तू का नाहीस ?

मॉडर्न नवदुर्गेचा अनोखा निश्चय आणि प्रवास
पंधरा ऑगस्टच्या आधी नुकताच तिचा वाढदिवस झालेला , अठरा पूर्ण झाले होते .

तिच्या कंपूने ठरवलं, चला अठरा पूर्ण झालेत , सगळ्यांनी रक्तदान करूया . स्वातंत्र्य दिनानिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प होताच…... तिथे गेल्यावर सात जणांच्या ग्रुपमध्ये तीन मुली, त्यात ही एक . चारही मुलं रक्तदान करण्यासाठी पात्र ठरली तर हिच्या आधीच्या दोन्ही मैत्रिणी अपात्र कारण एकीचं वजन कमी तर एकीचं हिमोग्लोबिन . आता तपासणीची हिची वेळ आली . हिचेही रक्त तपासल्यावर हिमोग्लोबिन कमी असल्याचे लक्षात आले . रक्त तपासणारा टेक्निशियन उपरोधाने म्हणाला , " कशाला येता तुम्ही मुली ? एकीचं रक्त प्रमाणात नसतं . चुकून एखाद्यावेळेस आला चांगला रिपोर्ट तरी कौतुकापूरते एकदा रक्तदान करायचे आणि नंतर संपला विषय !"

तिला खूप वाईट वाटलं . अरे , काय हे ? मुलगी म्हणून असा अपमान ? पण त्याचेही बरोबर आहे . खरंच कुठे चुकतो आपण बायका ? तिने अभ्यास करायचं ठरवलं . खाण्यातील सवयी , पाळीचे आजार , रक्तदानाबद्दल समज- गैरसमज आणि मुळात मी स्त्री असल्याने हे करू शकत नाही किंवा नाही केलं तरी चालेल असा दृष्टिकोन ही कारणं समोर आली . मग रक्ताची नड किती आहे हा अभ्यास केला तर ती प्रचंड प्रमाणात आहे आणि उलट बायकांमध्ये जास्त आहे हे लक्षात आलं .

तिथून सुरू झाला तिचा प्रवास , कुठला ? स्वतःचं आरोग्य सांभाळून स्वतःला रक्तदानासाठी लायक बनवण्याचा , अनेक महिलांना आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा आणि रक्तदानासाठी महिलांनाही उद्युक्त करण्याचा.....!

दुष्टांचा संहार करून चांगल्या प्रवृत्तीचा विजय म्हणजेच दुर्गा ना ? मग स्त्रियांच्या आरोग्यविषयक वाईट समजुती किंवा आजारांवर माहिती देऊन त्यांच्यातील रक्तदानाच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या ह्या दुर्गेला नवदुर्गा का म्हणू नये ?

आता तुम्हाला प्रश्न पडलाय का, ही नवदुर्गा कोण ? ती मीच आहे ! हो , ही माझीच कथा ! त्या दिवसापासून प्रेरित होऊन मी आजवर पंधरा वेळा रक्तदान केले आहे . स्त्री सुलभ अडथळे म्हणजे दोन वेळा नऊ महिने प्रेग्नन्सी आणि नंतरची स्तनपान करत असतानाची दोन दोन वर्षे , एखादं दुसऱ्या वेळी येणारे आजारपण किंवा पाळीच्या त्रासामुळे कमी झालेले हिमोग्लोबिन हे अडथळे मलाही आले किंवा येतात . तरीही , माझा आहार ( मी पूर्ण शाकाहारी आहे ) , माझे स्त्री आरोग्य आणि माझी रक्तदानाची इच्छाशक्ती ह्या जोरावर मी वर्षातून कमीतकमी दोनदा रक्तदान करतेच ! त्याचबरोबर माझ्या लेखातून , माझ्या आरोग्यविषयक सेशन्स मधून मी स्त्री आरोग्याबद्दल मार्गदर्शन ही करते आणि रक्तदानासाठी महिलांना प्रोत्साहित करते .

असं म्हणतात \" आपली आपण स्तुती करी तो एक मूर्ख \" , मी आज हा मूर्खपणा करते आहे कारण मला समस्त महिलावर्गाला प्रश्न विचारायचा आहे , मी करू शकते, तर तू का नाहीस ?

©️®️ डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर