दोष कुणाचा भाग २

General story of a couple

आपण मागील भागात बघितलंय, प्रसादच्या बदललेल्या वर्तनामुळे रागिनीला आश्चर्याच्या धक्क्यावर धक्के बसत होते. रागिनीला प्रसादच्या बदललेल्या वर्तनामागचे मूळ कारण शोधून काढायचे होते, प्रसादचे फोन वरील बोलणे रागिनीला संशयास्पद वाटत होते. प्रसादचा फोन ऐकल्यावर रागिनी रूममध्ये विचार करत बसली होती.रागिनीच्या डोक्यात खूप शंकाकुशंका येत होत्या.रागिनीला प्रश्न पडला होता की आपली शंका प्रसादला कशी काय विचारायची, आणि खात्री काय की प्रसाद आपल्याशी खरचं बोलेल ह्याची. रागिनीचे विचार चक्र चालू होतेच तेवढ्यात प्रसाद आपले फोनवरील बोलणे संपवून रूममध्ये परत येतो.

प्रसाद--- रागिनी कसला विचार करत आहेस? पिल्लू झोपलं वाटतंय, तुला झोप येत नाहीये का?

रागिनी--- प्रसाद उद्या सकाळी मॉर्निंग वॉकला येशील का माझ्यासोबत? खूप दिवस झाले आपण सोबत वॉकला नाही गेलो.

प्रसाद--- चालेल राणी सरकार, आपला आदेश मोडायची आमची काय बिशाद.

रागिनी--- सकाळी ५ला उठ मग.

प्रसाद--- ठीक आहे, मला जाग नाही आली तर उठव. Good night.

रागिनी--- Good night.

रागिनी विचार करत असते, उगाच मनात शंका घेण्यापेक्षा प्रसादशी सगळं बोलून क्लिअर करून घेऊया. रागिनी विचार करत करतच झोपते.

दुसऱ्या दिवशी सकाळी ५ला अलार्म वाजतो, रागिनी झोपेतून उठते व प्रसादलाही उठवते. दोघेही ब्रश करतात व फ्रेश होतात, रागिनी सासूबाईंना ईराकडे लक्ष द्यायला सांगते. दोघेही वॉक साठी घराबाहेर पडतात.

रागिनीच्या घराजवळ जॉगिंग ट्रॅक असतो तिथेच हे दोघेही वॉक साठी जातात. 

प्रसाद--- काय मॅडम,आज वॉक करण्याचा मूड कसा काय झाला?

रागिनी--- ईराच्या जन्माआधी आपण रोज वॉक करायला यायचो ना.

प्रसाद--- हो पण ईरा झाल्यानंतर तूच नाही म्हणायचीस ना वॉक करायला यायला.

रागिनी--- प्रसाद आपण जरा वेळ बसूया का?

प्रसाद--- इतक्यात थकलीस पण, ठीक आहे बसूयात.

रागिनी व प्रसाद जॉगिंग ट्रॅक वरच्या एका बाकावर बसतात.

रागिनी--- प्रसाद मला तुझ्याशी थोडं बोलायचे आहे. घरी बोलता आले नसते म्हणून इकडे घेऊन आलेय.

प्रसाद--- अगं मग बोल ना, एवढा विचार का करत आहेस.

रागिनी--- प्रसाद तू मला कालपासून खूप बदलल्या सारखा वाटतोय, तुझ्यातील बदलामागचे काय कारण आहे.

प्रसाद--- बदल आणि माझ्यामध्ये, मी समजलो नाही तुला काय बोलायचे आहे?

रागिनी--- तू मला काल पाठवलेले मॅसेज, तुझं घरी लवकर येणं, माझ्यासाठी दाबेली घेऊन येणं, चहा बनवणं, स्वयंपाक करण्यात मदत करणे,मी बनवलेल्या भाजीचे कौतुक करणे,सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणणे, बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅंनिंग करणे हे सगळं तुला नॉर्मल वाटतंय. काल तू एकदा पण चिडला नाहीस.

प्रसाद--- अगं पण तुझीच इच्छा होती ना की ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे म्हणून, तुझ्याखातरच मी माझ्यामध्ये बदल करून घेतले.

रागिनी--- इतकी वर्ष बोलून बोलून मी कंटाळले तरी तू थोडा पण बदलला नाहीस, आज अचानक एवढा कसा काय बदललास, कुणाच्या सांगण्यावरून तू असा वागत आहेस?

प्रसाद--- मी कुणाच्या सांगण्यावरून का बदलू? एक मिनिट तु माझ्यावर संशय घेत आहे का?

