सुनेला पारखण्याची घाई का?

नवीन सुनेच्या मनातील मर्म

"अगं नेहा,जरा हसून खेळून राहायचं.नेहमीच अशी गप्प गप्प का असतेस?"

" काही नाही ताई.मला ना जरा लाजल्यासारखे होते ना म्हणून."

" अगं तुझी ही मोठी वहिनी अलका आहे ना,ती पण तुझ्यासारखीच होती.ती आत्ता आत्ता आमच्यासोबत मोकळं बोलायला लागली.हो की नाही रे माधव? अशीच होती ना तुझी बायको?"

" हो.अशीच होती ही अलका. पण जेव्हा मी हिला हिच्या माहेरच्या नातेवाईकांसोबत बघायचो तेव्हा ती एकदम मोकळी, दिलखुलास असायची.मला तेव्हा खूप राग यायचा हिचा."

" वंस आणि नवरोबा तुम्ही दोघे आता जे माझ्याबद्दल बोलत आहात हे अगदी खरे आहे.कसे आहे ना कुठल्याही मुलीला लग्नानंतरचे घर सुरुवातीला परकेच असते.त्यावेळी ती या नव्या घरात कोणी मायेचे आपुलकीचे आहे का? हे शोधत असते.त्यासाठी ती अगदी परफेक्ट वागण्याचा प्रयत्न करते.मग अनेकदा तिची दमछाक होते,धांदल उडते.अशावेळी नवरोबाने तिला समजून घेणे खूप गरजेचे असते.मग असे असताना ती तिच्या माहेरी जरा मोकळी राहिली तर कुठे बिघडले?"

एव्हाना वंस आणि नेहाच्या चेहऱ्यावरील रंग बदलले होते.दोघींनी मान डोलावून आपले समर्थन दर्शविले.

" आता मला एक सांगा नवरोबा, जशी मी या घरात रुळत गेले, घरातील प्रत्येकाचे स्वभाव ओळखत गेले तशी मी खुलत गेले की नाही? व्यक्त होत गेले की नाही? माझा स्वभावही सर्वांना मग समजत गेला की नाही?"

नवरोबांनी होकारार्थी मान डोलावली.

" मग माझ्या या नवीन जाऊबाई म्हणजे नेहाकडून या साऱ्या अपेक्षा का? तिलाही जरा वेळ द्या.आपण तिला जरा माया आपुलकी दाखवली की तीही खुलेल, मोकळी होईल.उगीच इतरांशी तुलना करून तिचे मन आणखी दुःखी करणे हे चुकीचे आहे.बरोबर आहे की नाही वंस?"

" हो अलकावहिनी बरोबर आहे तुझं.पण आईला कोण समजावेल?"

" सासूबाईंना कसे समजून सांगायचे हे मला माहित आहे.त्यामुळे नेहा तू या घरात रुळण्यासाठी हवा तेवढा वेळ घे.काही अडचण आली तर मी आहेच तुझ्या मदतीला.डोन्ट वरी."

" थँक्यू वहिनी."

असे म्हणत नेहाने अलकाला मायेने मिठी मारली.

वाचकहो,नवी सुन ही सुद्धा कोणाची तरी मुलगी असते.लग्न झाल्यावर एका वेगळ्या विश्वात तिचे आगमन होते.मग अशा वेळी तिला समजून घ्यायचे सोडून तिला लगेच पारखणे खूप चुकीचे आहे.तिला समजून घ्या मग तीही हळूहळू सारे काही आत्मसात करेल आणि आपल्या कुटुंबासाठी आपले बेस्ट देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे