रुंदावलेल्या कक्षा आणि बदललेली परिभाषा

आजच्या पिढीतील आगळी वेगळी गुरुपोर्णिमा....


रुंदावलेल्या कक्षा आणि बदललेली परिभाषा....

" हे काय करतोय तू ? अरे लॅपटॉप , मोबाईल , त्यांचे कव्हर्स , ही फुलं , आरतीची तयारी.... काय हे ? तिकडे गुरुमाऊलींची पूजा करायची आहे , पादुकांना अभिषेक चाललाय आणि तुझं काय चाललंय इकडे ? चल तिकडे देवघरात...." आई अक्षजवर ओरडली . आज गुरुपोर्णिमा म्हणून त्यांच्याकडे तयारी जोरात सुरू होती पण अक्षज मात्र त्याच्या रूममध्ये काहीतरी खुडबुड करत होता .

" आई , दोन मिनिटं बस इथे. अगं मला सांग गुरू म्हणजे काय ? " वीस वर्षाच्या अक्षजने असा प्रश्न विचारावा ह्याचंच तिला आश्चर्य वाटत होतं.

त्याच्या कपाळाला हात लावून " बरा आहेस ना तू? असा का प्रश्न विचारतोय ? अरे गुरू म्हणजे आपल्याला योग्य माहिती देणारा , गुरू म्हणजे आपल्याला अडीअडचणीला मार्गदर्शन करणारा , गुरू म्हणजे पदोपदी वाट दाखवणारा , ज्याच्याशिवाय आपलं पान हलत नाही.... सुख दुःखात , ऊन पावसात , अगदी रोज आपल्या सोबत असणारा गुरू.... " आई म्हणाली .

" हं , बरोबर. मग ते काम तू आणि बाबा करतात माझ्यासाठी. सकाळीच तुम्हाला नमस्कार केला ना मी "

" हो रे बाळा पण ते आमचं कर्तव्य आहे आणि शिवाय कुणीतरी गुरू असतं आयुष्यात. आज त्या विशेष गुरूंची पूजा करायची, कृतज्ञता व्यक्त करायची...." आईने समजावलं.

" तेच तर करतोय....हा बघ लॅपटॉप आणि मोबाईल, त्यांचीच पूजा करतोय " अक्षज म्हणाला.

" ए , वेडा आहेस का तू ? ते कसे गुरू असतील तुझे ? " आई कोमात....

" का नाही ? हे बघ, ह्या लॅपटॉपवर माझा सगळा अभ्यास save आहे, मी कधीही कुठेही तो वाचू शकतो आणि कळलं नाही तर परत परत समजून घेऊ शकतो . मी ह्यात pdf, ppt करू शकतो , वेगवेगळी गणितं सोडवू शकतो , एवढंच नाही तर मला कंटाळा आला तर गेमही खेळू शकतो. आणि हा मोबाईल म्हणजे तर छोटा पॅकेट बडा धमाका ! ह्यात काय नाही करू शकत सांग ? हा मोबाईल मला communication स्किल शिकवतो , माहिती इकडून तिकडे पाठवतो , खूप माहिती save करून ठेऊ शकतो . ह्याला इंटरनेट जोडलं तर तर सोने पे सुहागा...." अक्षज बोलतांना खूप excited होता.

" हो , अरे....पण...." आईच्या काही पचनी पडत नव्हते

" बघ ह्यातला गुगल नावाचा गुरू सगळं काही सांगतो म्हणजे भारतातील नाही तर जगभरातील गोष्टी. कुठे कोणतं क्षेपणास्त्र लाँच झालं असो की कुठेही झालेला हल्ला असो , इतिहास असो की भूगोल , सगळं काही सांगतात हे गुगल सर..... आणि यु ट्यूब गुरुजी , विचारूच नको ! सगळं प्रॅक्टिकल करून दाखवतात मग कागदी होडी बनवायची असो की गाणं म्हणायचं असो की गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असो, यु ट्यूब गुरुजी चोवीस तास तयार असतात. तू पण नाही बघत का तुझ्या रेसिपीज ? होते की नाही तुला मदत ? " अक्षजने विचारलं .

" हो रे....आणि ते नाही का , गुगल मॅपने रस्ता पण कळतो. अरे पूर्वी किती अवघड जायचं नवीन ठिकाणी जायला, आता गुगल मॅपमुळे फार छान सोय झाली आहे. सगळी माहिती मिळते, अडचणीतून बाहेर यायला खरंच खूप वेळा गुगलची मदत होते. तरी ते गुरू कसे होणार? ती तर gadgets झाली " आई मुद्द्याला धरून होती .

" हं, आता बघ , हे तर मान्य केलंस ना की लॅपटॉप, मोबाईल आपल्याला मार्गदर्शन करतात , त्यांच्याशिवाय आपलं पान हलत नाही, ते आपल्या जीवनाला आकार देतात , संकटातून वाचवतात..... मग आता सांग , जेव्हा गुरू समोर नसतात तेव्हा तू काय करतेस? फक्त त्यांचं स्मरण करून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहतेस, तेव्हा मनातली गुरूंची शिकवण म्हणजे तुझ्या मनातील appच म्हणावे लागेल की नाही ? मग गुगल , यु ट्यूब का नाही गुरू ? सगुण-निर्गुण का काय म्हणतात ना तसंच ना गं हे ? मग का नाही मान्य तुला ही पूजा ? " अक्षजने विचारलं.

" पटलं मला . कर तू त्यांची पूजा पण एका अटीवर , gadgets नक्कीच मार्गदर्शन करतात पण ते गैरमार्गही दाखवू शकतात , अशावेळी आपल्याला सदसद्विवेकबुद्धी देण्याचं काम खरे गुरू करतात हे समजून घेऊन कर.... थोडक्यात काय, असतील जरी रुंदावलेल्या कक्षा आणि बदललेली परिभाषा तरी गुरुवीण नाही गवसायची योग्य दिशा..... तुझी पूजा झाली की ये मग पादुकांचे दर्शन घ्यायला !" आई म्हणाली.

आजच्या पिढीच्या अक्षजला हा मुद्दा पटला बरं का.....

©️®️ डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर