Oct 18, 2021
कथामालिका

कोण होती ती?...भाग 10.

Read Later
कोण होती ती?...भाग 10.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now


कोण होती ती....? भाग 10.


©रेश्मा आणि साक्षी.


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)


*******************************************


(मागील भागात आपण पाहिलं, इन्स्पेक्टर अरविंद ना अभिज्ञाची डायरी वाचताना काही धागेदोरे लागत होते... आणि अचानक अभिज्ञाच्या डायरीत पाटलांच्या पत्नीचा म्हणजेच लक्ष्मी चा उल्लेख झाला आणि त्या अभिज्ञाला काहीतरी सांगतात....आता पुढे....)

"अग पोरी हे समदे माझ्या नशिबाचे भोग हायत... आमचे मालक तसे चांगले हायत गं पर एकदा त्यांच्या रागाचा पारा चढला का ते काय करतील त्याचा नेम न्हाय....

हे जे दोघं बाहेर उभे आहेत नव्हं, त्यांच्याकडून आमचे मालक बेकायदेशीर कामं करून घेत्यात...."लक्ष्मी काकू सांगत असताना मी त्यांना मधेच विचारलं, "बेकायदेशीर म्हणजे नक्की कोणती कामं?"

तेव्हा त्या म्हणाल्या,"गावात दारूच्या भट्ट्या तर हायतच पर त्याचबरोबर गावातील समद्या लोकांना गांजा बी दिला जातोया...एवढंच न्हाय तर तिथं गरीब लोकांना म्हंजी ज्यांना पैशाची गरज हाय अश्या लोकांना दारू अन गांजा देत्यात अन नशेत असतानाच त्यांच्या सह्या घेऊन त्यांच्याच जमिनी बळकावत्यात.....

ते बी कामं हे दोघं सवता न्हाय करत ती कालेज ची पोरं असत्यात ना, त्यांना पैशाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून करून घेत्यात....

मला हे समदं पटत न्हाय पर काय करू, त्यांच्या विरोधात बोलले म्हणून माझी ही अवस्था झाली हाय..."

त्यावर मी त्यांना तुम्ही पोलीस चौकीत जाऊन तक्रार का नाही करत? असं विचारलं तर त्या म्हणाल्या,"पोरी, मला घरातून बाहेर जायची परवानगी न्हाय हाय....आत्ता माझी तब्येत बरी न्हाय असं न्हाय, मला हा तरास लय आधीपासून होतोय पर तेव्हा कुणी माझ्याकडे लक्ष दिलं न्हाय.... काल अचानक तरास वाढला म्हणून तुला बोलावलं....

अन तू सांगितलं म्हणून म्या इथं हाय...ते बी ह्या दोन लांडग्यांबरोबर...!"

तेवढ्यात बराच वेळ झाला म्हणून ते दोन्ही गुंड आत आले आणि म्हणाले,"अजून किती येळ? ए डाक्टर झालं का न्हाय?"

मध्येच ते दोघे आत आल्याने काकूंनी मला गप्प बसण्याचा इशारा केला आणि लगेच स्वतःचे डोळे पुसले....

"हो झालं.... तरीसुद्धा मी काही टेस्ट लिहून दिल्या आहेत त्या आपल्याकडे होणं शक्य नाही, तुम्ही तालुक्याच्या गावी जाऊन ह्या टेस्ट करून घ्या...आणि मला रिपोर्ट्स आले की दाखवा...."मी त्यांना सांगितलं....

"ए ते मालक ठरवतील, तू न्हाय...! चला मालकीणबाई..!" असं म्हणून ते दोघं काकूंना क्लीनिक मधून घेऊन गेले....

माझ्या मनात सतत काकूंनी सांगितलेल्या गोष्टींचं विचारचक्र सुरू होतं....मी या सगळ्याची खात्री करण्यासाठी गावातील दारूच्या भट्टीचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.....

रात्री आठच्या सुमारास भट्टीचा शोध घेत असतांना माझं लक्ष गावात आत असलेल्या एका जंगलाजवळ जाणाऱ्या निर्मनुष्य ठिकाणी असणाऱ्या पडक्या घरासारखं काहीतरी होतं त्याकडे गेलं....

ते घर जरी बाहेरून पडकं दिसत असलं तरी आतून प्रकाशाचा झोत येत होता....मी थोडं पुढे जाऊन पाहिलं, तर तीच दारूची भट्टी होती....

आणि जसं लक्ष्मी काकू म्हणाल्या तसंच तिथे घडत होतं, नशेत असताना ज्या लोकांना पैसे हवे आहेत त्यांच्या कडून सह्या घेत होते आणि खोटी आश्वासने देत होते.... आणि हे सगळं करणारे दुसरे तिसरे कोणी नसून काकूंबरोबर आलेले ते दोन गुंडच होते....

मी काही पुरावे गोळा करून घेऊन मग पोलिसात जाणार होते... पण मी काही पुरावे म्हणून फोटो काढणार तेव्हा अचानक दोन-तीन बेवडे माझ्या शेजारी आले आणि अंगाशी येऊ लागले, म्हणून मी तिथून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळाले....

दुसऱ्यादिवशी सकाळीच अचानक तेच दोन्ही गुंड माझ्या क्लीनिक मध्ये आले आणि मला जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले....

तेव्हा मला आठवलं त्यांनी जी धमकी मला सर्रास दिली तशीच्या तशी धमकी सीमाला दिली गेली होती आणि ही माणसं तीच होती....

त्यातला एक जण उंच, धिप्पाड, चेहेऱ्यावर टाके घातलेली खूण..... आणि दुसरा धिप्पाड पण थोडासा ठेंगणा, सावळ्या रंगाचा, त्याच्या हातावर टाके घातलेले, पाठीवर कुबड आलेलं....

जणू हे दोघेही त्यांच्या गुंडगिरीच्या व्यवसायात बरीच वर्ष मुरलेली आहेत....."

इन्स्पेक्टर अरविंद नी हे सगळं वाचलं आणि अभिज्ञाच्या डायरीचा शेवट झाला....

"अभिज्ञाच्या डायरीत केलेल्या उल्लेखानुसार त्या दोन गुंडांचं वर्णन, ती काळी गाडी.....

माझ्यावर हल्ला, तो हल्ला करणारे गुंड आणि ती काळी गाडी..... याचा काहीतरी संबंध आहे...!" इन्स्पेक्टर अरविंद ना स्वतः वर झालेला हल्ला आठवला....

त्यांनी लगचेच हेड कॉन्स्टेबल सावंत ना फोन लावला, "सावंत, मला अभिज्ञाच्या डायरीतून बरीच माहिती मिळाली आहे तुम्ही लवकर चोकीवर या..."

"साहेब तुम्हांला लागलं आहे, अशा परिस्थितीत तुम्ही घरीच आराम करायला हवा... हवं तर मी येतो तुमच्या घरी..." सावंत काळजीने इन्स्पेक्टर अरविंद ना म्हणाले....

"नको सावंत...! मी ठिक आहे एवढं काही नाही झालं... आणि तुम्ही येऊन मला मलमपट्टी केली आहे म्हणजे बरं वाटणारच ना..!" इन्स्पेक्टर अरविंद हसून म्हणाले....

"काय साहेब मस्करी करताय..! ठीक आहे मी पोहोचतो चौकीवर, तुम्ही सावकाश या..." सावंत इन्स्पेक्टर अरविंद ना म्हणाले....

काही वेळात इन्स्पेक्टर अरविंद चौकीवर पोहोचले....सावंत आधीच चौकीत पोहोचले होते....

डी.सी.पी साहेब देखील चौकीवरच होते....

"सावंत, बरं झालं ए.सी.पी साहेब आत्ता चौकीत नाहीयेत...!" इन्स्पेक्टर अरविंद सावंत ना म्हणाले....

"हो, त्यांना डी.सी.पी साहेबांनीच बाहेर पाठवलं, आणि मला सांगितलं की इन्स्पेक्टर कुलकर्णी आले की लगेच केबिन मध्ये या...."सावंत नी इन्स्पेक्टर अरविंद ना सांगितलं....

"हो चला..." असं म्हणून इन्स्पेक्टर अरविंद आणि सावंत डी.सी.पी साहेबांच्या केबिनकडे गेले......

