Oct 24, 2021
कथामालिका

कोण होती ती...? भाग 9.

Read Later
कोण होती ती...? भाग 9.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
कोण होती ती.....? भाग 9.

©रेश्मा आणि साक्षी.


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)


(माझ्या घरात काही पर्सनल प्रॉब्लेम झाल्याने मी भाग लवकर पोस्ट करू शकत नाही त्यासाठी क्षमस्व.... पुढचा भाग लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन....)
*******************************************

(मागील भागात आपण पाहिलं, इन्स्पेक्टर अरविंद ना घरी जात असताना काही गावगुंडांनी रस्त्यात गाठलं आणि अभिज्ञाची केस बंद करण्यासाठी धमकावून जखमीसुद्धा केलं......पण तरीसुद्धा इन्स्पेक्टर अरविंद नी अभिज्ञाची केस अजूनही बंद केली नाही, त्यांना मिळालेली ती अभिज्ञाची डायरी त्यांनी वाचण्यास उघडली..... आता पुढे.....)डायरीच्या सुरुवातीच्या पानांवर अभिज्ञाने स्वतःच्या आवडीनिवडी लिहिल्या होत्या....तिच्या आवडीनिवडी खूप साध्या होत्या...जसे, नक्षीकाम, चित्र हुबेहूब काढणे आणि बरंच काही....

इन्स्पेक्टर अरविंद नी पुढची काही पानं वाचली त्यात अभिज्ञाने तिची एक आठवण लिहिली होती, ज्यामुळे तिला डॉक्टर बनायचं होतं..... म्हणून इन्स्पेक्टर अरविंद नी ते पान वाचायला सुरुवात केली....

"आज अचानक राजूला ताप भरला आणि उलट्या सुरू झाल्या, डोळे पिवळे झाले होते.... सगळी काविळीची लक्षणं होती....पण गावात कोणीच डॉक्टर नसल्याने त्याला मावशीनी औषधी पालापाचोळा गोळा करून औषधोपचार केले.....

पण त्यामुळे त्याला जास्तच उलट्या होऊ लागल्या.... त्यावेळी मी दहावीत शिकत होते, आजूबाजूच्या जवळच्या गावात सुद्धा एकही डॉक्टर नव्हता....आणि जर तालुक्याच्या ठिकाणी जायचं झालं तर मावशीकडे एवढे पैसेही नव्हते.... आणि उपचाराअभावी मला माझा सख्खा मावस भाऊ गमवावा लागला....

गावातील अनेक मुलांना कावीळ झाली होती, त्यांनी देखील आयुर्वेदिक औषधे करून, चुना हातावर घासून, झाडू डोक्याला लावून कावीळ उतरवणे सगळे पर्याय लोकांनी केले पण काहीच उपयोग झाला नाही.....गावातील परिस्थिती तशीही काही फारशी चांगली नव्हती.... लोकांकडे जास्त पैसे नसल्याने त्यांनी देखील तालुक्याच्या गावी जाण्यासाठी नाइलाजाने नकार दिला.....

गावात काविळीची साथच पसरली होती.... तेव्हाच मी ठरवलं आता आपण डॉक्टर बनायचं.... आणि कमी पैशात व ज्यांची परिस्थिती नाही त्यांना मोफत उपचार करून द्यायचे.....

म्हणून दहावीनंतर मी सायन्स घेतलं.... बारावीला मला 89% मिळाले..... आई-बाबांची ही ईच्छा होती की मी डॉक्टर बनाव....

म्हणून मी तालुक्याच्या गावी जाऊन एम.बी.बी.एस कॉलेज ची चौकशी केली.... एम.बी.बी.एस चं कॉलेज नाशिकला होतं.... मी त्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं, मला स्कॉलरशिपवर ऍडमिशन मिळालं....

तिथेच माझी ओळख सीमा, दीप्ती, अनघा, आणि हर्षदा यांच्याशी झाली....आम्ही सगळ्याजणींनी मिळून सुरुवातीच्या काळापासूनच खूप मज्जा मस्ती केली....

बघता बघता आमचा एम.बी.बी.एस चा कोर्स पूर्ण झाला..... आता इंटर्नशीप आणि नंतर MD केलं की मी माझा दवाखाना या गावात उघडू शकेन....

