Oct 24, 2021
कथामालिका

कोण होती ती?... भाग 12. (अंतिम भाग )

Read Later
कोण होती ती?... भाग 12. (अंतिम भाग )

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


कोण होती ती?.... भाग 12. (अंतिम भाग )


©रेश्मा आणि साक्षी.(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)


*******************************************

(सर्वप्रथम मी तुम्हा सर्व वाचकांची माफी मागते.... माझ्या एका पर्सनल प्राॅब्लेममुळे कथा टाकण्यास उशीर झाला आणि ज्या वाचकांनी मला कमेंट केल्या त्यांनाही रिप्लाय करता आला नाही.....)

(मागील भागात आपण पाहिलं, रंगा आणि कुबड्या दोघांनाही इन्स्पेक्टर अरविंद नी दारूच्या भट्टीवर धाड टाकून पकडलं.... रंगा आणि कुबड्या ला थर्ड डिग्री देण्यात आल्याने ते दोघेही सगळं खरं सांगण्यास तयार झाले.....आता पुढे....)


"एssss, भोसले....! म्या काय तुझ्या घशात उगाच पैसे घातले काय?....तुला म्या काय सांगितलं व्हतं, त्या डाक्टरीणीची केस परत सुरू व्हता कामा नये....आता तुला काय वाटतं, म्या अडकलो म्हणजे तू सुटशील? है...., तुला असा तसा सोडणार न्हाय..... म्या अडकलो हाय ना, आता तुला बी चांगलाच अडकवतो..... न्हाय तुझा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणला ना, तर नाव न्हाय लावणार राजाराम पाटील....!

अन हो, ओss डी.सी.पी तुम्हांसनी काय वाटलं? म्या एकटा हे समदं करू शकतो? न्हाय.... अजिबात न्हाय...! तुमचा हा ए.सी.पी सुद्धा मला सामील हाय.... माझ्याकडून परतेक येळी त्यानं पैकं खाल्लं हाय....

एवढंच न्हाय तर माझ्या दारूच्या भट्ट्या बी आजवर म्हणूनच चालू राहिल्या, दर महिन्याला ह्यो माझ्याकडून हफ्ता घेतोया...अन जर मला शिक्षा होणार असंल तर ह्याला बी शिक्षा व्हायला पाहिजे....!" पाटील ए.सी.पी साहेबांवर अत्यंत चिडले होते....

"ओss पाटील...! जरा दमानं घ्या....कायदा सगळ्यांसाठी एकच असतो, त्यामुळे तुम्हाला आणि भोसलेंना त्याचबरोबर ह्या रंगा आणि कुबड्या ला देखील शिक्षा ही होणारच....!

आणि काय हो भोसले, तुम्ही ह्या पोलीस स्टेशन चे ए.सी.पी आहात.... आपल्यावर विश्वास ठेवून जनता आरामदायी जीवन जगत असते आणि तुम्हीच असं वागलात....!

तुमचं नाव आहे अजिंक्य.... अजिंक्यचा अर्थ तरी माहिती आहे का तुम्हाला?....अजिंक्य म्हणजे, सर्वोच्च, विजयी, जो पराभूत होऊ शकत नाही....
पण आज कायदा तुम्हाला पराभूत व्हायला भाग पाडेल..... आज तुमचा पराभव होईल....

पण तुम्ही? शी...! तुम्ही आमच्या टीम मध्ये आहात हे सांगताना सुद्धा मला लाज वाटते....!तुम्ही पाटलांकडून पैसे घेतलेत, का? तुम्हाला सरकार जो पगार देतेय तो कमी पडतोय का? जर तुम्हाला पैशाची गरज होती तर मला मागायचे होते, मी दिले असते.....

हे असले काळेधंदे करताना अंगावर घातलेल्या वर्दीचा तरी विचार करायचात.... तुमच्या ह्या अश्या वागण्याने आपल्या पोलीस चौकीचं नाव खराब होईलच, पण सामान्य जनतेचा आपल्यावरचा विश्वास उडेल....

तुमच्यासारख्या एका पोलीस ऑफिसरमुळे सर्व पोलीस खात्याचं नाव बदनाम होईल....आणि हे सगळं केल्यामुळे वर्दीचा आणि कायद्याचा अपमान झाला आहे त्याचं काय?.....

जेव्हा तुम्ही पोलिसात भरती झालात तेव्हा वर्दीवर हात ठेवून घेतलेली शपथ आठवा जरा.....
\"काहीही होऊदेत नेहमी सत्याची बाजू घेईन, वर्दीचा आणि कायद्याचा अपमान होईल असे कृत्य करणार नाही....माझ्या देशाशी आणि कायद्याशी मी एकनिष्ठ राहीन....!

विसरलात तुम्ही... सगळं विसरलात.....पैशासाठी तुम्ही कुठल्याही थराला जाऊ शकता हे आता आम्हाला कळलं आहे.... मी तुम्हांला सस्पेंड करतोय, पुढे तुमचं काय करायचं ते कोर्टच ठरवेल....!" डी.सी.पी साहेब भोसले साहेबांनी केलेल्या कृत्यामुळे प्रचंड संतापले होते.....


"आणि पाटील तुम्ही...!तुम्ही गावचे सरपंच आहात ना, तुमच्यावरसुद्धा गावातील लोकं डोळे झाकून विश्वास ठेवतात.... सरपंचाचं काम असतं गावातील ज्या लोकांवर अन्याय होतोय त्यांना न्याय मिळवून देणं....

तुम्ही तर सगळ्यांवर अन्याय करत सुटला आहात....लोकांच्या जमिनी, पैसे लुबाडून त्यांना वाईट मार्गावर लावताय, गावातल्या लोकांना जर समजलं तर त्यांना तुमची लाज वाटेल....!"डी.सी.पी साहेब पाटलांवर देखील प्रचंड चिडले होते......

"ओ पाटीलsss...! आम्ही अजूनही तुमच्याशी नीट बोलतोय, तोवर सगळं खरं सांगा.... नाहीतर तुमची अवस्था सुद्धा या दोघांसारखी होईल...."इन्स्पेक्टर अरविंद म्हणाले....

"सांगतो...! म्या सगळं खरं सांगतो....!
म्या दारूच्या भट्ट्या चालवतो ते बी पैकं मिळवण्यासाठी, लोकांच्या जमिनी लुबाडतो त्या बी पैशासाठी अन कालेज च्या पोरांसनी पैशाचं आमिष दाखवून गांजा बी सप्लाय करतो....

सगळी पोरं पैशासाठी ते काम करत्यात, पर पोरांसनी त्या पार्सल मध्ये काय हाय ते माहिती नसतं.....आमचं काम नीट चाललं व्हतं, पर तो सागर मांजरीसारखा आडवा आला म्हणून म्या त्याला मारून टाकायला पैक दिलं....

ती डाक्टरीण बी माझ्या कामात लुडबुड कराया लागली..... अन नेमकी ती त्या सागरच्या बहिणीची मैत्रीण निघाली.... तिला जवा कळलं की सागरला माझ्याच माणसांनी डांबलं व्हतं, तवा ती सगळं काही शोधून काढण्याच्या मागं लागली.....

मग आम्ही तिला बी आमच्या रस्त्यातून बाजूला केली.... ह्या सगळ्यात आम्हांसनी तुमच्याच ए.सी.पी साहेबांनी मदत केली.....

पर हे समदं 4-5 वर्षांपासून भोसलेंनी दाबून ठेवलं व्हतं, अचानक कसं तुम्हाला समदं समजलं? कोणी सांगितलं?...." पाटलांनी सर्वकाही सांगितलं....

"पाटीलsss...! कोणतीही चुकीची कृत्य लपून रहात नसतात....एकीकडे जर चुकीचं कृत्य घडत असेल, तर जगात कुठेही दुसरीकडे त्या कृत्याचा नाश करण्यासाठी शक्ती तयार होतेच...! हा जगाचा नियमच आहे....!

आणि राहता राहिला प्रश्न आम्हाला कसं कळलं किंवा कोणी सांगितलं, तर हे सगळं आम्हाला अभिज्ञाने सांगितलं...!"इन्स्पेक्टर अरविंद म्हणाले....

"म्हणजे? ती अभिज्ञा जित्ती हाय अजून?... आम्ही तर तिला सवताच्या डोळ्यांनी दरीत कोसळताना पाहिलंय...!"रंगा आणि कुबड्या आश्चर्याने म्हणाले....

