बायकोचा मित्र

Vijayshree meets her classmate Abhiman after a long span. Abhiman and his wife Urmila brings colours in viju's faded life.

#बायकोचा_मित्र

माझ्या जीवलग मैत्रिणीच्या,सानिकाच्या मुलीचं लग्न होतं. 

मी माझ्या अहोंना,प्रीतमना म्हंटलं,माझ्यासोबत शॉपिंग करायला चला. कसंच काय,डेबिट कार्ड माझ्या हातात देऊन हे चालते झाले. 

मी पुन्हा नाराज झाले. तेवढ्यात माझी लेक दुर्वा हिचा फोन आला. ती माझ्या आवाजावरून माझा मुड/मन:स्थिती ओळखते. तिने मला चिअर अप केलं. काय काय खरेदी करु,माझा लुक गॉजिअस दिसण्यासाठी काय केलं पाहिजे याचे सल्ले दिले. 

तसं मी प्रीतमसोबत बऱ्याचदा बिजनेस पार्टीजना जाते त्यामुळे स्वतःला कसं केरी करायचं इतकं ज्ञान मला आहे पण तरीही माझी कळी खुलावी म्हणून माझी गोजिरी,छकुली दूर होस्टेलमधून मला एकेक आयडिया सुचवत होती. आपली कोणतरी काळजी करतय हा अनुभवच किती सुखद असतो नं! 

ही आमची दुर्वा व्हायच्या आधीपासून प्रीतम हा असाच घुम्या. त्यावेळीही त्याने मला सूचना केलेली की मुलगा होवो वा मुलगी..एकच बास. 

अरे पण मला दुसरं मुल हवं की नको असा विचार करावसं का नाही वाटलं याला? निदान बायकोचं म्हणणं तरी ऐकून घ्यायचं. 

दुर्वाही प्रीतमसारखीच हुशार निघाली. आपला आपणच अभ्यास करायची. दोन्ही शिष्यवृत्ती मिळवल्या पठ्ठीने. दहावीतपण मेरीटहोल्डर. बापाची कॉलर टाईट. बारावीत मेडीकल कॉलेजला प्रवेश..

दुर्वा होस्टेलला गेल्यापासून घरात मी व आमचा गडी रामुच असायचो. हे निजण्यापुरते घरी यायचे. मीही वेळ जावा म्हणून काही छंद जोपासले पण ते तेवढ्यापुरतेच..अर्थार्जन वगैरे करावं असं वाटलं नाही त्यातून. 

मी एकटीच शॉपिंगला गेले.  मला ग्रे कलरची वर्क केलेली साडी घेतली,त्यावर मेचिंग ज्वेलरी घेतली,सानिकासाठीही त्यातलीच बेबीपिंक कलरची साडी घेतली,तिच्या मुलीकरता फुड प्रोसेसर घेतला गीफ्ट म्हणून. बाहेरच थोडं खाल्लं व घरी आले.

 संध्याकाळी प्रीतम आला तेव्हा त्याला शॉपिंग दाखवलं पण तो न्यूजमधेच बिझी होता. हा पक्ष नि तो पक्ष..हा चांगला तो वाईट..मला तर सगळे ठकास महाठक वाटतात. याचं बरंय,दिवसभर ऑफिसमध्ये फायलीत डोकं घालून बसतो नि आल्यावर हे राजकारणाचं नको ते टेंशन घेऊन बसतो आणि मग लागतात बीपीच्या गोळ्या मागे. शांतता कसली ती डोक्याला नाहीच. 

मी दुसऱ्या दिवशी छान तयार झाले. हा ग्रे रंग नं मला खूप आवडतो. माझ्या गोऱ्या रंगाला शोभून दिसतो. ऑक्सिडाईजचे लटकन मी कानात अडकवले. 

गळ्यात एक ऑक्सिडाईजची बारीक चेन,तिचं पेंडल छान होतं. आत मिरर होता. एका हातात कडं व दुसऱ्या हातात मेचिंग घड्याळ घातलं. ड्रायव्हरने गीफ्ट नेऊन गाडीत ठेवलं. मी ड्रायव्हरला सांगितल्यानुसार ब्राह्मणसभा हॉलच्या दिशेने गाडी निघाली. 

सानिकाच्या आमंत्रणाला मान देऊन, तिच्या लेकीच्या लग्नात आमच्या शाळेतले बरेच सवंगडी आले होते. सानिका तरी गेट टुगेदरला वगैरे जायची पण मी माझा नवरा,मुलगी यात इतकी गुंतले होते की सानिकालाच सहा महिन्यातून एकदा भेटायचे. 

खूप गप्पा मारल्या आम्ही. तितक्यात माझं लक्ष डार्क ब्लू शर्टवाल्या एका व्यक्तीकडे गेलं..तो केव्हापासून मोबाईलमधेच गुंतून होता. सानिकाला मी त्याच्याबद्दल विचारताच ती मला त्याच्यासमोर घेऊन गेली.

 "अगं,विजू,अभिमान हा. ओळखलं नाहीस याला!"

"अरे विजया हाय! किती दिवसांनी बघतोय तुला. किती चेंज झालाय तुझ्यात. पुर्वीची दोन वेण्यांवाली विजू कुठे आणि ही माझ्यासमोर उभी असलेली ग्रेसफुल लेडी कुठे!"

सानिका आम्हा दोघांना बोलत सोडून पुढच्या विधींसाठी निघून गेली. आम्ही ज्युस घेऊन तिथल्या कारंज्यापाशी बसलो.

"कशी आहेस?"अभी म्हणाला.

"मी मस्त"

"अजुनही तितकीच छान दिसतेस."

"वॉट डु यू मिन,अजुनही. बरं तुझं काय तुझ्याबद्दल सांग की. "

"छान चाललंय. एका मल्टीनेशनल कंपनीत कामाला आहे. गुणी बायको आहे,एक मुलगा आहे..जय..या वर्षी आठवीत आहे. आईवडील गावी रहातात."

"तू फेसबुकवर नाहीस का?"

"नाव बदललं ना. त्यामुळे ओळखलं नसशील. त्यावेळी विजयश्री होतं आता प्रीतमने प्रीती ठेवलं त्याच्या नावाला साजेसं..शिवाय मी माझे फोटोज फेसबुकवर अपलोड नाही करत. ती ग्रे कलरची बाहुली दिसते ना तेच ठेवलय प्रोफाइल पिक्चर."

"तेव्हाच. मी पण ना सानिकाला विचारायला हवं होतं तुझ्याबद्द्ल. लक्षातच नाही राहिलं बघ."

थोड्याच वेळात आम्ही इतर मित्रमैत्रिणींना जाऊन मिळालो. स्टेजवर जाऊन सानिकाच्या मुलीला,जावयाला  शुभेच्छा दिल्या,गीफ्ट दिलं व नंतर जेवून एकमेकांचा निरोप घेऊन घरी आलो.

 त्यादिवशी रात्री प्रीतमला यायला नेहमीसारखाच उशीर झाला. मी फेसबुक चाळत असताना मला अभिमानची फ्रेंड रिक्वेस्ट आली.मी ती एक्सेप्ट केली. त्याच्या पेजवर जाऊन त्याच्या मुलाचे व पत्नीचे फोटो पाहिले. त्याची बायको उर्मिला दिसायला फारच गोड होती. आणि हो दोघांचे विविध पेहरावांतले फोटो खूपच छान होते.

 एका फोटोत तर अभीने उर्मिलाला चक्क उचलून घेतलं होतं. काही फोटो बर्फाळ प्रदेशात एकमेकांवर स्नो बॉल फेकतानाचे,काही वाढदिवसाचे,काही पावसात भिजतानाचे,मंदिरातले,एकमेकांकडे बघत असलेले..फोटो पाहून वाटलं..असं लाईफ हवं यार. 

अभीचा मेसेज आला.
"हाय"

"हेलो"

"काय करतैस विजू?"

मी म्हंटलं,"तुझेच फोटो पहात होते. तुझी बायको खरंच क्युट दिसते."

