Oct 18, 2021
कथामालिका

कोण होती ती..?भाग 3..

Read Later
कोण होती ती..?भाग 3..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now


कोण होती ती....? भाग 3.


©रेश्मा आणि साक्षी..


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)


*******************************************

(मागील भागांत आपण पाहिलं, आदित्यला त्याच्या जुन्या आठवणीतील एक आठवण, म्हणजेच त्याचा अपघात आठवला....आता पुढे...)


दुसऱ्या दिवशी पहाटे सहाच्या सुमारास आई हॉस्पिटलमध्ये आली....
"अहो, म्हणजे तुम्ही काल रात्री माझ्याशी खोटं बोलून इथे आलात?,
मला तेव्हाच का नाही सांगितलं?,
कसा आहे माझा आदि?,
काय म्हणाले डॉक्टर?,
कसं झालं हे सगळं?,
तरी मी ह्या मुलांना सतत सांगत असते, गाडी नीट आणि हळू चालवा, पण माझं कोणी ऐकेल तर शप्पथ...!"आईने रडतच बाबांना प्रश्न विचारायला सुरुवात केली....

"शांत हो अश्विनी.... आताच माझं डॉक्टरांशी बोलणं झालंय, येईल आदि संध्याकाळपर्यंत शुद्धीवर..!"बाबांनी आईला धीर दिला....

तेवढ्यात समिधा आणि रिया तिथे आल्या....आज कुठे जरा समिधा शांत, रिलॅक्स वाटत होती....

रियाने बाकी सगळ्यांना घरी जायला सांगितले....पण कोणीच ऐकत नाही हे पाहून समिधा म्हणाली, "काका मी आणि रिया आहोत काकूंबरोबर आणि मी आता आदित्य शुद्धीवर आल्याशिवाय इथून हलणार नाही...!"

कालपर्यंत एकही शब्द जिच्या तोंडून बाहेर येत नव्हता त्या समिधाने आज एका मिनिटांत एवढं सगळं बोलून टाकलं....

आता मात्र सगळ्यांना खात्री पटली, की आज समिधा काल रात्री काय घडलं हे नक्की सांगेल.....
आणि बहुतेक समिधासुद्धा मनाशी निश्चय करूनच आली होती...आज सगळ्यांना न घाबरता सगळं सांगायचंच....

संध्याकाळी बाबा, नेहा, सिद्धार्थ, आणि सुयश एकत्रच हॉस्पिटलमध्ये आले.....

"अग समिधा, रिया कुठे गेली??" नेहाने विचारलं....

"मी इथेच आहे ग! मला माहितीये तुम्ही सगळ्यांनी सकाळपासून काहीच खाल्लं नसणार.... म्हणून कॅटिंग मध्ये जाऊन सगळ्यांसाठी खायला घेऊन आले आहे....
आता काहीही कारणं न देता सगळ्यांनी खाऊन घ्यायचंच..! असं म्हणत तिने बळजबरीने सगळ्यांना चार घास खाऊ घातले......

संध्याकाळी पाच-साडेपाच च्या दरम्यान मी शुद्धीवर आलो....

डॉक्टरांबरोबर जणू आई-बाबा, समिधा, नेहा, रिया, सुयश आणि सिद्धार्थ माझी शुद्धीवर येण्याचीच वाट बघत होते... मी शुद्धीवर आल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक smile दिसली....

तेवढ्यात मोहिते काका आणि त्यांच्याबरोबर एक कॉन्स्टेबल मला भेटायला आत आले....
बहुदा माझा accident ज्या ठिकाणी झाला होता त्या जागेचा पंचनामा करून ते आले असावेत...

"कसा आहेस आदित्य?, आता बरं वाटतंय का?"मोहिते काकांनी असं विचारल्यावर मी होकरार्थी मान डोलावली....

मी फक्त मान डोलवण्याचं कारण म्हणजे, मला काल रात्री काय घडलं, ते काहीच आठवत नव्हतं...

डॉक्टर म्हणाले, "तुझी जखम बरी झाली की तुला सगळं आठवेल...काळजी करू नकोस...! आणि आठवण्याचा प्रयत्न करू नकोस, तुलाच त्रास होईल..." आणि डॉक्टर निघून गेले.....

आता मोहिते काकांकडेही माझी जखम बरी होईपर्यंत थांबण्याशिवाय काही पर्याय नव्हता...म्हणून त्यांनी मला आराम करायला सांगितला....

बाहेर आल्यावर त्यांनी माझ्या \"कट्टा गृप\" ला विचारलं....."कोण कोण होतं आदित्य बरोबर?"..
"मी एकटीच होते, "समिधा म्हणाली...

"ठीक आहे....माने यांचं स्टेटमेंट लिहून घ्या..."असं मोहिते काकांनी कॉन्स्टेबल माने ना सांगितलं....

"बोला मॅडम काय घडलं नक्की काल???" कॉन्स्टेबल माने नी विचारल्याबरोबर समिधा न घाबरता बोलू लागली....

"मी आणि आदित्य आम्ही काल त्या जंगलाजवळच्या रस्त्याने घरी यायला निघालो... तेवढ्यात आदित्यची गाडी बंद पडली आणि तो सुरू करण्याचा प्रयत्न करत होता...
आम्हाला थोड्या अंतरावर हालचाल जाणवली त्यामुळे आम्ही पाहिलं तिथे कोणीतरी मुलगी पाठमोरी उभी होती....
तिला काही मदत हवी आहे का हे विचारायला आदित्य गेला आणि तिच्याजवळ पोहोचणार तोच मागून भर वेगात एक ट्रक आला आणि धडक देऊन निघून गेला...." समिधाने एका दमात थोडक्यात सगळं बोलून टाकलं...

मोहिते काकांनी तिला त्यांना सापडलेल्या evidence बद्दल विचारलं....त्यात एक लालसर रंगाची साईड बॅग, एक गुलाबी ओढणी आणि क्रश झालेला मोबाइल आहे असं सांगितल्यावर समिधा स्वतःच म्हणाली.....
"मोबाइल तर आदित्यचा असावा.... आणि ती ओढणी त्या मुलीची असावी कारण तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता...पण बॅग नाही माहिती कोणाची असेल ते...." माने नी सगळे स्टेटमेंट लिहून घेतले....

त्यांनतर पाच-सहा दिवस मला जनरल वॉर्ड मध्ये ठेवण्यात आलं....रिया, नेहा, समिधा, सुयश, सिद्धार्थ, सगळे सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र आळीपाळीने माझ्याजवळ थांबून माझी काळजी घेत होते.....

माझी जखम बरी होत आल्यावर मला डिस्चार्ज देण्यात आला....परीक्षा जवळ आली असल्याने आई-बाबांनी मला आणि बाकी सगळ्यांना ताकीद देऊन ठेवली होती, आता फक्त अभ्यास करायचा बाकी गोष्टी नंतर..!

अभ्यास व्यवस्थित सुरू होता... पण जखम भरत आल्याने मला त्या रात्री काय घडलं ते हळूहळू आठवू लागलं होतं..... पण ती गोष्ट आठवताच माझ्या डोक्यात झिणझिण्या आल्या....

मी लगेचच मोहिते काकांना फोन केला, "काका मला थोडंफार आठवतंय...
म्हणजे मी त्या मुलीला काही मदत हवी आहे का बघायला गेलो आणि हे सगळं झालं...
पण ती मुलगी पाठमोरी उभी असल्याने मला तिचा चेहरा पाहता आला नाही...
तुम्हाला काही माहिती मिळाली का??"

"आमचा तपास सुरू आहे आम्हाला सापडलेल्या त्या साईड बॅग मध्ये काहीही id proof न मिळाल्याने आमचे प्रयत्न सुरू आहेत..! तू आराम कर..!"मोहिते काका म्हणाले...

बघता बघता आमची परीक्षा संपली.... माझ्या accident नंतर मी थोडा upset राहू लागलो...आई मला घराबाहेर सुद्धा जाऊ देत नव्हती, त्यामुळे एकदिवस सगळे माझ्या घरी मला भेटायला आले...

"कसा आहेस आदित्य? काकूंचा फोन आला होता, तू upset असतोस.. अजूनही त्रास होतोय का?"समिधा म्हणाली....

"ओयय... इमोशनल क्वीन, आपण त्याला हसवायला आलोय रडवायला नाही..." सिद्धार्थ म्हणाला....

"नाही रे .. मला कुठे काही झालंय... मी ठणठणीत आहे, आईला काळजी वाटते माझी म्हणून तिने असं सांगितलं असेल..." मी म्हणालो...

"आपण सगळे छान कुठेतरी फिरायला जाऊयात म्हणजे आदित्यचा ही मूड रिफ्रेश होईल...." नेहा उत्साहात म्हणाली...

"ए आपण कॅम्पिंगला जाऊयात का? तसही परिक्षासुद्धा संपल्या आता...!"रिया म्हणाली...

"कॅम्पिंग... ते पण तुझ्याबरोबर...imposible जाताना सगळे जाऊ पण येताना तू एकटीच घरी येशील...!" सिद्धार्थ रियाला चिडवत म्हणाला....

"ए कधीतरी सिरीयसली बोला रे..! कुठेही काय भांडता तुम्ही?.."सुयश दोघांना म्हणाला....

"नॉट अ बॅड आयडिया...! आपण जाऊयात की कॅम्पिंगला.!" समिधाने कधी नव्हे ते सहमती दर्शवली...

हे पाहून सुयश के मन मे लड्डू फुटा...

"ठीक आहे... सगळे तयार आहेत तर जाऊयात...पण घरच्यांचं काय??"नेहा म्हणाली..

यावर सगळ्यांचा गोंधळ उडाला, आणि माझ्या खोलीतला आवाज वाढला...

"अरे..! आधी कुठे जायचं ते तरी ठरवा, मग सांगू घरच्यांना.." मी सर्वांना शांत केलं....

"लोणावळा, खंडाळा, माथेरान, महाबळेश्वर", अशी अनेक नावं आम्ही कॅम्पिंग साठी सुचवत होतो...

तेवढ्यात सुयशने नवीन जागा म्हणून \"भंडारदरा\" हे नाव सुचवलं....
भंडरदऱ्यातील आर्थर तलाव, विल्सन धरण, रंधा धबधबा याबद्दल सुयशच्या मामाकडून सुयशने बरच काही ऐकलं होतं...

हे ऐकून सगळेच तिथे जाण्यासाठी उत्सुक झाले...

"अनायसे माझा मामा टुरिस्ट गाईड आहे...मी त्याला फोन करून त्याच्याकडून सगळी माहिती घेतो..." सुयश सगळ्यांना म्हणाला...

आम्ही भंडारदऱ्याला जाण्याचा निर्णय घेतला...केदार मामाही आमच्यासोबत येत असल्याने घरच्यांनी लगेच परवानगी दिली....आणि तो दिवस उजाडला...

आम्ही पहाटे सहा वाजता बोरीवलीहून निघालो....
केदार मामा आम्हाला पुढे जॉईन होणार होता, म्हणून इथून फक्त आमचा कॉलेज कट्टा गृप निघाला....

खाण्या-पिण्याचे काही पदार्थ, पाण्याच्या बाटल्या, तिथे फार थंड वातावरण असल्याने गरम कपडे व पावसाळ्याचे दिवस असल्याने छत्री आणि रेनकोट इतके सगळे सामान होते...आम्ही private गाडी करून निघालो....

8 वाजताच्या सुमारास आम्ही मुंबई-नाशिक हायवे जवळ वशिंद्याच्या आधी पडघा येथे थांबलो, कारण केदार मामा आम्हांला तिथेच भेटणार होता...

"hey, hello...!"केदार मामाने आम्हांला पाहिलं आणि हात उंचावून हाक मारली...

सुयशने आमची केदार मामाशी ओळख करून दिली... केदार मामा तसा आमच्या पेक्षा वयाने काही जास्त मोठा नव्हता....म्हणून त्याच्याशी बोलतांना आम्ही लवकर comfortable झालो....

केदार मामा एका दुसऱ्या टूर वरून आल्याने तो तिथे नाश्ता करण्यासाठी थांबला होता...आम्ही सुद्धा तिथे वडापाव, कोथिंबीर वडी, थालीपीठ या सगळ्यावर ताव मारला आणि पुढच्या प्रवासाला निघालो....