"अच्छा, म्हणजे तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास नाहीये का?.... ठीक आहे, मी सांगतो...! अभिज्ञा आता या जगात नाहीये, पण तिची डायरी अजूनही आहे... आणि सध्या ती आमच्या ताब्यात आहे....

तसंही अभिज्ञा जेव्हा दरीत कोसळली, तेव्हा एका व्यक्तीने हे सगळं पाहिलं.... आता तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर आता आम्हाला तुमच्या मिसेस ना भेटायचंय..."डी.सी.पी साहेबांनी पाटलांना सांगितलं.....

"ती घरला न्हाय हाय...! ती पैशासाठी माझ्याशी लगीन कराया तयार झाली होती अन आता माझं पैक घेऊन बऱ्याच वर्षांपूर्वी कुठंतरी निघून गेली, ती सवता निघून गेल्याने म्या काय तिला शोधायला गेलो न्हाय....पर तुम्हाला तिला का भेटायचं हाय?"पाटील म्हणाले....

"कारण अभिज्ञाला त्यांच्यामुळेच तुमच्या दारूच्या भट्ट्या आणि गांजा सप्लाय करण्याविषयी कळलं होतं....आणि तुम्ही त्यांना मारहाण करायचात हे आम्हाला कळलं आहे... आता लवकर बोला कुठे आहेत मिसेस पाटील?...."इन्स्पेक्टर अरविंद म्हणाले....

"म्या सांगितलं ना, मला न्हाय माहीत...!" पाटील यांच्या तोऱ्यात म्हणाले....

तेव्हा डी.सी.पी साहेबांनी पाटलांसमोर रंगा आणि कुबड्या ला मिसेस पाटील बद्दल विचारलं....

"साहेब, खरंच आम्हाला नाही माहिती....!"रंगा आणि कुबड्या म्हणाले.....

"हे बघा...! तुम्हाला जे काही माहिती असेल ते खरं खरं सांगा, आधीच तुम्ही खूप मार खाल्ला आहे, आम्हाला उगाच अजून मारायला लावू नका..." सावंत रंगा आणि कुबड्या ला म्हणाले....

"अव्ह साहेब,खरंच आता मारू नका...आम्ही सांगतो...!
त्या अभिज्ञाला समदं बहुतेक मालकीणबाईंनी सगळं सांगितलं असा पाटलांना संशय आला अन त्यांनी सवताच्या हातांनी मालकीणबाईंना मारून टाकलं....

आम्हांसनी फकस्त त्या मारलेल्या मृतदेहाला वाड्याच्या मागच्या अंगणात गाडायला सांगितलं, आम्ही तेवढं केलं....

पर गावात मात्र अशी अफवा पसरवली की, मालकीणबाई पाटलांचं पैकं घेऊन कुठंतरी पळून गेल्या....अन अभिज्ञा ईषयी बी आम्हीच खोट्या अफवा पसरवल्या व्हत्या...." रंगा आणि कुबड्या ने सगळ्यांसमोर सगळं खरं खरं सांगून टाकलं.....

"पाटीलss, आता तुम्हाला अटक होणारच...! तुमच्यावर तीन-तीन खुनांचे आरोप आहेत....तुमचं पुढे काय होईल ते कोर्टच ठरवेल...!
सावंत घेऊन जा या तिघांना...!" डी.सी.पी साहेबांनी सावंत ना सांगितलं....

"ए.सी.पी अजिंक्य भोसले.... मला तुमच्या बद्दल खरंच खूप आदर वाटायचा, तुम्ही वरून किती साधे सरळ असल्याचा आव आणता हो...! मला वाटायचं आपल्या चौकीत असा चांगला आणि प्रामाणिक ऑफिसर ए.सी.पी च्या पोस्ट वर आहे तर आपल्या जवळपासच्या गावात गुन्हे घडणार नाहीत.....

पण ते म्हणतात ना दिसतं तसं नसतं तेच खरंय...! आता जोवर कोर्ट काही निर्णय देत नाही तोवर तुम्ही ड्यूटी वर येऊ शकत नाही...." डी.सी.पी साहेब म्हणाले....

"कुलकर्णीss..! ही केस कोणी फाईल केली होती? त्यांना चौकीवर बोलवा....
आणि सावंत तुम्ही अभिज्ञाच्या मामाला आणि सीमाला देखील चौकीवर बोलावून घ्या....!"डी.सी.पी साहेब म्हणाले....