"आहेच ती क्यूट. तुमच्या दोघांचा एकही फोटो नाही तुझ्या पेजवर."

"प्रीतमला नाही आवडत.. बाकी काही नाही."

"बरं तुला वेळ तरी देतो तो?"

"का रे असं का विचारतोयस?"

"अगं काल रात्री माझ्या बायकोशी बोलत होतो तुझ्याविषयी."

"काय सांगितल़स तिला?"

"हेच की तू किती नॉटी होतीस,वर्गात बेंचखाली बसून चिंचा खायचीस,मी फळ्यावर तुझं नाव लिहिलं की दादागिरी करुन पुसून टाकायचीस,माझ्या डब्यात आईने तुझ्या आवडीचं काही दिलं असेल तर डबा एक्सेंज करायचीस,बेंचवर पकडापकडी खेळायचीस,बाईंसमोर मात्र खाली मुंडी घालून आज्ञाधारकपणाचा आव आणायचीस."

"बरंच लक्षात आहे रे अभी तुझ्या आणि असं आपल्या बालमैत्रिणीचे किडे कुणी बायकोला सांगत का! यडं कुठचं."

"हो आहे मी वेडा..पण मला तू फार बदललेली,कोषात गेलेली वाटलीस. नक्की काय होतंय सांगशील प्लीज. ऑफ कोर्स,नो फोर्स,तुला वाटलं तरच सांग."

"अरे तसं सगळं सुरळीत चाललय बघ. गाडी,घर,पैसा सगळं काही आहे..प्रीतमही खूप चांगला आहे स्वभावाने पण ना तो फक्त नि फक्त त्याच्या कामातच मग्न असतो. घरी आला की न्यूज वगैरे. माझ्यासाठी वेळच नसतो त्याच्याकडे. तुम्ही दोघं कशी फिरायला जाता तसं मलाही वाटतं प्रीतमसोबत फिरावं पण तो सांगतो तुझं तू फिर. वाटल्यास सानिकाला सोबत घेऊन जा म्हणतो."

"मग विजू तू चिडत नाहीस का त्याच्यावर? माझ्या शर्टावर  शाईचे डाग पाडायचीस,मला वेडावून दाखवायचीस,खोखो खेळताना जोरात धपाटा घालायचीस पाठीत तसं काही करत नाहीस का त्याच्यासोबत?"

"ए गप हां अभी. आता मोठी झाले मी. लहानच समजतोस काय तू मला? मुलगी मेडीकलला गेली आता."

"तरी रुसतेस..बरं ते जाऊदे..मी आणि माझी डिअर बायको मिळून तुझ्या नवऱ्यासाठी एक प्लँन बनवतो. नाही तुझा नवरा आठदहा दिवसात तुझ्याबद्दल कॉशस झाला तर बघ!"

"तू फक्त आमचे स्टेप्स फॉलो कर. परवा तुझ्या बर्थडेला येतोय मी."

प्रीतम येऊन बराच वेळ झालेला. रामूने दार उघडून साहेबांना आत घेतलेलं. आज प्रथमच मी त्याला रिसिव्ह करायला गेले नव्हते. प्रीतम बेडरुममध्ये येऊन कपडे बदलत होता तरी माझं ध्यान नव्हतं. 

मी टेरेसमधे अभीसोबत फोनवर हसतखिदळत होते. प्रीतमने आज पहिल्यांदाच मला विचारलं,"कोणाशी एवढ्या गप्पा चाललेल्या..सानिकाच असणार म्हणा..दुसरं कोण!"

"नाही रे. माझा शाळुमित्र काल सानिकाच्या पार्टीत भेटला म्हणजे तसे बरेच फ्रेंड्स भेटले पण हा अगदी जवळचा,फास्टफ्रेंड म्हणतात तसा. अजुनही माझ्या हरएक सवयी लक्षात आहेत त्याच्या. आठवून आठवून हसत होतो आम्ही. After such a long gap ,I have met someone with whom I can share my feelings."

"हे असे फ्रेंड वगैरे काय नसतं गं. इथे असतो फक्त व्यवहार. तू एवढी rich आहेस म्हणून तुझ्याशी बोलावसं वाटलं असेल,झालं."

माझं प्रीतमच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. मी केव्हाच झोपी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता मला अभीचा फोन आला. मग दोघं असंच छानछान गप्पा करत बसलो. प्रीतम मॉर्निंग वॉकवरुन आला तरी माझ्या व अभीच्या गप्पा चालू होत्या.

आता मात्र प्रीतमला थोडं काळजीचं प्रकरण वाटू लागलं. सकाळी उठल्यापासून त्याच्या पाठीपाठी असणारी त्याची विजू कालपासून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती,त्याला निग्लेट करत होती. 

रामूने पुढ्यात आणून ठेवलेले पोहे प्रीतमने पेपर वाचत खाल्ले पण आज नेहमीसारखं त्याचं बातम्यांत मन रमलं नाही. मी,माझं हसणं आणि मोबाईल..माझ्या गालावरचा..त्याला नीट अक्षरं दिसेनात. टिव्हीवर बातम्या लावल्या पण नेहमीच्या राजकारणावरच्या बातम्यांत पण मन लागेना त्याचं. 

आज नेहमीसारखं रुमाल,चावी देण्यासाठी मी मागेमागे करत नव्हते. रामूच सगळं हातात देत होता. जाताना मात्र मी त्याला बाय केलं.

तिकडून अभीचा प्रश्न आला.

"गेला का हाफिसला तुझा हबी?"

"ए काय रे तुम्ही नवराबायको किती डांबरट अहात. हा रे कसला प्लॅन बनवलात. किती तुसड्यासारखं वागावं लागतय मला!"

तितक्यात अभीची बायको म्हणाली,"अहो ताई,तुम्ही तुमच्या नवऱ्याला रोजच अवेलेबल राहिलात..24 hours service सारखे तर ते तुमच्याकडे दुर्लक्षच करणार. थोडे दिवस कळ काढा."

मी अच्छा म्हणत फोन ठेवला नि कामाला लागले. 
दुसऱ्या दिवशी सकाळीही तेच ..माझं टेरेसमधे उभं राहून बोलणं,गालातल्या गालात मधाळ हसणं,केसांच्या बटांशी चाळा करणं..

प्रीतम मला म्हणाला,"हे फोनकॉल्स मी ऑफिसात गेल्यावर अटेंड कर ना."

"अरे सॉरी रे प्रीतम. मीही अभीला तेच सांगते पण तो ना ऐकतच नाही माझं. बरं कसले भारी जोक्स सांगतो!"

 प्रीतम आजही चरफडत ऑफिसला गेला. नेहमी सकाळची पोळीभाजी मी स्वतः बनवायची. आता मात्र त्याला रामूच्या हातचा डबा खावा लागत होता. 

दुपारी जेवलात का असं विचारणारा माझा फोनही बंद झाला. मिटींगमधे प्रीतमचं लक्षच लागेना. तो दुपारीच घरी आला. तीनेक वाजले होते. रामूने बँग घेतली.

टायची नॉट ढिली करत प्रीतमने मला हाक मारली. रामू म्हणाला,"साहेब,ताईंचे मित्र अभिमान आलेले. त्यांच्यासोबत त्या शॉपिंगला गेल्या. लय खूष होत्या. सिनेमापण बघणार म्हणल्या."

"बरं बरं"

प्रीतम आज खरंच वैतागला. मनातल्या मनात त्याने अभिमानला शिव्या घातला..च्यायला..बायको कोणाची नि फिरवतो कोण..बालमैत्रीण असली म्हणून काय झालं..हक्काची बायको असल्यासारखा सिनेमा बघायला नेतो. 

तो एक थिल्लर,हिला कळायला नको. आपलं.स्टेटस काय,वय काय नि आपण वागतो कसे..कसलाच पायपोस नाही..पोरगी कॉलेजात शिकते आता नि ही सिनेमा बघते म्हणे बालमित्रासोबत."

  रामू गपचूप हसत प्रीतमला जेवण वाढत होता. त्याच्या आवडीची गोळ्यांची आमटीही आज त्याला बेचव लागली. कारलं खाल्ल्यासारखं तोंड करुन हॉलमधे येरझारा घालू लागला. 

संध्याकाळी सहा वाजले तरी माझा पत्ता नव्हता. प्रीतमने मला फोन लावला पण तो नॉट रिचेबल येत होता. रात्री नऊ वाजता त्याला गाडीचा आवाज आला. अभी मला बाय करत होता. त्याची गाडी गेली आणि थोड्याच वेळात डोअरबेल वाजली. मी दारात गीफ्टस,एक डॉल व लालबुंद गुलाबांचा बुके घेऊन उभी होते. रामूने दार उघडलं. 

"कुठे होतीस इतका वेळ?" इति प्रीतम.

"मी रामूला सांगून गेले होते. जाम धम्माल केली आज. तू तर बोलूच नकोस. माझा बर्थडे तुझ्या कधीच लक्षात नसतो ना. आम्ही दोघच आज सेलिब्रेट करायचं ठरवलं म्हणजे खरं तर त्यातचं प्लँनिंग सगळं.

 पहिलं मॉलमधे गेलो. तिथे मला साजेसा सुंदर बोट नेकचा गाऊन घेतला त्याने.. त्यावर त्याच्याच चॉईसच्या एक्सेसरीज घेतल्या. मग आम्ही लंच केलं,सिनेमा बघितला..माझ्या आवडीच्या हिरोचा..त्यानंतर म्हंटलं घरी जाऊ तर नाही..संध्याकाळी सी बीचवर घेऊन गेला..बऱ्याच दिवसांनी मावळतीच्या सुर्याचे रंग, बुडणाऱ्या रवीला निरोप देणारा तो शांत गंभीर समुद्र पाहिला. फेसाळत्या दुधाळ लाटा अंगावर घेतल्या,आज खूप खूष आहे मी प्रीतम खूप खूष. 

येताना डिनर करुन आलो. माझ्या आवडीचा रेड वेलवेट केक घेतला. तिथेच कट करुन खाल्ला आम्ही. तुझ्यासाठी व रामूसाठी पेक करुन आणलाय आणि ही बाहुली बघतर,मला खूप वेड होतं बाहुलीचं..आज किती वर्षांनी बाहुली घेऊन दिली मला अभीने.. सेम अशीच बाहुली होती माझी..निळ्या डोळ्यांची..सोनेरी केसांची. अभी तिच्या आईकडून माझ्या बाहुलीसाठी फ्रॉक शिवून घ्यायचा."

"अगं पण विजू असं परपुरुषाबरोबर कुठेही फिरतेस?"

"परपुरुष कसला. माझा जीवलग मित्र आहे तो. त्याला किंमत आहे माझ्या मनातल्या भावनांची."

मी कपडे बदलायला आत गेले इतक्यात लेकीचा फोन आला.."काय बाबा,आज आईचा चाळीसावा बर्थडे. जंगी सेलिब्रेशन केलं असेल ना तुम्ही का विसरलात नेहमीसारखे?"

"गपे पोरी. उगा आगीत तेल घालू नकोस. ठार विसरलो मी तिचा बर्थडे."

"त्यात नवल ते काय! तुमच्या बिजनेस फ्रेंड्सचे बरे लक्षात ठेवता. बरं फेसबुक वापरलात तर त्यात रिमाइंडर तरी असतो."

"गधडे,तुला आठवण करुन द्यायला काय धाड भरलेली! आणि ती नाराज वगैरे नाही अजिबात..शॉपिंग करुन आल्यात बाईसाहेब. एक नवीन मित्र उगवलाय तिचा. त्याने म्हणे बोटनेकचा गाऊन दिला तिला,शिवाय,सिनेमा,सेलिब्रेशन अँड ऑल देट."

"बाबा, are you feeling jealous?"

"ए तू ओळखतेस त्याला?"