मुंबई पासून जवळजवळ 185 किमी. अंतरावर अहमदनगर जिल्ह्यात, पश्चिम घाटालगत वसलेल्या भंडारदऱ्याला जाताना लागणारा कसारा घाट म्हणजे जणू स्वर्गच, निर्सगरम्य वातावरण, गार वाऱ्याची झुळूक, आणि त्यात समोर दाटलेलं धुकं अहाहा....

किती छान ते वातावरण.... ते वातावरण आणि घाटाचं सौदर्य डोळ्यात साठवण्यात आमचं भान हरपलं होतं......

तेवढ्यात सिद्धार्थ ने " अश्या दाटलेल्या धुक्यात गाडी चालवणं म्हणजे तारेवरची कसरत, जर रस्ता दिसला नाही तर गाडी घाटात आणि आपण डायरेक्ट वरती...!" हे वाक्य बोलून सगळ्यांना भानावर आणलं....

तशी समिधा फारच घाबरली....म्हणून आम्ही अंताक्षरी खेळायला सुरुवात केली....मुलींची टीम vs मुलांची टीम आणि आमच्या खेळाचा कर्णधार म्हणजे केदार मामा....
खेळ जस-जसा रंगत जात होता, तशी मज्जा दुप्पट होतं होती....

त्यातच मुलींच्या टीमवर \"न\" हे अक्षर आल्याबरोबर सगळ्यांनी समिधाला गाणं म्हणायला सांगितलं, त्यावर तिने वातावरणाला अनुसरू "निंदीया से जागी बहार, ऐसा मौसम देखा पेहेली बार"...हे गाणं म्हंटल....

"अश्या प्रकारे मुलांच्या टीमवर \"र\" हे अक्षर आलेलं आहे..." केदार मामाने comentry दिली....

सुयशने हा चान्स सुद्धा सोडला नाही...त्याने समिधाला उद्देशून "राजा को रानी से प्यार हो गया...." हे गाणं म्हंटल....यावर सगळे सुयशला चिडवू लागले....

पण सुयश मात्र केदार मामाशी या बाबतीत बोलूनच आला होता, की तो आज समिधाला प्रपोज करणार आहे..... केदार मामा हा त्यांच्याच वयाचा असल्याने आणि त्यात त्याचंही लव्ह मॅरेज असल्याने त्याने सुयशला साथ दिली.......

जवळपास 11 वाजता आम्ही भंडारदऱ्यात पोहोचलो...भंडारदऱ्याने जणू हिरवी शाल पांघरली आहे असे भासत होते....

आम्ही \"आर्थर लेक\" पासून पुढे जायचे ठरवले... आमच्याप्रमाणे तिथे अनेक लोकं कॅम्पिंगसाठी आलेले होते, सगळ्यांचे टेंट जिथे उभे होते तिथेच जवळपास आम्हीसुद्धा आमचे टेंट लावले....

आणि आम्ही बोटींग साठी गेलो....भरपूर मज्जा मस्ती केली, फोटो काढले, सगळेजण कधी सेल्फी तर कधी गृप फोटो तर कधी तेथील निसर्गाचे फोटो घेण्यात दंग होता....ह्या सगळ्यात जेवणाची वेळ होत आली....

आर्थर तलावापासून विल्सन डॅम 11 किमी. अंतरावर असल्याने आम्ही जेवण करून मग तिथे जायला निघालो....\"विल्सन डॅम\" लाच \"भंडारदरा डॅम\" असेही म्हणतात....

अतिशय सुंदर असं ते धरण, प्रवरा नदीवर आहे... त्याची निर्मिती 1910 मध्ये झाली समुद्रतळापासून जवळजवळ 150 मी. उंच अश्या या धरणाचे बांध पावसाळ्यात धरण भरले तरच उघडतात...
आणि त्यातून जे पाणी खाली असलेल्या गोलाकार डोंगरांवर कोसळतं तेव्हा ते छत्रीचं रूप धारण करतं म्हणून त्याला umbrella fall असं म्हणतात...
ते नशीबवान लोकांनाच पाहायला मिळतं असं देखील म्हणतात...."केदार मामा टुरिस्ट गाईड असल्याने तो सगळी माहिती छान देत होता.....

