Jan 19, 2022
मनोरंजन

खरा नशीबवान कोण?

Read Later
खरा नशीबवान कोण?

खरा नशिबवान कोण??

मी,विद्याधर यशवंत गोरे. मी व माझा धाकटा भाऊ नामदेव. नामदेव माझ्याहून दोन वर्षाने लहान. 

लहानपणी मला नाम्याचा फार राग यायचा. मला वाटायचं आई त्याचेच जास्त लाड करते. नाम्या फार लबाड होता. आधी माझी कळ काढायचा. मी शांत बसलो तर त्याला अजुनच चेव चढायचा. तो माकडचाळे करुन मला खिजवायचा तेही आईच्या अपरोक्ष. 

नाम्याच्या मस्तीला मी वैतागलो की आईला साद घालायचो पण आई नेमकी कामात असायची. मग मी त्याला चांगलाच रट्टा द्यायचो. त्याची पाट शेकवायचो. तो कर्कश्य आवाजात रडत आईकडे जायचा. त्याच्या डोळ्यातून पाणी,नाकातून शेंबूड गळत असायचा. आईला त्याचीच दया यायची. 

मी माझी बाजू मांडायचा विफल प्रयत्न करायचो. आई म्हणायची,"विदया लहान भाऊ आहे नं तो तुझ्या पाठीवरला. त्याला सांभाळून घ्यायचं." आजी नाम्याचा गंजीफ्रॉक वर करायची व म्हणायची,"विदया,दगडाचे काळीज आहे का रे तुझे? केवढ्याने मारलेस कोवळ्या चामडीवर. पाचही बोटे उमटलेत बघ कशी. हैवान होतास का रे गेल्या जन्मी? मी खाली मान घालून ऐकून घ्यायचो.

आजी खोबरेल तेल नाम्याच्या पाठीला चोळायची. आई त्याला गुळपापडी खायला द्यायची. त्याचं तोंड पुसायची.  नाम्या आजीच्या मांडीवरून मला हळूच ठेंगा दाखवायचा. मी परत त्याचे नाव सांगायचा निष्फळ प्रयत्न करायचो. आई त्याला अगदी हळूच दामटायची. मला रागच यायचा. मला नेहमी जास्त ओरडा,जास्त शिक्षा आणि नाम्याला कमी पण खाऊच्या बाबतीत मात्र उलटं होतं. 

बाबा कधी फरसाण,कधी चिवडा आणायचे. नाम्याला नेहमी माझ्यापेक्षा जास्तच खाऊ मिळायचा. समान वाटे केले तरी तो रडून,लोळून जास्त घ्यायचा.

 मी रुसलो तर आई सांगायची,"अरे विदया तू मोठा आहेस ना. लहान भावाचे लाड पुरवावेत हो. मी रागात म्हणायचो,"यंदा पाचवीत गेला. अजून किती दिवस लहान रहाणार?"
आजीला बाकी कमी ऐकू येत असलं तरी मुद्द्याचं मात्र बरोबर ऐकू येई. मग ती तिच्या सानुनासिक स्वरात बोले,"विदया तो कितीही मोठा झाला तरी तुझ्यापेक्षा लहानच रहाणार आणि कनिष्ठ बंधुचे लाड ज्येष्ठ बंधूला पुरवावेच लागतात हो."

शाळेतल्या अभ्यासातही नाम्या माझ्यापेक्षा हुशार होता. त्याचं पाठांतर लवकर व्हायचं. तो लिखाण,पाठांतर आवरुन खेळायला पळायचा. मी मात्र एकाच प्रश्नावर डोकं फोडत रहायचो. कधी चुकून लवकर पाठ झालच व खेळायला गेलो तर सारखं माझ्यावरच राज्य यायचं. बाकीचे सगळे रडीचा डाव खेळायचे.

पेपर मिळाले की नेहमीच नाम्याला माझ्याहून जास्त गुण असायचे. वडील म्हणायचे,"लहान भावाची अक्कल घे जरा." मला रागच यायचा कारण माझा अभ्यास व त्याचा अभ्यास वेगळा असायचा तरी आमच्यात तुलना व्हायची. 

पुढे कॉलेजातही नाम्या परीक्षेसाठी अभ्यास करताना काही मोजकेच प्रश्न करुन जायचा व तेच नेमके प्रश्नपत्रिकेत असायचे.माझं बेड लक जोमात असायचं..मी वर्षभर अभ्यास करायचो तरी जे प्रश्न मी वेळेअभावी सोडलेले असायचे तेच नेमके प्रश्नपत्रिकेत माझ्या डोळ्यासमोर फेर धरुन नाचायचे.

सततच्या बेडलकमुळे माझा शिक्षणातला रस उडाला. कसंबसं जेमतेम पदवीपर्यंत शिकलो व एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला लागलो. सकाळी सातच्या गाडीने ऑफिसला जायचो. रात्री घरी येईस्तोवर नऊ साडेनऊ वाजायचे. बॉस नेहमीच जास्त काम करुन घ्यायचा. पगार मात्र वाढवत नव्हता. 

नाम्याने एमकॉम केलं,पुढे एमएड करून प्रोफेसर झाला. कॉलेजच्या नोकरीसोबत त्याने स्वतःचा कोचिंग क्लास काढला. त्याचं नशीब जोरावर होतं. कॉलेज आमच्या घरापासून वीस मिनटाच्या अंतरावर क्लासेसही तिथेच त्यामुळे त्याला प्रवास करावा लागत नव्हता.

आई,आता सुनेसाठी माझ्याकडे तगादा लावत होती. एक स्थळ बघताना नाम्याही आमच्यासोबत आला होता. मुलगी खरंच खूप सुंदर होती. केतकी वर्ण,काळेभोर डोळे, लांबसडक केसांचा दाट शेपटा,कमनीय बांधा..शिवाय डबल ग्रेज्युएट..कुठेही नाव ठेवण्यास जागा नव्हती.

 मला मुलगी पसंत पडली पण तरीही तीर्थरुपांनी त्यांना चार दिवसात कळवू असे सांगितले.. आणि काय,थोड्याच दिवसात मुलीकडच्यांच पत्र आलं की मुलीला कनिष्ठ बंधू आवडले. पुन्हा एकदा माझ्या नशिबाने माती खाल्ली. मी बघायला गेलो ती मुलगी आता माझी वहिनी बनून ग्रुहप्रवेश करणार होती.

माझं लग्न ठरतच नव्हतं. माझा सावळा रंग कधी आड येई तर कधी माझी कमी उंची तर कधी माझी बिन भरवशाची प्रायव्हेट नोकरी. शेवटी घरच्यांनी माझ्या लग्नाआधी नाम्याचं लग्न करायचा निर्णय घेतला. मीही मुक संमती दिली. न देऊन जाणार होतो कुठे आणि नाम्या काही शत्रू नव्हता माझा. माझ्या पाठचा सख्खा भाऊ होता. त्याच्यावर माया,वात्सल्य होतंच. 

नाम्याची बायको दामिनी,हिच्यासोबत तिची मैत्रीण नंदिनी पाठराखीण म्हणून आली होती. आईला तिची चालचलणूक आवडली. नंदिनी दिसायला काळसावळी असल्यामुळें तिचं लग्न ठरत नव्हतं इतकच बाकी तिच्यात नाव ठेवायला कुठेच जागा नव्हती. 

नाम्याच्या लग्नमांडवात माझं व नंदिनीचं लग्न फिक्स झालं. त्यानंतर अवघ्या एक महिन्यात आमचं लग्न झालं. नाम्या बायकोला घेऊन हनिमुनसाठी सिमलाला गेला होता. असं हनिमुनसाठी कुठे लांब फिरायला जाण्याएवढी माझी ऐपत नव्हती.

 पुन्हा एकदा मी नाम्यासमोर थिटा पडलो होतो. पण नंदिनीने कधीही मला माझ्यातला थिटेपणा जाणवू दिला नाही. तिने आमच्या खोलीतच आमचा हनिमुन साजरा केला. मला भरपूर प्रणयसुख दिलं. प्रणयसुखाशी रंगरुपाचा दुरान्वयेही संबंध नसतो तर त्यासाठी साथीदारावर निर्मळ,निर्व्याज प्रेम असावं लागतं हे मला नंदूने पटवून दिलं. मी माझ्या संसारात रमलो. 

नाम्याची पत्नी,दामिनी नोकरी करणारी होती. त्या उभयतांनी वरळीतल्या उच्चभ्रू वस्तीत दोन बेडरुमचा फ्लेट घेतला. ती उभयता तिथे रहावयास गेली.

 आमची जुनी चाळ पाडावयाचे ठरले. मी तिथे जवळच वन बीएचके घेतला. आजी कधीच गेली होती काळाच्या पडद्याआड. मी व नंदिनी आईबाबांना माझ्या ब्लॉकवर घेऊन आलो. त्यांना बेड,ड्रेसिंग टेबल..सारी व्यवस्था केली. गेलरीत लाकडी झुला बांधला.

 कर्जाचे हफ्ते फेडताना नाकीनऊ यायचे. नंदूने माझी होणारी ओढाताण जाणली व तीही पोळ्या लाटायला जाऊ लागली. तितकाच घराला हातभार लागे. नंदू सासूसासऱ्यांच्या देखरेखीत काही कमी ठेवत नव्हती पण म्हणतात नं दुरुन डोंगर साजिरे तसा माझ्या आईचा जीव हा धाकट्या सूनबाईवर,दामिनीवरच अधिक होता. नंदूने आईला आपलंस करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण नंतर तिने तो नाद सोडला. 

नाम्याला पहिला मुलगा झाला. माझ्या आईवडिलांना कोण आनंद झाला. त्यांनी नातवासाठी सोन्याची चेन,अंगठी केली. त्यानंतर दिडेक वर्षात माझ्या नंदूलाही दिवस गेले. बाळंतपणात ती दिवसेंदिवस अधिकच खुलून दिसत होती. आम्हाला मुलगी झाली. माझ्या नंदूचेही सर्वांनी कौतुक केले पण हात राखूनच. 

पुढे एक वर्षात आम्हाला मुलगा झाला. नाम्याने एका मुलावरच थांबवलं. साहजिकच माझ्या कुटुंबाचा खर्च हा त्याच्या कुटुंबाच्या खर्चापेक्षा जास्त असायला हवा होता पण नंदू फार काटकसरी होती. कोंड्याचे मांडे करुन घालण्याइतपत पाककौशल्य होतं तिच्याकडे.

रिझल्ट लागला की नाम्याचा फोन यायचा,त्याच्या मुलाला अमुक अमुक टक्कै पडले म्हणून,सोबत त्याला मिळालेल्या मेडल्सचे फोटो धाडायचा. माझी मुलं अभ्यासात माझ्यासारखीच सुमार होती. कुठे नातेवाईकांकडे गेलो की नाम्याच्या मुलाच्या प्रगतीमुळे त्याची कॉलर टाइट असायची. नातेवाईक माझ्या मुलांचेही मार्कँस विचारायचे व सांगितले की सहानुभुतीच्या नजरेने माझ्याकडे, माझ्या मुलांकडे बघायचे. 

एकदा एका नात्यातल्या लग्नासाठी माझे आईवडील,मुलौ,सौ परगावी गेले होते. घरात मी एकटाच होतो म्हणून मी नाम्याला बोलवून घेतलं. नाम्या आज खांबा,चकणा घेऊन जय्यत तयारीनिशी आला होता. मी बिरयानी,चिकन शोरमा मागवून घेतले होते. जेवणं झाल्यावर टेरेसमधे टेबल मांडून आम्ही मदिरापानास सुरुवात केली. आकाशात टिप्पूर चांदणं पडलं होतं. नारळाच्या झावळ्यांतून चंद्रकोर चकाकत होती. तिचा सौम्य,शीतल प्रकाश भुईवर पखरला होता.

थोडी चढल्यावर मी म्हणालो,"नाम्या,जिंदगी असावी तर तुझ्यासारखी यार. नो टेंशनवाली. मानाची नोकरी, जोमात चाललेले क्लासेस, सर्विसवाली बायको,हुशार पोरगा,टुबीएचकेचा फ्लेट तोही शहरात,दोन कार,बाईक. नायतर साला माझी जिंदगी..'रोज त्या गर्दीचा एक भाग व्हायचं. मेंढरासारखं लोकलमधून बाहेर पडायचं..हाफिसात बॉसची हांजी हांजी करायची,कुणीही यावं टपली मारुन जावं असा नेभळट स्वभाव,पोरंही सुमार बुद्धीवाली, बायको साधीसुधी काळसावळी.

 नाम्या,लेका दोघे सख्खे भाऊ आपण पण प्राक्तनं किती विरोधी आहेत नं आपली.  तू पहिल्यापासूनच हुशार,माझ्यापेक्षा वरचढ..सगळ्याच गोष्टीत..खेळात,अभ्यासात..त्यामुळे आई,आजी,बाबा सारेच कौतुक करायचे तुझं. मी उपऱ्यासारखाच लहानाचा मोठा झालो."

नाम्याने अजुन दोन पेग बनवले. माझ्या खांद्यावर हात ठेवला नि म्हणाला,"दादा,दिसतं तसं नसतं रे. तुला माझं वरवरचं हसू दिसतं पण रात्रभर मी तळमळत असतो ते कुठे माहित आहे तुला! दामिनी,दिसायला लाखात एक. तिने तुझ्याऐवजी मला पसंती दिली होती नि आता..आता मी आवडत नाही तिला. माझ्या सवयी आवडत नाहीत. मधे तिला म्हणालो होतो की महिनाभरासाठी आईवडिलांना आपल्या घरी आणुया तर सरळ नकार दिला तिने. तिला मी,माझे नातेवाईक नको आहेत रे. तिला फक्त माझा पैसा हवा पैसा."

"अरे पण तीही पगार घेते ना!"

