खरा चोर कोण?

Who Is The Thief
खरा चोर कोण?

बादशाह अकबर हा गुणग्राहक तर होता आणि कलाप्रेमी पण होता. अकबराच्या काळात पर्यटन आणि तीर्थाटनालाही उर्जितावस्था प्राप्त झाली होती. तीर्थयात्रेवरचा करही अकबराने माफ केला होता. त्यामुळे अकबराच्या काळात दळणवळणही वाढले होते.

तीर्थाटन आणि दिल्लीची सहल करायला एकदा एक ब्राह्मण दिल्लीला गेला. तो दिल्लीत कुणालाही ओळखत नव्हता. दिवसभर दिल्लीतील काही स्थळे त्यांने पाहीली आणि संध्याकाळी एका दुकानाच्या समोर तो बसला होता. दिवसभराच्या श्रमाने तो थकला होता, त्याला भूकही लागली होती. त्याच्याकडे फारसे पैसेही नव्हते. ज्या दुकानासमोर तो ब्राह्मण बसला होता त्या दुकानाच्या मालकाला त्या गरीब ब्राह्मणावर दया आली आणि त्या व्यापाराने त्याला आश्रय दिला. स्वतःच्या घरी नेऊन त्याला जेवण दिले आणि रात्री झोपायला एक खोलीही दिली.

त्या दिवसांमध्ये दिल्लीत चोरांनी फार हौदोस घातला होता. चोरांना पकडण्यासाठी अकबराचे शिपाई रात्री संपूर्ण शहरात फिरून पहारा देत होते. चोरांना पकडण्यासाठी शिपाई सारख्या आरोळ्या देत 'जागते रहो.' परंतु अकबराच्या या शिपायांपैकीच एक शिपाई स्वतःच चोर होता. रात्री पहारा देता देता शहरात फिरताना तो छोट्या-मोठ्या चोऱ्या करत असे.

ब्राह्मण ज्या व्यापाराच्या घरी रात्री झोपला होता, तेथे तो शिपाई येऊन धडकला. ब्राह्मणच्या खोलीत झोपला होता त्या खोलीच्या भिंतीला भगदाड पाडून शिपाई आत घुसला. त्या खोलीच्या एका कोपऱ्यात घराच्या मालकाची एक कुलूप लावलेली पेटी होती. शिपाई ती पेटी उचलून जायला निघाला. त्याचा खूडबुड, खुडबुड आवाज ऐकून ब्राह्मण जागा झाला. त्याने पेटी घेऊन पळणाऱ्या शिपायाला पकडले.

शिपाई मोठा चतुर होता, त्याने ब्राह्मणाला आमीष दाखवले,"तू मला सोडून दे या पेटीत जे काही असेल त्यातील अर्धा भाग मी तुला देईन." पण ब्राह्मणाने ते काही मान्य केले नाही,

ब्राह्मण म्हणाला,"ज्या माणसाने मला या अनोळखी शहरात आसरा दिला, खायला अन्न दिलं, त्याच्याच घरात चोरी होताना मी गप्प बसू? मला हे मान्य नाही आणि तू शिपायाचा वेश घालुन चोऱ्या करतोस? तुला काहीच कसं वाटत नाही रे? थांब तुला आत्ता खऱ्या शिपायांच्या हवाली करतो!" तो आरडाओरडा करून घर मालकाला उठवणारच होता, तेवढ्यात शिपायानेच ओरडायला सुरुवात केली,"अरे पकडा पकडा, चोर चोर!"

आतल्या खोलीतला हा सगळा आरडाओरडा ऐकून व्यापारी जागा झाला आणि तिथे आला. व्यापाराला बघून शिपाई त्याला म्हणाला,"हा ब्राह्मण तुमची पेटी घेऊन पळून जात होता म्हणून मी त्याला पकडले आहे, बघा याने घराला भगदाड सुद्धा पाडले आहे."

ब्राह्मणाच्या हातातली पेटी बघून व्यापाराला शिपायाचे बोलणे खरे वाटले. शिपायाने चोराला पकडले होते, म्हणून हा मामला राजदरबारात पोहोचला. शिपाई, ब्राह्मण आणि व्यापारी या तिघांना बादशहा अकबरासमोर हजर केले गेले.

शिपायाचे आणि ब्राह्मणाचे म्हणणे दरबारात हजर असणाऱ्या बिरबलाने लक्षपूर्वक ऐकले आणि सर्वात पहिले आपल्या एका विश्वासू माणसाच्या कानात काहीतरी सांगितले आणि त्याला बाहेर पाठवले.

इकडे बादशहा मात्र पेचात पडला. त्याला ब्राह्मणाचेही म्हणणे खरे वाटे आणि शिपायाचेही! शेवटी निवाडा करण्यासाठी त्याने बिरबलास सांगितले.

बिरबलाने शिपाई आणि ब्राह्मणाला आपल्याजवळ बोलावले. त्याने त्या दोघांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. इतक्यात बिरबलाने बाहेर पाठवलेला माणूस तिथे धावत धावत आला. तो बिरबलाला म्हणाला,"सरकार मी आणि माझा मुलगा महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. मंदिरातून बाहेर निघतानाच माझा मुलगा खाली पडला आणि बेशुद्ध झाला त्याला तिथून उचलून दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी मला तुम्ही दोन माणसं द्याल का?"

बिरबल म्हणाला, "तू इथेच थांब. माझं तुझ्याकडे एक छोटंसं काम आहे. मी या शिपायाला आणि ब्राह्मणाला मंदिरात पाठवतो ते तुझ्या मुलाला मंदिरातून उचलून इथे घेऊन येतील. तू त्याची काळजी करू नकोस."

शिपाई आणि ब्राह्मण मंदिरात पोहोचले. त्यांनी बेशुद्ध पडलेल्या मुलाला उचलले. परत येताना रस्त्यामध्ये ब्राह्मण, शिपायाला म्हणाला,"मित्रा तूच त्या व्यापाराच्या घराला भगदाड पाडलंस, तूच त्याची पेटी घेऊन पळून जात होतास, मी तर तुला चोरी करण्यापासून थांबत होतो मग लोकांसमोर खोटं बोलून मला या चोरीच्या खोट्या आरोपात का अडकवलंस?"

शिपाई म्हणाला,"तुझं म्हणणं खर आहे, पण आता त्याला काहीही अर्थ नाही. मी चोरीच्या मालातला अर्धा भाग तुला देईन असं म्हटलं होतं. पण तरीही तू ऐकलं नाहीस. म्हणून आता तुला शिक्षा भोगावी लागेल."

अशाप्रकारे आपापसात बोलत बोलत मुलाला उचलून ते दोघे बिरबलाकडे येऊन पोहोचले. त्यांनी त्या मुलाला खाली झोपवले.

बिरबलाने, शिपाई आणि ब्राह्मणाला पुन्हा खरे बोलण्यासाठी समजावले. "हे बघा! तुम्ही दोघे अजिबात आढेवेढे घेऊ नका आणि खरं खरं सांगा चोरी कोणी केली?" परंतु ते दोघेही चोरीचा आरोप एक दुसऱ्यावर करत राहिले.

बिरबल म्हणाला, "तुम्ही दोघे जर असेच करत राहिलात, तर मी खरा चोर कसा शोधणार?"

बिरबलाचा प्रश्न ऐकून बेशुद्ध पडलेला मुलगा उठून उभा राहिला. तो बिरबलाला म्हणाला, "खरा चोर हा शिपाईच आहे. यानेच ब्राह्मणाला या चोरीच्या खोट्या आरोपात अडकवले आहे." नंतर त्या मुलाने ब्राह्मण आणि शिपाई यांच्यात रस्त्यामध्ये झालेले बोलणे बिरबलाला सांगितले.

आता खरा चोर कोण? हे बिरबलाला आणि बादशाह अकबराच्या दरबारातील सगळ्यांनाच कळले होते. बादशहाने ब्राह्मणाला सन्मानपूर्वक सोडून दिले आणि शिपायाला शिक्षा करून तुरुंगात पाठवले.

परत एकदा बादशहाला आणि दरबारातील सगळ्यांनाच बिरबलाचे बुद्धीच्यातुर्य मान्य करावे लागले.


©® राखी भावसार भांडेकर.
नागपूर.



🎭 Series Post

View all