रागिनी--- संशय असं नाही पण तू काल रात्री फोन वर बोलत असताना माझ्या कानावर तुझं थोडं फार बोलणं पडलं म्हणून जरा मनात शंका उत्पन्न झाली.

रागिनीच्या बोलण्यावर प्रसाद मोठयाने हसायला लागतो. रागिनी त्याच्या कडे रागाने पाहते, प्रसाद आपले हसू थांबवण्याचा प्रयत्न करतो.

प्रसाद--- अगं वेडाबाई, मग रात्रीच विचारायचं ना की फोन कुणाचा होता,रात्रभर विचार करत असशील ना.

रागिनी--- तू खरं सांगशील की नाही याची मला शंका होती म्हणून नाही विचारलं.

प्रसाद--- रागिनी तू एक नंबरची वेडी मुलगी आहेस. आजपर्यंत मी तुझ्यापासून काही लपवले आहे का?

रागिनी--- मग असा अचानक कसा काय बदललास? रात्री कुणाशी फोन वर बोलत होतास?

प्रसाद--- रात्री मी माझा कॉलेजचा मित्र रोहनशी फोन वर बोलत होतो, आणि हो मी नक्कीच बदललोय पण हा बदल काही चुकीच्या कारणासाठी नाहीये तर चांगलाच हेतू आहे. इतक्या दिवस मला तुझ्याप्रती व घरच्यांच्या प्रती वाटणारे प्रेम , काळजी कसं व्यक्त करावं हेच कळत नव्हते. मी तुम्हाला सगळ्यांना गृहीतच धरत होतो, सगळ्यात जास्त तुला गृहीत धरत होतो, असं कधीच नव्हते की माझं तुझ्यावर प्रेम नव्हते पण ते व्यक्त करण्याची पद्धतच माहीत नव्हती.

रागिनी--- मग अशी अचानक ह्या सगळ्याची उपरती कशी काय झाली?

प्रसाद--- मागच्या आठवड्यात आमचं गेट टूगेदर होत ना, तेव्हा सगळ्यांचे आपआपले आयुष्याचे अनुभव ऐकल्यावर माझी काय चूक होत होती हे लक्षात आले.

रागिनी--- गेट टूगेदर चा चांगलाच फायदा झाला असं म्हणावे लागेल. असं काय ऐकायला भेटले मित्रांकडून मला तरी सांग. त्याच्या आधी मला सांग, रात्री एवढ्या उशिरा रोहनचा फोन का आला होता?

प्रसाद---गेट टूगेदर मध्ये रोहन असा एकमेव व्यक्ती होता की जो त्याच्या आयुष्यात पूर्णपणे सुखी दिसला, त्याची आयुष्याप्रती कुठलीही तक्रार नव्हती. 

रागिनी--- का? बाकीच्यांच काय झाले? मागच्या वर्षी गेट टूगेदर ला मी आली होती तेव्हा तर सगळेच खुश दिसत होते. आणि विशेषतः निरंजन व श्वेता तर खूपच खुश दिसत होते आणि दिव्या तर तिच्या नवऱ्याच कौतुक करताना थोडीही थकत नव्हती. त्यांच सोड तू पण खुश नाहीये का माझ्यासोबत?

प्रसाद--- मी तुझ्यासोबत खूप खुश आहे पण माझ्या सततच्या चिडचिडेपणा मुळे तुलाही त्रास होतोच ना.आपल्यातही सतत कुरबुरी चालूच असतात ना. दिव्याचा घटस्फोट झालाय, निरंजन व श्वेताच लग्नही मोडकळीस आलंय, त्यांचीही केस पुढच्या आठवड्यात कोर्टात उभी राहतेय. श्वेता गेट टूगेदर ला नव्हती आली.

रागिनी--- निरंजन व श्वेताच तर लव्ह मॅरेज होत ना शिवाय ते जवळ जवळ ५ वर्ष एकमेकांच्या प्रेमात होते ना. दिव्याचा ही नवरा खूप चांगला होता ना, खूप प्रेम दिसत होतं त्यांच्यामध्ये मग अस घटस्फोट घेण्यामागे एवढे मोठे काय घडलं? प्रसाद आणि आपल्यात ज्या कुरबुरी होतात ते नॉर्मल आहे, असे जगात कुठलेच नवरा बायको नाही ज्यांच्यात कुरबुरी होत नाहीत, तू काही काळजी नको करुस, मी तुला कुठेही सोडून जाणार नाही.

प्रसादच्या मित्रांच्या आयुष्यात असं काय घडलं की ते घटस्फोटाच्या टोकाच्या भूमिकेपर्यंत पोहचले जाणून घेऊया पुढील भागात.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all