Oct 18, 2021
कथामालिका

कोण होती ती...? भाग 7..

Read Later
कोण होती ती...? भाग 7..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
कोण होती ती.....?.भाग 7...


©रेश्मा आणि साक्षी....


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)


*******************************************
(मागील भागात आपण पाहिलं डी.सी.पी. साहेबांच्या मदतीने इन्स्पेक्टर अरविंद नी अभिज्ञाची मिसिंग केस पुन्हा रिओपन केली... आणि सदा भाऊंनी दिलेल्या माहितीनुसार इन्स्पेक्टर अरविंद आणि सावंत गर्ल्स हॉस्टेलला चौकशीसाठी जातात...आता पुढे....)


इन्स्पेक्टर साहेब... काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही अचानक असे इथे कसे काय?.." अचानक पोलीस आलेले पाहून मुकुंद ना आश्चर्य वाटलं....

"आम्हाला तुमची छोटीशी मदत हवी आहे..."इन्स्पेक्टर अरविंद नी मुकुंद ना सांगितलं...

"मी माझ्या परीने जमेल तेवढी मदत करायला तयार आहे सर... पण तुम्ही बसा ना...!" मुकुंद इन्स्पेक्टर अरविंद ना म्हणाले....

"आम्हाला तुमच्या हॉस्टेल मध्ये 4-5 वर्षांपूर्वी राहणाऱ्या दोन मुलींची थोडी माहिती हवी आहे..."इन्स्पेक्टर अरविंद म्हणाले...

"सर, आमच्या हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या कोणत्याही मुलीची माहिती आम्ही तुम्हांला कधीही देऊ शकतो...तुम्ही फक्त त्या दोघींची नावं सांगा..." मुकुंद नी इन्स्पेक्टर अरविंद ना सांगितलं...

"That\"s great...!
आम्हाला सीमा नाईक आणि अभिज्ञा गायकवाड ची संपूर्ण माहिती द्या..."इन्स्पेक्टर अरविंद नी दोघींची माहिती देण्यास मुकुंद ना सांगितलं...

मुकुंद नी लगेचच 4-5 वर्षांपूर्वीच्या सर्व फाईल्स मधून सीमा आणि अभिज्ञाची माहिती असलेली फाईल शोधली आणि इन्स्पेक्टर अरविंद ना दिली...

"अभिज्ञा आणि सीमा यांची वागणूक कशी होती? म्हणजे त्यांचं कोणाशी भांडण किंवा दुश्मनी वगैरे काही होतं का?" इन्स्पेक्टर अरविंद नी मुकुंद ना विचारलं....

"नाही साहेब...! अजिबात नाही... सीमा आणि अभिज्ञा या दोघी चांगल्या, गुणी आणि प्रामाणिक मुली होत्या...प्रत्येकाला गरज पडली की मदत करायच्या... आम्ही त्या दोघींना अजून पण miss करतो....पण तुम्ही त्यांची चौकशी का करताय?any problem?..." मुकुंद नी इन्स्पेक्टर अरविंद ना विचारलं...

"नाही...तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद...!गरज वाटली तर पुन्हा येऊ..."एवढं बोलून इन्स्पेक्टर अरविंद आणि सावंत तिथून निघून गेले.....

पोलिस चौकीत पोहोचेपर्यंत इन्स्पेक्टर अरविंद नी सीमाची फाईल हाताळली....त्यात तिची संपूर्ण माहिती होती....

नाव:- सीमा नरेश नाईक.
राहणार :- नाशिक.

त्यातच सीमाचा फोन नंबर मिळाला.... इन्स्पेक्टर अरविंद नी लगेचच त्या नंबर वर फोन लावला....आणि तो नंबर अजूनही सीमाचा आहे, हे पाहून इन्स्पेक्टर अरविंद नी तिला अभिज्ञाच्या केस संदर्भात चौकशीसाठी पोलिस चौकीत बोलावून घेतले....

इन्स्पेक्टर अरविंद आणि सावंत दोघेही चौकीत पोहोचले...थोड्याच वेळात सीमा देखील चौकीत आली....

"सर, मी सीमा नाईक...मला इथून फोन आला होता..."सीमा म्हणाली....