आता नावाआधी डॉक्टर लागणार आहे पण इंटर्नशीप केली तर थोडा अनुभव मिळेल आणि इंटर्नशीप केल्याशिवाय MD चा कोर्स करता येणार नाही, म्हणून मी इंटर्नशीप विषयी चौकशी करायला निघाले.....

मुंबईतील काही ठिकाणच्या इंटर्नशीप बद्दल कॉलेज मध्ये काहीजण बोलताना ऐकलं होतं....

मी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.... मी मुंबईला चौकशी करण्याकरता निघाले.... बरीच चौकशी केल्यानंतर मला एका हॉस्पिटलमध्ये इंटर्नशीपसाठी जागा उपलब्ध मिळाली....

त्याच दिवशी त्यांनी माझा नॉर्मल इंटरव्ह्यू घेतला आणि मला पुढच्या दोन दिवसात जॉईन व्हायला सांगितलं....

ही छान बातमी मी घरी येऊन आई-बाबांना दिली, ते सुद्धा खुश झाले.... पण आता प्रश्न होता माझ्या राहण्याचा..... मुंबईत आमच्या ओळखीचं कोणीच नव्हतं....

थोडीफार माहिती मी स्वतः मोबाईल वरून काढली.... तेव्हा माझ्याकडे नवीनच फोन होता त्यामुळे नक्की कसा वापरायचा हे काही माहिती नसल्याने मी त्यातून तोडकी-मोडकी माहिती मिळवली.....

त्या माहितीनुसार मुंबईत अनेक गर्ल्स हॉस्टेल आहेत त्यात अनेक मुली सतत प्रवास जमत नाही म्हणून येऊन राहतात..... मी सुद्धा गर्ल्स हॉस्टेल च्या शोधात पुन्हा मुंबईत आले कारण दोन दिवसात मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं......

हॉस्पिटलपासून पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर एक गर्ल्स हॉस्टेल होतं, त्या हॉस्टेल वर मी चौकशीसाठी गेले....

तिथेच माझी ओळख तिथले वॉर्डन मुकुंद शिर्के यांच्याशी झाली.... त्यांनी हॉस्टेलचे सर्व नियम व अटी नीट समजावून सांगितल्या.... तसेच एका रुम मध्ये दोन जणी असं राहावं लागेल, हे सुद्धा सांगितलं....

मी होकार दिला तेव्हा त्यांनी मला सांगितलं, " हे बघ, तुझ्यासोबत रूम मध्ये कोण असेल हे तुला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून मी तुला नाव सांगतो तुमची ओळख होईल हळूहळू..... तुझ्या रूम पार्टनरचं नाव सीमा नाईक आहे...."तेवढ्यात त्यांचा फोन वाजला आणि माझा फॉर्म भरून सगळ्या फॉर्मेलिटी पूर्ण करून झाल्या होत्या, म्हणून त्यांनी मला जायला सांगितलं....

माझं एक टेंशन कमी झालं असल्याने मी आनंदात होते....दुसऱ्याच दिवशी सकाळी माझं थोडं सामान घेऊन मी होस्टेलवर आले... रूम मध्ये पाऊल टाकताच समोर सीमा दिसली....मला आश्चर्य वाटलं आणि आनंद ही झाला.....

सीमा देखील मला बघून खुश झाली....तीदेखील आताच रूमवर आली असल्याने आम्ही दोघींनी मिळून आमचं सामान लावलं...

खूप गप्पा मारल्या, गप्पा मारता मारता आमच्या हेही लक्षात आलं की ज्या हॉस्पिटलमध्ये मी इंटर्नशीपसाठी जॉईन झाले आहे त्याच हॉस्पिटलमध्ये सीमाही जॉईन झाली आहे.....

आमचं रोजचं रुटीन सुरू झालं....आणि आमची मैत्री घट्ट होतं गेली....दिवसभरात घडलेली प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकींशी शेअर करायचो....

सगळं काही चांगलं सुरू असताना अचानक एक दिवस ह्या सगळ्याला दृष्ट लागावी तसं काहीसं झालं, सीमाच्या भावाचा म्हणजे सागरचा सीमाला फोन आला....
मी तिच्याबरोबर रूममध्येच होते....त्याने तिला काहीतरी सांगितलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच काळजी दिसू लागली.....

मी तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली, की सागरला कॉलेजला जायला लागल्यापासून संगत चांगली मिळाली नाही.... आणि त्याचा कमी वेळात पैसे कमावण्याचा नाद..... यामुळे काही टपोरी मुलांनी त्याला जुगार, लॉटरी ह्या सगळ्यांत ओढलं....

त्याला ह्या सगळ्यात पडू नको सांगून सुद्धा त्याने ऐकले नाही, आणि आता मध्यंतरी तो एक काम करत होता.... म्हणजे त्याचे सगळेच मित्र त्यागून जास्त पैसे मिळतात म्हणून ते काम करतात.....

पण आज त्याला वेगळीच माहिती मिळाली, ती म्हणजे इतके दिवस त्यांच्याकडून जी पाकीटं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवली जातायत त्यात गांजा आहे.....

त्याला हे काम करायचं नाहीये पण ते लोक त्याला हे काम सोडू देत नाहीयेत.....

सीमा फार काळजीत दिसत होती.... मी तिला शांत केलं, आधार दिला...पण काही वेळातच तिला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला, आणि जवळजवळ धमकीच दिली, की तुझ्या भावाला आम्ही सांगतोय ते काम करायला सांग नाहीतर त्याला मारून टाकू....

त्यांनतर सागरचा फोन काही लागला नाही.... त्याच्या मित्रांकडे चौकशी केली पण त्यांना सुद्धा तो कुठे आहे याची काहीच कल्पना नव्हती....सीमाला सतत धमकीचे फोन येऊ लागले, त्यामुळे तिचं BP shoot होऊ लागलं.....

एकदा अचानक तिला एक पार्सल आमच्या रूममध्ये पाठवण्यात आलं.....आणि सागर त्या लोकांच्या ताब्यात आहे ते सीमाला आधी आलेल्या फोन मध्ये सांगण्यात आलं होतं.....

आणि ते पार्सल सुद्धा तिला बोरीवलीजवळ एकेठिकाणी पोहोचवायचं होतं....तिला आधीच बराच स्ट्रेस होता, म्हणून ती हॉस्पिटलमध्ये मध्ये गेल्यावर मीच ते पाकीट घेतलं आणि त्या फोनवर सांगितलेल्या वेळी मी तिथे जाण्याचा निर्णय घेतला...

मी काही गोष्टी नीट ठरवल्या होत्या.... मी माझ्या गळ्यातील लॉकेट मध्ये एक हिडन कॅमेरा लावला जेणेकरून सागर कोणाच्या ताब्यात आहे ह्याचा पुरावा माझ्याकडे राहावा.... आणि त्या माणसांमुळे ह्या सगळ्याचा सूत्रधार पकडला जावा.....

मी पार्सल घेऊन त्या ठिकाणी पोहोचले....पावसाळ्याचे दिवस होते आणि अंधारसुद्धा होता, अचानक एक ट्रक आला आणि मला धडक देऊन निघून गेला..... पण मला एवढं नक्कीच माहिती आहे की माझ्या व्यतिरिक्त तिथे एक व्यक्ती होती, माझ्यामुळे त्या व्यक्तीचा सुद्धा अपघात झाला हे मला तेव्हाच कळलं होतं, आणि नंतर मी बेशुद्ध झाले.......

मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी माझ्या मामाच्या घरी होते.... माझ्या हाताला आणि डोक्याला प्लास्टर केलं होतं..... पायाला सुद्धा थोडीफार जखम होती....घरात कोणीच दिसत नव्हतं, मला सीमाची फारच काळजी वाटू लागली म्हणून मी हळूहळू घराबाहेर पडले.....

गावाच्या चौकाजवळ मला सीमा दिसली.... मी तिला हाका मारणार तोच तिथे दोन गावगुंड आले.....

"अरे तू जित्ती हाय अजून? ठीक हाय चल, तुझा भाऊ तर हाय ना आपल्याकडे.....अन ए तू जर आता कोणाला काय सांगायला गेली तर तुझं अन तुझ्या भावाचं तुकडं करून फेकून देऊ.....! हा पर तुझी नवीन मैत्रीण हाय ना तिला बी सांगून ठेव मांजरीसारखी आडवी येऊ नको म्हणावं....!" सरळ धमकी देऊन निघून गेले.....

मी हे सगळं काही माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि कानांनी ऐकलं.... पण त्यावेळी मी परत घरी गेले, सीमा घरी आल्यावर तिने मला औषध दिलं जे ती गावात कुठे मिळतंय का हे पाहण्यासाठी गेली होती....

पण ते औषध शेवटी मामा नी तालुक्याच्या गावी जाऊन आणलं होतं..... सीमाने मला औषध दिलं, मामा सुद्धा शेतात निघून गेला होता....

मी सीमाला सागरबद्दल विचारलं पण तिने काही उत्तर दिलं नाही.... जाणूनबुजून ती माझं बोलणं टाळत होती....म्हणून मी तिला आपण सरळ पोलिसात जाऊयात असं सांगितलं, तेव्हा मात्र ती बिथरली.....

आणि म्हणाली, "मला काम आहे मी निघते.... आणि हो, माझ्या भावाच्या आणि माझ्या मध्ये तू पडू नकोस.....आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं ते....!" हे सगळं ती माझ्या भल्यासाठी बोलत होती पण तिचा उर मात्र दाटून आला होता हे तिच्या आवाजावरून समजत होतं..... आणि ती निघून गेली....

थोडे दिवसांनी माझी जखम बरी झाली आणि मी पुन्हा मुंबईला आले.....आता मात्र सीमा आधीची सीमा राहिलेली नव्हती, तुटक पणे बोलणं, माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं, सतत छोट्या कारणांवरून वाद घालणं सगळं तिने सुरू केलं होतं.... पण सगळं रूमच्या आत......रूमच्या बाहेर कोणाला कळायचंही नाही की आमच्यात वाद झाला असेल....

नंतर आमची इंटर्नशीप संपली आणि आम्ही आपापल्या मार्गी लागलो....मला MD ची डिग्री मिळाली आणि मी आमच्याच गावात छोटासा दवाखाना सुरू केला......

आजूबाजूच्या गावातील लोक सुद्धा दवाखान्यात येऊ लागले होते.....एक दिवस अचानक बरेच पेशंट येत होते, सगळ्यांना एकच त्रास होत होता तो म्हणजे, सर्वांना अशक्तपणा आणि हृदयाचे ठोके मध्येच कमी होणे तर मधेच वाढणे.....ही सर्व लक्षणं व्यसनाची होती, मी येणाऱ्या प्रत्येक पेशंटला व्यसनमुक्त होण्यास सांगितलं आणि काही औषधं लिहून दिली....

त्यादिवशी एका काकांबरोबर एक काकू माझ्या दवाखान्यात आल्या होत्या....त्या काकांना सुद्धा अगदी आधीच्या रुग्णांसारखीच लक्षणे आढळली...मी त्यांना सुद्धा व्यसनमुक्त होण्यास सांगितलं....तेव्हा काकू मध्येच बोलल्या,"अग पोरी, जोवर त्यो पाटील त्याच्या दारूच्या भट्ट्या बंद करत न्हाय तोवर ह्या अन आजूबाजूच्या गावातील माणसं व्यसनमुक्त व्हणार न्हाईत...!

अन एव्हढच न्हाय, माझी चुलती हाय ती बाजूच्या गावात राहते....तिनं बिचारीने इश्वासानं पाटलाकडं जमीन गहाण टाकली, पर आता तिनं त्याला पैक परत देऊन बी त्यानं तिची जमीन काय तिला परत दिली न्हाय....लय पैशाची हाव हाय त्याला...!" काकूंच्या सांगण्यावरून पाटलांची सगळी नकारात्मक बाजू माझ्या डोळ्यासमोर आली होती....

तेवढ्यात अचानक दोन धिप्पाड माणसं दवाखान्यात आली आणि अरेरावीच्या सुरात म्हणाली,"ए डाक्टर, लवकर चल पाटीलांच्या वाड्यावर बोलवलं हाय....मालकिणबाईंची तब्येत बरी न्हाय...आताच्या आत्ता चल....!"

नक्की काय झालं असेल हे माहिती नसल्याने मी लगेचच त्या दोन्ही माणसांबरोबर त्यांच्या काळ्या रंगाच्या गाडीत बसून पाटलांच्या वाड्यावर पोहोचले.....

वाडा अतिशय सुंदर, अगदी पूर्वजांनी जसा ठेवला असेल तसाच असावा कारण बाहेर व्हरांडा त्या व्हरांड्यात एक मोठा झोका, छान रंगीबेरंगी फुलझाडं, दाराच्या चौकटीवर जुनं अतिशय रेखीव असं नक्षीकाम.....असा तो वाडा बघताक्षणी कोणालाही आवडेल असा होता....

तिथेच बाजूला पत्ते खेळत बसलेल्या दोन माणसांकडे माझं लक्ष गेलं.... मी ह्यांना कुठेतरी पाहिलंय पण कुठे?, ते माझ्या लक्षात येत नव्हतं.....

तेवढ्यात तिथे पाटील आले आणि मला धमकीच दिली...."आमच्या मालकीणबाईंना काय झालंय ते बघायचं.... अन जे काय औषध-पाणी लागंल ते करायचं, पैशाची काळजी करायची न्हाय.....पर लक्षात ठेव आमच्या मालकीणबाईसनी काय झालं तर तुझी काय खैर न्हाय....."

आणि त्यांनी मला मालकीणबाईंची खोली दाखवली.... त्या खरंच कळवळत होत्या, विव्हळत होत्या.... मी त्यांना नक्की काय होतंय विचारलं, तेव्हा त्या म्हणाल्या माझ्या पोटात खूप दुखतंय.....

मी त्यांना चेक केलं.... आणि पेंक्युलर बरोबर एक इंजेक्शन दिलं......
"काय ओ डाक्टरीण बाई काय झालं हाय आमच्या मालकीणबाईस्नी?..." पाटलांनी मला विचारलं....

"मी त्यांना सध्या इंजेक्शन दिलंय, त्या शांत झोपल्या आहेत.....उद्या तुम्ही त्यांना क्लीनिकवर घेऊन या मग आपण काही टेस्ट करू....." मी पाटलांना सांगितलं...

"बरं बरं...! पर त्यास्नी काही झालं ना तर तुझा दवाखाना शाबूत राहणार न्हाय....!" पाटील चिडून म्हणाले, आणि मला त्याच काळ्या गाडीतून परत क्लीक्निकला सोडण्यास सांगितलं.....

मी माझी कामं आटपून घरी गेले व दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच क्लीनिकला पोहोचले.....

तोवर मला काल ओळखीची वाटणारी ती दोन माणसं त्यांच्या मालकीणबाईंबरोबर माझ्या क्लीनिकमध्ये आली.....

मला पाटलांच्या पत्नीचं नाव माहिती नव्हतं आणि मला त्यांना चेक सुद्धा करायचं होतं... म्हणून मी त्या दोन माणसांना बाहेर जाण्यास सांगितलं.....

"ए आम्ही आमच्या मालकीणबाईंना सोडून कुठं बी जाणार न्हाय....तू तुझं काम कर...!"ते दोघेही त्यांच्या गुंडगिरीच्या भाषेत बोलत होते.....

तेव्हा त्यांच्या मालकीणबाईंनीच त्या दोघांना बाहेर जाण्यास सांगितलं म्हणून ते दोघे बाहेर जाऊन थांबले....

मी त्यांना त्यांचं नाव विचारलं... तेव्हा त्यांनी त्यांचं नाव लक्ष्मी असं सांगितलं..... आज त्या जरा कालच्यापेक्षा बऱ्या वाटत होत्या..... पण अजूनही अशक्तपणा होता, म्हणून मी त्यांना सलाईन लावलं....

सलाईन लावतांना मला त्यांच्या हातावर काही व्रण दिसले जणू कोणीतरी त्यांना मारहाण केली असावी....

मी त्यांना सलाईन लावलं आणि त्या व्रणाबद्दल विचारलं.... तश्या त्या अचानक रडायला लागल्या आणि बाहेर आवाज जाऊ नये म्हणून हळू आवाजात मला सगळं काही सांगू लागल्या.....

*******************************************


अभिज्ञाच्या डायरीतून थोडेफार धागेदोरे मिळायला सुरुवात तर झाली पण यातून पूर्ण माहिती मिळेल?.

पाटलांच्या पत्नी लक्ष्मी यांच्याकडून अभिज्ञाला काही माहिती मिळेल?.

अभिज्ञाला ओळखीची वाटणारी माणसं नक्की कोण होती?

या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन भेटुयात पुढच्या भागात....

क्रमशः

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Reshma Sonawane

Housewife

Listening and reading