाटणीचा प्रश्न नाही पण म्हणून आतापासून बंगला यांच्या नावावर करुन यांनी हाकलून दिलं तर म्हातारपणी जाणार कुठं?  आदि आर्या,एवढा प्रेमविवाह करुनही त्यांच्यातला संवाद विरत जावा,असं काय बरं घडलं असेल त्या दोघांत?

इंदूने सकाळीच संध्याकाळचाही स्वैंपाक करुन ठेवला. तिला आज आर्याशी नीट बोलायचं होत़. नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घ्यायचं होत. आदिच्या आवडीची ताकाची कढी,भात व आर्याच्या आवडीची मटकीची उसळ तिने बनवली. ऑफिसमधून आल्यावर सगळा स्वैंपाक तयार पाहून आर्याही निवांत झाली. तिला सासूचा खूपच आधार वाटला. आल्यापासून इंदूने आर्याला तिची स्पेस,तिचा वेळ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. जेवण झाल्यावर आदि हॉलमधे कुठलातरी शो बघत बसला.

आर्या ओटा आवरत होती. इंदुने तिला बाहेर बोलावलं. तिला वाटलं पाणी हवं असेल गोळ्या घ्यायला म्हणून ती पाणी घेऊन आली पण इंदुने तो ग्लास बाजूला ठेवत आर्याला समोर बसवलं. तिच्या केसांचा बँड सोडला व थोडं तेल हातावर घेऊन बोटांच्या अग्रांनी तिचं डोकं मालीश करु लागली.  आर्याला खरंच खूप खूप बरं वाटलं. असं मालीश तिची आई करायची पण पाचेक वर्षापासून आईला संधीवाताने जखडलं होतं. तिचीच कामं तिच्याच्याने होत नव्हती तर बाकी अपेक्षा काय करणार.

"आदि तुझ्या आर्याला मालीश आवडतय बरं. तुही करत जा तिला असंच. इंदु म्हणाली तसं आदि व आर्याने एकमेकांकडे पाहिलं व लगेच तोंड फिरवलं.

"आर्या,नेमकं काय झालंय तुमच्यात? आम्ही इथं आलेलं आवडलं नाहीए का तुम्हाला. त्याची शिक्षा देताय का परस्परांना," इंदुताई म्हणाल्या तशी आर्या त्यांच्या कुशीत शिरुन रडू लागली. इंदूने तिला मोकळं होऊ दिलं. आर्य उठून बेडरुममधे जाऊ लागला तसं तात्यांनी त्याला रोखलं,"आर्य,अरे लोकाची पोरगी घरात आणलीस ती अशी रडवायला. तिला काही दुखतंय का खुपतंय का हे बघणं तुझं कर्तव्य आहे." आर्य खाली मान घालून बसून राहिला.

आर्या म्हणाली,"आई, माझ्या आईची तब्येत बरी नसते म्हणून येताना मी तिथे अर्धाएक तास जाते. अप्पांना थोडीफार मदत करते. आईला मालीश करुन देते ते आवडत नाही याला. आता तर म्हणतोय दुसरीकडे घर घेउया म्हणजे तू सारखी आईकडे जाणार नाहीस. तुम्हीच सांगा आई हा जसा तुमचा एकुलता एक तशीच मीही माझ्या आईवडिलांची एकुलती एक लेक आहे. त्यांच्या उतारवयात मी त्यांना बघणं चूक आहे का? त्यांना असं वाऱ्यावर सोडून मला याच्यासोबत दुसऱ्या घरी जाऊन रहाता येणार नाही. याच विषयावरुन अबोला धरलाय याने माझ्याशी. हेच होतं का याचं माझ्यावरचं प्रेम! आई,मला याचे आईवडील म्हणजे तुम्ही दोघंही हवे अहात अर्थात तुम्ही इथेच रहायला आलात तर मला आधार मिळेल तुमचा पण मग यानेही माझ्या आईवडिलांवर थोडी तरी माया करावी. बरं,याला ते शक्य नाही तर मी त्यांना हवं नको ते बघते,त्यांची काळजी घेते तेही याला बघवू नये! याच गोष्टीवरुन सतत धुसपूस आणि आता थेट अबोला. ऑफिसमधे तर याचं हे वागणं पाहून लोकांना आमचा घटस्फोट होतोय की काय असं वाटू लागलय."

तात्यांना आठवलं,तेही इंदुच्या आईवडिलांशी थोडे त्रयस्थासारखे वागले होते. आता ती दोघं हयात नव्हती पण मग मुलगा त्यांचाच कित्ता गिरवत होता. तात्यांना स्वतःची लाज वाटली आणि आर्यला कसं समजवायचं या विचारात ते पडले. इंदुने आर्यला म्हंटलं,"आर्य,याचसाठी प्रेमविवाह केलास का रे? लग्नाचा अर्थच कळला नाही का तुला? तुम्ही दोघांनी परस्परांची सोबत करायचीच आहे पण त्याचबरोबर तुझ्या तुझ्या सासूसासऱ्यांच्याप्रतिही काही जबाबदाऱ्या आहेत. आईवडिलांइतकच सासूसासऱ्यांच्या तब्येतीची वेळोवेळी विचारपूस करणं,त्यांना डॉक्टरकडे नेणंआणणं हीही तुझी कर्तव्यं आहेत. तू ती करत नाहीएस आणि ती आईवडिलांची काळजी घेतेय हेही तुला पटत नाही. आर्याने तुझ्याशी लग्न केलं याचा अर्थ दिवसातले चोवीस तास तिने तुझंच ऐकावं असं नाही होत. तीचं स्वत्व हिरावून घेऊ नकोस. तात्या मला स्वैंपाकात मदत करतात तशी तुही आर्याला स्वैंपाकात मदत कर. कबुल आहे की इतके दिवस मेसचं जेवल्याने तुझा स्वैंपाकघराशी संबंध नाही आला पण आता तुमचं स्वतःचं घर आहे ना. एकमेकांना चवीढवीचं करुन घाला. एकमेकांचे लाड करा. एकमेकांच्या आईवडिलांचा आदर करा व मुख्य म्हणजे एकमेकांना मोकळीक द्या. हे नव्यानवलाईचे दिवस भुर्रकन उडून जातात. यांचा यथेच्छ उपभोग घ्या बाळांनो."

आदिला आईचं म्हणणं पटलं. तो आर्याला सॉरी म्हणाला.  इंदुच्या बोलण्याचा लेकावर झालेला सकारात्मक परिणाम पाहून तात्या सुखावले. आदि व आर्या झोपायला गेले तसे तात्या म्हणाले,"मीही असाच रुक्ष वागायचो तुझ्या आईवडिलांशी. ते घरी आले की पेपरात डोकं घालून बसायचो,वगैरे पण मग हेच तू मला तेव्हा का नाही समजावलंस? आता कळून काही उपयोग नाही. मला माझी चूक सुधारता येणार नाही."

इंदू म्हणाली,"एवढं तुमच्यासमोर बोलायचं धाडस तेव्हा नव्हतं माझ्याकडे पण आता तुम्ही केलात तेच मुलगा करतोय म्हंटल्यावर वाटलं,कुठेतरी हे थांबवायला हवं. एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे चुकीचा संदेश जाता कामा नये."

तात्या आकाशात बघत राहिले. कदाचित तिथे गेलेल्या सासूसासऱ्यांना शोधत होते,त्यांची माफी मागण्यासाठी.

------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now