असं का झालं? (भाग -२) जलद लेखन

Sad love story

जलद लेखन स्पर्धा - नोव्हेंबर 

विषय -अधूरी प्रेमकहाणी 

शीर्षक  - असं का झालं?

(भाग -२)

लेखिका - स्वाती  बालूरकर, सखी

  परंतु  नंदूला कळेचना की आपण म्हणजे मी काहीच तर केलं नाही, मग यांच्यासमोर  काय कबूल करायचंय?



"सर खरं सांगतो, माझ्या मित्रांनीच मला मारहाण केली. का मारलं ते देखील मला खरंच माहीत नाही. ते तिथे संध्याकाळी अचानक का आले आणि त्यांनी मला का मारलं, तेच तर कळत नाहीये पण त्यांचे इरादे काही चांगले नव्हते ."

" नव्हतेच ना, म्हणून तर हे सगळं झालं!"

" सर म्हणजे प्लीज काय झालं सांगाल का? शामल माझी मैत्रीण कुठे आहे? कशी आहे? ती आली होती का मला भेटायला?"

" अरे डोकं बिकं फिरलं की काय? कुठे आहे काय विचारतोस? ती कशी येईल तुला भेटायला?"

आता इन्स्पेक्टर खंडागळेंना मामला लक्षात आला आणि त्यांनी शिंदेंना थांबा असा इशारा केला.

ते त्याला स्वतःच्या केबिनमध्ये घेऊन गेले. शांतपणे बसवलं, पाणी प्यायला दिलं आणि मग विचारलं "तुला काय आठवतंय सांगशील का खरं खरं?"
"सर मी आणि श्यामल गाडीवर त्या गावामागच्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत गेलो. मग गाडी पुढे जात नाही म्हणून मी चढत चढत गप्पा मारत वर गेलो. वर मैदान सारखं आहे तिकडे बसणारच होतो इतक्यात ते दोघे तिघेजण पळतच आले. प्रमोद मला काही बाही बोलायला लागला पण मला काही संदर्भच लागेना. तो पिलरला असावा बहुतेक. मग मला परत जा असं बोलायला लागले. मी भिऊन श्यामल ला चल परत जाऊया म्हणालो अन तितक्यात माझ्या डोक्यात कशानेतरी मारलेला प्रहार. . . सर अजूनही डोकं दुखतंय. ती ओरडत होती सर ऐकू येत होतं पण मला हॉकी स्टीक व लाथा बुक्क्यांनी मारलं सर तर अंधारी आली. . . पुन्हा काहीच आठवत नाहीय. ती नंदू नंदू म्हणून ओरडत होती. . . पण मला काहीच समजत नव्हतं आणि आता आठवत नाहीय. "
खंडागळेंनी सगळं ऐकलं व एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले-
"म्हणजे तुला कल्पना आहे का की आम्ही कशाबद्दल तुझी चौकशी करतोय?"

" नाही सर! म्हणजे मला का अटक केली? मला आतापर्यंत कळालं नाही. त्या रस्त्यावरच्या मित्रांनी मला मारलं , मी त्यांच्यावर तक्रार करण्याच्या ऐवजी मलाच असं? माझे आई वडिल काय विचार करत असतील माझ्याबद्दल ?"

" आम्ही त्या तीन जणाच्या पाळती वरती आहोत , तूच साक्षीदार आहेस त्यामुळे तू दिलेली माहिती कामी येईल. आम्ही माणसं लावलीत आणि त्यातला एक जण सापडलाय, अजून दोन सापडायचे आहेत."

" तेच तर म्हणतोय सर मी, मला का मारहाण केली त्यांनी?"

" ते तर तू सांगायला पाहिजे ना आम्हाला! तुझा काय प्लान होता आणि मुळात तू त्यांना तिथे का बोलावलंस?"

"बाप रे! आईशप्पथ सांगतो साहेब, मी त्यांना नव्हतं बोलावलं. मी तर तिथे तिला घेवून एकांत म्हणून गेलो होतो?"

" कुठे तर . .डोंगरावर? निर्जन ठिकाणी मुलीला घेऊन जातोस म्हणजे ?"

"नाही सर म्हणजे तसं काही नाही , पण निवांत गप्पा मारायच्या होत्या साहेब, . . .शांत जागाच मिळायची नाही शहरात . . . तर बोलायचं होतं!"

" म्हणून चांगल्याच मारल्या गप्पा! कशाला माही ते धंदे करता रे, मुली काय तुम्हाला खेळणं वाटतात का? सुशिक्षित आहेस ना मग?"

" सर आपण मला सांगा ना, शामल कुठे आहे?"

"शेवटचं विचारतो नंदू . . खरं सांग तुला काहीच माहित नाही?"

" नाही सर, मी येच तर सांगतोय ना की मला एवढं मारलं तेव्हा. . .कळतच नव्हतं काही अन पुढचं मला काहीच आठवत नाही. डोळे उघडले तर पोलीस चौकीत, पुन्हा तुम्ही. . . मला कळत नाहीय. . . खरंच काही माहित नाही . किती जणांना विचारलं ,मला कोणीच सांगत नाहीय!"
खंडागळें ना इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर एवढं तर कळत होतं की नंदू खरं बोलतोय. डोळ्यात साधेपणा दिसत होता.

क्रमशः  

लेखिका  - स्वाती  बालूरकर ,सखी

दिनांक  २९ .११ .२२

🎭 Series Post

View all