"हो आई बोलली माझ्याशी त्या अंकलबद्दल. मी तर नुकतीच फ्रेंड रिक्वेस्टही पाठवली त्यांना. तुम्हीही पाठवा. बाबा,ते अभी अंकल कसले हँडसम दिसतात..कोण बघेल ती प्रेमात पडेल अशी personality आहे त्यांची. रुबाबदार व्यक्तीमत्त्व. थांबा तुम्हाला फोटोज शेअर करते आणि आजच्या आईच्या व अभीअंकलच्या सेलिब्रेशनचेही फोटो पाठवते सोबत बट डोण्ट बी जेलस. थंड पाण्याची पिशवी घेऊन बसा सोबत, फोटो बघताना,केस गेलेल्या तुळतुळीत टकलावर ठेवायला. गुड नाईट."

"हिची तर ना"..असं म्हणेपर्यंत लेकीने प्रीतमला फोटोज शेअर केलेसुद्धा.

प्रीतम अभिमानच्या फोटोकडे बघतच राहिला. "आयला, हा तर चिकणा हिरो दिसतो..अगदी अक्षय कुमार. काय हाईटय. तेव्हाच विजूला आवडते याची कंपनी." प्रीतम स्वतःच्या डोक्यावरच्या चंद्रावर हात फिरवत विचार करु लागला.

पींक टॉप व थ्रीफोर्थमधे किती सुंदर दिसतेय विजू! अजुनही फिगर मेंटेंण्ड केलीय हिने नाहीतर माझं पोट तो स्वतःच्या पोटाच्या घेरावर हात फिरवू लागला.

लंचमधे माझ्या आवडीचा साऊथ इंडियन मेन्यू पाहून त्याला वाटलं,"किती दिवस झाले हॉटेलमधे जाऊन. कधी गेलोच तर मीच काय ते ऑर्डर करतो आणि हिला सगळे एटिकेट्स पाळत काट्याचमचाने खायला लावतो पण इथे तर ही हाताच्या पाची बोटांनी किती समरसून खातेय."

प्रीतमने पुढचे फोटोज पाहिले. हात पसरुन लाटांच्या दिशेने धावत जाणारी मी, पाण्यात बसलेली मी,किल्ला बनवण्यात मग्न असलेली मी, शंखशिंपले वेचणारी मी,वारा तोंडात भरत स्वैर धावत सुटलेली मी आणि माझं बालपण मला परत जगायला देणारा माझा बालमित्र अभी. 

प्रीतम बेडरुममध्ये आला. मी अभीने दिलेला मरुन कलरचा बोट नेकचा गाऊन व त्यावरचे एक्सेसरीज घालून बघत होते. आरशात स्वतःची छबी पाहून गोल गिरकी घेत होते. प्रीतमने मला जवळ घेतलं..अगदी जवळ. मी लाजले. तो म्हणाला,"विजू,रागावलीस, माझ्यावर!"

"नाही रे. बिल्कुल नाही."

त्याने माझ्या मानेजवळ त्याचे ओठ न्हेले. त्याच्या उष्ण श्वासांनी मी मोहरुन गेले. 

"विजू तुझ्या मित्राला माझं थँक्यू सांग. रादर माझी ओळख करुन दे त्याच्याशी. माझ्या बायकोचा मित्र..काय भारी माणूस आहे गं. खरं तर मला राग यायला हवा अभीचा पण मी आभारी आहे त्याचा. हाती कस्तुरी असताना मी उगाचच भटकत होतो. सुखाचे क्षण वेचायचे विसरुनच गेलो होतो. आजपासून नाही होणार असं.  Your husband will be at your service, mam." 

मी लाजून म्हंटलं,"चला काहीतरीच तुमचं."

प्रीतम म्हणाला,"चल झोपुया. उद्या पहाटे निघायचंय आपल्याला."

"कुठे?"

"सेकंड हनिमुनला."

मी लाजून माझं मुखकमल हातांच्या दोन्ही तळव्यांत लपवलं. 

-------सौ.गीता गजानन गरुड.