का खेळलास तू भावनांशी ? ( भाग 1 )

About Love And Emotions


का खेळलास तू भावनांशी ? ( भाग 1 )


\" आज तिला माझ्या मनातले सांगूनचं टाकतो. किती दिवस मनातच ठेवायचं? बोलून तर बघतो, काय होते ते पुढे बघू... \" असं स्वतःशीच बोलत सुमीत आपल्या रूममध्ये इकडून तिकडे फिरत होता. आणि ती पहिल्यांदा दिसली तो दिवस... तो क्षण ,त्यानंतर आपली अशी झालेली मनस्थिती हे सर्व आठवू लागला.

नेहमीप्रमाणे संध्याकाळी ग्राउंड वर क्रिकेट खेळण्यास गेलो होतो. तेव्हा तिकडे गर्ल्स होस्टेल कडे जात असताना ती दिसली होती. तिला पाहताच आपल्याला काय झाले हे कळलेचं नाही.ह्रदयाची कंपने अचानक वाढली होती. यापूर्वी असे कधीही झाले नव्हते. चित्रपटांमध्ये दाखवतात त्याप्रमाणेच \"पहिली नजर में ही प्यार हो गया ...\" अगदी तसं झालं होतं. ती होस्टेलच्या गेटमधून आत जाईपर्यंत मी एकसारखा तिच्याकडे बघतचं होतो. मित्र आवाज देत होते पण त्याकडे माझे लक्षही नव्हते. मित्राने जवळ येऊन पाठीवर एक थाप दिली तेव्हा भानावर आलो.
"काय झाले?" म्हणून त्याने विचारले. त्याने विचारलेला प्रश्न, हा माझ्याही मनात आला ..
\" काय झाले आपल्याला?\"
या प्रश्नाचे उत्तर आपल्यालाही समजत नव्हते तर त्याला काय उत्तर देणार?
म्हणून \"काही नाही\" असे काही तरी सांगून वेळ साधून घेतली आणि मॅच खेळायला गेलो. त्या दिवशी चांगली मॅच खेळलोच नाही. रोज चांगले रन्स काढणारा मी त्यादिवशी एकही रन न काढता आऊट झालो.
खेळण्यातही विकेट गेली आणि इकडेही माझी विकेट पडली होती तिला पाहून ..

त्यादिवशी कशातही लक्ष लागत नव्हते. जेवणही नावापुरतेच केले. घरातले ही "काय झाले ?" म्हणून विचारत होते.
"काही नाही " असे सांगून त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. रात्री झोपण्याचा प्रयत्न केला; पण झोपही लागत नव्हती. डोळ्यासमोर तिचं दिसत होती. तिचे सुंदर डोळे, हसरा चेहरा आणि मला आवडणाऱ्या पिस्ता रंगाचा ड्रेस. खूप छान दिसत होती ती..
तिच्याच विचारात रात्री कधी झोप लागली कळलेच नाही.
सकाळी तयार होऊन कॉलेजला गेलो.

कॉलेज सुरु होऊन काही दिवसचं झाले होते. 12 वी नंतर कोणी मेडीकलला तर कोणी इंजिनिअरिंगला गेले . तर काहींनी कॉलेजला ऍडमिशन घेतले.
जुने मित्रमैत्रिणी आणि काही नवीन चेहरे पण दिसत होते.

त्यादिवशी लेक्चर साठी सर वर्गात येण्यासाठी वेळ होता. वर्गात स्टुडंट्स येत होते. फ्रेंडशी बोलत असताना माझे लक्ष दरवाज्याकडे गेले. आणि पाहून धक्काच बसला. काल जिच्यामुळे आपली शुद्ध हरपली होती.हो..हो.. ती ..तिच होती. मला वाटले भास होतो आहे की काय ? पण मित्राने मला एक टपली मारली आणि वर्गात एक नजर फिरवली तेव्हा ती दिसली. म्हणजे ती माझ्याच वर्गात ...

मित्र ही बोलला ," नवीन ऍडमिशन वाटतं!"

मी पण बोललो " हो,बहुतेक."

माझ्या मनात तर आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. केव्हा सर येऊन गेले? लेक्चर केव्हा संपले? हे सुद्धा कळले नाही. मी माझ्याच आनंदात,माझ्याच धुंदीत होतो.

दुसऱ्या लेक्चरसाठी सर येईपर्यंत वेळ होता. त्या वेळेत मी तिच्याकडे चोरून पाहत होतो. ती मैत्रीणींशी बोलत होती. बोलताना ही खूप छान दिसत होती. मनात वाटत होते \" तिच्याकडे जावे आणि मनाला वाटते ते एका दमात सांगून टाकावे.\"

पण हे काही शक्य नसल्याने मनातील विचार मनातच ठेवला.

