का खेळलास तू भावनांशी? ( भाग 2 )

About Love

" मी काय म्हणत होतो, ऐकलं का ... स्नेहलसाठी काही खाऊ वगैरे केला की नाही ? " स्नेहलच्या बाबांनी आपल्या पत्नीला विचारले.


" अहो, हे काय विचारता आहे ? आई आहे मी तिची.तिला आवडते ते सर्व केले मी. पोह्यांचा चिवडा, शंकरपाळी , बेसनाचे लाडू.सर्व केले तिच्यासाठी. लोणचे,चटणी पण देणार आहे तिला. " स्नेहलची आई आपल्या पतीला म्हणाली.


" तसं नाही गं ,तू तर केलाच असेल खाऊ याची मला खात्री आहे. पण बापाचं मन माझं .....विचारून गेलं तुला... आईची माया दिसून येते गं...पण वडिलांच प्रेम दिसून येत नाही गं... त्यात माझे वागणे असे. मी जरी तुम्हां सर्वांना कठोर वाटत असलो तरी , मनात सर्वांबद्दल प्रेमच असते. सर्वांची काळजीच असते. स्नेहलवर तर माझा किती जीव ! हे तुला माहितचं आहे. जास्त प्रेमाने मुलं बिघडू नये म्हणून शिस्तिने वागण्यास सांगतो. मुलांनी चुकीच्या मार्गाने जाऊ नये , त्यांना आपला आदरयुक्त धाक असावा म्हणून काही वेळा कठोरही होतो. आणि हा गुण आमच्या रक्तातचं आहे बरं का..." स्नेहलचे बाबा म्हणाले.


" आई ..अगं आई ..मला ना काहीच सूचत नाही आहे..काय करू ते? तू कर ना मला मदत थोडी..." स्नेहल आईला आवाज देत आईजवळ आली.


" अगं,किती दिवस माझ्या वर अवलंबून राहशील गं, छोट्या छोट्या गोष्टीत तुला माझी मदत लागते. आता होस्टेलला गेल्यावर तुझी कामे तुलाच करावी लागतील ना ? मी थोडीच येणार तुझ्याबरोबर तिथे." आई म्हणाली.


"खरचं आई, होस्टेलला गेल्यावर माझी फजिती होणारच आहे.घरात सर्व आयते मिळत असते मला .तिथे माझे मलाच सर्व करावे लागेल, तुझ्या हाताचे चविष्ट जेवण मिळणार नाही. रोज थोडा वेळ का असेना , तुझ्या मांडीवर डोके ठेवून झोपण्याची माझी लहानपणापासूनची सवय,माझ्या पाठीवर तुझे हळूहळू थापडणे, तुझा तो मायेचा स्पर्श, आजारी पडल्यावर माझी काळजी घेणारी तू , रोज आपण सर्व एकत्र जेवताना होणाऱ्या गप्पागोष्टी, रोज न चुकता माझ्यासाठी अजूनही काहीतरी खाऊ आणणारे बाबा, माझ्याशी दादाची रोज चालणारी थट्टामस्करी ... हे सर्व मी मिस करणार गं..मला तर वाटते, मी जाऊच नये होस्टेलला. तुम्हांला सोडून जावेसेच वाटत नाही मला." स्नेहल रडत रडत आईला म्हणाली.


तिचे हे सर्व बोलणे ऐकून बाबा डोळ्यातील अश्रू लपवत तेथून चालले गेले.


आई तर तिचा एकेक शब्द ऐकून रडत होती. स्नेहल तर मनातले सर्व बोलून मोकळी झाली होती. पण ज्या दिवसापासून स्नेहलचे दुसऱ्या गावी कॉलेजला ऍडमिशन घेतले व तिला प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून तिथेच होस्टेलला रहावे लागेल. हे आईला कळाले , त्या दिवसापासून आईच्या मनात भावनांचे काहूर माजले होते.


गावात फक्त 12 वी. पर्यंत कॉलेज होते. पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या गावी स्नेहलला जावे लागणार होते. एकीकडे तिच्या भविष्याचा विचार तर दुसरीकडे तिला आपल्याला सोडून होस्टेलला रहावे लागणार होते , म्हणून वाईट वाटत होते.

आईलाही खूप रडू येत होते. पण आपणच असे कमजोर पडलो तर.. स्नेहलही मनाने खचून जाणार आणि ती तिकडे राहू शकणार नाही, चांगला अभ्यास करणार नाही. म्हणून आईने मोठ्या कष्टाने आपल्या भावनांना आवर घातली आणि स्नेहलला जवळ घेऊन, मायेने तिला कुरवाळत समजावून सांगितले ,

" अगं, तुझे म्हणणे खरे आहे. आम्हांलाही तू जाऊ नये असे वाटत आहे. पण तुझ्या चांगल्या भविष्यासाठी शिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे ना .. आणि त्यासाठी तुला कुठेतरी तडजोड करावीच लागेल ना .. तू सुट्टी असेल तेव्हा घरी येशील ना आणि तुझे बाबा,दादा तुला अधूनमधून भेटायला येतीलचं... फोनवर रोज बोलणे होतच राहिल. आणि जास्त दूर नाहीच आहे...आठवण आली की तू पटकन येऊ शकते .."


आईचे बोलणे ऐकून स्नेहलला थोडे बरे वाटले आणि पुढच्या भविष्याच्या विचाराने , होस्टेलला जाण्याच्या तयारीला लागली.

आईने आवडीने बनविलेला तिच्या आवडीचा खाऊ,अभ्यासाचे सर्व साहित्य, कपडे आणि अजून इतर आवश्यक वस्तू . असे सर्व सामान भरून स्नेहलने बॅग्स रेडी केल्या. आईच्या मदतीशिवाय हे होणारच नव्हते ! त्यामुळे आई थकलेली असूनही तिला मदत करू लागली. होस्टेलला जाणार म्हणून स्नेहल मैत्रीणींना,ओळखीतील सर्वांना भेटायला गेल्यामुळे आईला घरात तिची काही मदत झाली नव्हती.

आईचे प्रेम खरचं किती वेगळे असते ना ! मुलांवर इतके प्रेम करते की स्वतः चा कधी विचारही करत नाही.



दुसऱ्या दिवशी आई,बाबा व दादा हे सर्व स्नेहलला होस्टेलला सोडण्यासाठी गेले. कॉलेज व होस्टेलचे ऍडमिशन अगोदरच झालेले होते.

स्नेहलला होस्टेलला सोडून घरी परतत असताना, आई,बाबा व दादाला खूपच सुनसुन वाटत होत आणि स्नेहलला तर खूप एकट वाटत होत. रडायला ही येत होत. कधी नाही ते पहिल्यांदाच घर सोडून एकटे राहण्याची वेळ होती. होस्टेलला एक,दोन जणी तिच्या अगोदरच्या कॉलेजच्या मैत्रीणी होत्या. त्यांच्याशी बोलून ती एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न करत होती.दिवस तर कसातरी काढला पण रात्री , झोप लागत नव्हती. घरची आठवण येऊन सारखी रडत होती.

दुसऱ्या दिवसापासून कॉलेज सुरू झाले. आणि हळूहळू कॉलेज,अभ्यास व मैत्रीणींबरोबर गप्पागोष्टी यात ती रमू लागली.




जे म्हटले आहे ते खरचं आहे,

' प्रेम हे काही मुद्दामहून होत नसते. ते आपोआपच होत असते. '


त्याच्यात आणि माझ्यात असेच काही असेल का ? जेव्हाही त्याची व माझी नजरानजर होते, तेव्हा त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल एक वेगळीच भावना आहे, असे जाणवते. तो मला चोरून पाहत असतो, हे मला कळते. पण मलाही त्याचे असे बघणे आवडते. त्याच्या त्या पाहण्यात स्वच्छ भावना दिसते. त्याच्या वागण्याबोलण्यातून तो चांगला मुलगा वाटतो. दिसायला तर काय राजबिंडा ..काय ते बोलके डोळे आणि ते घायाळ करणारे स्माइल . मुली जेव्हा त्याची तारीफ करतात तेव्हा मला एक वेगळीच फिलिंग वाटत असते. त्याच्याबद्दल चांगले बोलतात हे ऐकून खूप छान वाटते,पण त्या मुलींचा रागही येतो. त्याच्याविषयी बोलण्याचा अधिकार तुमचा नाही फक्त माझा आहे. असे त्या मुलींना सांगावेसे वाटते.मन भावनांना आवर घालते. मुली तर त्याच्याशी मुद्दामहून काही तरी निमित्ताने बोलण्याचा प्रयत्न करीत असतात. पण तो ही अगदी सज्जन मुलाप्रमाणे त्यांच्याशी वागत असतो.कदाचित त्याला समजतही असावे , मुली आपल्याशी एवढी सलगी का करत असतील ते ? पण तो कधीही अशा संधीचा कधी गैरफायदा घेत नसावा. असे मला वाटते.

रूपाबरोबर त्याला चांगल्या गुणांची ही साथ लाभलेली त्यामुळेच माझे मन त्याच्याकडे धाव घेत असावे.

त्याला पाहिले की, माझे ह्रदय जोरात धडधडते. चित्त ठिकाणावर राहत नाही. वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटत रहाते. मनाला सावरण्याचा खूप प्रयत्न करते. पण तो दिसला की, त्याच्याकडे पाहत रहाते. मी त्याच्या कडे पाहते आहे , हे त्याच्या लक्षात येऊ नये म्हणून चोरून पाहते आणि नेमका त्याचवेळी तो ही मला पाहत असतो. आणि मग दोघेही न पाहिल्यासारखे करत इकडेतिकडे पाहू लागतो. मला तर खूप ओशाळल्यासारखे वाटते आणि कधीकधी हसूही येते, माझ्या अशा वागण्याचा.कॉलेजमध्ये तर आम्ही बघत असतो एकमेकांना पण संध्याकाळी तो ग्राउंडवर खेळायला येतो, तेव्हाही त्याला पाहण्याचा मोह आवरत नाही ..त्याला बघता यावे म्हणून कुठेतरी जाण्याच्या निमित्ताने होस्टेलच्या बाहेर पडते.

आतापर्यंत मी म्हणत होते की, प्रेम करणारे वेडे असतात, प्रेम वगैरे काहीही नसते. फक्त टाईमपास असतो. आणि त्याला पाहून मला जे वाटते आहे त्याला काय म्हणावे ?


आईवडिलांची लाडकी ,दादाची खोडकर बहीण स्नेहलच्या मनात सुमितला पाहिल्यावर त्याच्याबद्दल वाटणाऱ्या या भावना कोणाला सांगाव्या? असे तिला वाटत होते. आणि आपण जे वागत आहोत ..ते बरोबर का ? येथेच थांबायचे की पुढे भावनांना शब्दरूप देवून त्याला आपल्या मनातले सांगायचे . या द्विधा परिस्थितीत स्नेहल गुरफटून गेली. काय निर्णय घ्यावा हे ही तिला समजत नव्हते.




क्रमशः
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all