का खेळलास तू भावनांशी ? ( भाग 4 )

About Love

वर्तमानपत्रातील त्या बातमीने सुमीतने आपल्या मनातील तिच्या विषयीच्या त्या भावना कधीही व्यक्त न करण्याचे ठरवले होते. एकीकडे मनात तिच्याविषयी ओढ निर्माण व्हायची तर दुसरीकडे मन भावनांना आवर घालण्यासही सांगायचे. त्यामुळे सुमीतच्या मनात द्विधा परिस्थिती होऊन खूप त्रास होत होता.तिचा विचार मनात येऊ नये,ती आपल्यासमोर येऊ नये यासाठी तो स्वतःला अभ्यासात व वेगवेगळ्या गोष्टीत गुंतवू लागला. खेळण्यासाठी तिच्या

होस्टेलजवळच्या ग्राऊंडवर न जाता दुसऱ्या ग्राऊंडवर जाऊ लागला. कॉलेजमध्येही पूर्वी प्रमाणे तिच्याकडे पाहण्याचे टाळू लागला. शक्य तितके तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू लागला.

त्या बातमीचा त्याच्या मनावर इतका परिणाम झाला की,आपल्या मनात असलेली तिच्याबद्दलची प्रेमाची भावना त्याने मनातच दाबून टाकली.


इकडे स्नेहलवरही आईबाबांच्या बोलण्याचा परिणाम झालेला होता. आपल्याकडून त्यांना असलेल्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्यांना फक्त आनंदच द्यायचा , या विचाराने स्नेहलही कॉलेज व अभ्यास यात मन गुंतवू लागली. तो नेहमी ग्राऊंडवर ज्या वेळेत असायचा आणि तो दिसावा यासाठी मुद्दामहून त्या वेळेत होस्टेलच्या बाहेर पडायची पण आता ती त्या वेळेला बाहेर पडणे टाळू लागली.कॉलेजमध्ये त्याच्या प्रमाणे तीही त्याला चोरून बघायची, आता ते बंद करून मनावर संयम ठेवू लागली. दोघेही एकमेकांना टाळत होते,त्यामुळे दोघेही समोरासमोर येत नव्हते, पूर्वी सारखी होणारी त्यांची नजरानजरही होत नव्हती.

दोघांनाही आपण काहीतरी मिस करतोय असे वाटत होते आणि दोघांचेही मन रडत होते.


असेचं दोघांचे विरहात दिवस जात होते.



"काय रे सुम्या,सध्या तू खूप शांत शांत आणि उदास राहतोस, पहिल्या सारखा आनंदी दिसत नाही.तुझ्याच दुनियेत हरवलेला दिसतोस..'

सुमीतच्या बेस्ट फ्रेंड्स पैंकी एकाने त्याला विचारले.

"आणि तू आपल्या नेहमीच्या ग्राउंडवरही खेळायला येत नाही."


लगेच दुसऱ्या एका मित्राने प्रश्न विचारला.


आपल्या मित्रांना काय उत्तर द्यावे? खरे कारण सांगावे की काहीतरी दुसरे कारण सांगावे? या विचारात तो काहीही न बोलता शांत बसून होता.

सुमीतच्या तिच्याविषयीच्या भावना त्याच्या जवळच्या मित्रांना कळलेल्या होत्या आणि त्यावरून ते त्याची गंमतही करत होते. पण आता त्याच्या वागण्यात अचानक झालेला हा बदल पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले होते.


"हर दर्द का इलाज दोस्तों के पास होता हैं..सुमीत, बोल तुझे क्या तकलीफ हैं? हम सब मिलकर इलाज ढूँढते हैं।"


सुमीतच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी एक मित्र गंमतीने बोलला.


"अरे, मी इथे टेंशनमध्ये असतो आणि तुम्हांला माझी गंमत करावीशी वाटते..खरचं मित्र आहेत का तुम्ही माझे ? "

सुमीत आपल्या मित्रांना म्हणाला.


"अरे मगं आम्ही तुला तेचं तर विचारत आहोत ,काय टेंशन आहे तुला ? तू सांगणार तेव्हाचं कळेल ना आम्हांला तुझे टेंशन आणि उपायही शोधू तुझ्या टेंशनचा..."

एका मित्राने सुमीतला असे सांगितल्यावर बाकीचेही त्याच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाले,

"सुमीत, सांग जे काही मनात आहे ते स्पष्टपणे सांगून टाक. तुझे मनही हलके होईल व काहीतरी मार्गही मिळेल."


"तुम्हांला कळलेलेच आहे की, आपल्या वर्गातील स्नेहल मला आवडते,जेव्हा पहिल्यांदा तिला पाहिले त्या क्षणापासून तिच्याबद्दल एक वेगळीच जाणीव मला होऊ लागली. आजपर्यंत मी अनेक मुलींशी बोललो,फ्रेंडशिप केली पण तेव्हा असे कधी जाणवलेच नाही ,जे स्नेहलला भेटल्यानंतर जाणवू लागले. आणि फक्त मलाच नाही तर तिच्याही मनात माझ्याबद्दल तिचं भावना असल्याचे जाणवते. तिच्या डोळ्यात मी ते भाव पाहिले आहेत. मला पाहताच तिचाही चेहरा आनंदाने सुखावतो. पण मी जशा माझ्या मनातील भावना तिच्यासमोर शब्दरूपात व्यक्त केल्या नाही. तशाच तिनेही कधी तिच्या भावना माझ्या जवळ व्यक्त केल्या नाही. एवढेचं काय आम्ही अजून एकमेकांशी फ्रेंड म्हणूनही बोललो नाही. फक्त नावाने ओळखतो.

पण आता एक वेगळीच समस्या तयार झाली आहे,

वर्तमानपत्रात त्या दिवशी मी बातमी वाचली की, प्रेमीयुगलाने आपल्या प्रेमाला घरात कोणी स्विकारले नाही म्हणून त्या दोघांनी प्रेमाचा पराभव होऊन एकमेकांपासून दूर जाण्यापेक्षा, आत्महत्या करून जीवन संपवले.मला तर त्यांचे वागणे आवडले नाहीचं पण प्रेमाचा अंत असाही होऊ शकतो यामुळे मला भीतीही वाटू लागली. त्यांनी जर प्रेमचं केले नसते तर आज ते दोघेही जीवनाचा आनंद घेत राहिले असते ना ? म्हणून मलाही स्नेहलबद्दलच्या माझ्या भावना तिला सांगाव्याशा वाटत नाही. समजा आमच्या प्रेमालाही घरून परवानगी नाही मिळाली तर..आमच्या जीवनाचे काय होईल ? या विचाराने मला टेंशन येते."


"सुमीत,तुझे तिच्यावर प्रेमही आहे आणि तिलाही तुझ्याबद्दल प्रेमाची भावना आहे. असे तू म्हणतोय.. आणि असे असूनही तू पुढचा विचार करून मनातल्या भावनांना व्यक्त करत नाही. तू वाचलेल्या बातमीतील त्या दोघांनी आत्महत्येचा जो निर्णय घेतला तो चुकीचाच होता.त्यांनी असे करायला नको होते. त्यांनी यातून काहीतरी दुसरा मार्ग शोधायला हवा होता. आणि सुमीत त्यांनी असे केले,त्यांच्या बाबतीत घरातील असे वागले म्हणून प्रत्येकाच्या बाबतीत असेचं होईल असे आहे का? कदाचित तुमच्या दोघांच्याही घरातून तुमच्या प्रेमाला संमती मिळाली तर, जीवनात आनंदच आनंद ना ! तू निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार कर ना. तुझा तुझ्या प्रेमावर विश्वास असला म्हणजे खूप झालं.नको त्या गोष्टीचं आताच टेंशन घेऊन तू खूप दुःखी झाला आहे. तू तर अजून तुझ्या मनातील प्रेमाच्या अंकुराला मनाच्या बाहेरही येऊ दिले नाही. त्याला बहरण्याचाही आनंद घेऊ दिला नाही. लढाई जिंकण्याअगोदरचं ,

लढण्याअगोदरचं तू हार स्विकारत आहेस. तुझे आणि तिचे प्रेम खरे असेल, तुमचा एकमेकांवर विश्वास असेल तर नक्कीच तुमचे प्रेम यशस्वी होईल. आम्ही तुला आमचे मत सांगितले, मार्ग सांगितला. आता तूचं ठरवं तुला तुझे तिच्यावरील प्रेम व्यक्त करून आनंद घ्यायचा की मनातल्या मनात भावना दाबून आयुष्यभर दुःखी राहयचे. खूप दूरचा विचार करून तू आजचा आनंद गमवत आहेस."


मित्रांच्या या उपदेशानंतर सुमीतच्या मनात अजूनच उलटसुलट विचार सुरू झाले. काय बरोबर आणि काय चूक? हेचं त्याला समजत नव्हते.


स्नेहलही आईवडिलांचा विचार करून आपल्या मनातील सुमीतविषयीच्या प्रेमाला विसरण्याचा प्रयत्न करत होती.त्रास होत होता पण आईवडिलांसाठी आपण एवढे तर सहन करू शकतो ना ?या विचाराने ती इतर गोष्टीत मन रमवून दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत होती.

तिचे रूटीन ठरलेले होते. कॉलेज,होस्टेल व अभ्यास. मैत्रीणींसोबत गप्पागोष्टी आणि सुट्टीत घरी जाणे.


असेच चार पाच महिने झाले असतील. ती आपल्या रूटीन मध्ये चांगली रूळली होती.

आणि एके दिवशी अचानक ती जेव्हा होस्टेलमधून कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. तिला लायब्ररीत काम होते म्हणून एकटीच चालली होती.रस्त्याने ती आपल्याच विचारात जात असताना तिला 'स्नेहल'अशी हाक ऐकू आली. पाहिले तर सुमीत तिला आवाज देत होता. त्याला पाहून तर ती खूप घाबरून गेली. थांबावे की पटकन चालत जावे या विचारात ती गोंधळून गेली.

"स्नेहल, थांब मला तुझ्याशी बोलायचे आहे." सुमीत तिच्या जवळ येऊन बोलू लागला.

स्नेहलला तर त्याच्याकडे पाहण्याचे धाडसही होत नव्हते.


"स्नेहल,ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा पाहिले त्या दिवसापासून, त्या क्षणापासून तू मला आवडायला लागली. खूपदा तुझ्याशी बोलण्याचा,माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण हिंमत होत नव्हती. मला वाटते माझ्या मनात जी भावना आहे तशीच तुझ्या मनातही आहे,हे मी ओळखले आहे. आपण आपल्या भावनांना व्यक्त करू या ना!

स्नेहल, माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे ,आय लव्ह यू स्नेहल . "

सुमीत हे सर्व बोलत असताना तो रडतही होता.

सुमीत हे सर्व बोलत असताना स्नेहल त्याच्याकडे पाहतही नव्हती. फक्त त्याचा रडवेला आवाज आणि शब्द ऐकत होती. त्याच्या बोलण्यावर काहीही न बोलता,कोणतीच प्रतिक्रिया न देता स्नेहल कॉलेजकडे निघून गेली.



क्रमशः


नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all