"ओके सर...!
सर, actually ही केस माझ्याच पुतण्याच्या मित्राने आदित्यने फाईल केली होती...!"इन्स्पेक्टर अरविंद म्हणाले....

"ओss मग सध्या कुठे आहे तो?" डी.सी.पी साहेबांनी इन्स्पेक्टर अरविंद ना विचारलं....

"सध्या सर ते तिघेही म्हणजेच आदित्य, मोहित आणि नेहा त्यांची मैत्रीण इथेच एका हॉटेलवर राहतायत....

अरे हो...! मी विसरलोच, त्यांना सुद्धा ह्या केसमुळे इथेच थांबावं लागलं....

मी त्यांना लगेच फोन करून सगळं सांगतो म्हणजे ते बिचारे आपापल्या कामासाठी घरी जातील....!"इन्सपेक्टर अरविंद हसत म्हणाले....

"नको कुलकर्णी...! तुम्ही एक काम करा त्यांना इथे चौकीवर बोलवून घ्या, मला त्यांचे आभार मानायचे आहेत....
कारण त्यांच्यामुळे आपल्या चौकीला लागलेली कीड म्हणजेच भोसले, त्यांचा खरा चेहेरा समोर आला....
हो, पण त्यांना असं सांगा की मला काहीतरी चौकशी करायची आहे..."डी.सी.पी साहेबांनी इन्स्पेक्टर अरविंद ना सांगितलं.....

इन्स्पेक्टर अरविंद नी मोहितला फोन लावला,
" हॅलो...!मोहित तू, आदित्य आणि नेहा जरा चौकीवर या डी.सी.पी साहेबांचं काम आहे तुमच्याकडे...!" इन्स्पेक्टर अरविंद मुद्दाम म्हणाले.....

तसे तासाभरात आदित्य, नेहा आणि मोहित हॉटेल वरून चौकीवर आले....तेव्हाच अभिज्ञाचा मामा म्हणजेच सदाभाऊ आणि सीमा देखील चौकीवर पोहोचले....

"बोला काका, काय झालं? डी.सी.पी साहेबांना माझ्याशी काय बोलायचंय?अभिज्ञाच्या केस चा काही निकाल लागला का?" आदित्यने इन्स्पेक्टर अरविंद ना विचारलं....

"व्हय साहेब सांगा की काय झालं? असं गडबडीत का बोलावून घेतलं?" सदाभाऊ म्हणाले....

"हो साहेब सांगा ना, सागरचा काही शोध लागला का?"सीमा म्हणाली....

"मी सांगतो...!,अभिज्ञाचा व सागरचा खून करणारे मारेकरी एकच आहेत....ते फक्त सीमाला खोटं सांगत राहिले की तुझा भाऊ आमच्या ताब्यात आहे....

आम्ही गुन्हेगारांना अटक केली आहे....!

म्हणूनच आदित्यला आणि त्याच्या मित्रांना थँक्स म्हणायला इथे बोलावलं आहे...!

कारण,त्यांनी दिलेलं अभिज्ञाचं स्केच आणि आदित्यला आठवलेला अभिज्ञाचा अपघात यावरूनच आपण अभिज्ञाच्या मारेकऱ्यांना शोधू शकलो आणि शिक्षा करू शकलो....!

कुलकर्णीss, खरंच खूप हुशार आणि कर्तबगार आहे तुमचा पुतण्या...!अगदी जसंच्या तसं स्केच काढलं त्याने अभिज्ञाचं...!म्हणूनच आपल्याला ही केस लवकर solve करायला मदत झाली...ह्या पोरांनी देशाचे चांगले आणि जागरूक नागरिक म्हणून स्वतः च कर्तव्य पार पाडलं..."डी.सी.पी साहेब हसत म्हणाले.....त्यांच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.....

"अहो सर उलट मी तुम्हाला थँक्स म्हंटल पाहिजे, तुम्ही फक्त मला पडलेल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून चार-पाच वर्षांपुर्वीच्या अपघाताचा शोध लावलात आणि अभिज्ञाला न्याय मिळवून दिलात...."आदित्य म्हणाला....