"सर, मे आय कम इन?" इन्स्पेक्टर अरविंद नी डी.सी.पी साहेबांना विचारलं....

"येस, कुलकर्णी अहो या...! तुमचीच वाट बघत होतो मी.... मगाशी तुमचा फोन आला तेव्हाच लगेच मी ए.सी.पी भोसलेंना एका केससाठी बाहेर पाठवलं....

तुमची तब्येत बरी आहे ना? म्हणजे मला सावंत नी सांगितलं सगळं...!" डी.सी.पी साहेबांनी आपुलकीने इन्स्पेक्टर अरविंद ना विचारलं....

"हो सर....!
मी अभिज्ञाची डायरी वाचली, त्यातून असं लक्षात येतंय की पाटलांच्या दारूच्या भट्ट्या आहेत आणि त्याचबरोबर गांजा सप्लाय करण्याचे देखील काम पाटीलांची माणसं करतात....त्याचप्रमाणे गरजू लोकांना पैशाचं आमिष दाखवून त्यांच्या जमिनीदेखील बळकावतात.....

अभिज्ञाच्या डायरीत लिहिल्यानुसार, पाटलांच्या पत्नी म्हणजेच लक्ष्मी राजाराम पाटील यांना देखील हे सगळं पटत नव्हतं, पण त्यांना सुद्धा विरोधात बोलल्याने मारहाण केली गेली आणि म्हणून त्या या सगळ्या गोष्टींपासून दूर राहू लागल्या....

अभिज्ञा देखील त्या दारूच्या भट्टीजवळ गेली होती त्यामुळे आपल्याला त्या भट्टीचा शोध घ्यायला मदत मिळेल.....

अभिज्ञा त्या भट्टीचा शोध घेत घेत तिथे पोहोचली म्हणून पाटलांच्या गुंडांनी तिला धमकी दिली, आणि तीच धमकी सीमाला देखील देण्यात आली होती....

एवढंच नव्हे तर अभिज्ञाच्या डायरीत केलेल्या गुंडांच्या वर्णनानुसार माझ्यावर हल्ला करणारे गुंड देखील तेच होते......

त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की, त्या गुंडांना आपण जर आपल्या ताब्यात घेतलं तर आपल्याला नक्कीच काही ना काही माहिती मिळेल...."इन्स्पेक्टर अरविंद नी सगळा प्रकार डी.सी.पी साहेबांना सांगितला.....

"ठीक आहे.....तुम्ही त्या दारूच्या भट्टीवर धाड टाका म्हणजे नक्की काय प्रकार आहे तो कळेल...!"डी.सी.पी साहेबांनी इन्स्पेक्टर अरविंद ना सांगितलं....

"ओके सर...!"असं म्हणून इन्स्पेक्टर अरविंद आणि सावंत त्यांच्या बाईकवरून भट्टीवर धाड टाकायला गेले...

"अभिज्ञाच्या डायरीत लिहिल्यानुसार ती भट्टी याच जंगलाजवळच्या ठिकाणी आहे..."इन्स्पेक्टर अरविंद सावंत ना म्हणाले....

"हो साहेब, जागा हीच वाटतेय.... ते बघा बरीच लोकं इथे दारूच्या नशेत आहेत... आणि त्यांच्याकडून सह्या घेतल्या जातायत..."सावंत इन्स्पेक्टर अरविंद ना म्हणाले....

"वाटतेय नाही, आहे सावंत...! ते बघा तेच ते दोन गुंड आहेत ज्यांनी माझ्यावर हल्ला केला होता....तुम्ही एक काम करा, ह्या दोघांचेही माणसांच्या सह्या घेताना फोटो काढा...."इन्स्पेक्टर अरविंद सावंत ना म्हणाले....

सावंत नी लगेचच त्या गुंडांच्या नकळत त्यांचे फोटो काढले आणि अचानक इन्स्पेक्टर अरविंद नी त्या भट्टीवर धाड टाकली.... सावंत नी आधीच त्या दोघांचे फोटो काढून पुरावे घेतल्याने दोघांनाही लगेच चौकीत न्हेलं....

"बोल, नाव काय तुझं?" सावंत नी त्यातल्या एका गुंडाला विचारलं...