बहुतेक आम्ही नशीबवान असू म्हणून धरणाचे बांध उघडले गेले आणि आम्हाला umbrella fall सुद्धा पाहायला मिळाला...आम्ही त्याचे सुद्धा व्हिडिओ आणि फोटो काढले....आपण स्वप्नात आहोत की काय असं काहीसं वाटत होतं....!

umbrella fall पासून अर्ध्या तासांवर असलेला \"रंधा धबधबा\" पाहायला आम्ही गेलो...
"हा धबधबा जवळजवळ 45 मी. उंचीवरून खाली वाहतो...हा धबधबा भंडारदऱ्यातील वीजनिर्मिती चा खूप मोठा स्रोत आहे...
रंधा धबधबा हा देशातील तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठा धबधबा आहे...हा धबधबा 170 फुटांवरून खाली वाहतो..." केदार मामाने रंधा धबधब्याचीही माहिती फार सुंदर प्रकारे दिली....

रंधा धबधबा हा नेहमी न थांबता वाहत असतो...रंधा धबधबा हा सतत मोठमोठया दगडांवरून वेगाने वाहत असतो...कितीही मोठा दगड समोर आला तरी त्याला धुडकावून तो धबधबा पुढे वाहत राहतो...

हा धबधबा आपल्याला दोन संदेश देत आहे असे वाटते, " जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला"... आणि "जो थांबला तो संपला...." म्हणून आपण सतत प्रयत्न करत राहावे...

केदार मामाने आम्हाला बाकी माहिती देण्यास सुरुवात केली, "रंधा धबधबा पाहण्यासाठी एक पूल बांधलेला आहे...
त्या पुलावर आम्ही गेलो आणि त्या पुलावरून संपूर्ण धबधबा खूप छान प्रकारे पाहायला मिळाला, त्या पुलावर अनेक सिनेमांच्या गाण्यांचे शूटिंग करण्यात आले आहेत..."
या ठिकाणी आम्ही सर्वांनी फोटो काढले, आणि काही व्हिडिओ सुद्धा काढले....

आम्ही सतत सोबत आणलेले चिप्स, फरसाण, बाकरवडी हे सगळं खात असल्याने आम्हाला कुठेही नाश्ता करण्यासाठी थांबण्याची वेळ आली नाही....

आता मात्र अंधार पडू लागला होता...आम्ही आर्थर लेक जवळ आलो....टेंट जवळ छान बॉर्नफायर तयार केला...त्यावर बार्बेक्यू बनवले इतरही सगळ्या गृप ने काही न काही तयारी केली होती...आम्ही त्या गृपना जॉईन झालो....बॉर्नफायर भोवती सगळ्यांनी छान कपल डान्स केला...

आम्ही दिवसभरात काढलेले फोटो पाहत सहज आकाशाकडे पाहिलं, " सगळीकडे पसरलेलं चांदणं जणू निसर्गरम्य वातावरणाचे वर्णन करत आहे असे वाटत होते...."

दिवसभर दमल्याने आम्ही सगळे झोपायला गेलो....आमचा टेंट आणि मुलींचा टेंट बाजू-बाजूलाच लावल्याने सगळेजण गाढ झोपले होते, पण अचानक माझा डोळा उघडला....
सिद्धार्थ बाजूला घोरत पडला होता... आणि त्यातच आजूबाजूच्या रातकिड्यांच्या आवाजाने माझी झोपमोड झाली असावी....

आमच्या टेंट मध्ये काही काजवेही शिरले होते...ते जणू मंद अश्या night lamp सारखे भासत होते...म्हणून मी बाहेर आलो........


*******************************************
आदित्यच्या जुन्या आठवणीतील आणखी एक आठवण म्हणजे हा कॅम्प....

ह्या कॅम्पमध्ये काही घडलं तर नसेल?

आदित्यच्या अपघातातील मुलगी आणि स्वप्नातील मुलगी एकच असेल तर...

काय गुपित दडलं असेल या रात्रीच्या अंधारात? याचा संबंध आदित्यच्या स्वप्नाशी तर नसेल....

या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन भेटूया पुढच्या भागांत....

क्रमशः

(भंडारदरा ही खूप मोठी जागा असल्याने, त्याची संपूर्ण माहिती घेणं शक्य नाही त्यामुळे चुकांसाठी क्षमस्व....)..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Reshma Sonawane

Housewife

Listening and reading