"या , बसा....मीच तुम्हांला फोन केला होता...मी इन्स्पेक्टर अरविंद कुलकर्णी...! खरं तर आम्हांला तुमची मैत्रीण अभिज्ञा गायकवाड हिची चौकशी करायची आहे...."इन्स्पेक्टर अरविंद नी सीमाला सांगितलं....

"अभिज्ञाची चौकशी? काय झालं सर? काय केलं अभिज्ञाने?" सीमा इन्स्पेक्टर अरविंद ना म्हणाली...

"आमच्याकडे तिची जुनी म्हणजे 4-5 वर्षांपूर्वीची मिसिंग केस आहे....आणि सध्या त्या केस संदर्भात आम्हाला आदित्य सरंजामे या व्यक्तीमुळे काही धागे-दोरे सापडले आहेत.... म्हणजे आदित्यने अभिज्ञाचा अपघात होताना पाहिलाय....म्हणून ही केस पुन्हा रिओपन करावी लागणार आहे..."इन्स्पेक्टर अरविंद नी सीमाला सांगितलं....

"हो... तो अपघात माझ्या भावामुळेच झाला होता..."सीमाने बोलायला सुरुवात केली...

"म्हणजे..?सर्वकाही सविस्तर आणि स्पष्ट सांगा..."इन्स्पेक्टर अरविंद सीमाला म्हणाले....

""माझा भाऊ म्हणजे सागर त्याच्यामुळेच तिचा अपघात झाला होता..... मी आणि अभिज्ञा नाशिकला एकाच कॉलेज मध्ये शिकायला होतो तेव्हा आमची ओळख होती, नंतर आम्ही इंटर्नशीप साठी मुंबईला गेलो.... तेव्हा एकाच हॉस्टेल मध्ये एकाच रूम मध्ये असल्याने आमच्यात घट्ट मैत्री झाली....

माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मी तिला सांगायचे आणि ती मला सांगायची....आमच्यातील घट्ट मैत्री लोकांना आवडायची..... कदाचित त्याच मैत्रीला लोकांची नजर लागली......

एकदा मी बोलता बोलता अभिज्ञाला भावाबद्दल सगळं सांगितलं.... सागर कॉलेज मध्ये जायला लागला तेव्हा त्याची संगत बरोबर नव्हती, त्याला खूप वेळा मी समजावलं पण त्याने काही ऐकलं नाही... नंतर त्याच त्याच्या टवाळकी करणाऱ्या मित्रांनी त्याला व्यसनी केलं.... वाईट कामं करून घेतली...

एकदा अचानक मला सागरचा फोन आला..."
ताई तू त्यावेळी सांगत होतीस तेव्हा मी तुझं ऐकायला हवं होतं...आता हे सगळेजण मला खूप वाईट काम करायला सांगतायत, पण मला ते करायचं नाहीये...."

तेव्हा मी स्वतः त्याला त्यांनी काय काम सांगितलं ते विचारले असता तो म्हणाला, "इथल्या आजूबाजूच्या गावांमध्ये त्यांना \"गांजा\" सप्लाय करायचाय, आणि तो पोहोचवण्यासाठी ते लोक माझ्यावर जबरदस्ती करतायत.....ताई तू काहीतरी कर..."आणि अचानक त्याचा फोन कट झाला होता...

मी बऱ्याच वेळा त्याचा फोन ट्राय करत होते पण, फोन काही लागला नाही.... हे सगळं बोलणं जेव्हा माझं सागरशी झालं तेव्हा अभिज्ञा माझ्याबरोबरच होती.... तिनेच मला धीर दिला....

काहीवेळाने मला एक निनावी फोन आला...."तुझा भाऊ फार जीभ चालवतोय....त्याला तोंड बंद ठेवायला सांग, नाहीतर....!"एवढं बोलून समोरच्या व्यक्तीने फोन कट केला...

दुसऱ्या क्षणी मी सागरला फोन लावला..."सागर अरे, कोण आहेत हे लोक? आणि का तू त्यांच्या भानगडीत पडतोयस? जाऊदेत तुला नाही करायचं ना ते काम..! झालं तर मग विषय संपव...." मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला.....

"ताई मी नाही ऐकणार आता, आता त्या सगळ्यांना पुराव्यासकट पकडून देईन...." एवढं बोलून सागरने फोन ठेवला.....

नंतर सागरचा फोन लागत नाही म्हणून मी त्याच्या मित्रांकडे त्याची चौकशी केली.... कोणालाच काहीच माहीत नसल्याने मला टेंशन आलं होतं....अभिज्ञा सतत माझ्या बाजूने होती... मला सतत समजावत होती....

एक-दोन दिवसांनंतर पावसाळ्याच्या दिवसांत मला पुन्हा वेगळ्या नंबर वरून फोन आला...."तुझ्या भावाने काहीच ऐकलं नाही तो आमच्या ताब्यात आहे, तू जर काही चलाखी केलीस तर त्याला मारून टाकेन..... मी जे सांगतो ते कर.....

आज रात्री बोरिवलीला जो जंगलाजवळून रस्ता जातो त्या रस्त्यावर ये....तुझ्या भावाने जे काम केलं नाही ते आता तुला करावं लागेल....तू त्या ठिकाणी पोहोचल्यावर एक मोठा ट्रक येईल, त्याच्याकडे मी पाठवीन ते पार्सल द्यायचं.....
माझ्या माणसाचं सतत तुझ्यावर लक्ष असेल...."एवढं सांगून समोरच्या व्यक्तीने फोन कट केला.....

माझ्या भावासाठी मी सगळं करायला तयार झाले....आणि मला ते पार्सल सुद्धा मिळालं...माझी 2nd शीप होती ती झाल्यावर मी लगेचच ते पार्सल घेऊन जाणार होते.....

पण मी यायच्या आधीच अभिज्ञा तिथे गेली असावी कारण ते पार्सल मला कुठेच मिळत नव्हतं....मी नंतर त्या ठिकाणी जायला निघाले....पण मला तिथे पोहोचायला उशीर झाला, अभिज्ञाचा अपघात आधीच झाला होता....कदाचित त्या गुंडांनी मला मारायला तो ट्रक पाठवला असेल , पण माझ्याजागी अभिज्ञा गेल्यामुळे तिचा अपघात झाला...."" सीमाने सर्व घडलेला प्रकार इन्स्पेक्टर अरविंद ना सांगितला....

"पण मग तुमच्या जागी अभिज्ञा का गेली याविषयी तुम्हांला काही माहिती आहे का?" इन्स्पेक्टर अरविंद नी सीमाला विचारलं...

"हो, म्हणजे मी जेव्हा तिला तिच्या मामाच्या घरी न्हेल होतं तेव्हा तिने मला सांगितलं की, तिने तिच्या गळ्यात एक कॅमेरावालं लॉकेट घातलं होतं.... पण तिला ट्रकचा जोरात धक्का लागला आणि त्या लॉकेटला तडा गेला व त्यातली सगळी मेमरी delete झाली...."सीमाने इन्स्पेक्टर अरविंद ना सांगितलं...

सीमाने सांगितलेल्या अपघाताच्या घटनेनंतर इन्स्पेक्टर अरविंद ना मोहितने सविस्तर सांगितलेल्या आदित्यच्या अपघाताबद्दल आठवले....म्हणून त्यांनी सावंत ना आदित्यला बोलावून घ्यायला सांगितलं....

आदित्य चौकीत आल्यावर त्याची आणि सीमाची ओळख इन्स्पेक्टर अरविंद नी करून दिली....

इन्स्पेक्टर अरविंद नी आदित्यला त्याच्या अपघाताबद्दल पुन्हा एकदा सविस्तर सांगायला सांगितलं....
आदित्यने सर्व प्रकार इन्स्पेक्टर अरविंद ना सांगितला व त्यावेळी ही केस इन्स्पेक्टर रमाकांत मोहिते यांच्याकडे होती अपघाताच्या ठिकाणी काही ठोस पुरावा मिळाला नाही...
म्हणून ती केस क्लोज झाली असावी.... हे सुद्धा सांगितलं....

"अभिज्ञाने सुद्धा तिचा अपघात झाला त्यावेळी तिच्या व्यतिरिक्त तिथे कोणीतरी आहे याचा उल्लेख केला होता..." अचानकपणे सीमाला आठवल्याने सीमा पटकन मध्येच बोलली.....

"म्हणजे हे तर क्लिअर झालं की, ज्यावेळी अभिज्ञाचा अपघात झाला त्याचवेळी आदित्यचा देखील अपघात झाला..."इन्स्पेक्टर अरविंद ना त्यांच्या मनातील एका प्रश्नाचं उत्तर मिळालं....