"न्हाय पोरांनो...! अव्ह डी.सी.पी साहेब बराबर बोलायलेत.... जर तुम्ही तुम्हाला पडलेल्या स्वप्नाइषयी जर कोणाला बोलला नसतात तर माझ्या अभिज्ञाला कधी बी न्याय मिळाला नसता...!"हे सर्व बोलताना सदाभाऊंच्या डोळ्यात पाणी तरळत होतं आणि त्यांचे हात आपोआप जोडले गेले....

"अहो मामा, काय करताय तुम्ही हे? मी सुद्धा तुमच्या भाच्यासारखाच आहे, हात नका जोडू...!"आदित्य सदाभाऊंना म्हणाला....

"कोण व्हते साहेब ते ज्यांना माझ्या पोरीचं चांगलं बघवलं न्हाय?" सदाभाऊंनी डी.सी.पी साहेबांना विचारलं....

"पाटील आणि पाटलांच्या माणसांनी हे सगळं केलंय आणि मला हे सांगायला लाज वाटते की, ह्या सगळ्यात पाटलांना ए.सी.पी भोसलेंनी मदत केली...म्हणूनच अभिज्ञाला न्याय मिळायला उशीर झाला...."डी.सी.पी साहेब म्हणाले......

पण सदाभाऊंना आणि सीमाला मात्र अभिज्ञाला आणि सागरला उशिरा का होईना पण न्याय मिळाला यात समाधान होतं....म्हणून ते हसतमुखाने आपापल्या घरी जाण्यासाठी निघून गेले....

आदित्य, नेहा आणि मोहितसुद्धा अरविंद काका आणि डी.सी.पी साहेबांचा निरोप घेऊन हॉटेलवर जायला निघाले.....

"सावंत तुम्ही सुद्धा या केसमध्ये खूप मदत केलीत, तुमच्यामुळेच आम्हाला अजिंक्य भोसलेंचा खरा चेहेरा कळला.... शेवटी तुमचा संशय खरा ठरला...ह्या चौकीतील आम्ही सर्वजण तुमचे आणि कुलकर्णींचे ऋणी राहू....!"डी.सी.पी साहेब सावंत ना म्हणाले.....

"सर अहो, आम्ही एका पोलीस ऑफिसरचं कर्तव्य पार पाडलं, ती आपल्यासाठी एक जबाबदारी आहे...!" इन्स्पेक्टर अरविंद म्हणाले......

"हो, आता तुमची आणि सावंत ची जबाबदारी वाढणार आहे...!"डी.सी.पी साहेब सावंत आणि इन्स्पेक्टर अरविंद ना म्हणाले....

"म्हणजे?"इन्स्पेक्टर अरविंद व सावंत या दोघांनीही एकदम विचारलं.....

"म्हणजे, अभिनंदन...!कुलकर्णीss तुम्ही आता सिनिअर इन्स्पेक्टर नाही, ए.सी.पी अरविंद कुलकर्णी झाले आहात....

सावंत तुम्हीसुद्धा आता हेडकॉन्स्टेबल नाही, सब इन्स्पेक्टर सावंत झाले आहात.....तुमच्या दोघांचेही मनापासून अभिनंदन आणि पुढे देखील याच जोशात काम करत रहा....!" डी.सी.पी साहेबांनी इन्स्पेक्टर अरविंद आणि सावंत ना आनंदाने प्रोमोशन आणि शुभाशीर्वाद दिले.....

"थँक यु सो मच सर...!मी ए.सी.पी झालो ह्यापेक्षा तुमच्यासारखे आमच्यावर विश्वास ठेवणारे सिनिअर आम्हाला मिळाले ह्यातच मला आनंद आहे.... आम्ही तुमचा आमच्यावरील विश्वास कधीच मोडू देणार नाही.....!

जय हिंद सर...!(सावंत आणि इन्स्पेक्टर अरविंद नी डी.सी.पी साहेबांना सेल्युट केला...) आणि आपापल्या कामासाठी निघून गेले....

तोवर इकडे आदित्य, नेहा आणि मोहित घरी जायची तयारी करून कॅबमध्ये बसले होते..... तसंही तिघांची रजा संपत आली होती, म्हणून त्यांना उद्याच ऑफिसला जावं लागणार होतं..... नवीन CEO चं देखील उद्या स्वागत करायचं होतं.....

नेहा आणि मोहित गाडीत बसल्यापासून ते घरी पोहोचेपर्यंत आदित्यशी झालेल्या घटनेबद्दल बोलत होते, त्याने त्याच्या स्वप्नावर ठाम राहून अभिज्ञाला न्याय मिळवून देण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्यासाठी आदित्यचे कौतुक करत होते.....घरी पोहोचेपर्यंत हा कौतुक सोहळा सुरूच होता.....

घरी पोहोचल्यावर आदित्य जरा जास्तच relax आणि खुश वाटत होता....रात्री स्वप्नात त्याला आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा अभिज्ञा दिसली, पण आज तिचा चेहेरा आधीपेक्षा हसरा आणि खुललेला दिसत होता....तिच्या चेहऱ्यावरील तेज जणू सुर्यप्रमाणे चमकत होतं....ती खळखळून हसत होती.... जणू आदित्यने तिला न्याय मिळवून दिला म्हणून ती त्याला धन्यवाद म्हणत आहे असे भासत होते.....

दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य जेव्हा उठला तेव्हा त्याला तशीच खळखळून हसणाऱ्या अभिज्ञाचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता, आणि तिचं ते खळखळून हसणं त्याच्या कानात घुमत होतं.....

तेवढ्यात त्याच्या आईने त्याला हाक मारली, "अरे आदी, उठ...! कामाला नाही जायचं का?..."

आईच्या आवाजाने आदित्यची तंद्री तुटली आणि तो तयार होऊन ऑफिसला जायला निघाला.....आज आदित्यचा चेहरा फारच खुललेला आणि चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं.....

आदित्य ऑफिस मध्ये पोहोचला तेव्हा, नवीन CEO च्या स्वागतासाठी ऑफिसमध्ये नेहा आणि मोहित नी फुलांचे बुके आणि फुग्यांनी सजावट केली होती....

सगळेच काही ना काही तयारी करण्यात व्यस्त होते.....

तेवढ्यात नवीन CEO ची एन्ट्री ऑफिसमध्ये झाली......

चेहेरा स्कार्फने झाकलेला, डोळ्यांवर काळ्या रंगाचा गॉगल घातलेला, छान पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेला.....

ऑफिसमध्ये येताच त्यांनी आधी चेहेर्यावरचा स्कार्फ काढला आणि नंतर डोळ्यांवरचा गॉगल काढला......

त्यांचा चेहरा बघून आदित्य, नेहा आणि मोहित यांना धक्काच बसला.....नेहा आणि मोहितने स्वतःला सावरलं.....

नेहा हळूच आदित्यच्या कानात कुजबुजली,"ईट्स ओके...! जगात सारखी दिसणारी माणसं असतात...! आत्ता त्यांचं स्वागत करणं महत्वाचं आहे, तू मॅनेजर म्हणून तुझं कर्तव्य पार पाड....!"

नेहाने असं सांगितल्यावर आदित्यनेही स्वतःला पुरेपूर सावरण्याचा प्रयत्न करत त्या नवीन CEO चहा समोर गेला आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं......

"हॅलो मॅम, मी आदित्य सरंजामे...! आपल्या कंपनीचा मॅनेजर...!" आदित्यने स्वतःची ओळख करून दिली.....

"हॅलो, मी अनुष्का नायर....! ह्या कंपनीची CEO...! तुमची नवीन बॉस....! तुम्हा सर्वांना भेटून आनंद झाला.... आजपासून आपण एकत्र काम करू आणि कंपनीला नफा मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू....!" अनुष्का ने स्वतः ची ओळख करून दिली.....

नंतर आदित्यने नेहा, मोहित आणि बाकी स्टाफ ची ओळख अनुष्का मॅडम ना करून दिली..... सगळ्यांशी ओळख झाल्यावर मॅडम आपल्या केबिनमध्ये गेल्या.......

"नेहाss, पुन्हा तोच हुबेहूब चेहरा, लांबसडक केस, बोलके डोळे....! ही नक्की सुरुवात आहे की शेवट....!" असं म्हणत आदित्य बेशुद्ध झाला.......

"नक्की कोण असेल ही अनुष्का?" नेहा विचार करत बसली....

(ह्या कथेचं दुसरं पर्व कोणाकोणाला वाचायला आवडेल? Comment fast... )

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Reshma Sonawane

Housewife

Listening and reading