"रंगा...!" एक जण म्हणाला....

"आणि तुझं रे..?" इन्स्पेक्टर अरविंद नी रागात विचारलं...

"कुबड्या...!" दुसरा म्हणाला....

तोवर डी.सी.पी साहेब तिथे आले....

"चला लवकर बोला काय करत होतात तुम्ही?" डी.सी.पी साहेबांनी दोघांना विचारलं....

"कुठं काय दारूच्या भट्टीवर दारू पित व्होतो, दुसरं काय करणार....!"दोघं उद्धटपणे म्हणाले....

"कुलकर्णीss...! या दोघांकडून सगळ्या प्रकारे माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करा... आणि नाहीच ऐकलं तर थर्ड डिग्री द्या...
पण काहीही करून यांच्याकडून आपल्याला माहिती काढायला हवी, त्याशिवाय आपण त्या गावच्या पाटलांना काहीच बोलू शकत नाही....
मला लवकरात लवकर रिपोर्ट हवाय....."असं म्हणून डी.सी.पी साहेब तिथून निघून गेले.....

"साहेब....साम, दाम, दंड, भेद सगळं करून झालं, पण रंगा आणि कुबड्या काहीच बोलायला तयार नाहीयेत...!" सावंत इन्स्पेक्टर अरविंद ना म्हणाले.....

"वाटलंच होतं मला...! आता मी बघतो, तुम्ही काळजी करू नका...."इन्स्पेक्टर अरविंद सावंत ना म्हणाले....

थोड्याच वेळात इन्स्पेक्टर अरविंद नी रंगा आणि कुबड्या कडून माहिती काढण्यासाठी तेल आणि टायर मागवले.....

टायरमध्ये घालून पाठीला तेल लावून दोघांनाही चाबकाने चोप दिला... आधी दोघही काही बोलत नव्हते पण नंतर मात्र बोलायला तयार झाले....

"आsssss...! साहेब, सांगतो, सांगतो....! मारू नका..."दोघही कळवळत म्हणाले....

"अब आया उंट पहाड के नीचे...! चल पटापट बोल आता, काय काय काळे धंदे करता तुम्ही?..."इन्स्पेक्टर अरविंद नी विचारलं....

"साहेब, आम्ही समदं पाटलांच्या सांगण्यावरून करतो... आम्हांसनी त्या कामाचं चिक्कार पैकं बी मिळत्यात....
आम्ही दोघं बी गरीब, गरजू लोकांसनी दारू पाजतो, गांजा देतो अन त्यांच्याकडन नशेत असतांना त्यांच्या जमिनीच्या कागदपत्रांवर सह्या घेतो....
मग ते कागद मालकांकडे म्हणजेच पाटलांकडे देतो, मग पाटील त्या लोकांच्या जमिनी बळकावत्यात...."चांगलाच चोप मिळाल्याने आता मात्र दोघही चुरुचुरू बोलायला लागले होते.....

"सागर आणि अभिज्ञाला का गायब केलंत?" इन्स्पेक्टर अरविंद नी विचारलं.....

तसे दोघेही थोडे घाबरले, पण इन्स्पेक्टर अरविंद च्या हातातील चाबूक बघून म्हणाले, "साहेब ते बी आम्हांसनी पाटलांनीच सांगितलं व्हतं बघा..."

"मग आता कुठे आहेत ती दोघं?"इन्स्पेक्टर अरविंद नी विचारलं....

"साहेब ते.... ते...."दोघही चाचपडत बोलत होते....

"काय ते? आता का त त प प होतंय बोला लवकर.... बोलता का देऊ एक...!"इन्स्पेक्टर अरविंद नी दोघांनाही खरं सांगण्यास भाग पाडलं....


*******************************************


रंगा आणि कुबड्या हे पाटलांचे दोन हात, ते दोघेही सगळं खरं खरं सांगतील?...

ह्या सगळ्यातून खरं काय ते समोर येईल?...

रंगा आणि कुबड्या ने जर नंतर सगळा आरोप स्वतः वर घेतला तर....!

या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन भेटुयात पुढच्या भागात.....


क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Reshma Sonawane

Housewife

Listening and reading