"मुंबईला परत आल्यावर आम्ही बऱ्याच वेळा सागरला शोधण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला त्याचा काहीच पत्ता लागला नाही....आमची इंटर्नशीप संपल्यावर आम्ही आपापल्या घरी गेलो,आमचं एकमेकींशी बोलणं व्हायचं.... एक दिवस अचानक माझा तिच्याशी असलेला कॉन्टॅक्ट तुटला....पुढे काय घडलं मला माहिती नाही...!"सीमाने इन्स्पेक्टर अरविंद ना सांगितलं....

"म्हणजे जो अपघात आदित्यने पाहिला त्याबद्दल तुम्हांला काहीच माहिती नाही?" इन्स्पेक्टर अरविंद नी सीमाला विचारलं....

तेवढ्यात अतिशय हुशार पण स्वार्थी, स्वार्थापुढे कायद्यालाही तोडून-मोडून खिशात ठेवणारं, करून सवरून नामानिराळं राहणाऱ्या, आपल्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणे तोही नकळतपणे....असं व्यक्तीमत्व असलेल्या ए.सी.पी अजिंक्य भोसले यांनी चौकीत प्रवेश केला.....

"सर..!"(चौकीतल्या सगळ्यांनी एकत्र सेल्युट केला..)

"काय कुलकर्णी... कोणाच्या अपघाताबद्दल बोलताय?" ए.सी.पी. साहेबांनी इन्स्पेक्टर अरविंद ना विचारलं...

"सर ती अभिज्ञा गायकवाड ची जुनी मिसिंग केस होती त्या केस संबंधित काही पुरावे मिळाल्याने ती केस पुन्हा रिओपन करण्यात आली आहे..." इन्स्पेक्टर अरविंद नी ए.सी.पी. साहेबांना सांगितलं....

"ओके... you carry on... माझी काही मदत लागली तर सांगा..."एवढं बोलून ए.सी.पी. साहेब केबित मध्ये निघून गेले....

हे पाहून इन्स्पेक्टर अरविंद ना आश्चर्य वाटलं....

"सर..! मला एक गोष्ट अभिज्ञाबद्दल आठवतेय, आणि माझ्या मते ही गोष्ट माझ्या शिवाय कोणालाही माहिती नसावी...."सीमाने असं म्हणताच इन्स्पेक्टर अरविंद भानावर आले...

"अशी कोणती गोष्ट आहे? जी तुमच्या शिवाय इतर कोणालाही माहिती नाही?" इन्स्पेक्टर अरविंद नी सीमाला आश्चर्याने विचारलं....

"डायरी..!

अभिज्ञाची डायरी...!

त्यात नक्कीच काहीतरी पुरावा सापडेल...!"सीमाने इन्स्पेक्टर अरविंद ना सांगितलं...

"तुम्हांला अभिज्ञाच्या डायरीबद्दल कसं माहिती?"इन्स्पेक्टर अरविंद नी सीमाला विचारलं....

"सर, मी तिच्याबरोबर इतके वर्ष राहिली आहे... मी तिला बऱ्याच वेळा दिवसभरात काय घडलं हे डायरीत लिहून ठेवताना पाहिलं आहे..."सीमाने इन्स्पेक्टर अरविंद ना सांगितलं....

"ती डायरी कुठे मिळू शकेल? तुम्हांला काही आयडिया?" इन्स्पेक्टर अरविंद नी सीमाला विचारलं...

"नक्की माहिती नाही... पण तिच्या घरी ती डायरी तुम्हाला मिळू शकेल..."सीमाजवळ असलेली सर्व माहिती सीमाने इन्स्पेक्टर अरविंद ना दिली....

"आम्ही बघतो.... तुम्ही दोघेही आता जाऊ शकता जर परत काही मदत लागली तर पुन्हा बोलावून घेऊ..."इन्स्पेक्टर अरविंद नी सीमा आणि आदित्यला जायला सांगितलं.....

ते दोघे तिथून गेल्यावर इन्स्पेक्टर अरविंद नी न राहवून मगासपासून मनात खदखदत असलेला प्रश्न सावंत ना विचारला...
"सावंत, ही केस जर ए.सी.पी. साहेबांनी क्लोज केली होती, तर आत्ता त्यांना या केसबद्दल सांगितल्यावर ते काहीच का रेऍक्ट झाले नाहीत??"...

"साहेब, ह्या केसला 4-5 वर्ष होऊन गेली आहेत....आणि अश्या कितीतरी केस आहेत ज्या ए.सी.पी. साहेबांनी लोकांना धमकावून आणि पैसे उगाळून बंद केल्या आहेत.... त्यांना आठवलं नसेल...."सावंत इन्स्पेक्टर अरविंद ना म्हणाले....

"हम्म...!सावंत एक काम करा,सदाभाऊंना गावाच्या चौकात बोलवा आणि त्यांना सांगा की अभिज्ञाच्या घराची एकदा झडती घ्यावी लागेल तर तुम्ही या...."इन्स्पेक्टर अरविंद नी सदाभाऊंना फोन करण्यासाठी सावंत ना सांगितलं...

"शिंदे गाडी काढा आणि सरळ गावच्या चौकात नेऊन उभी करा...सावंत आणि मोरे माझ्याबरोबर चला...."इन्स्पेक्टर अरविंद नी शिंदेंना गाडी काढायला सांगितली....

सगळे गावच्या चौकात पोहोचले... सदाभाऊ आधीच तिथे येऊन उभे होते....

"काय झालं साहेब? काही पत्ता लागला का, अभिज्ञा कुठं असेल त्याचा?"सदाभाऊंनी इन्स्पेक्टर अरविंद ना विचारलं....

"आमचे प्रयत्न सुरू आहेत...! तुम्ही आम्हाला अभिज्ञाचं घर दाखवा..."इन्स्पेक्टर अरविंद नी सदाभाऊंना सांगितलं....

सदभाऊंनी इन्स्पेक्टर अरविंद ना अभिज्ञाचं घर दाखवलं... घर लॉक होतं... ते सदभाऊंनी उघडलं, आणि सगळे आत गेले....

"साहेब, घराची अवस्था बघता, या घरात गेली काही वर्ष कोणीही राहत नसावं...!" सावंत म्हणाले....

"हम्म..! सदाभाऊ अभिज्ञाचे आई-वडील कुठे असतात?"इन्स्पेक्टर अरविंद नी सदाभाऊंना विचारलं...

"अभिज्ञाची आई म्हणजेच माझी ताई अभिज्ञा जेव्हा बरेच दिवस शोधून बी सापडली न्हाय, तेव्हाच त्या धक्क्यातून स्वतःला सावरू शकली न्हाय आणि आम्हाला सोडून गेली....त्यांनतर तिचे वडील कुठंतरी निघून गेले अन ते बी परत आलेच न्हाय...ते जीत्ये हायत का न्हाय हे बी कोणाला ठाव न्हाय...."सदाभाऊ रडतच बोलत होते.....

"ओ... सॉरी...!तुम्ही सांगितलेल्या सीमा नाईकचा शोध आम्ही घेतला... सीमाच्या सांगण्यानुसार अभिज्ञाला स्वतःची डायरी लिहायची सवय होती, याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?" इन्स्पेक्टर अरविंद नी सदाभाऊंना विचारलं....

"डायरी...? मला काय बी माहिती न्हाय साहेब यातलं..."सदाभाऊंनी इन्स्पेक्टर अरविंद ना सांगितलं...

शेवटी सगळ्यांनी घराची झडती घ्यायला सुरुवात केली....सगळं कपाट रिकामी केलं, सगळे ड्रॉवर चेक केले पण ती डायरी कुठे मिळत नव्हती...

मग माळ्यावर ठेवलेली एक जुनी ट्रंक सावंत ना सापडली , त्या ट्रंक मध्ये बऱ्याच जुन्या वस्तू होत्या...लहानपणीचे कपडे, लंगोट, आणि त्यातच एक डायरी सापडली... त्यावर अभिज्ञाचं नाव लिहिलेलं होतं.....


*******************************************


सागरच्या गायब होण्यामागे आणि अभिज्ञाच्या अपघातामागे एकच व्यक्ती तर नसेल...?


अभिज्ञाची डायरी तर मिळाली, पण त्या डायरीत नक्की काय लिहिलं असेल?...


या डायरीचा खऱ्या गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी उपयोग होईल?.....


या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन भेटूयात पुढच्या भागात.....

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Reshma Sonawane

Housewife

Listening and reading