पत्रास कारण की

टपाल सुविधेचा थोडक्यात इतिहास आणि गोडवा


" प्रिय चिऊ ,

खूप खूप आशीर्वाद!
आजीचं पत्र बघून आश्चर्य वाटलं का ? अगं , परवा मी फोनवर तुला म्हंटलं, आज टपाल दिन आहे त्यावर तू टपाल म्हणजे काय , पत्र कसं असतं , इ मेल आणि व्हिडिओ कॉल असतांना पोस्टाची काय गरज असे प्रश्न विचारलेस म्हणून म्हंटलं तुला पत्रच लिहावं ! तर पत्रास कारण की पत्र वाचून त्यातला गोडवा तुला कळला पाहिजे ना .

हे इंटरनेट आत्ता आलं गं पण त्याने आपलं सगळं जग बदलून टाकलं. हं , आता आपण घेऊ तसं आहे ते, जग जवळ पण आणलंय . ते जाऊ दे, आज पत्राची गोष्ट पत्रातून सांगणार आहे .

फार पूर्वी वॉरन हेस्टिंग म्हणून इंग्रजी ऑफिसर होता तेव्हा साधारण १७७० च्या आसपास कार्यालयीन पत्र म्हणजे तुम्ही म्हणता ना formal लेटर ते पाठवायला पोस्ट भारतात आलं . मग डलहौसी ह्या दुसऱ्या ऑफिसरने \"Indian Postal Act\" कायदा आणून जनसमान्यांसाठी पोस्टाची सोय सुरू केली. पूर्वी तार खातं ही पोस्टात होतं मग ते वेगळे झाले. गम्मत सांगू , १,५४,९६५ इतक्या पोस्ट ऑफिसेस ला सांभाळून ४,१६,०८३ लोकांना रोजगार देणारा भारतीय पोस्ट विभाग जगात टपाल खात्यात नंबर एक आहे आणि तुम्ही मुलं मात्र विचारता , पोस्टाची काय गरज ?

गरज आहे बरं चिऊ ताई.... अगं तू मुंबईत राहतेस, तुझा काका अमेरिकेत आणि मावशी कलकत्त्याला म्हणजे सगळेच मोठ्या शहरात . पण भारतात अजुनही अशी गावं आहेत जिथे अजुन इंटरनेट काय वीज देखील पोहोचली नाहीये . पण तिथे हे पोस्टाचं जाळं आहे बरं का ! आता पोस्ट नुसतंच पत्र नाही पोहोचवत तर कुरिअरसारखं सामान देखील पोहोचवतं , बचतीसाठीचेही प्रमाणपत्र , RD, life insurance असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. आता पोस्टातून बिलेही भरता येतात म्हणे. खरंच रुपडं पालटलंय आता टपाल खात्याचं.

बोर झालीस का ? गम्मत सांगू , तुझे आजोबा पोस्टात कामाला होते बरं. ते पोस्ट मास्टर जनरल असले तरी त्यांना टपाल पोहोचवणाऱ्या पोस्टमन बद्दल खूप आदर होता. ऊन पाऊस , वादळ वारा, सणवार कशाचाही विचार न करता आपले काम ते चोख करतात असं म्हणायचे ते . चिऊताई , अगं तेव्हा पत्र नुसता कागदाचा चिटोरा नसायचा तर भावनांनी भरलेला संदेश असायचा , अजुनही आहे. कधी खुशाली तर कधी गोड बातमी तर कधी नुसत्याच आधार देणाऱ्या चार ओळी अगदी हव्याहव्याशा वाटायच्या. त्या हस्ताक्षरातून दूरवर असणाऱ्या प्रिय व्यक्तीला स्पर्श केल्याचं फिलिंग यायचं आणि इच्छा असो नसो, पापण्या बंड पुकारायच्या व डोळे बोलू लागायचे. आजोबांमुळे तर मला टपाल खात्याविषयी जास्त आदर निर्माण झाला कारण मी बघत होते त्या खात्यात कामसू , प्रामाणिक , कर्तव्यनिष्ठ आणि लोकांना जवळ आणणारी माणसं काम करतात .

पत्रातील मजा ज्यांनी पत्र वाचलंय , लिहिलंय त्यांनाच कळून येते . पत्र , मग ते फॉर्मल असो वा इन्फोर्मल लिहिणं एक कला आहे. तो वारसा कुठेतरी हरवलाय हे खरं पण काळाचा महिमा , त्यापुढे कोण जाणार? तुला पत्रातील जादू कळावी आणि टपालसेवा नेमकं काय ते समजावे म्हणून हा पत्र प्रपंच केला बरं चिऊताई.... तू पण लिहिणार ना ह्या पत्राचं उत्तर ?

तुझ्या आईला आणि जावाईबापूंना अनेक उत्तम आशीर्वाद .

तुझी वाट पाहणारी,
तुझी आजी

ता. क. पत्राचे उत्तर इंग्रजीत नको लिहूस बाई.


डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर