का खेळलास तू भावनांशी? ( भाग 3 )

About Love


का खेळलास तू भावनांशी ? ( भाग 3 )


\"प्रेमीयुगलाची आत्महत्या\" या वर्तमानपत्रातील बातमीकडे सुमीतचे लक्ष गेले. असे काय झाले असेल ? त्यांच्या आयुष्यात म्हणून त्यांनी आत्महत्या करावी. या विचाराने सुमीतने पूर्ण बातमी वाचली. बातमी वाचून तर त्याचे हातपाय थरथर कापायला लागले. त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. पण घरातल्या व्यक्तिंचा लग्नाला तीव्र विरोध होता. आपले प्रेम यशस्वी होणार नाही... जिंवतपणी आपण एकमेकांचे होऊ शकत नाही... आपण कुठेही गेलो तरी घरातले आपल्याला त्रास देत राहतील. प्रसंगी ते कोणत्याही थराला जाऊ शकतील . त्यापेक्षा आपणच आपले जीवन संपून टाकावे.असे त्या प्रेमीयुगलाला वाटले आणि त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

हे सर्व वाचून सुमीतच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते.

प्रेम होणे, प्रेम करणे या नाजूक भावनेला इतके भयावह रूप मिळू शकते? प्रेमाचा असाही अंत असू शकतो ?
त्यांना दुसरा कुठलाही पर्याय सापडला नाही का ? प्रेमासाठी त्यांनी आपले जीवन संपवावे ? ते स्वतः वर प्रेम करत नव्हते का?

\"जियेंगे भी साथमे और मरेंगे भी साथमे \" या विचाराने त्यांनी आपले जीवन संपवले का ? बापरे! एवढी शक्ती कुठून आली त्यांच्यात? आत्महत्या करताना त्यांनी आपल्या जीवनाचा विचार केला नसेल का ? घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली नाही म्हणून जीवन संपवायचे का?
आपल्या नशिबात नसेल असे समजून, त्यांनी एकमेकांना विसरून, आपले पुढील आयुष्य जगले असते तर ... आपल्या अमूल्य अशा आयुष्याला त्यांनी गमवले नसते. आणि असे करूनही दोघांनीही आपल्या घरातल्यांना दुःखच दिले ना!
प्रत्येकालाच आपल्या मनासारखे मिळते, असे नाही ना... जीवनात यशस्वी प्रेमी जोड्यापेक्षा, आपण अपूर्ण प्रेमाची अनेक उदाहरणे पाहत असतो. मग ती लोकही जगतातच ना...कुठेतरी मार्ग निघतोच.
खरे प्रेम जगणे शिकवते. मरणे किंवा मारणे नाही शिकवत . आपण ज्या व्यक्तिवर प्रेम करतो ,ती व्यक्ती नेहमी सुखात रहावी मग ती व्यक्ती आपल्या जवळ असो की दूर , फक्त सुखात रहावी एवढीच भावना असते ...तेच खरे प्रेम !

प्रेमामुळे तर जीवनात आनंद येतो,जगण्याला ऊर्जा मिळते, नवचैतन्य निर्माण होते. मग यांच्या प्रेमात शक्ती नव्हती का? त्यांचे प्रेम एवढे कमकुवत होते की, त्यांनी हार मानून जीवन संपवले.
यांची दया करावी की यांचा राग करावा ...हे ही समजत नाही.
म्हणून म्हणतात, \"प्रेम करणे सोपे असते पण प्रेम टिकवून ठेवणे,प्रेम निभावणे अवघड असते.\"
ज्यांना आपले प्रेम मिळते ते खरचं किती भाग्यवान असतात ना !
प्रेम यशस्वी झाले तर खरचं आनंदी आनंदच!पण प्रेमात विघ्ने आली तर किती त्रास !
प्रेम करणाऱ्यांना घरातूनच विरोध असेल ? समाजाला त्यांचे प्रेम मान्य नसेल तर प्रेमाचे, प्रेम करणाऱ्यांचे किती शत्रू तयार होतात. आपलेच लोक शत्रू होतात.कारण का तर.. प्रेम केले म्हणून ?
धर्म, जात, रंग,रूप,गरीब, श्रीमंत हे सर्व पाहून प्रेम होते का ? प्रेम तर आपोआप होत असते ना!
पण अशा आंधळ्या प्रेमाला स्विकारण्यास घरातील आपलीच माणसे तयार होत नाही. त्यामुळे प्रेमात आकांत बुडालेल्या प्रेमींना कधीकधी चुकीचे निर्णय घ्यावे लागतात.

वर्तमानपत्रातील बातमीने सुमीतच्या मनात विचारांची कालवाकालव सुरू झाली.

आपले काय होईल ? आपण तर अजून तिच्याविषयीच्या वाटणाऱ्या कोमल भावनांना शब्दरूपही दिले नाही. हे असे काही ऐकले, वाचले की तिला आपल्या भावना सांगायचीही हिंमत होत नाही. तिच्यावर माझे प्रेम आहे. हे मी तिला सांगितले आणि तिने माझ्या प्रेमाचा स्विकार नाही केला तर.. तिच्या किंवा माझ्या घरच्यांनी आमच्या प्रेमाला विरोध केला तर ...
बापरे ! कल्पनाही करवत नाही.
नुसत्या विचारानेच किती त्रास होतो ते...

मला वाटते आपण तिच्या बद्दल वाटणाऱ्या भावनांना सध्या तरी इथेच थांबवून ,अगोदर करियर घडवण्याकडे लक्ष दिलेले बरे...आणि आईबाबांच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.


कॉलेजला 3,4 दिवस सुट्या होत्या म्हणून स्नेहल आपल्या घरी आलेली होती.
फोनवर एक दोन दिवसातून घरी बोलणे व्हायचे. मध्यंतरी बाबा भेटायला येऊन गेले होते आणि एक दोनदा स्नेहलही घरी येऊन गेली होती. पण फक्त एका दिवसासाठीच येणे झाले होते त्यामुळे घरी राहण्याचा पाहिजे तसा आनंद घेता आला नव्हता. आईलाही आपल्या लाडक्या लेकीचे लाड पुरविता आले नव्हते. पण या वेळी 3,4 दिवसासाठी घरी आल्यामुळे स्नेहल तर खुश होतीच पण आईलाही खूप आनंद झाला होता. मुलीसाठी काय करू आणि काय नाही ? असे आईला वाटत होते. जणू एखादी सासरवासी मुलगी माहेरपणासाठी आली आहे , असे झाले होते.
स्नेहलला आईच्या हाताच्या स्वादिष्ट जेवणाची सवय होती.त्यामुळे मेसचे जेवण तिला आवडत नव्हते. पण नाईलाजाने तिला पोट भरण्यासाठी,भूक भागविण्यासाठी खावे लागत होते. पण आता घरी आल्यावर ती आईच्या हाताच्या जेवणाचा खूप आवडीने व मनसोक्तपणे आनंद घेत होती.स्नेहलच्या येण्याने स्नेहल, आई यांच्याप्रमाणे बाबा व दादाही आनंदी होते. घरात जसे उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. घरात तिच्या आवडीचे पदार्थ बनत होते,त्यामुळे दादा आईला म्हणाला, "स्नेहलमुळे आम्हांलाही नवीन नवीन पदार्थ खायला मिळत आहे..तिच्या मुळे आमची पण मजा..."

" असे काय म्हणतोय रे...मी तर तुझ्या आवडीचेही पदार्थ करते ना, आणि तु तर इथेच राहतो ना ...तुला केव्हाही तुझ्या आवडीचे बनवून देऊ शकते ना ? आता माझी लेक आली आहे तर करते तिच्या आवडीचे."
आई दादाला म्हणाली.

" हो, ग आई, खरे आहे ते ,तू तर सर्वांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून सर्व करत असते. मी मुद्दाम स्नेहलची गंमत करतो आहे. कधीची तिची गंमत केली नव्हती ना ..."
दादा म्हणाला.

" हो रे , कळते मला सर्व.. आणि असेच बहीणभावाचे प्रेम ,नाते टिकवून ठेवा. एवढीच इच्छा आमची दोघांची. "
आई थोडी भावनिक होऊन म्हणाली.


आईच्या हातच्या पदार्थांचा आस्वाद घेणे, आई,बाबा,भाऊ यांच्याशी खूप गप्पागोष्टी मारणे, गावातील मैत्रीणींना भेटणे यामुळे स्नेहलला खूप बरे वाटत होते. पण तिला अधूनमधून त्याची आठवण येत होती. त्याचा हसरा चेहरा, बोलके डोळे, रूबाबदार व्यक्तिमत्त्व हे सर्व तिला दिसत होते, डोळ्यासमोर येत होते. आपण आपल्या छान अशा प्रेमळ कुटुंबात आनंदी असतानाही ,त्याची आठवण का येत असावी? आपण दुसऱ्या गोष्टीत मन रमविण्याचा प्रयत्न केला तरी ,आपले मन त्याच्याकडे का ओढले जात आहे ?
आज आपल्यावर एवढे जीवापाड प्रेम करणारे आई,बाबा,भाऊ यांना जर आपल्या मनातील त्याच्या विषयीच्या वाटणाऱ्या भावना सांगितल्या तर ....त्यांची काय प्रतिक्रिया असेल ?
असा विचार स्नेहलच्या मनात आला.



" आजकालच्या मुलामुलींना आपल्या आईवडीलांविषयी प्रेमच राहिले नाही. फक्त स्वतःचाच विचार करतात."

स्नेहलचे बाबा आईला म्हणत होते .

" का ? काय झाले ? कोणी काय केले ? "
स्नेहलच्या आईने बाबांना विचारले.

" अगं , आपल्या गावातील ते शिंदे सर आहेत ना, त्यांची मुलगी कोणासोबत तरी पळून गेली . सर्व गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मलाही आताच कळाले. बिचारे तिचे आईवडील ...काय वाटत असेल त्यांना... मुलीच्या या वागणूकीमुळे ? " बाबा म्हणाले.

" अरे बापरे ! कसे काय हो ? कोणाबरोबर गेली ? आईवडीलांचे लक्ष नव्हते का ,आपल्या मुलीवर ? आणि तिने पळून जाताना आईवडीलांचा विचार केला नाही का ? "
आईनेही काळजीने
विचारले.

" मला तर खूप राग येतो अशा मुला मुलींचा, जे आईवडिलांचा विचार करत नाही. त्यांना त्रास देतात. त्यांना थोडेसे वागण्याचे स्वातंत्र्य दिले की ते त्याचा गैरवापर करतात. आपल्या मुलांनी असे वागून आपल्याला दुःख देवू नये . एवढीच इच्छा. "
बाबा म्हणाले.

" माझा आपल्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे. ते नाही असे काही करणार ज्यामुळे आपल्याला काही त्रास होईल. त्यांचे आपल्यावर खूप प्रेम आहे . आणि आपण चांगले संस्कार केलेच आहेत त्यांच्यावर . त्यामुळे तुम्ही ती जास्तीची काळजी करू नका. "
आई बाबांना समजावत म्हणाली.


आई बाबांचे हे बोलणे स्नेहल बाहेरून घरात येत असताना तिच्या कानावर पडले.

आईबाबांच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा आणि आपल्या चुकीच्या वागण्याने त्यांना किती त्रास होऊ शकतो. हे ही तिला कळाले होते.
त्यामुळे मनात उमटणाऱ्या त्याच्याविषयीच्या त्या भावनांना तिने मनातच पुसून टाकण्याचा विचार केला. आपल्या कुटुंबाचे प्रेम हेचं आपल्यासाठी सर्वकाही आहे. त्यामुळे त्यांना त्रास होईल असे काहीही करायचे नाही . असे तिने ठरविले.


क्रमशः

🎭 Series Post

View all