एकही लेक्चर व्यवस्थित ऐकले नाही. अधूनमधून तिच्याकडे पाहण्याचा मोह आवरता येत नव्हता.
त्यामुळे कॉलेजचा तो दिवस लेक्चर न ऐकता फक्त तिच्याकडे बघण्यात आणि तिच्याच विचारात गेला.सर्व लेक्चर्स संपल्यानंतर ती तिच्या मैत्रीणींसोबत गप्पा मारत निघून गेली. आणि मी फक्त बघतचं राहिलो.

आता हे रोजचेचं होऊन गेले होते.वर्गात,कॅन्टीनमध्ये जेव्हा संधी मिळेल तेव्हा बघत रहायचे.आणि संध्याकाळी ग्राऊंड वर खेळायला गेलो की, तेव्हा ही ती होस्टेलला जाताना- येतांना दिसायची. मी ग्राऊंडवर खेळण्यासाठी जायचो पण खेळण्यापेक्षा तिला पाहण्यातच रमायचो.माझे हे वागणे माझ्या जवळच्या मित्रांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. आणि मग त्यांनी अनेक प्रकारचे सल्ले दिले.काहीतर माझी गंमत करू लागले. पण मी त्यांना सांगितले, \"तुम्ही समजत आहात तसे काहीही नाही.उगाच गोष्ट वाढवू नका. \"
\"जब प्यार किया तो डरना क्या..\" असे सारखे बोलून
ते अजून जास्त त्रास द्यायचे.
मी माझ्याच विचारांमध्ये राहतो,कोणाच्या बोलण्याकडे लक्षही राहत नाही. जेवणात लक्ष नाही. मध्येच हसतो ,मध्येच दुःखी चेहरा दिसतो. हे सर्व बदल घरातील व्यक्तिंच्या लक्षात आले आणि ते विचारू लागले , \"काही प्रॉब्लेम वगैरे आहे का? \"
पण मीही अशीच काहीतरी उत्तरे देवून त्यांना शांत करायचो.
मी जे वागतो आहे , ते योग्य की अयोग्य ? हे ही मला समजत नव्हते.

असेचं काही दिवस,महिने जात होते. लेक्चर्स ला व्यवस्थित लक्ष देवू लागलो. अभ्यास करू लागलो.
\"ती मला फक्त आवडते की माझे तिच्यावर खरोखर प्रेम आहे ? \" हाच गोंधळ मनात सुरू होता.
आपली गाडी पुढे काही सरकत नाही. असे वाटत होते..पण जेव्हा वर्गात अधूनमधून बघायचो तेव्हा तीही आपल्याकडे पाहते आहे. असे वाटायचे आणि दोघांची नजरानजर होताच दोघेही इकडेतिकडे बघायचो.मी जेव्हा संध्याकाळी ग्राऊंडवर खेळायला जायचो तीही रोज त्याच वेळी होस्टेलच्या गेटजवळ दिसायची. तेव्हाही एकमेकांकडे बघायचो.

या विचारांमध्ये सुमीत रमलेला असताना,आईने त्याला आवाज दिला ," सुमीत कॉलेजला जायला उशीर होत आहे.आवर लवकर .नाश्ता तयार आहे."

आईच्या आवाजाने सुमीत विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला.
आणि आईला म्हणाला,"हो आई, जायचे आहे कॉलेजला.मी तयारीच करत आहे. "

आई - "चांगला अभ्यास कर रे सुमीत,आमच्या दोघांची खूप स्वप्ने आहेत तुझ्याकडून आणि कॉलेजमध्ये फक्त शिकायलाच जात जा. इतर गोष्टीत गुंतू नकोस रे बाळा."

सुमीत - "हो गं आई , तुझा आणि बाबांचा माझ्यावर विश्वास आहे ना? मी कॉलेजमध्ये शिकण्यासाठीच जातो. कोणालाही विचार मी कॉलेजमध्ये कसा वागतो ते ."

आई - " तू आमचा चांगला मुलगा आहे. पण आईवडिलांना मुलांची काळजी असते म्हणून सांगावे लागते ना ?"

सुमीत - " बरं आई, मला कॉलेजसाठी उशीर होतो आहे,येतो मी. "

आई - " नीट सांभाळून जा रे ."

सुमीत घरातून कॉलेजमध्ये जाईपर्यंत, आईने आपल्याला सांगितलेले व आपल्या मनातील त्या व्यक्तिविषयीच्या भावना यांचा विचार करत होता.


क्रमशः

🎭 Series Post

View all