Feb 23, 2024
बालकथा

आला ग! आला....

Read Later
आला ग! आला....

छोट्या बाल मित्रांनो ही गोष्ट आहे एका आळशी, ऐतखाऊ, भांडकुदळ बायकोची आणि तिच्या साध्या सरळ नवऱ्याची           फार फार वर्षापूर्वी एका छोट्याशा शहरात माधव आणि त्याची बायको चंद्री राहत असतात. माधव हा अगदी साधा , सरळ , सज्जन माणूस असतो, आपण भलं आणि आपलं काम भलं. कोणाच्या अध्यात मध्यात नसणारा, तर त्याची बायको चंद्री ही अतिशय आळशी आणि भांडकुदळ असते. आणि तिला खाण्याचं प्रचंड वेड असतं. दिवसभर चंद्रीचे एकच काम रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक फेरीवाल्याकडुन, चौकातल्या हॉटेलातून आणि दुकानातून जे जे काही नवीन खायचे पदार्थ असतील ते सगळे ती घरी घेऊन येते आणि माधव ऑफिस मध्ये गेल्यानंतर एकटीच खात असते, शिवाय घरातलं ती एकही काम करत नाही सगळी कामं ती माधवलाच करायला लावते.       माधव बिचारा गरीब स्वभावाचा सकाळी उठून झाडलोट,  पाणी भरणे, आंघोळ करून कपडे धुऊन, स्वयंपाक करून तो स्वःताचा डबा भरतो आणि स्वयंपाकाची भांडी घासून त्याच्या कामावर जातो. इकडे चंद्री रस्त्याने केळेवाला गेला की केळी घे, पपई ,सफरचंद ,पेरू आणि त्या त्या मोसमात मिळणारी सगळी फळं ती विकत घेते, आणि दुपारी हॉटेलमध्ये बनलेले कचोरी , समोसे, ढोकळा , मिसळ पाव जे काही त्यावेळी तयार असेल ते सगळं घेऊन येते आणि एकटीच मस्त खाते.     बर खाऊन झाल्यानंतर ती भांडी ही तशीच पडू देते, आणि बाजूलाच सतरंजी टाकून डाराडूर झोपते, त्यामुळे चंद्री दिवसेंदिवस गलेलठ्ठ होते तर बिचारा माधव आणखीन आणखीन रोड होतो. कारण ऑफिसमधून घरी आल्यानंतर माधवला परत सकाळची सगळी भांडी, दुपारचा चहा आणि रात्रीचा स्वयंपाकही करायचा असतो , शिवाय सगळी आवरासावर करून दुसऱ्या दिवशीची तयारी ही तोच करतो.       लग्न झाल्यानंतर सुरुवातीला माधवने चंद्रीला कामाबद्दल म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला पण चंद्री ही त्याच्याशीच भांडण -भांडण भांडली. मुळातच माधवचा स्वभाव शांत असल्याने माधवने तिला काही सांगणेच बंद केले. पण चंद्रीच्या या खादाड स्वभावामुळे माधवला त्याचा पगार पुरत नव्हता. आणि मानसिक शांती नसल्याने तो दिवसेंदिवस खंगत चालला होता. पण एकदा काय होतं!  माधव ज्या ऑफिस मध्ये काम करत असतो तिथे त्याचा एक जुना मित्र दुसऱ्या गावाहून बदलून येतो, जुना जिवलग मित्र मिळाल्याने माधव गप्पा गप्पांमध्ये त्या मित्राला आपली सारी हकीकत सांगतो, माधव चा हा मित्र फार हुशार आणि इरसाल असतो. तो माधवला त्याच गावातल्या एका तांत्रिका कडे घेऊन जातो. माधव त्या तांत्रिक बाबांना आपली सारी हकीकत सांगतो, तांत्रिक बाबा म्हणतात ,"तुझी बायको खरच महाकजाग दिसते रे!, एक काम कर ह्या चार बाहुल्या घे आणि ती रात्री झोपली की तुझ्या घराच्या चार कोपऱ्यांमध्ये "त्या", तुझ्या बायकोला दिसणार नाही अशा पद्धतीने लपून ठेव आणि मग आठवड्यानंतर,  मला काय होतं ते सांगायला ये".         माधव आणि त्याचा मित्र घरी परततात, आणि रात्री चंद्री झोपल्यावर माधव खोलीच्या चार कोपऱ्यांमध्ये त्या बाहुल्या, गुपचुप तिला दिसणार नाही अशा पद्धतीने लपवून ठेवतो.दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तो आपली रोजची सारी कामे आटपून,  कामाला निघून जातो. चंद्री तिच्या हिशोबाने आरामात उठते आणि जे जे हवं असेल ते सगळं विकत आणून दुपारी बारा वाजता जेवायला बसते. पण जसा ती पहिला घास तोंडापर्यंत नेते तिला एक आवाज ऐकू येतो, "आला ग आला!", पाठोपाठ दुसरा आवाज येतो, "सांगू का त्याला?", मग तिसरा आवाज येतो, "असं गं कसं?", आणि चौथा आवाज म्हणतो , "तीचं लक्षणच तसं". या आवाजामुळे चंद्री अगदी घाबरून जाते आजूबाजूला कावरीबावरी होऊन बघायला लागते, पण आजूबाजूला कुणीच नसतं. फक्त सार्वजनिक नळावर काही बायका पाणी भरत असतात. चंद्री तावातावाने त्या बायकां जवळ  जाऊन, त्यांच्याशी भांडण करून, त्यांना त्या नळावरून हुसकावून लावते. घरी आल्यावर ती परत जेवायला बसते, परत तिला तेच आवाज ऐकू येतात."आला ग आला!, सांगू का त्याला, असं गं  कसं? तिचं लक्षण च तंसं". चंद्री आता पुरती घाबरून गेलेली असते, दरवाजातून आजूबाजूला बघते तर कोणीच नसतं, मग ती घराचे सगळे दरवाजे खिडक्या बंद करते. परत जेवायला बसल्यावर तेच आवाज तिला ऐकू येतात. आवाज येणं दुपारी चार वाजतात ,तरी काही थांबत नाही. शेवटी चंद्री सगळा स्वयंपाक झाकून ठेवते आणि नवऱ्याची वाट पाहते. संध्याकाळी माधव घरी येतो आणि पाहतो की अन्न तसंच पडलेलं आहे. तो चंद्री ला विचारतो, "आज जेवली नाही का तू?", त्यावर चंद्री लाडात येऊन म्हणते की मला आज एकटीला जेवावसचं वाटत नव्हतं, एक काम करू तुम्ही आज संध्याकाळी स्वयंपाकच नका करू आपण दोघे रात्री सोबतच जेवू". माधवला मनातल्या मनात खूप हसायला येतं आणि तो तांत्रिक बाबांचे आभारही मानतो, ते दोघं रात्री आनंदाने जेवतात. आणि दुसऱ्या दिवशी माधव परत सगळी काम करून कामावर जातो.        चंद्री परत दुपारी जेवायला बसते तर तिला आदल्यादिवशी प्रमाणेच आवाज येतात, आता तर ती अगदी गर्भगळीत होऊन जाते. परत संध्याकाळी माधव आल्यावर ती दोघंजण रात्री एकत्र आनंदाने जेवतात. दुपारी चंद्री जेवायला बसल्यावर येणारे ते विचित्र आवाज आणि  चंद्री च न जेवणं हे सगळं जवळपास एक आठवडा सुरू असतं. या एका आठवड्यात चंद्राच्या मनात त्या आवाजाबद्दल इतकी दहशत निर्माण होते की ती माधवला म्हणते की, " तुम्ही फक्त ऑफिसातून घरी लवकर या ,  घरातली सगळी कामं आणि स्वयंपाक मीच करत जाईन आणि आपण दोघं सोबत जेवत जाऊ".       त्यामुळे आता माधव आणि चंद्री रोज सकाळ-संध्याकाळ एकत्र आनंदाने जेवतात आणि चंद्री घरातलं सगळं कामही करते.    माधव आणि चंद्री आता आनंदाने आणि समाधानाने एकत्र रहातात.          तांत्रिक बाबांनी दिलेल्या त्या  जदुच्या बाहुल्या माधव त्यांना परत देतो हे वेगळे सांगायलाच नको.  छोट्या दोस्तांनो आपण सगळे शाळेत जातो त्यामुळे जादू च्या बाहुल्या या फक्त गोष्टींमध्येच असतात हे लक्षात असू द्या आणि आळशी आणि ऐतखाऊ लोकांना एक ना एक दिवस नक्कीच धडा मिळतो त्यामुळे आपण सगळे जण प्रामाणिक आणि परिश्रमी होऊन जीवन जगले पाहिजे नाही का?    (सदर लिखाण हे मोबाईल मधून केलेलं असल्याने काही शुद्धलेखनाच्या चुका असल्यास क्षमस्व)       (वाचकहो तुम्हाला माझं लिखाण कसं वाटलं याकरिता आपल्या कमेंट अपेक्षित आहेत. तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर मला फॉलो नक्की करा)


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//