"तो पुरतोय कुठे तिला! तिच्या किटी पार्टीज शिवाय एखाद्या मैत्रिणीने किंवा बहिणीने महागातला सेट घेतला की ही तिच्याहून चढ्या दामाचा घेणार. एखादी वस्तू घेताना खरंच त्याची गरज आहे का याचा विचार नाही. घराचं रिनोवेशन,महागडं फर्निचर, महागड्या गाड्या यामुळे कर्जबाजारी झालोय मी. क्लासही तितकासा जोरात चालत नाही आतासा. कॉम्पिटीशन जोरात असते या क्षेत्रात. कधीकधी डोकं फुटायची वेळ येते. जीव द्यावासा वाटतो."

"अरे असं वाटलं की लेकाकडे बघायचं."

"लेक..लेकाला माणुसकी आहे कुठे. खोऱ्याने मार्क्स मिळवणारा तो एक रोबोट झालाय. त्याला माझ्याबद्दल अजिबात आपुलकी नाही. कधी दोन शब्द मायेचे माझ्या सोबत बोलत नाही. दादा तुला वाटतं मी लकी आहे पण जरा माझ्या आरशातून बघ रे तुला तू नशीबवान दिसशील. तुझ्यावर मनापासून प्रेम करणारी पत्नी आहे तुझ्याजवळ जी आपल्या आईवडिलांना विनातक्रार अगदी आनंदाने सांभाळते. 

तुझ्या थोड्याशा पगाराला हातभार लागावा म्हणून चार घरी पोळ्या लाटते,तुझ्या मुलांवर योग्य ते संस्कार घडवते. कातडीचा रंग आयुष्याची वाट चालताना उपयोगी नाही पडत. तिथे आवश्यकता असते ती आरसपानी मनाच्या जोडीदाराची जो तुला लाभलाय. तुझी मुलं भलेही साधारण बुद्धीची असतील पण आयुष्यात येणाऱ्या संकटांशी जिद्दीने कसं तोंड द्यायचं हे नंदिनीने त्यांना शिकवलय. 

याउलट माझा लेक..गेल्या दोन परीक्षांत त्याला हवे तसे गुण मिळाले नाही तर डिप्रेशनमध्ये गेला आहे. त्याच्यापुढे गेलेल्या त्याच्या मित्राला त्याने वाटेत गाठून बेदम मारलं. पोलिस केस झाली होती. कसाबसा त्या पोलिसांना बाबापुता करुन चिरंजीवाला सोडवून आणलं. आता सांग दादा खरा नशीबवान कोण? तू का मी?"

नाम्याचे हे बोलणे ऐकून माझी नशा खाडकन उतरली. दोन दिवसांनी बायको,मुलं,आईवडील घरी आले. मी सगळ्यांची माफी मागितली.

 बायकोला आयुष्यात पहिल्यांदा जुईचा गजरा आणला. त्या वेडीने तो अर्धा करुन आधी सासूला माळला मग स्वतःच्या केसात माळला. मी म्हंटलं,"चल आपण दोघं बाहेर जाऊ जेवायला तर म्हणाली त्यापेक्षा मीच बनवते तुमच्या आवडीच्या पाकातल्या पुऱ्या,बाबांच्या आवडीच्या अळुवड्या,आईंसाठी केळ्याचं शिकरण आणि मुलांसाठी भजी. मी म्हंटलं,तुझ्यासाठी? त्यावर म्हणाली,"माझ्या आवडीचं काय हे मी विसरुनच गेली पण तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिलं की खरंच माझं मन आपोआप भरतं. त्रुप्त मनाला मग कोरडी चटणीभाकरही तितकीच गोड लागते जितकं शाही पक्वान्न."

मी देवाला म्हणालो,"देवा,माझ्या हातात परीस असताना मी सोनं शोधत फिरत होतो." आता मात्र निश्चय केला.. आहे त्यात समाधानी रहाण्याचा. जमेल तशी नाम्याला मदत करण्याचा.

********

नमस्कार,
खरंच आपल्या सर्वांत असा एक विद्याधर असतो जो स्वतःला नेहमी कमनशिबी समजतो. आपल्याजवळ असलेल्या वस्तुंचं,गुणांच समाधान मानण्यापेक्षा आपण इतरांकडे आपल्यापेक्षा काय जास्त आहे ते पहाण्यात नि स्वतःच्या आयुष्याला नावं ठेवण्यात बरेच पुढे निघून जातो. 

पैलतीर जवळ आला की कळतं,अरे किती सुंदर क्षण येऊन गेले आयुष्यात पण आपण त्यांचा आस्वाद घेतलाच नाही. आयुष्य जगायचं राहुनच गेलं. 

आयुष्यात आपण पैसा भरपूर मिळवू पण तो पैसा देऊन यमराजाकडे अजुन एक तासाचं आयुष्य मागितलं तर तो देईल का? आपण सगळेच नशीबवान आहोत म्हणून देवाने आपल्याला हा मनुष्यजन्म दिला आहे. त्या विश्वनिर्मात्याचे आभार मानुया.????

--------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now